बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

तालिबानी राजवटीमुळे बदलणारी आंतरराष्ट्रीय समीकरणे


 


'रोम जेव्हा जळत होते तेव्हा निरो बासरी वाजवत होता' इतिहासातील या प्रसिद्ध कथेची पुनरावृत्ती अफगाणिस्तानात झाली आहे असे म्हणावे लागेल. अफगाणिस्तान जळत होते तेंव्हा सगळे जग डोळे मिटून शांत बसले होते. निरोला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळाली, आता संपूर्ण जगाला शांत बसण्याची काय शिक्षा मिळते हे येणारा काळच ठरवेल. बरोबर २० वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेन्टर वरील हल्ल्यानंतर अमेरिकेने ज्या घाईत अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उलथून टाकली होती, अगदी त्याच घाईत तेथून काढता पाय घेतला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज ३ लाख अफगाणी सैनिकांना ७५ हजार तालिबानी हरवू शकणार नाहीत हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा आत्मविश्वास किती पोकळ होता हे तालिबानने दोनच महिन्यात संपूर्ण अफगाणिस्तानवर परत सत्ता प्रस्थापित करून दाखवून दिले. या सत्तांतराने येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील समीकरणे पार बदलून जाणार आहेत.

अफगाणिस्तानातील सत्तांतराचा सर्वाधिक फायदा पाकिस्तान भारताविरोधात कसा घेता येईल या प्रयत्नात राहणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी चाल खेळायला सुरुवात देखील केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 'तालिबानने अफगाणिस्तानला गुलामगिरीच्या साखळ्यातून मुक्त केले आहे' असे विधान करून अफगाणिस्तानातील सत्तांतराचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. सामरिकदृष्ट्या अफगाणिस्तानला लागून असेलेली सीमा पाकिस्तानला शांत ठेवायची आहे. जेणे करून जास्तीत जास्त सैनिक हे भारतीय सीमेवर तैनात राहतील. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात तालिबानचा खूप प्रभाव आहे आणि हा प्रभाव पाकिस्तानसाठीही घातक ठरू शकतो. ज्या पद्धतीने तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला त्या पद्धतीने ते आपल्या वायव्य सरहद्द प्रांतात उपद्रव करू शकतात याची जाणीव पाकिस्तानला आहे. म्हणूनच पाकिस्तानने घुसखोरी टाळण्यासाठी अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घालण्याचे काम आधीच पूर्ण करून घेतले आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानला भारताविरोधात थेट युद्ध लढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात तालिबानचा उपयोग काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढवण्यासाठी ते करतील यात शंका नाही. भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीनचा देखील तालिबानला पाठिंबा राहील. एकीकडून पाकिस्तान आणि तालिबान तर दुसरीकडून चीन अशा कात्रीत भारत सापडणार आहे.

चीनने उघडपणे तालिबानसोबत मैत्री करण्यासाठी हाथ पुढे केला आहे. तालिबानसोबत मैत्रीकरुन चीन एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेला शह देण्याबरोबरच भारतालाही कोंडीत पकडण्याचा चीनचा मनसुबा आहे. तालिबानसोबत मैत्रीमुळे चीनला सामरिकदृष्ट्या मध्य आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुठलाच अडसर राहणार नाही. रेशीममार्ग बनवण्याच्या बहाण्याने चीन याभागात आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. भविष्यात नव्या अफगाणी सरकारला लागणारे माहिती आणि तंत्रज्ञान पुरवण्यासाठी चीन पुढाकार घेईल. अफगाणिस्तानच्या बाजारपेठेवर चीनचा डोळा नक्कीच असणार आहे. रशियाची भूमिका तालिबानसोबत मैत्रीचीच असेल. ज्या तालिबानचा जन्मच मुळी रशियाशी युद्ध करण्यासाठी झाला होता, ते दोघेही आता अमेरिकेविरोधात एक होतांना दिसतील. चीन आणि रशिया या दोघांसाठी तालिबान शासित अफगाणिस्तान ही शस्त्रास्त्रांसाठी मोठी बाजारपेठ ठरणार आहे. त्यादृष्टीने हे दोन्ही देश तालिबानसोबत सोईची भूमिका घेतील. 

