कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

कविता : बागेतील झाड



एकदा बागेतल्या सुंदर झाडाकडे पाहून
मी हसून म्हणालो,

"बागेत आहेस म्हणून खुजाच राहीलस तू
कारण
शोभेसाठी जाणीवपूर्वक छाटल्या जातात तुझ्या फांद्या
निबीड अरण्यात असतास तर
वाढला असतास हवे तसे, हवे तेवढे
फुलला असतास, बहरला असतास मनासारखे"

झाड शांतपणे उत्तरले

"मित्रा,
मी झाड आहे!
एकदा मुळं घट्ट केल्यावर
मी स्वतः बदलू शकत नाही माझी जागा
माझे स्वातंत्र्य मर्यादित आहे.
पण,
तू तर चालता बोलता माणूस
तरीही तू विचारांच्या काटेरी कुंपणात का घेरला गेलास?
तू देखील वाढत नाहीस का जाती, धर्मांच्या बागेत?
अंधानुकरणासाठी तुझ्या विचारांच्या फांद्या
नाही छाटत का कुणी?
अरे मित्रा!
या कुपंणातून बाहेर येऊन "माणूस" म्हणून जगून बघ
जगशील सुखाने मनासारखे
फुलशील, बहरशील विचाराने"

मी निरुत्तर झालो
बागेतून ताडकन उठून थेट निघालो
"त्या" कुंपणाच्या तारा कापण्यासाठी

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

कविता : सुपरनोव्हा



एकत्र येतात अणुरेणू तेंव्हा
या ब्रह्मांडात जन्मतात
सजीव आणि निर्जीव
जन्मतात ग्रह-तारे, उपग्रह, उल्का
माणसं, पशुपक्षी, झाडं-वेली
आणि दगडधोंडे सुद्धा!

जन्मतात म्हणजे एकदिवस मरतातही
कारण
प्रत्येकजण जन्मतो तो मरण्यासाठीच.....

नारायणा!
काही अब्ज वर्षांपूर्वी
तुही असाच जन्मलास या आकाशगंगेच्या उदरात
याच अणुरेणूंच्या पुंजक्यातून
आणि
तुझ्या भोवताली परिक्रमा करणाऱ्या
धुळ-वायूंच्या शिल्लक ढगांतून
तू जन्माला घातलीस
ही सृष्टी आणि हे सौरमंडळ

नारायणा!
तूच निर्मिलीस पंचमहाभूते,
जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी
तूच काठोकाठ भरलेस हे सप्त सागर
तूच हिमाच्छादित केलीस ही उंच गिरीशिखरे
अरे!
हे संपूर्ण चराचर म्हणजे तुझाच तर अंश आहे.....
नाही का?

नारायणा!
आम्ही जेंव्हा आईच्या उदरातून
अणुरेणूंचे गोळे होऊन बाहेर आलो
तेंव्हा तूच कोंबलास आमच्या नाकातून श्वास
आणि तेवत ठेवलेस हे प्राण
तुझ्याच प्रकाश संश्लेषणात बनलेल्या अन्नातून
आम्ही मिळविली जगण्यासाठी लागणारी जीवनसत्वे

नारायणा!
लहानाचे मोठे होत असताना
खेळलो याच अणुरेणूंच्या दगड मातीत
पुढे शिकलो मोठे झालो
तेव्हा वाढत गेली आमची महत्वाकांक्षा
म्हणून
जमा करत बसलो तुझीच मुलद्रव्ये
साठवले अमाप कागदी गठ्ठे
आणि आता म्हणतोयस की,
तुझं आयुष्य संपत चाललंय
अरे!
मग या आमच्या सगळ्या संचयाचे ढिगारे
आम्ही कुणाच्या हवाली करायचे?

