आखाती देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी उभा रहातो, तो म्हणजे वाळवंट किंवा तेलाच्या विहीरी, इथली अरब संस्कृती, नाही तर मग या देशांतील आर्थिक संपन्नता. आखाती देशांचा बराचसा भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. आखाती देश हे आर्थिक दृष्ट्या खूप संपन्न आहेत, परंतु खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी इथले लोकजीवन अतिशय खडतर होते. मासेमारी किंवा समुद्रातून मोती शोधून त्यांचा व्यापार हेच इथल्या लोकांचे महत्त्वाचे व्यवसाय होते. खनिज तेलाच्या शोधानंतर मात्र या देशात मोठी आर्थिक संपन्नता आली. रोजगार निर्मितीमुळे इथले जीवनमान बदलून गेले. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यानी येथे कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक केली. आर्थिक क्रांतीमुळे स्थानिकांबरोबरच परदेशी लोकांनाही या देशांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या.
गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
सौदी अरेबिया डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सौदी अरेबिया डायरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०
सौदी अरेबिया - रब-अल्-खाली वाळवंट
आखाती देशांची अर्थव्यवस्था ही अजूनही खनिज तेलावर अवलंबून आहे. खनिज तेलाच्या विहीरी या समुद्रात किंवा वाळवंटी प्रदेशात विखुरलेल्या आहेत. यातील बहुतांश विहीरी 'रब अल खाली' या वाळवंटात आहेत. रब अल खाली चा अर्थ 'रिक्त भाग' (Empty Quarter) असा होतो. हा अरब खंडातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश आहे. सौदी अरेबिया, युएई, ओमान आणि येमेन या चार देशांचा बराचसा भूगभाग या वाळवंटाने वेढलेला आहे. साधारणपणे साडे सहा लाख वर्ग किलोमीटर (महाराष्ट्र राज्याच्या दुप्पट) एवढे याचे एकूण क्षेत्रफळ आहे. सौदी अरेबिया, ओमान आणि युएई या देशांच्या त्रिसीमा जिथे एकत्र येतात तो भाग तर खनिज तेलानी खूप समृद्ध मानला जातो. सौदी अरेबियाच्या एकुण क्षेत्रफळाच्या एक चर्तुथांश भाग या वाळवंटाने व्यापलेला असून हा संपूर्ण प्रदेश एकदम निर्जन आहे.
वाळवंटाने वेढलेले शेबा
रब अल खालीचा हा प्रदेश पर्यटकांसाठी खुला नसला तरी अधिकृत कामानिमित्त कंपनी मार्फत येथे जाता येते. सुदैवाने मला तिन्ही देशातील या भूभागात जाण्याची संधी मिळाली. त्यात सौदी अरेबियातील शेबा (शायबाह किंवा इंग्रजी मध्ये Shaybah) येथील अनुभव तर खरोखरच रोमांचित करणारे होते. शेबा ऑईल फिल्ड ही सौदी अरेबियातील महत्वाचे खनिज तेल भांडार आहे. इथले तेल चांगल्या प्रतीचे गणले जाते. १९९८ सालापासून येथे तेल उत्पादनास सुरूवात झाली. येथे उत्पादित तेलाला पाईपलाईन मार्गे अबकैक या रिफायनरीत नेले जाते. या पाईपलाईनची लांबी सुमारे ६३८ किमी इतकी आहे. शेबातील तेलाच्या विहीरी युएईच्या सीमेपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहेत. शेबा येथील वातावरण खूपच शुष्क आहे. उन्हाळ्यात दिवसाचे तापमान ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते तर हिवाळ्यात रात्रीचे तापमान शून्य अंशापर्यत घसरते. येथे पाऊस जेमतेच पडतो. वर्षाकाठी सरासरी ३० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होते. मी ज्यावेळी शेबाला गेलो, तो डिसेंबर महिना होता. डिसेंबर महिन्यात इथले वातावरण थंड आणि आल्हाददायक असते.