शिया बहुल इराण आणि सुन्नी तालिबान यांच्यात यापूर्वी फार काही चांगले संबंध राहिलेले नाहीत. पूर्वीच्या राजवटीत १९९६-२००१ दरम्यान तालिबानने अनेक अल्पसंख्यांक शिया धर्मियांचे हत्याकांड घडवून आणले होते. १९९८ मझार-ए-शरीफ येथील दूतावासातील ८ इराणी अधिकाऱ्यांची तालिबानने हत्त्या केली होती. याची जखम इराणच्या मनात जरी असली तरी ते तालिबानशी यावेळी थेट संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे इराणचा कट्टर विरोधी सौदी अरेबिया मात्र तालिबानच्या मदतीने इराणवर अंकुश ठेवण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्नशील राहील.  पूर्वीच्या तालिबान राजवटीला सौदी अरेबिया आणि यूएई या आखाती देशांनी मान्यता दिली होती. त्यावेळच्या राजवटीत तालिबानने केलेल्या क्रूर अत्याचारामुळे मान्यता देणाऱ्या या दोन्ही देशांची प्रतिमा एक प्रकारे मलिन झाली होती. परंतु यावेळी हे दोन्ही देश मात्र सावध पवित्रा घेतांना दिसत आहेत. तरीही हे दोन्ही देश तालिबानच्या बाजूनेच झुकलेले राहतील. यूरोपातील देश खास करून ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे कधीच तालिबान शासनाला मान्यता देणार नाहीत. 

इतर महत्वाचे मुस्लिम देश तुर्की आणि मलेशिया यांची नव्या तालिबान राजवटीविषयी काय भूमिका असेल हे महत्वाचे ठरणार आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वी तुर्कीने काबूल विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलण्याचा प्रस्थाव ठेवला होता. तालिबानने तुर्कीच्या या हस्तक्षेपाला जोरदार विरोध केला आहे. तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे त्यामुळे तो तालिबान राजवटीला उघडपणे पाठिंबा देणार नाही. तुर्कीचे पाकिस्तान सोबत घनिष्ठ संबंध आहेत तर पाकिस्तानचे तालिबानशी. भविष्यात पाकिस्तानमुळे तुर्की आणि तालिबानची जवळीक वाढू शकते. अफगाणिस्तानचे इतर शेजारी देश तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांची तालिबान आणि अफगाणिस्तानमधून येणारे निर्वासित भविष्यात डोकेदुःखी वाढवू शकतात. या तिन्ही पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघातील देशांना तालिबानशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा उभारण्यात भारताचे फार मोठे योगदान आहे. रस्ते, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक संस्था या बरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारताने फार मोठी गुंतवणूक केलेली आहे. अफगाणिस्तानचे संसद भवन आणि सलमा धरण हे महत्वाचे प्रकल्प भारताने पूर्ण केलेले आहेत. अफगाणिस्तानातील सत्तांतर हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. नवे तालिबानी शासन भारतासोबत कसे संबंध ठेवते हे महत्वाचे ठरणार आहे. जगाच्या व्यासपीठावर या नव्या शासनाला मान्यता मिळो अथवा ना मिळो, तालिबानच्या एक हाती सत्तेला आता भविष्यात तरी कुठलाच अडसर दिसत नाही. भारताने अजूनही या घटनाक्रमावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतू भारताला काश्मीरमध्ये तालिबानचा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. रशिया, कतार आणि यूएईच्या माध्यमातून भारताचे तसे प्रयत्न चालूही झालेले असतील.

तालिबानच्या सरकारचे स्वरूप कसे असेल याबाबत अजून निश्चितपणे सांगता येत नसले तरी, अभ्यासकांच्या मते तालिबान आपला कट्टरतावाद सोडून काहीशी मावळ भूमिका घेऊ शकतो. त्याशिवाय त्यांना चीन आणि रशिया सह अमेरिकेच्या विरोधी गोटातील देश मान्यता देणार नाहीत.


दि. २२ ऑगस्ट २०२१ रोजी दैनिक पुण्यनगरीच्या सर्व आवृत्तीत हा लेख प्रसिद्ध झाला आहे. 