नारायणा!
तू म्हणे, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात
फुगत जाशील राक्षसा सारखा
गिळत सुटशील तुझ्या चिल्या-पिल्याना
आणि
तुला जन्म देणारेच अणुरेणू करतील उठाव
तेंव्हा तू क्षणार्धात फुटशील फुग्यासारखा
तुझ्या सुपरनोव्हा मधून निघणाऱ्या ज्वाळातून
तू बेचिराख करशील ह्या सृष्टीतले सगळे अणुरेणू,
त्यात असतील आमच्या संचयाचे ढिगारे देखील
मग आमचा हा मुलद्रव्यांचा अट्टाहास कशासाठी?
.....
(फोटो सौजन्य : नासा)

शनिवार, २० जुलै, २०१९

कविता : रोज तू स्वप्नात येतोस



रोज तू स्वप्नात येतोस
म्हणून कधी जाणवत नाही
आपल्या दोघांतील काळाच्या पडद्याचं अंतर...

हे अंतर
म्हटलं तर अगदीच जवळ
फक्त एका क्षणाचं
म्हटलं तर खूपच लांब
अनेक वर्षांचं

तू
चुकता, कंटाळता येतोस
आणि अजूनही माझ्यासोबत खेळत रहातोस
तेच बालपणीचे खेळ
रंगीत गोट्यांचे रिंगण,
सूरपारंब्या,
धप्पाकुटी आणि
विटी दांडूचा डाव,

पण खरं सांगू का?
स्वप्नाबाहेरील दुनियेत
मी आता खेळत नाही असले खेळ
कारण
मी तेव्हाच सोडून दिलंय खेळणं
तू पडद्याआड गेल्यापासून

तुला नवल वाटेल
पण सांगतो
मी या बाजूला आता मोठा झालोय
मोठा म्हणजे बघ, म्हातारा होईल काही वर्षात
केस पांढरे झालेत, डोक्यावर टक्कल पडलंय
तू मात्र आहे तसाच आहेस
अगदी लहानपणी होतास ना, तसा....
काय रे!
पडद्याआड तुझं वय वाढत नाही का?

रोज तू स्वप्नात येतोस
तेव्हा आपण दोघे मिळून अजूनही हिंडत असतो
रानातील ओढ्याकाठी
कधी मधाचे पोळे काढत
तर
कधी सापाची कात शोधत
तुला ती संग्रही ठेवायला खूप आवडायची
पण आता मी फार घाबरतो
सापाची कात बघीतली की
काळीज धडधडतं , हात थरथरतात

स्वप्नात तू अजूनही हट्ट धरतोस पोहण्याचा
पोहणे हा तुझा आवडता छंद
पोहायला जाता यावं म्हणून
कधी कधी तू शाळेला दांडी मारायचास
तू नेहमीच हट्ट करायचास
मी देखील पोहायला शिकावं म्हणून
पण
मला अजूनही पोहता येत नाही
तुझ्यानंतर कुणी मला पोहणे शिकवलेच नाही

तू रोज स्वप्नात नसता आलास
तर
माझ्या संसाराचा गाडा ओढता ओढता
कदाचित मला विसर पडला असता तूझा
तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांचा
म्हणूनच
तू रोज स्वप्नात येतोस
आणि
मला जाणीव करून देतोस
अतूट आहे आपल्यातील मैत्रीचा धागा
कळाचे पडदे तोडू शकत नाहीत नातीगोती
नाती अमर असतात
आपल्या मैत्री सारखी

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

कविता : फांदी तुटली तुटली




फांदी तुटली तुटली
त्याला सुगरणीचा खोपा
मारी झाडाला चकरा
जीव झाला वेडापिसा

फांदी तुटली तुटली
आता कुठं ठेवू बाळ
कसा नियतीचा फेरा
झाला घरट्याचा काळ

फांदी तुटली तुटली
माझ्या पिल्लांची झोळी
आता कुठं गाऊ अंगाई
सदा भरलेली डोळी

फांदी तुटली तुटली
गेला मोडून संसार
दिस भरले गर्भाचे
त्याला कशाचा आधार

~ गणेश
(१८.०१.२०१७)

गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

कविता : धुके



आजही छान धुके पडले आहे. मेट्रोतून ऑफीसात येतांना त्या धुक्याची सफेद चादर पाहुन सुचलेल्या ताज्या ताज्या ओळी...