शेबातीळ वाळूच्या टेकड्या
शेबामध्ये जाण्यासाठी हवाईमार्ग हाच एकमेव पर्याय आहे. शेबा हे ठिकाण अल-हफूफ (किंवा अल-हास्सा) आणि रियाध शहरांशी रस्त्याने जोडलेले असले तरी हा रस्तेमार्ग फक्त मालवाहतूकीसाठी वापरला जातो. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको शेबासाठी विशेष विमानसेवा राबवते. अरामकोची स्वतःची एअरलाईन्स असून, महत्वाच्या सर्व प्लॅन्टवर कामगारांची ने-आण करण्याचे काम ही एअरलाईन्स करते. त्यासाठी ठिकठिकाणी अरामकोची स्वतःची विमानतळं आहेत. मी दम्मामच्या अरामको विमानतळाहून शेबाला हवाईमार्गे गेलो. दम्मामहून शेबाला जाण्यासाठी अंदाजे दोन तास लागतात. हे विमान अल-हफूफ मार्गे जाते. एकदा का विमानाने दम्माम सोडले तर आकाशातून दिसते ती चहूकडे शुष्कता आणि ओसाड जमिन. दम्माम आणि अल-हफूफ दरम्यान विमानातून तुरळक ठिकाणी मानवी वस्त्या नजरेस पडतात, परंतु अल-हफूफ ते शेबा या प्रवेसा दरम्यान रुक्ष वाळवंटाशिवाय काहीच नजरेस पडत नाही. या भागात तांबड्या वाळवंटाच्या उंचच उंच टेकड्या आहेत (Desert Dunes). रब अल खालीच्या काही भागात या वाळूच्या टेकड्यांची उंची २०० मीटरपर्यंत आहे. या वाळूच्या टेकड्यांदरम्यान ठिकठिकाणी तळ्यासारखी मोकळी जागा दिसते. हजारो वर्षांपूर्वी पावसाचे पाणी साचून ही तळी तयार झाली होती. आज फक्त या तळ्यांच्या खाणाखुणा तेव्हढ्या आकाशातून दिसतात.
शेबातील तात्पुरती कामगार वसाहत
शेबा हे एक छोटेसे विमानतळ आहे. दम्माम, जेद्धा, रियाध आणि अल-हफूफ या शहरांतून येथे रोज अनेक उड्डाणे संचलित केली जातात. वाळवंटाच्या टेकड्या चारही बाजूना सारुन निर्माण केलेल्या सपाट जागेत शेबा विमानतळासह कामगारांची निवास व्यवस्था, क्रीडांगण, खाणावळ, अग्नीशमन केंद्र आणि रूग्णालय यासारख्या इमारती बनवलेल्या आहेत. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर चारही बाजूना वाळूचे डोंगर दिसतात. वाळूच्या या डोंगरामुळे आपण एखाद्या खड्ड्यात आहेत की काय असा भास होतो. या एवढ्या ओसाड भागात अरामकोने नियोजनपूर्वक सर्व इमारती बांधलेल्या आहेत. या बांधलेल्या पक्क्या इमारती बघून नवल वाटल्याशिवाय रहात नाही. विमानतळा लागूनच कामगारांची निवास व्यवस्था आहे. शेबामध्ये येणाऱ्या सर्व कामगारांची अरामको मार्फत राहण्याची व तीन वेळ जेवणाची सोय केली जाते. शेबामध्ये राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा आहे. सर्व स्तरातील कामगार व अधिकारी वर्गासाठी एकच खाणावळ आहे. अरामकोने कामगारांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी येथे खेळाची मैदाने बनवली आहेत. त्यात फुटबॉल, जाॅगिंग ट्रॅक, बास्केटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, स्विमींगपुल आणि जीमचा समावेश आहे. शेबा कॅम्पच्या परिसरात झाडं लावल्यामुळे येथे पक्षांचे वास्तव्य जाणवते. या कॅम्पमध्ये अनेक मांजरी आणून सोडलेल्या आहेत.