बुधवार, ७ जुलै, २०२१

वडिलांचा स्मृतिदिन

 


आज वडलांना जाऊन ३२ वर्षे झाली. मी जवळपास सहा वर्षांचा असतांना माझे वडील भाऊसाहेब रामभाऊ पोटफोडे यांचा अपघातात मृत्यू झाला. वडील वारले त्यावेळी मी पहिलीला जात होतो. लहान वयात वडलांचे छत्र हरपल्याने त्याचे मानसिक आणि आर्थिक परिणाम मला आणि माझ्या कुटुंबियांना दीर्घकाळ भोगावे लागले. नुकत्याच चाळीशीत प्रवेश केलेल्या घरातील तरुण आणि कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्यामुळे आम्ही सगळे कोलमडून पडलो. वडलांच्या नंतर माझ्या आजीने ती मरेपर्यंत म्हणजे जवळपास १८ वर्षे आपल्या लाडक्या लेकाचे सुतक पाळले. वडलांना घरात आणि गावात सगळे अण्णा म्हणायचे. प्रामाणिक वागणुकीमुळे गावात त्यांना खूप मान आणि प्रतिष्ठा होती. त्यांच्या शब्दाला किंमत होती. गावात सगळे त्यांना घाबरायचे.

अण्णाच्या जाण्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणाविषयी जी स्वप्न होती ती पूर्ण होऊ शकली नाहीत. माझे शिक्षण पुढे पूर्ण झाले नाही याची मला आयुष्यभर खंत राहील. घरात मी सगळ्यात लहान असल्याने माझा ते फार लाड करायचे. खाऊ, खेळण्या यांची घरात रेलचेल असे. आमच्याकडे त्यावेळी राजदूत कंपनीची मोटारसायकल होती. राजदूत गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून त्यांच्यासोबत जायला मला खूप आवडायचे. अण्णा गाडी घेऊन बाहेर निघाले की, मी मला बरोबर नेण्याचा हट्ट करत असे. कितीतरी वेळा मी त्यांच्या गाडी मागे धावत गेल्याचे आठवते.

राजकीय वर्तुळात त्यांचा सक्रिय सहभाग असे. अहमदनगर जिल्हा दूध संघाचे ते अनेक वर्ष संचालकही होते. त्यांच्या पुढाकाराने गावातील अनेकांना त्यांनी गाई, म्हशी, बैलजोडी त्याचबरोबर शेतीच्या इतर कामासाठी कर्ज मिळवून देण्यात मदत केली. गावातील अनेकांच्या अडीअडचणीत त्यांनी पुढाकार घेऊन मदत केली. म्हणूनच गावातील प्रत्येक घरात त्यांना मान मिळत असे. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांची आठवण काढतात, त्यांचा आदराने उल्लेख करतात. मला असं वाटते हीच त्यांच्या छोट्याश्या आयुष्याची खरी कमाई असावी.

दिनांक ७ जुलै १९८९ ला जिवलग मित्र भाऊसाहेब फलके यांच्या सोबत शेवगावला जात असतांना भगूर गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही भाऊसाहेबांचा मृत्यू झाला. आमचे कायमचे पोरके झालो. नियतीने आमचे बालपण कायमचे हिरावून नेले.

अण्णा तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_

रविवार, २५ एप्रिल, २०२१

कोरोना योद्धा : बाळू डाॅक्टर


कोरोना विषाणूच्या जागतिक रोग साथीमुळे सध्या भारतभर हाहाकार माजला आहे. रोज आपल्या समोर मित्र परिवारातील किंवा आप्तस्वकीयांमधील कुणीतरी कोरोनामुळे गेल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णांनी भरून गेले असून औषधे, ऑक्सिजन आणि बेडचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दवाखान्यात जागा नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपार मिळत नाहीत. आपल्या माणसांना वाचवण्यासाठी नातेवाईकांची सगळीकडे धावाधाव चालू आहे. खासगी दवाखाने तर अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातही तीस ते पन्नास हजार रूपये डिपाॅझिट दिल्याखेरीज दवाखान्यात प्रवेशच मिळत नाही. या संकट काळात अनेक ठिकाणी औषधांचा काळाबाजार होताना आपण पहातोय. बऱ्या होणाऱ्या रुग्णांना दवाखाने लाखोंची बिलं हातात देत आहेत. सामान्य लोकांना तर खासगी दवाखान्यातील उपचार परवडत नाहीत आणि सरकारी दवाखान्यात बेड मिळत नाही. या कोंडीत सामान्य लोकं मात्र भरडत आहेत.