धुके

धुके आज पडले किती किती छान
रस्त्यावर लांब लांब मोटारीची रांग
चालक दादा चालक दादा हळू हळू
हाक तुझी गाडी नको फार पळू

सावकाश चल दूरचे काही दिसतय का?
नको काढू फोटो मन स्वस्त बसतय का?
चालक दादा चालक दादा हळू हळू
पोलिसची गाडी मागे नको फार पळू

लाव मोटारीचे लाल लाल इंडिकेटर
मागच्यांना कळू दे पुढे आहे मोटर
चालक दादा चालक दादा हळू हळू
शाळा आहे पुढे नको फार पळू

एक दिवस उशीर झाला तरी चालेल
कामावर तुला आज कोण नाही बोलेल
चालक दादा चालक दादा हळू हळू
तुझ्या घरी छोटे बाळ नको फार पळू

~ गणेश

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

कविता : माझी फुलबाग

वाडग्याच्या एका कोपर्‍यात
जिथं आजूबाजूला होते
एक भले मोठं चिंचेचे झाड
कडब्याच्या गंजी, गायींचा गोठा  
शेणाचा उकिरडा, सरपणाचे फास
चिपाटाचे ढिगल, भुसारा
आणि अजूनही बरच काही...

तिथंच एका छोट्याशा जागेत
होती एक माझी फुलबाग
जीवापाड जपलेली आणि
मेहनतीने फुलवलेली
माझ्या बागेत होती नानाविध फुलझाडं
मोगरा, प्राजक्त, झेंडू, सदाफुली, गोकर्ण, जास्वंद
कर्दळी, काटेकोरंटी, शेवंती, रूई आणि निशिगंध
गणेश वेल, जाईजुईचे वेल तर चौफेर पसरायचे
फुलझाडां व्यतिरिक्त असायचा भाजीपाला
शेवगा, पपई, वांगी आणि मिरची

शाळा सुटली की मी बागेकडे धाव घेई
झाडांना पाणी घाली
कितीदा शेणखतचा डोस देई
सुट्टीच्या दिवशी तर मी बागेतच रमायचो 
कळ्या फुलांवर अलगद हाथ फिरवायचो
फुललेल्या फुलांचा सुगंध घ्यायचो
रंगीबेरंगी फुले पाहुण फार आनंदात जगायचो
झाडांची काळजी घेण्यातच मग सुट्टी संपत असे

माझी फुलबाग अनुभवायची
वर्षाचे सारे सण आणि उत्सव
गणपतीच्या आरतीचा हार
नवरात्रातील फुलांची माळ
दसरा दिवाळीला झेंडूचा हार
शनीला रूईच्या पानाफुलांचा हार
महादेवाला गोकर्ण चा हार

ताई बनवायची मोगर्‍याचा गजरा
प्राजक्ताची फुले वेचायला तर
गल्लीतल्या मुली पहाटेच जमायच्या
फुलासाठी भांडण खेळायच्या

वर्षामागून वर्ष गेली
बालपण सरले 
शाळा शिक्षण पुर्ण झाले
नोकरी लागली
घर बदललं
गोठाही मोडला
गावापासून खूप दूर आलो
माझी फुलबाग तोपर्यंत सुकून गेली

आज जेंव्हा जुन्या वाडग्यात जातो
फुलबागेची जागा ओसाड दिसते
कधी काळी जिथं फुलं फुलली
तिथं खाचखळगे पडलेत
प्राजक्ताच झाड तेव्हढ आहे
नियतीच्या पावसाळ्यावर तग धरून
प्रेमाने पाणी घालणारं
फुलासाठी भांडणं खेळणारं
आज तिथं कुणी कुणी नाही

माझ्या फुलबागेची जागा बघीतली की,
परत एकदा मला बाग फुलवावी वाटते
पण कधी?
आयुष्याच्या उतारावर कधीतरी
वेळ मिळेलच.....

