बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

बाल कविता : चिमणीला आला फोन

एक दिवस सकाळी
चिमणीला आला फोन
छान छान आवाजात
सांगा बोलत होते कोन ?

कोकीळा ताई तिकडून
बोलू लागल्या गोड
म्हणाल्या चिमणीला
ऊठ बिछाना सोड

आज बाई आपल्याला
जायचे आहे गावाला
कावळे दादाच्या लग्नाचा
बस्ता बाई बांधायला

मोराच्या दुकानातून
नवरीला घेऊ साडी
सुतार पक्षाची लावू
वरातीला गाडी

टिटवी कडून घेऊ
छान छान अलंकार
लग्नाला बोलवू
बदक पोपट आणि घार

सुगरणीला सांगू छान
विणायला कोट
बगळेराव आचारी भरेल
सगळ्या पाहुण्यांचे पोट

ऊठ बाई चिमणे
दिवस राहिले थोडे
कसे सोडवायचे बाई
आता वेळेचे कोडे?

चिमणी आणि कोकीळा
घाईत उडाल्या भूर
कावळे दादाच्या घरी
आला पाहुण्यांचा पूर