या भीषण परिस्थितीत अमरापूर ता. शेवगाव येथे डाॅक्टर अरविंद पोटफोडे ऊर्फ "बाळू डाॅक्टर" कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कोरोना रुग्णांना बाळू डाॅक्टर अगदी नाममात्र दरात योग्य उपचार देत आहेत. विशेष म्हणजे ते अमरापूर गावातील रुग्णांना मोफत सेवा देतात. गेल्या महिन्याभरात त्यांनी हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. माणसावर आलेल्या या संकटाला अनेक जण संधी समजून पैशाची लटू करत असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मात्र सामाजिक बांधिलकी जपत आहे. बाळू डाॅक्टर यांच्या या सेवेची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. नगर सारख्या दुष्काळी भागातील गरीब, कष्टकरी, शेतकरी यांची अखंड सेवा करून बाळू डाॅक्टर यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निरपेक्ष सेवेसाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनता सदैव त्यांची ॠणी राहील. भारतात कोरोनावर सर्वात स्वस्त इलाज करणाऱ्या डाॅक्टरांमध्ये बाळू डाॅक्टर यांचा नक्कीच समावेश करावा लागेल.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

बाल कविता : पक्षांची भरली शाळा

 

(Photo Credit : FLICKR USER SOROUSH JAVADI // CC BY-SA 2.0)

पक्षांची भरली शाळा

वीजेच्या खांबाजवळ
पक्षांची भरली शाळा
तारेचाच केला वर्ग
आकाशाचा झाला फळा

खंडोजी धीवर गुरूजी
आले निळा कोट घालून
कावळेराव मुख्याध्यापक
उभे चोचीत छडी घेऊन

टिटवीने जोरात केली
शाळा भरायची गर्जना
कोकिळा ताईने गायली
मग सकाळीची प्रार्थना

साळुंखी आणि पोपटाचे
नव्हते पाढे पाठ
बगळ्यांनी गिरवले मग
फळ्यावर पाढे आठ

चिमण्यांनी गायली
कविता एक छान
पारव्यांनी डोलावली
ताला सुरात मान

मोराने घातला होता
छान छान गणवेश
बदक आणि कोंबडीला
नव्हता वर्गात प्रवेश

होला आणि कोतवाल
आज होते गैरहजर
वेड्या राघुची नुसती
घड्याळाकडे नजर

चातक बघु लागला
शाळा सुटायची वाट
पिंगळ्याने वाजवली घंटा
पक्षी उडाले एकसाथ

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

परीक्षण - 'अक्षरदान दिवाळी २०२०'

 


 

समाज माध्यमांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समविचारी लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी क्षणार्धात होणारा संपर्क. आज फेसाबुकवर संपादक मा. मोतीराम पौळ यांच्याशी जोडले गेलो आणि त्यांनी लगेच अगत्याने 'अक्षरदान' २०२० चा दिवाळी अंक पाठवला. परदेशात असल्याने छापील अंक मिळण्याला अनेक बंधने आहेत; हि अडचण ओळखून मोतीराम पौळ यांनी दिवाळी अंकाची पीडीएफ फाईल प्रेमपूर्वक पाठवून मला वाचनाच्या फराळाचा जणू डब्बाच भेट दिला आहे. खरं तर इ. स. २०२० हे खूप कठीण आणि मानवतेला वेठीस धरणारे साल होते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाचे अर्थचक्र थांबले होते. अनेकांना आपले जीव गमावले लागले. जे वाचले त्यातील कित्येकांचे रोजगार गेले. जगातल्या प्रत्येक माणसाला या काळात कुठल्या ना कुठल्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. या काळात अनेक नामांकित दिवाळी अंक बाजारात येऊ शकले नाहीत. तरीही या कठीण परिस्थितीशी दोन हात करत संपादक मोतीराम पौळ यांनी 'अक्षरदान' अंकाचे शिवधनुष्य पेलून तो वाचकांसमोर ठेवून खूप मोठे योगदान दिले आहे. 'साहित्य निर्मिती प्रक्रिया' हा अत्यंत महत्वाचा विषय घेऊन त्यांनी यावर्षीच्या अंकाची निर्मिती केली आहे. एखाद्या साहित्याची निर्मिती प्रक्रिया खुद्द लेखकाकडून जाणून घेणे किंवा लेखनामागची त्यांची पार्श्वभूमी समजावून घेणे, लेखन करताना कुठल्या दिव्यांचा सामना करावा लागला या सगळ्या गोष्टींचा हा लेखाजोखा खरोखरच नोवोदित लेखकांना तसेच संशोधकांसाठी मोलाचे दस्तऐवज ठरतो. यंदाचा 'अक्षरदान' दिवाळी अंक हा या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून भविष्यात तो संदर्भ म्हणून वापरला जाईल यात शंका वाटत नाही.