~ गणेश

शब्दार्थ :
१. वाडगं - जनावरांचा गोठा, शेतीचे आवजारे, वैरणसाठी असलेली जागा
२. सरपणाचे फास - रचून ठेवलेले सरपण
३. भुसारा - मळणी यंत्रातून धान्य निघाल्यानंतर बाकी राहिलेला भूसा साठवलेले ठिकाण

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

कविता : यजीदी संभोग

काळ्या श्वापदांच्या कळपाने घेरून ठेवलेल्या खंडरातील
अतृप्त संभोग गृहात बंदिवान झाल्या कित्येक नाजूक पर्‍या
होत्या त्यात चिमुकल्या आणि किशोरवयीन उमलत्या कळ्या

विवस्त्र करून करकचून आवळलेल्या त्यांच्या देहाचा
आस्वाद घेण्यासाठी लागलेल्या लांबलचक बारीत
लिंग ताठर करून उभी होती पिसाळलेली श्वापदे

अविरत चालणार्‍या बलात्कारामुळे गतप्राण झाल्यात सर्व
त्यांच्या फुटलेल्या हंबरड्याने भिंतीनांही तडे गेलेत
आणि ओरडून ओरडून देह चेतना हरवून बसलाय
मरणाच्या उंबरठ्यावर असलेले त्यांचे आत्मे
मोठ्याने किंचाळत आहेत......

मयुरेश्वरा! मयुरेश्वरा!
हे मयुरेश्वरा!.......

मृत्यूवर आमचा हक्क असतानाही
त्याने का पाठ फिरवली आहे रे?
आम्हाला मृत्युच्या कवेत घेऊन झेपवण्यास  
तुझे पंख आज कसे शक्तीहीन झाले आहेत?
अजून किती लिंगाचा मारा भोगावा लागेल?
म्हणजे कठोर बनलेल्या मृत्यूचे मन वितळेल
आणि आम्हाला घेऊन उडशील या रेताडातून दूर कुठेतरी.....

आणि जाताना फक्त तुझा मुलायम मोरपीस
एकदाच अंगावरून फिरवत तुझी तरी माया लाभूदे आम्हाला

आम्ही यातना भोगताना त्या यातनांनाही यातना झाल्या असतील रे!
आमच्या सहनशीलतेने एवढी उंची गाठलीय की
आता इच्छा असूनदेखील यातनेच्या खोल डोहात बुडताही येत नाही
वासनेच्या बिछायतीवर आमच्या देहाच्या मखमली झालरी
लोंबकळत आहेत किती दिवसापासून (?)

वस्रहीन आमच्या योनी सताड उघड्या आहेत
सर्वांनाच उपभोगण्यासाठी ........
त्यातून त्यांच्या वीर्याचा झरा अखंड वाहत आहे
स्तनं, गाल, ओठ, कान, मान अशा सर्व सर्व अंगावर
त्यांनी दाताने असे चावे घेतलेत की ते कधीही मिटणार नाहीत  
आमच्या अंगाची चाळणी करून ठेवलीय या धर्मवीरांनी (?)

विधात्या मयुरेश्वरा!
आम्हा यजीदी कळ्यांनी काय रे असा अपराध केला होता?
वाळवंटात फुलायचे होते, हा काय अपराध झाला?
यजीदी म्हणून जन्माला आलो, हा काय अपराध झाला?

श्वापदांच्या मगर मिठीतून आम्हाला आता सुटायचे आहे
आणि मृत्यूच्या गुलाबी आलिंगनात घुसायचे आहे


सोडव रे! आम्हाला सोडव....
या यजीदी संभोगातून सोडव......

