आठवतोय का तुम्हाला?
भल्या सकाळी तुर्कस्तानातील एका समुद्रकिना-यावर
पालथा पडलेला तो एक बालक...
निळी चड्डी आणि लाल शर्ट घातलेला
होय तोच मी!
मी ॲलन कुर्दी बोलतोय...
वय जेमतेम तीन वर्ष
आता त्याची वाढ कायमची खुंटली आहे
कारण माझं वय कधीच "सुपूर्द
ए खाक" झालंय
सुरूवात कशी करू?
हेच कळत नाहीये
माझा भूतकाळ आठवण्याचा तरी मला हक्क आहे ना?
की तोही हिरावून घ्याल माझ्यापासून?
जसा माझा कोवळा जीव घेतला तसा?
माझ्या देशवासीयांना ठार मारण्यात येत होते
त्यांच्या मृत्यूचा तमाशा पहाण्याशिवाय
या जगाला काहीच करता आलं नाही
जगानेही शेवटी पाठ फिरवली आमच्याकडे
कारण त्यांना आमचे निर्दयी अंत पहावेसे वाटेनात
आमच्याच बापजाद्यांच्या मायभूमीतून
आम्हाला बेदखल करण्यात आलं
आमच्याच देशात आम्ही जगण्याचा हक्क गमावून बसलो
कारण......?
कारण आम्ही कुर्दी होतो.....कुर्दी
"त्यांच्या" नियमानुसार
कुर्दी लोकांना आता इथं जगण्याचा मुळीच अधिकार नव्हता
पण मला, माझ्या कुटुंबियांना जगायचं होतं
मला मोठं व्हायचं होतं
एक फुल बनून उमलायचं होतं
म्हणूनच
आम्ही धावत होतो या शहरातून त्या शहरात
कधी वेश बदलून, कधी जीव मुठीत धरून
कारण सतत बाँब कोसळत होते
सू सू गेळ्या सुटत होत्या
फक्त आमच्या सारख्यांचाच वेध घेण्यासाठी
आमच्या घराचा, गावाचा
कधीच ढिगारा झाला होता
आमच्या भूईसपाट झालेल्या घरांचा व शहरांचा
शकडो वर्षांनी शोधही लागेल संशोधकांना
याठिकाणी ऐके काळी मानवी संस्कृती नांदत होती
यावर त्यांना विश्वासच बसणार नाही
आणि ते हर्षभरित होतील
मातीखाली गाडलेली घरं पाहुन
त्यांना सापडतील थोरा मोठ्यांचे सांगाडे
मस्तकाची चाळनी झालेल्या कवट्या पाहुन तर ते कदाचित निष्कर्ष काढतील
या काळातील आधुनिक शस्त्रांचा
पण रासायनिक आणि विषारी वायुने कित्येक ठार झाले
याचा शोध लागेल का त्यांना?
इतिहासाची पानं तोपर्यंत टिकली, तर कदाचित लागेलही
असो...
आकाश हेच आता आमच्या डोक्यावरलं छप्पर होतं
स्वतःच्याच देशात निर्वासित होणे फारच वेदनादायी असतं
माझ्या बाबाला लोक म्हणात होते
युरोपात चल तिथं चांगलं जगता येईल,
तिथलं सरकार मदत करेल
गोळीची किंवा बाँब कोसळण्याची तिथं भितीतरी नसेल
माझ्या बाबानं होता नव्हता तो पैसा जमवला
आणि कसंतरी तुर्कस्तान गाठलं आम्हाला घेऊन
मी, गालीब आणि मामा
तस्कराला पैसा देऊन आम्ही जाणार होतो युरोप खंडात
तुर्कस्तान म्हणजे युरोपचे प्रवेशद्वार
फक्त समुद्र ओलांडला की झालं
मग आम्हाला कुणी निर्दयीपणे ठार करू शकत नव्हतं
आम्ही निर्वासित म्हणून तिथं जगू शकणार होतो
किती स्वप्न होती आमची जीवन जगण्याची
अनेक प्रयत्नानंतर
आम्हाला युरोपात घेऊन जाण्यास एक तस्कर तयार झाला
बाबाने जीवन भराची कमाई त्याला दिली
बोटीने आम्हाला ग्रीसच्या हद्दीत सोडण्यासाठी
बोटी वाल्याला हवा होता फक्त पैसा
आम्ही जगावं की मरावं याच्याशी त्याला देणं घेणं नव्हतं
म्हणूनच तर बोटीत बसल्यावर आम्हाला
दिखाव्यासाठी का होईना
परिधान करण्यासाठी दिली गेली
नकली लाईफ जाकेट
आठ माणसांच्या बोटीत आम्ही होतो बहुधा दुप्पट
समुद्र खवळलेला होता
आणि आम्ही जगायचं की मरायचं याचा सौदा बोटी वाल्याशी करून
बसलो होतो
बोटीने किनारा सोडला
पाच मिनिटातच बोट पाण्यात बुडायला लागली
बोटीवाला जीव वाचवून पळला
आता काय?
आम्ही सगळे सैरभैर झालो
शेवटी आमच्या जगण्याच्या स्वप्नाला घेऊन बोट बुडालीच
माझा बाप धावत होता, पोहत होता
इकडून तिकडे...
पालथ्या बोटीखाली आम्हाला शोधत होता
कुणाला वाचवू? मामाला? गालिबला? की मला?
माझा बाप ओक्साबोक्सी रडत
होता
पाण्यात सूर मारत होता
आम्हाला हाक देत होता
आम्हा मुलांना छातीजवळ कवटाळून धरण्याचा प्रयत्न करत होता
उपरवाल्याला भिक मागत होता
पण त्या काळ्या निर्दयी पाण्याने शेवटी घात केला
मामा बुडाली, गालीबही दिसेनासा झाला
सर्वात शेवटी माझाही हात निसटला
आणि मी ही खूप खूप दूर निघून गेलो...
मामापासून, बाबापासून, माझ्या मातृभूमीपासून
बहुतेक आमचं मरण आगीच्या भडक्यात लिहीलेलं नसावं
म्हणूनच आम्हाला थंड पाण्यात नियतीने बुडून मारलं
माझी मामा किती भाग्यवान निघाली
त्या क्रूर वासनांध श्वापदांच्या हातातून ती वाचली
मी, गालिब किती भाग्यवान
गळे न कापताही आम्हाला सुखाचं मरण आलं
पण बाबाचं काय?
आयुष्यभर साथ देण्याचे वचन माझ्या मामाने दिले असेल बाबाला
तिने तो शब्द मोडल्यावर काय वाटलं असेल माझ्या बाबाला?
गालिबला बुडतांना पाहुन किती इंगळ्या डसल्याच्या वेदना झाल्या असतील माझ्या बाबाला?
माझा हात निसटल्यावर काय
परिस्थिती झाली असेल माझ्या बाबाची?
बाबा बाबा काय होईल तुझं?
दुस-या दिवशी मी किना-याला लागलो नसतो तर,
मी देखील त्या हजारो सिरीयन मुलांसारखा बेवारशी गणला गेलो असतो
सिरीयस मुलांचे दुःख, वेदना सांगण्यासाठीच
मला परत देवाने किना-याला पाठवले असावे
मनुष्य प्राण्यांनो
मी ॲलन कुर्दी बोलतोय
किडामुंगींसारखं मरत असलेल्या
सिरीयन मुलांचा प्रतिनिधी म्हणून....
●●●