■ सुरुवातीलाच जेष्ठ पत्रकार तथा लेखक महावीर जोंधळे यांची दीर्घ मुलाखत फार वाचनीय आहे. जोंधळे सर हे मराठी साहित्यातील ललित, कथा, कादंबरी, वैचारिक तसेच बालसाहित्य आशा सर्व प्रकारात विपुल लेखन करणारे साहित्यिक म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत. गांधीवादी विचारांचं आयुष्यभर पालन करत असलेल्या जोंधळे सरानी आपण गांधींच्या विचाराकडे कसे आकर्षित झालो? यावर सविस्तर भाष्य या मुलाखतीत वाचायला मिळते. त्याचबरोबर गांधीवादी विचारांचा प्रभाव एकूणच त्यांच्या लेखनावर, आयुष्यावर कसा पडला? या प्रश्नांची वाचकांना उकल होत जाते. अत्यंत सध्या आणि प्रवाही भाषेत ही मुलाखत आहे.

लेखनाला कशी प्रेरणा मिळते? या प्रश्नवर सरानी खूप सुंदर उत्तर दिलेले आहे. ते म्हणतात – “(लेखन) प्रक्रिया हि काही एका थांब्यावर थांबण्याची गोष्ट नाही. ती बदलत जाते. रस्ता मिळेल तशी बदलते. विषय मिळेल तसे त्यात बदल होतात. विषयाचे गांभीर्य कळेल तसे त्याला आकार येतो. ही प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी तुमच्याकडे चिंतन, वाचन आणि मनन या तीन सूत्रांची गरज असते.”

करोना लॉकडाऊनमुळे जवळपास सात महिने जोंधळे सरांनी घरातच काढले. या सगळ्या काळाचा त्यांनी वाचनासाठी आणि लेखनासाठी सदुपयोग करून घेतल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात घोळत असलेली महात्मा गांधी विषयीची दीर्घ कविता त्यांनी या काळात पूर्ण केली. 'जमीन अजून बरड आहे' ही ११० पानांची दीर्घ कविता लिहून तिला गांधी जयंतीला पुस्तक स्वरूपात आणले. त्याचबरोबर सरानी 'ललित गद्याची चिकित्सक समीक्षा' हा ग्रंथ देखील याच कालखंडात लिहून पूर्ण केला. या मुलाखतीत त्यांच्या बालपणीच्या आठवणी, शिक्षणासाठी घ्यावे लागलेले कष्ट, परदेश प्रवास, ग्रामीण जीवनाच्या साहित्यावर पडलेला प्रभाव, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम, मनात दडलेला चित्रकार, विविध आंदोलने व चळवळीतील सहभाग, तरुणाविषयीचा सकारात्मता आणि समाज माध्यमाविषयीचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