शेबातील तात्पुरती कामगार वसाहत
शेबामध्ये अनेक वायू आणि खनिजतेल निर्मिती केंद्रे आहेत. ती कॅम्पपासून साधारणपणे दहा किमी च्या त्रिज्येत विविध दिशांना पसरलेली आहेत. याठिकाणी जाण्यासाठी देखील वाळूच्या टेकड्या बाजुला सारुन रस्ता बनवलेला आहे. या रस्त्यावरून जाताना आपण एखाद्या खिंडीतून प्रवास करत असल्याचा भास होतो. येथे वाहनांची गतीला मर्यादा घालून दिलेली आहे आणि त्या गतीच्या पुढे वाहन चालवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाहनांची गती मोजण्यासाठी ठिकठिकाणी रेडार बसवलेले आहेत. संपूर्ण परिसराला सौदी अरेबियाच्या सैन्य दलाचे कडक सुरक्षा कवच असते.
शेबातील तात्पुरती कामगार वसाहत
शेबातील तेल-वायू निर्मिती प्रकल्प आणि इथल्या सुविधा म्हणजे रब अल खाली या सारख्या निर्जन वाळवंटात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मानवाने निसर्गावर मात करण्याचा जणू प्रयत्न केल्याचे दर्शविते. इथला वाळूच्या टेकड्या जरी उष्णतेने लालेलाल होत असतील, परंतु त्यातही एकप्रकारचे सौंदर्य दडलेले आहे. चहूकडे पसरलेली तांबडी वाळू आपण इतर जगापासून खूप लांब असल्याची जाणीव करून देते. रब अल खाली वाळवंट खरोखरच बघायला सुंदर आहे पण उन्हाळ्यात इथे काम करणे म्हणजे कदाचित नरकयातनाच असतील!
शनिवार, १४ जून, २०१४
सौदी अरेबिया डायरी : भाग ४ धार्मिक वातावरण व नियम
सौदी अरेबिया
हा १००% मुस्लिम
देश आहे. येथील
नियम जगापेक्षा खूपच
वेगळे आणि कठोर
आहेत. येथे राहणाऱ्या
देशी - विदेशी लोकांना त्या
नियमांचे पालन करणे
बंधनकारक आहे. सौदी
मधील काही महत्वाच्या
नियमां विषयी माहिती .
इकामा
(IQAMA) : थोडक्यात अर्थ रहिवाशी
ओळखपत्र. हे अत्यंत
महत्वाचे आहे. जर
तुम्ही सौदी मध्ये
नोकरी करण्यासाठी आला
असाल तर तुम्हाला
हे ओळखपत्र कंपनी
कडून अथवा मालक
कडून दिले जाते
(आरबी मध्ये याला
कफील म्हणतात) इकामा
साठी आपला पासपोर्ट
कफिलाच्या ताब्यात द्यावा लागतो.
सौदी अरेबियाच्या नियमा
प्रमाणे एक वेळी
आपण इकामा किंवा
पासपोर्ट यापैकी एकाच गोष्ट
बाळगू शकतो. सौदी
मध्ये गेल्यावर कफील
आपला पासपोर्ट स्वतःच्या
ताब्यात घेतो, त्यामुळे येथे
फसवणूक होण्याची फार शक्यता
असते. त्यासाठी येथे
जाण्यापूर्वी सर्व गोष्टींची
खातरजमा करावी.
इकम्याचा
उपयोग बँक खाते,
टेलिफोन - मोबाईल कनेक्शन, घर
भाड्याने घेणे, वीज बिल,
ड्रायव्हिंग लायसेन्स अश्या अनेक
महत्वाच्या कारणासाठी होतो. इकाम्याचा
क्रमांक हा येथील
सगळ्या सरकारी यंत्रणेशी जोडला
गेलेला असतो. येथे मुस्लिम
आणि अमुस्लिम यांना
वेगवेगळ्या रंगांचे इकामे
दिले जातात. इकाम्यावर तुमचे नाव,
धर्म, राष्ट्रीयत्व, इकामा
क्रमांक, कफिलाचे नाव, व्हिजा
क्रमांक, व्हिजाचा प्रकार, तुमचा
हुद्दा, पासपोर्ट क्रमांक आणि
इकाम्याची मुदत या
गोष्टींचा उल्लेख अरबी आणि
इंग्रजी मध्ये असतो.