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

कविता : कुमार सैनिक

अंगावर दारुगोळा बांधलेला
हातात आधुनिक बंदुका घेऊन
तो 'कुमार सैनिक'(?) निघाला
आपल्या धर्माची रक्षा करण्यासाठी
‘त्या’ धर्माच्या लोकांची
हत्या करण्यासाठी
तो नियंत्रण रेषा ओलांडून आतही आला
आपल्या युद्ध भूमीत
पंधरा सोळा वर्षाचा तो कुमार
हातात लेखणी पुस्तका ऐवजी
त्याच्या हतात होती खतरनाक बंदुक
लाल रक्ताच्या शाईने तो
लिहणार होता आपल्या वहीत
स्वतःचीच आत्मगाथा
खेळणीच्या बंदुकाबरोबर खेळण्याच्या वयात
रेषेच्या पलिकडची बालके खेळतात
खऱ्याखुऱ्या बंदुकांशी
कारण त्यातूनच तर ते होणार आहेत
भविष्यातले योद्धे!
कशासाठी........?
दुसर्‍याला ठार मारण्यासाठी
ते आत्ताच घेतात शिक्षण
मग त्यांना बाकीचे शिक्षण व्यर्थच
'तुम्ही मरा नाही तर जगा
पण रेषे पलिकडच्यांना ठार मारा'
हिच त्यांची शिकवण असते
आणि ध्येय त्यांचे फक्त मरण असते
अनेकांचे बळी घेऊन मारतात हे
किडा-मुंग्यांसारखे, अगदी बेवारस
ज्या भूमीतून ते शिक्षण घेऊन येतात
ती भूमीही त्यांना स्वीकारीत नाही
शेवटी माती इथेच मिळते
तीही साम्मानाने!

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

वाळवंटातील श्रावण

श्रावणमासी या वाळवंटी
सूर्य नभीचा आग ओकतो
पन्नाशीवर चढवून पारा
आम्हास तो उभा भाजतो

ए सी घरातून बाहेर पडता
सर घामाची येते धावून
अंगाखांद्यावर ओघळून ती
इकडून तिकडे जाते भिजवून

छत्री असे जरी डोक्यावर
ढग घामाचा तरी गाठतो
गुपचूप अंगातून तो पाझरत
पाण्यासाठी कंठास दाटतो

आकाश निरभ्र असे निरंतर
वाळूस असे रान मोकळे
मृगजळी त्या खेळती पिंगा
क्षणात वाळूचे धुके झाकळे

सरते शेवटी श्रावणमासी
दुसरे कशाचे कौतुक नसे
पिकल्या गाभोळ्या खजूराचे
तेवढेच काय ते भाग्य असे

~ गणेश (दुबई)

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

कविता : मरण

स्वप्नात देवदूतांचा दृष्टांत झाला आहे
समय 'तो' माझाही समीप आला आहे

सांज झाली तरी अजून गोठा रिकामा का?
रेड्याच्या आवाजाची हुरहुर मनाला आहे

उगाचच ढाळू नका आश्रू मगरीचे कुणी
हितशत्रूंचा गराडा माझ्या उशाला आहे

वीष्ठेत माझ्याच लोळण्याच्या यातना किती?
ठेवा नरकासाठी थोड्या... परवा कुणाला आहे?

मरू द्यारे मला माझ्या सुखाने आता तरी
मरणाच्या स्वप्नावर तुम्ही... घातला घाला आहे

छातीत आहे धडधड अजूनही यार हो
तिरडी बांधण्याची घाई कशाला आहे?