■ स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख तथा जेष्ठ कवी डॉ. केशव सखाराम देशमुख यांचा 'लिहिणं: माझी ताकद आणि गरजही' या लेखात त्यांनी आपल्या कविता निर्मिती प्रक्रियेबद्दल सविस्तर भाष्य केलेले आहे. 'पाढा', 'चालणारे अनवाणी पाय', 'अथक', 'गाभा' आणि 'तंतोतंत' असे त्यांचे एकूण पाच काव्यसंग्रह आजगायत प्रकाशित झालेले आहेत.  गाव, शेत-शिवारात वाढलेल्या देशमुख सरांच्या कवितेत या गोष्टींचा कसा प्रभाव पडला तसेच आयुष्याकडे बघण्याच्या त्यांच्या अतिसूक्ष्म संवेदना या लेखातून वाचायला मिळतात. शेती करत असतांना तिच्यावर अनेक घटक अवलंबून असतात. या घटकांचा अंतर्भाव सरांनी कवितेत कसा केला आहे याची अनेक उदाहरणे या लेखात दिलेली आहेत. बैल, गाय या शेतीतल्या प्राण्यांशिवाय चिमण्या, विविध पक्षी, साप, मुंग्या, कीडे, विविध कीटक या सूक्ष्म जीवांचाही प्रभाव त्यांच्या कवितेत पडल्याचे ते सांगतात. बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी अनेक कविता लिहिल्याचे दिसते. उदारणार्थ -

पायांपेक्षा प्रिय मला बैलांचे खूर

बैलांच्या डोळ्यातील प्रार्थनांचे मुक्काम

मी लिहून ठेवतो काळजावर...

(चालणारे अनवाणी पाय: ७०) 

■ महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांचा 'माझी जडणघडण आणि लेखन' हा लेख खूप महत्त्वाचा वाटतो. आपण शिकून मोठं झाल्यावर पोलिस व्हावं हे स्वप्न बाळगणारा एक शाळकरी मुलगा प्र. के. अत्रे यांचे 'मी कसा झालो?' हे आत्मचरित्र वाचून आपल्यालाही असंच लिहिता आलं पाहिजे, असे ठरवून लेखनाकडे वळतो. लेखक होणार एवढं ठरवून तो मुलगा थांबत नाहीत तर त्यासाठी पाठपुरावा करतो. ऐंशी पानाची कोरी वही आणून भांड सरांनी यातून आपला लेखन प्रवास सुरू केला. आयुष्यात येणारे एक एक प्रसंग ते या डायरीत लिहू लागले. शालेय जीवनात शिक्षकांनी केलेल्या वाचन संस्कारमुळे त्यांच्यातील साहित्यिक जन्माला आल्याचे ते ठकळपणे नमुद करतात. स्काऊटमध्ये मिळालेल्या पदकामुळे त्यांना तरुण वयातच दहा देशात जाण्याची संधी मिळाली. या प्रवासात आलेले अनुभव त्यानी 'लागेबांधे' या प्रवासवर्णनातून लिहून काढले. परंतु हे पुस्तक छापण्यासाठी आलेल्या अडचणी आणि यातूनच पुढे एक तरुण लेखक ते प्रकाशक होण्याचा प्रवास वाचायला मिळतो. भांड सरांनी 'धारा' आणि 'साकेत' प्रकाशन संस्थांची स्थापना, त्यासाठी कुटुंबाकडून मिळालेली साथ आणि या संस्थाची भरभराट यावर देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यावर बाबा भांड सरांनी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले. यात अनेक ग्रंथांचे मराठी भाषांतर, मराठी-उर्दू कोश आणि विविध विषयातील अनेक ग्रंथ व त्याचे खंड त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रकाशित केले. 

■९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि जेष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांचा 'माझ्या ग्लोकल लेखनाची कहाणी!' या लेखातून ते त्यांची विचारधारा स्पष्टपणे अधोरेखित करताना दिसतात.

'मी प्रेमचंद परंपरेचा म्हणजेच प्रगतशील लेखक चळवळीच्या पुरोगामी परंपरेचा पाईक आहे.'

'स्वस्तुती टाळून मी असं म्हणू शकतो की, मी एक ग्लोकल लेखक आहे. आणि माझं लेखन आणि माझं प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.'

बालपणी वडिलांच्या बदल्यामुळे तसेच पुढे प्रशासन सेवेतील अनुभव हे त्यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेचा पाया असल्याचे ते मान्य करताना दिसतात. एका संमेलनाध्यक्षांची साहित्य निर्मिती प्रक्रिया समजावून घेण्यासाठी हा लेख वाचणे खूप महत्वाचे वाटते.