घराबाहेर पडतांना तुमचा इकामा
नेहमी जवळ बाळगावा.
जर आपण व्हिजीट
व्हिजावर गेलो आसोल
तर स्वतःचा पासपोर्ट
जवळ ठेवावा. नवीन
गेलेल्या कामगारांसाठी जर तुमचा
पासपोर्ट इकामा बनवण्यासाठी कंपनीने
घेतला असेल आणि
तुमचा इकामा अजून
बनला नसेल तर
आपल्या पासपोर्टची छायांकित प्रत
(Photo Copy) करून (उदारणार्थ : मुख्य पान,
शेवटचे पान, व्हिजा
लावलेले पान आणि
दाखल (Entry) शिक्का विमानतळावर मारतात
ते पान) यावर
कंपनीचा शिक्का मारून घ्यावा.
बऱ्याच वेळा या
गोष्टी कंपनी स्वतःहून देतात.
या
बाबत माझा एक
अनुभव आहे. त्यावेळी
हज यात्रेचे दिवस
होते. त्यामुळे सौदी
मध्ये ठीक ठिकाणी
पोलिस तुमचा इकामा
तपासतात. मी सौदी
मध्ये नवीन आलेलो
होतो व माझा
पासपोर्ट कंपनीने इकामा बनवण्यासाठी
घेतलेला होता. त्या दिवशी
मी, रत्नाकर हिरे,
कमलेश आणि संजय
माने हे सुट्टी
निम्मित रत्नाकर याच्या गाडीतून
बाहेर शॉपिंगसाठी दम्माम
शहरात गेलो होतो.
तेथे अनेक ठिकाणी
तपासणी चालू होती.
गाडी सिग्नला थांबल्यावर
पोलिसांनी आम्हाला इकामा दाखवण्यासाठी
सांगितले. सर्वांनी आपआपले इकामे
दाखवले पण माझ्याकडे
फक्त कंपनीने दिलेला
कागद होता. पोलिसांनी
आम्हाला गाडी बाजूला
लावायला सांगितली. त्यांनी माझ्या
कडील कागदाची बरीकीने
तपासणी केली, त्यावर कंपनीचा
शिक्का आणि अरबी
भाषेत मजकूर लिहिलेला
होता, त्यामुळे माझी
सुटका झाली अन्यथा
मला सौदी मधील
तुरुंगाची (कालाबुस) हवा खावी
लागली असती. बाहेर
गेल्यावर जर तुमच्याकडे
इकामा नसेल आणि
पोलिसांनी पकडले तर ते
तुम्हाला तुरुंगात टाकतील आणि
जो पर्यत कंपनीचा
प्रतिनिधी (स्थानिक अरबी) येवून
तुमची सुटका करत
नाही तोपर्यंत तुम्हाला
तुरुंगातच राहावे लागते. इकामा
बनवण्याची सर्व जबाबदारी
आपल्या कफिलची किंवा कंपनीची
असते. सौदी मध्ये
आल्यावर इकामा बनवण्यासाठी तुम्हाला
वैद्यकीय चाचणी (Medical Test) द्यावी लागते. यामध्ये
सर्व आजारांची सखोल
चाचणी करतात. जर
तुम्ही वैद्यकीय तपासणीत नापास
झालात तर तुम्हाला
इकामा मिळत नाही
आणि जेणेकरून तुम्हाला
परत मायदेशी यावे
लागते.
साप्ताहिक
व
इतर
सुट्ट्या
: येथे प्रत्येक शुक्रवारी साप्ताहिक
सुट्टी असते. त्याच बरोबर
रमादान ईद साठी
५ दिवस, हज
यात्रा (बकरी ईद)
साठी ५ दिवस
आणि राष्ट्रीय दिन
२३ सप्टेंबर एक
दिवस सुट्टी असते.
