आज वडलांना
जाऊन ३२ वर्षे झाली. मी जवळपास सहा वर्षांचा असतांना माझे वडील भाऊसाहेब रामभाऊ पोटफोडे
यांचा अपघातात मृत्यू झाला. वडील वारले त्यावेळी मी पहिलीला जात होतो. लहान वयात वडलांचे
छत्र हरपल्याने त्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम मला आणि माझ्या कुटुंबियांना दीर्घकाळ
भोगावे लागले. नुकत्याच चाळीशीत प्रवेश केलेल्या घरातील तरुण आणि कर्त्या पुरुषाच्या
अचानक जाण्यामुळे आम्ही सगळे कोलमडून पडलो. वडलांच्या नंतर माझ्या आजीने ती मरेपर्यंत
म्हणजे जवळपास १८ वर्षे आपल्या लाडक्या लेकाचे सुतक पाळले. वडलांना घरात आणि गावात
सगळे अण्णा म्हणायचे. प्रामाणिक वागणुकीमुळे गावात त्यांना खूप मान आणि प्रतिष्ठा होती.
त्यांच्या शब्दाला किंमत होती. गावात सगळे त्यांना घाबरायचे.
अण्णाच्या जाण्यामुळे
त्यांनी आमच्या शिक्षणाविषयी जी स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकली नाहीत. माझे शिक्षण
पुढे पूर्ण झाले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. घरात मी सगळ्यात लहान असल्याने
माझा ते फार लाड करायचे. खाऊ, खेळण्या यांची घरात रेलचेल असे. आमच्याकडे त्यावेळी राजदूत
कंपनीची मोटारसायकल होती. राजदूत गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून त्यांच्यासोबत जायला
मला खूप आवडायचे. अण्णा गाडी घेऊन बाहेर निघाले की, मी मला बरोबर नेण्याचा हट्ट करत
असे. कितीतरी वेळा मी त्यांच्या गाडी मागे धावत गेल्याचे आठवते.
राजकीय वर्तुळात
त्यांचा सक्रिय सहभाग असे. अहमदनगर जिल्हा दूध संघाचे ते अनेक वर्ष संचालकही होते.
त्यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांना त्यांनी गाई, म्हशी, बैलजोडी त्याचबरोबर शेतीच्या
इतर कामासाठी कर्ज मिळवून देण्यात मदत केली. गावातील अनेकांच्या अडीअडचणीत त्यांनी
पुढाकार घेऊन मदत केली. म्हणूनच गावातील प्रत्येक घरात त्यांना मान मिळत असे. आजही
जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात, त्यांचा आदराने उल्लेख करतात. मला असं वाटते
हीच त्यांच्या छोट्याश्या आयुष्याची खरी कमाई असावी.
दिनांक ७ जुलै १९८९ ला
जिवलग मित्र भाऊसाहेब फलके यांच्या सोबत
शेवगावला जात असतांना भगूर
गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही भाऊसाहेबांचा मृत्यू झाला. आमचे कायमचे पोरके
झालो. नियतीने आमचे बालपण कायमचे हिरावून नेले.
अण्णा तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_