 ■ या अंकात अनेक महिला लेखिकांचे लेख वाचायला मिळतात. हे सर्व लेख महिला साहित्य निर्मतीची प्रक्रिया एकंदरीत कशी असते हे समजावून घेण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतात. काहीतरी काल्पनिक न लिहिता स्रियांना दैनंदिन जीवनात सोसावे लागणारे अत्याचार, अडथळे, शोषण किंवा दुय्यम वागणूक याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी साहित्य घडत असल्याचे सगळ्याच जणी काबुल करताना दिसतात. इंदुमती जोंधळे यांचा 'सभोवतालची अस्वस्थताच लेखणी होते', डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा 'संस्कृतीचं संचित असं सिद्ध होत राहतं', प्रा. लीला शिंदे यांचा '...हीच खरी माझ्या लेखनाची प्रेरणा', आणि डॉ. तासणीम पटेल यांचा 'लेखन : मनातील सल व्यक्त करण्याचं साधन' हे सर्वच लेख वाचनीय आहेत.

 ■महाराष्ट्राचे लाडके कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांचा 'शिक बाबा शिक कविता घडताना' हा लेख म्हणजे एका कवितेचे आत्मकथन वाटते. 'शिक बाबा शिक' या कवितेने महाराष्ट्राच्या विविध चळवळींना बळ दिले आहे. अनेक शेतकरी आंदोलनात ही कविता गायली गेली आणि जात आहे. या कवितेत काळानुरूप कसे बदल होत गेले, तिचे स्वरूप कसे बदलत गेले हे वाचणे महत्वाचे ठरते. विविध आंदोलनात आलेले आपले अनुभव भालेराव सरानी या लेखातून मांडले आहेत.

भालेराव सर म्हणतात कि

'या कवितेनं कायम विरोधी पक्षाचं काम केलंय आणि या कवितेचा कर्ता म्हणून मला लोकांनी कायम विरोधी पक्षाचा कवी समजलंय.'

'या कवितेची आणखी एक गंमत म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांना ती नेहमी आवडते. आणि ते सत्तेत आले की, त्यांना ती नको वाटते.'

 ■ नव्या पिढीचे कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर यांचा कवी ते कांदबरीकार हा प्रवास 'लिहिणं म्हणजे स्वतःला छळणं, स्वतःच्या आत खणत जाणं" या लेखातून वाचायला मिळतो. स्वतःत एक लेखक घडण्यासाठी काय पात्रता असावी लागते आणि खरा लेखक कसा घडतो याची उत्तम मांडणी या लेखात आहे. बांदेकर सर यांचे खालील विधान नवोदित लेखकांसाठी खूप म्हत्वाचे आहे -

‘लेखकाला त्याची स्वतःची भाषा सापडावी लागते. ही भाषा त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचा भाग असते. त्याच्या जगण्यामधून, वाचनामधून, भवतालच्या निरीक्षणांमधून, निसर्ग आणि समाजवाचनामधून ही भाषा त्याला सापडू शकते. त्याला सापडलेली ही स्वतंत्र भाषा हीच लेखकाची खरी ओळख असू शकते.’

 ■प्रा. मिलिंद जोशी यांचा 'लेखकाचं लिहिणं आणि त्याची वैचारिक भूमिका यात द्वैत नसावं!', अजय कांडर यांचा 'कवी कविता निर्मितीतून त्या त्या काळाचं राजकारण खेळात असतो', अशोक कौतिक कोळी यांचा 'भोवतालच्या अस्वस्थतेतून पाडा ची निर्मिती', सचिन परब यांचं 'माझ्या आभाळातलं रँडम रँडम', त्याचबरोबर किरण गुरव यांचा 'उद्योग विश्वावर क्ष-किरण, टिकून राहण्यासाठी जोवनावश्यक लास आणि इतर काही', जेष्ठ कवी शशिकांत शिंदे यांचा 'मनावर उमटलेले अमीट ठसा : 'निर्मम', तरुण कवी अमृत तेलंग यांचा 'खडकाळ माळरानातून फुलून येते कविता', आदींनी लेखन निर्मिती प्रक्रियेवर भरभरून लिहिले आहे. हे सर्वच लेख व त्यांनी कथन केलेले अनुभव वाचणे नवोदित साहित्यिकांसाठी तसेच वाचकांसाठी फार महत्वाचे ठरते. यातून लेखकाची पार्श्वभूमी याच बरोबर त्यांचा सामान्य माणूस ते लेखक होण्याचा जो काही प्रवास आहे, त्यावर प्रकाश पडतो. 