या व्यतिरिक्त कुठलीच
सुट्टी नसते.
रमजान
महिना
: रमजान हा मुस्लिमांचा
पवित्र महिना आहे. या
महिन्यात सौदी मध्ये
फार कडक नियम
पाळले जातात. उपवासाच्या
काळात सार्वजनिक ठिकाणी
खाण्यास व पिण्यास
बंदी असते. रस्त्यावर
तुम्ही पाणी पण
पिवू शकत नाहीत.
या काळात सर्व
खानावळी बंद असतात.
कंपनी मध्ये मुस्लिम
कामगारांना अर्धा दिवसच काम
असते. नियम मोडणाऱ्या
अमुस्लीमांना कडक शिक्षा
होवू शकते.
नमाजाच्या
वेळा
: नमाजाच्या वेळी सर्व
दुकाने, शॉपिंग मॉल्स, खानावळी,
हे नमाज संपे
पर्यंत बंद असतात.
कंपनीचे मुस्लिम कामगार नमाजासाठी
१५ ते २०
मिनिटे सुट्टी घेवू शकतात.
सर्व कंपन्या, शॉपिंग
मॉल्स, जेथे कामगारांची
संख्या जास्त आहे तेथे
प्रार्थना स्थळ (मस्जिद) असणे
सक्तीचे आहे.
मृत्युदंड
: सौदी अरेबिया मध्ये मुस्लिमांची
शरीया कायदा लागू
असल्यामुळे येथे मृत्युदंडाची
शिक्षा मोठ्या प्रमाणात दिली
जाते. मादक पदार्थांची
तस्करी किंवा विक्री करणे,
खून, बलात्कार, मुस्लिम
धर्म सोडणे (मुस्लिम
धर्मातून दुसऱ्या धर्मात जाने),
लुटमार व दरोडा
टाकणे, विवाह बाह्य अनैतिक
संबंध आणि समलिंगी
संबंध या कारणांसाठी
येथे मृतुदंड दिला
जातो. त्याच प्रमाणे
चोरी करणाऱ्याचे हात
चाटले जातात
मृत्युदंडाची
पध्दत
: मुस्लिम धर्माच्या शरीया कायद्याप्रमाणे
येथे सार्वजनिक ठिकाणी
(शक्यतो शुक्रवारी दुपारची नमाज
झाल्या नंतर मस्जिदिसमोर)
आरोपीचे मुंडके धारदार तलवारीने छाटण्यात येतो.
जो आरोपीचे मुंडके छाटतो
त्याला अरबी भाषेत
जल्लाद म्हणतात. सौदी मध्ये
महिलांचेही शिरच्छेद झालेले आहेत.
काहीवेळा आरोपींना सार्वजनिक ठिकाणी
(शक्यतो शहराच्या मुख्या चौकात)
फासावर दिले जाते.
मृत्युदंडाची हि पध्दत
सर्व देशी-विदेशी
नागरिकांना लागू आहे.
सौदीतील
महिला
: मुस्लिम
देश असल्यामुळे येथे
महिलांवर अनेक बंधने
आहेत. मुस्लिम आणि
अमुस्लिम महिलांना बुरखा (अभाया)
घालणे बंधनकारक आहे.
परदेशातून आलेल्या सर्व महिलांना
बुरखा परिधान करावा
लागतो. येथे कुठल्याही
धर्माच्या महिलांना वाहन चालवण्यास
बंदी आहे.
काही
महत्वाचे
नियम
:
दारू पिणे
व विक्री करणे
यावर बंदी त्यामुळे
बिअर बर नाहीत.
सिनेमा थियटर नाही.
अमुस्लीमांना हज प्रांतात
(मक्का आणि मदिना)
येथे जाण्यास बंदी.
अमुस्लिमांना सौदीत अंत्यविधी करण्यास
बंदी.