खंगलेल्या देहाचा उडाला भडका शेवटी
सुटलो बुवा एकदाचे!... जो तो म्हणाला आहे

~ गणेश

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

कविता : आई


या वाळवंटात तुझी आठवण येते खूप आई
वाळूच्या कणाकणात दिसते तुझेच रूप आई

तुझ्या पुरण पोळीचा दरवळ आठवतो तेंव्हा
स्वप्नातही दोन चमचे जास्त वाढतेस तूप आई

दिवाळीचे खमंग फराळ संपून जायचे तेंव्हा
लपवून ठेवलेले लाडू द्यायचीस गुपचूप आई

खोड्यांना वैतागून शेजारी तक्रारीला यायचे तेंव्हा
माहित असुनही तोंडाला लावायचीस कुलूप आई

पावसात खेळून खेळून आजारी पडायचो तेंव्हा
हुरड्याच्या पीठाचे बनवून द्यायचीस सूप आई

बुधवार, २७ जुलै, २०१६

कविता : शाळेचं दप्तर

माझं शाळेचं दप्तर
होतं फार मजेशीर
पांढर्‍या खताच्या गोणीला
दोन बंध लावून शिवलेलं

त्यातच कोंबलेली असत
वह्या, पुस्तकं, लाकडी पट्टी
कोरे कागद, पॅड, रंगपेटी
आणि जेवणाचा डब्बा

ओमेगाच्या कंपास पेटीला
शिवलेला होता एक खिसा
कारण कंपास पेटीत
माझा फार जीव होता

वर्षात वह्या पुस्तकं बदलायची
पण कंपासपेटी तीच असायची
कंपास पेटीला आतून चिकटवलेली होती
दरवर्षीच्या ध्वज दिनाची तिकीटं

दप्तरात होती अजुन एक
खताची मोकळी पांढरी गोणी
स्वच्छ धुतलेली आणि
दाबून घडी करून ठेवलेली

वर्गात नव्हती बाकं तेंव्हा
आम्ही गोणी अंथरूणच बसायचो
पावसाळ्यात हीच गोणी
घोंगता करून वापरायचो

स्वतःला पावसात भिजायला
फार फार आवडायचं
पण दप्तर भिजल्यावर
फार वाईट वाटायचं

दप्तर जरी मळकटलेलं होतं
पण मला ते प्रिय होतं
कितीतरी वस्तूंनी भरलेल आसलं
तरी त्याचं कधी ओझं नाही वाटलं

एक दिवस शाळा संपली
ते कुठेतरी अडगळीत पडलं
पण मला अजूनही आठवतं
माझं 'शाळेचं दप्तर'

गुरुवार, २१ जुलै, २०१६

कविता : चल जाऊ पोहायला

पाणी आहे खूप
गावाच्या नदीला
मंदिराच्या बारवेला
रानातल्या विहीरीला
दगडाच्या खाणीला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

गवताची गर्दी झालीयं
रानातली पिकं वाढलीयं
मकाला कणसं आलीयं
लपायला जागा झालीयं
बोरं पिकलीत झाडाला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

शाळेला दांडी मारू
गुपचूप खाणीवर जाऊ
दुपारच्या सुट्टीत ऊस खाऊ
दप्तर लपवून ठेवू
कपडे लटकून झाडाला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

दगडाचा ठाव आणू
पाण्यात धराधरी खेळू
दोघात शर्यत लावू
पोहण्याची मज्जा लुटू
भांडणे ठेवून बाजूला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

उन्हात बसून चड्डी वाळवू
दुपारनंतर मुलांसोबत निघू
त्यांच्याकडून वर्गपाठ मिळवू
घरी जाऊन अभ्यास करू
पण सांगायचे नाही कोणाला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

मंगळवार, १२ जुलै, २०१६

कविता : धबधबा



झरझर धारा वाहत येती डोंगर माथ्यावरूनी
क्षणभर वाटे जणू दुध सांडले रंग त्यांचा पाहुनी

खळखळ वाहत त्या जल धारा भेटती मोठीच्या गळा
ओसंडूनी त्या पुढे धावती साकारण्या निसर्ग सोहळा

हिरव्या रंगात धवल शोभतो त्या दूर माथ्यावरी
गार तुषार पवन धावून आणतो नकळत गालावरी

कोसळणारा तो कोलहल चहूकडे रणभूमी सम भासे
किरणे त्या केशरी भास्कराची सप्तरंग उधळीत असे