 ■श्रीकांत देशमुख यांची 'नायबराव', सुरेंद्र रावसाहेब पाटील यांची 'गोरख गोंधळी' आणि प्रमोद कमलाकर माने यांनी साकारलेली 'सारजामाय' या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवितात. अनेक मान्यवर साहित्यिकांच्या कथा देखील या अंकातून वाचायला मिळतात. रंजन मोरे यांची 'काय भुललासी', डॉ. कैलास दौंड यांची 'सुखवस्तू चिमणी', संदीप झरेकर यांची 'अग्नितांडव', श्रीकांत कुलकर्णी यांची 'दुबळा' संजय ऐलवाड यांची 'वाढदिवस', आबा महाजन यांची 'गुरंढोरं आणि पुस्तक', देविदास सौदागर यांची 'देवकी', रंगराव बापू पाटील यांची 'खळं', ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांची 'पिशवी', आणि पालवी मालुंजकर याची व शिवानी घोंगडे यांनी अनुवादित केलेली 'आम्हाला स्त्रीवादाची गरज आहे' या सर्वच कथा वाचनीय आहेत. आबा महाजन याची कथा तर अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी अशीच आहे. या अंकातून अनेक मान्यवर कवींच्या सुंदर कविता देखील आलेल्या आहेत.

 सुंदर मांडणी, उत्कृष्ट सजावट त्याच बरोबर अवघ्या दहा वर्ष वयाच्या शिवार्थ दिलीप दारव्हेकर या विद्यार्थ्याने साकारलेले अतिशय सुंदर मुखपृष्ठ या अंकाचे वैशिष्ट्य ठरते. एवढ्या कमी वयातील कलाकाराने दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ साकारण्याची बहुदा ही दिवाळी अंक परंपरेतील पहिलीच वेळ असावी. करोनाच्या काळात भासणाऱ्या दिवाळी अंकांची उणीव 'अक्षरदान'ने भरून काढली आहे. आपल्या ७ वर्षांच्या परंपरेला साजेसा आणि दर्जेदार अंक काढून संपादक मोतीराम पौळ यांनी खूप महत्वाचे काम केले आहे. त्यांचे अभिनंदन!

दिवाळी अंक : अक्षरदान (साहित्य निर्मिती प्रक्रिया)

संपादक : मोतीराम पौळ

मुखपृष्ठ : शिवार्थ दिलीप दारव्हेकर

किंमत : १५० रु

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे

  दुबई, संयुक्त अरब अमिरात

  २६ जानेवारी २०२१

रविवार, २४ जानेवारी, २०२१

कविता : ओल्या भुईचे गाणे


 ओल्या भुईचे गाणे 


भुई नटली थटली अंगी लेवून बियाणे
पानाफुलांच्या ओठी येती हिरवाईचे गाणे 

भुई मागती ढगाला सालाची ओवाळणी
लाव भाऊराया तुझ्या खिशाला गाळणी 

ढग धाकटा भाऊ आहे खोडकर फारं
कधी रुसतो फुगतो कधी भरतो कोठारं 

कधी रागावतो भाऊ करतो दाणादाणं
कधी आनंदाने तो बहरतो हिरवे रानं 

सरतो रुसवा त्याचा धाव भेटायला घेई
भावा बहिणीचे हे नाते कधी तुटणार नाही 

नको हट्ट भाऊराया येऊदे बहिणीची कीव
तुझ्या ओवाळणीसाठी भुई असूसते जीव 

दरसाल होऊन मुऱ्हाळी येत जा भाऊराया
माझ्या बळीराजास तुझी सदा लाभू दे माया 

माझ्या पिल्लांच्या चोचीत भर हिरवे दाणे
पाखरांना गाऊ दे सदा 'ओल्या भुईचे गाणे'