सौदी अरेबियाचा
राजा, राजपुत्र,राजघराणे
आणि इस्लाम, यांच्या
विषयी उपशब्द केल्यास
कडक शासन
सोमवार, २४ मार्च, २०१४
सौदी अरेबिया डायरी : भाग ३ माझा मित्र परिवार
सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवले होते. माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी
बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच
मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे
मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.
संजय माने हे कल्याण (मुंबई) मधील सद्ग्रहस्थ आमच्या
कंपनी मध्ये मागील तीन वर्षांपासून कामाला होते. त्यांना जेंव्हा एक नवीन मराठी
माणूस कंपनी मध्ये आलाय असे कळाल्यावर ते
माझी भेट घेण्यासाठी आवर्जून आले. त्यांच्याकडून मला कंपनीतील रत्नाकर हिरे आणि
कमलेश बुजाडे या इतर दोन मराठी माणसां विषयी माहिती मिळाली. त्यावेळी रत्नाकर हे कंपनीच्या कामानिमित्त जर्मनीला गेलेले
होते. या तिघांनी एक मराठी माणूस या नात्याने मला फार मदत केली. नवीन देशात आणि
त्यातल्या त्यात जगावेगळे नियम असणाऱ्या सौदीमध्ये त्यांचे मार्गदर्शन मोलाचे
होते.
संजय माने दिसायला उंच, गोरा वर्ण, मध्यम बांधा, हसरा चेहरा, फ्रेंच कट दाढी असे त्यांचे वर्णन करता येईल. स्मित भाषी आणि मन मिळावू
स्वभावामुळे ते संपूर्ण कंपनीमध्ये प्रसिद्ध होते. तसं त्यांच्या आणि माझ्या वयात
२०-२१ वर्षांचा फरक असूनही आमच्या देघांची खूप गट्टी जमली.
काही महिन्यांच्या काळानंतर कमलेश बुजाडे याच्या प्रयत्नाने आम्हा दोघांना कंपनी अकॉमोडेशन मध्ये सेम रूम मिळाली. मी शाकाहारी असल्यामुळे आम्ही दोघे एकत्र
स्वयंपाक बनवायचो. माने हे कोकणातील असल्यामुळे ते मांस मच्छी खायचे पण माझ्या
शाकाहारीपाना मुळे त्यांनी कधी घरी मांस मच्छी वगैरे बनवले नाही. थोड्याच
दिवसामध्ये मी जेवण बनवण्यात पटाईत झालो. शाकाहारी भाज्या, कांदा पोहे, शिरा, वाडा पाव, मिसळ, रव्याचे व बेसनाचे लाडू, थालपीठ हे अस्सल मराठमोळे पदार्थ मी बनवू
लागलो. मी बनवलेला शिरा आणि कांदा पोहे हे सर्वांना फार आवडायचे. एका वेगळ्या
प्रकारची फोडणीचे वरण मी बनवायचो ते माझ्या इतर दक्षिणात्य मित्रांना फार आवडायचे, मी गमतीने त्या डिशचे नामकरण "दाल पूना" असे केले होते.
रत्नाकर हिरे हे कुशाग्र बुद्धीचे धनी होते.
सौदी अरेबियातील महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ किंवा मराठी माणसाचा बुलंद आवाज
अशा भाषेत मी त्यांचे वर्णन करेल. मराठी भाषा आणि मराठी लोक यांच्यावर त्यांचे खूप
प्रेम होते. मराठी लोकांची निंदा त्यांना अजिबात सहन व्हायची नाही. त्यांचा स्वभाव भयंकर तापड होता, कामगार लोक त्यांच्यापुढे जाण्यास घाबरत असत. त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय
घेऊन कंपनीला प्रगती पथावर नेले.
या मराठी मित्रां व्यतिरिक्त विविध देशातील आणि
भारताच्या इतर राज्यातील मित्र मला येथे आल्यावर मिळाले. यामुळे वेगवेगळ्या भाषा
आणि संस्कृती यांचा परिचय अगदी जवळून अनुभवता आला.