कोण आडवी धबधब्यास? तो चिर तांडव नृत्य करी
खोल दरीतील अक्राळरूप त्याचे अंगावर रोमांच भरी

शुक्रवार, १ जुलै, २०१६

कविता: माझा ताजमहाल

तुझ्या प्रेमाखातर ताजमहाल मी
कसा कोठे बांधणार होतो

शब्दांचा जरी बादशाह मी
दगड कसे साळणार होतो

तुझ्या प्रेमाचा कवी मी
कविता एक करणार होतो

मुमताज तुला मानले मी
शहाजहान तुझा होणार होतो

ओळीत तुला साठवून मी
माझा ताजमहाल घडवणार होतो

रविवार, १९ जून, २०१६

कविता : बगळे

सांजवेळी त्या रस्त्याकडेच्या सुबाभळीवर
बसावेत असंख्य बगळ्याचे थवे
मग ती सुबाभळ कसली?
ते तर कापसाचे उंच झाड
गगनाला भिडलेले
दिवसभर दमून भागून
विश्रांतीसाठी यावे त्यांनी
रात्रभर विसावल्यानंतर
सूर्याची किरणे अंगावर येताच
उंच उंच भरारी घेत
निघावे त्यांनी परत
आपल्या कामाला
मग त्या आठही दिशा
उजळाव्यात पांढर्‍या शुभ्र बगळ्यानी

शुक्रवार, १७ जून, २०१६

कविता : मैल

तो अजूनही तेथेच उभा होता
उन्हा तान्हात, पाऊस पाण्यात
गार वार्‍या वादळात
कित्येक वर्षाचा अनुभव
मनाशीच बांधून
तो तसाच उभा होता
सारखा एकटक पहात
कधी नाही कोणाला घाबरला
येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूना न्याहाळत
त्यांच्या रोजच्या जीवनातील प्रसंग पहात
अश्या गेल्या असतील कित्येक पिढ्या
त्याच्या डोळ्यासमोरून
दुसर्‍याचे सुख पाहतांना
त्याने आपल्या हाल अपेष्टांची
कधी नाही केली पर्वा
तो दुसरा तिसरा कोणी नव्हता
तो होता रस्त्याकडेचा एक मैल

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

कविता : वाळवंटातील तुळस


कंपनी समोरच्या त्या ओट्यावर
एक हिरवीगार तुळस नियमित बहरते
पूर्वजांच्या देशातल्या आम्हा बांधवांना
ती रोज आपुलकीने निरखते

कोण कुठली मी आभागी म्हणत
आपली केविलवाणी पाने फडफडवते
स्वच्छंदी होऊन वार्‍या बरोबर झुलते
स्वतःशीच कधी हसते कधी रुसते

सणासुदीला ती फार एकटी पडते
कार्तिक द्वादशीला तिची नजर
चातका सारखी चहूकडे भिरभिरते
चिंचा सीताफळ बोरांची ती वाट पहाते

या ओसाड वाळवंटातील उन्हात
ती फार तळमळतेय घुटमळतेय
गटारीच्या पाझरात मुळं घट्ट करून
आपुलकीची आपली माणसं शोधतेय

तिची इवली इवलीशी हिरवी पाने
जांभळ्या फुलांच्या कोवळ्या मंजिऱ्या
वाळून उगवलेल्या बियांची टवटवीत रोपं
नियतीच्या तुरुंगात पडलीयेत दूर देशी

रोज जाता येता ती आमच्याकडे पहाते
पण जाणिवेच्या तप्त निखाऱ्यात
निरंतर जाळणाऱ्या स्वतःच्या मनाला
कवटाळून ती अबोल होऊन जाते

एक वाळवंटातील तुळस होऊन
ती म्हणत असेल मला नाही पण
माझ्या सावलीत वाढणाऱ्या रोपांना तरी
एखाद्या वृंदावनाची कुंडी मिळेल का?