बुधवार, १९ मार्च, २०१४
सौदी अरेबिया डायरी : भाग २ छोटे केरळ
कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे. पण माझ्या बाबतीत
हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान
संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता
त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि
वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास
झाला नाही. माझ्या एका
मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य
असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली
शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे
नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास
करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे
वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच
करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो.
सौदी अरेबियाची राष्ट्रभाषा ही अरबी असल्यामुळे
इथले जवळपास सर्वच व्यवहार अरबी भाषेतून होतात. स्थानिक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स,आणि इतर अनेक गोष्टी अरबी भाषेतच असतात. अरबी
भाषेनंतर येथे हिंदी प्रामुख्याने बोलली जाते. बहुतेक कामगार हे भारतीय उपखंडातील
असल्यामुळे येथे हिंदी भाषेचा खूप प्रभाव आहे. आफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका या उपखंडातील
लोक चांगले हिंदी बोलतात. उर्दू आणि हिंदी भाषेमध्ये जरी साम्यता असली, आणि उर्दू भाषक जरीही या भाषेला उर्दू मालत असले तरीही सौदी मध्ये बोलली
जाणारी हिंदी - उर्दू या मिश्रित भाषेला 'हिंदी' या नावानेच ओळखले जाते. अरबीमध्ये भारतीय लोकांना हिंदी असेच संबोधतात तर
भारताला अलहिंद म्हणतात. अरबी व हिंदी या भाषानंतर येथे
बोलली जाणारी तिसरी महत्वाची भाषा म्हणजे मल्याळम. त्यानंतर बंगाली, तगालूक, तमिळ आणि इंग्रजी या भाषांचा क्रम लागतो. सरकारी कार्यालये, बँका, मनी एक्सचेंग या ठिकाणी विविध भाषामधून सूचना
फलक पाहण्यास मिळतात.
सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली
गरुड झेप. केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा येथे प्रत्येक व्यवसायात
बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही
केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लौंड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय
केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे पण केरळीच आहेत.
मी काम करत असलेल्या कंपनीत एकूण कामगारांच्या
संखेच्या पन्नास टक्क्याहून अधिक पण फक्त केरळीच
आहेत. केरळची बहुतेक लोक हे बहुभाषक असल्यामुळे त्यांच्याशी बोलण्यास भाषेची आडचन
जाणवत नाही. केरळी लोकांना त्यांची भाषा सोडून किमान हिंदी, तमिळ, इंग्लिश आणि अरबी या भाषा बोलता येतात. केरळी लोकांना त्यांच्या मातृभाषेचा खुपच
आभिमान आहे, कुठल्याही धर्माचा केरळी
माणूस संकटात असतांना सर्वजण त्याच्या मदतीला धावून जातात ही गोष्ट येथे आवर्जून
निदर्शनास येते.
सर्व धर्मीय केरळी लोक 'ओनाम' हा त्यांचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.
या दिवशी सर्व केरळी हॉटेल्स मध्ये केळीच्या पानावर वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल
असते. माझ्या माहिती प्रमाणे या एकाच दिवशी येथे शुद्ध शाकाहारी जेवण मळत असावे.
मल्याळम भाषेत येथून अनेक दैनिके प्रसिद्ध
होतात. भारता बाहेर
राहून ह्या केरळी लोकांनी आपली मातृभाषा आणि संस्कृती किती प्रेमाने जपली आहे हे
पाहून एखाद्या मराठी भाषाकाचे डोळे दिपून जावेत. मराठी माणसांना नवल वाटणारी हि
गोष्ट आहे. क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्र कितीतरी मोठा असला
तरी भाषेच्या बाबतीत आपण मराठी लोक किती भरकटलो आहोत याची खंत प्रत्येक मराठी
माणसाला येथे जाणवते. एखाद्या शुष्क
वाळवंटात हिरवेगार झाड क्वचितच किंवा पाहण्यासच भेटू नये तशीच गत येथे मराठी
भाषकांची आहे. हाजारात एखादा मराठी बोलणारा कधीतरी भेटतो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)