शनिवार, १४ जून, २०१४

सौदी अरेबिया डायरी : भाग ४ धार्मिक वातावरण व नियम

सौदी अरेबिया हा १००% मुस्लिम देश आहे. येथील नियम जगापेक्षा खूपच वेगळे आणि कठोर आहेत. येथे राहणाऱ्या देशी - विदेशी लोकांना त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सौदी मधील काही महत्वाच्या नियमां विषयी माहिती .
इकामा (IQAMA) : थोडक्यात अर्थ रहिवाशी ओळखपत्र. हे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही सौदी मध्ये नोकरी करण्यासाठी आला असाल तर तुम्हाला हे ओळखपत्र कंपनी कडून अथवा मालक कडून दिले जाते (आरबी मध्ये याला कफील म्हणतात) इकामा साठी आपला पासपोर्ट कफिलाच्या ताब्यात द्यावा लागतो. सौदी अरेबियाच्या नियमा प्रमाणे एक वेळी आपण इकामा किंवा पासपोर्ट यापैकी एकाच गोष्ट बाळगू शकतो. सौदी मध्ये गेल्यावर कफील आपला पासपोर्ट स्वतःच्या ताब्यात घेतो, त्यामुळे येथे फसवणूक होण्याची फार शक्यता असते. त्यासाठी येथे जाण्यापूर्वी सर्व गोष्टींची खातरजमा करावी.
 इकम्याचा उपयोग बँक खाते, टेलिफोन - मोबाईल कनेक्शन, घर भाड्याने घेणे, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसेन्स अश्या अनेक महत्वाच्या कारणासाठी होतो. इकाम्याचा क्रमांक हा येथील सगळ्या सरकारी यंत्रणेशी जोडला गेलेला असतो. येथे मुस्लिम आणि अमुस्लिम यांना वेगवेगळ्या रंगांचे  इकामे दिले जातातइकाम्यावर तुमचे नाव, धर्म, राष्ट्रीयत्व, इकामा क्रमांक, कफिलाचे नाव, व्हिजा क्रमांक, व्हिजाचा प्रकार, तुमचा हुद्दा, पासपोर्ट क्रमांक आणि इकाम्याची मुदत या गोष्टींचा उल्लेख अरबी आणि इंग्रजी मध्ये असतो.
घराबाहेर पडतांना तुमचा इकामा नेहमी जवळ बाळगावा. जर आपण व्हिजीट व्हिजावर गेलो आसोल तर स्वतःचा पासपोर्ट जवळ ठेवावा. नवीन गेलेल्या कामगारांसाठी जर तुमचा पासपोर्ट इकामा बनवण्यासाठी कंपनीने घेतला असेल आणि तुमचा इकामा अजून बनला नसेल तर आपल्या पासपोर्टची छायांकित प्रत (Photo Copy) करून (उदारणार्थ : मुख्य पान, शेवटचे पान, व्हिजा लावलेले पान आणि दाखल (Entry) शिक्का विमानतळावर मारतात ते पान) यावर कंपनीचा शिक्का मारून घ्यावा. बऱ्याच वेळा या गोष्टी कंपनी स्वतःहून देतात.
                या बाबत माझा एक अनुभव आहे. त्यावेळी हज यात्रेचे दिवस होते. त्यामुळे सौदी मध्ये ठीक ठिकाणी पोलिस तुमचा इकामा तपासतात. मी सौदी मध्ये नवीन आलेलो होतो माझा पासपोर्ट कंपनीने इकामा बनवण्यासाठी घेतलेला होता. त्या दिवशी मी, रत्नाकर हिरे, कमलेश आणि संजय माने हे सुट्टी निम्मित रत्नाकर याच्या गाडीतून बाहेर शॉपिंगसाठी दम्माम शहरात गेलो होतो. तेथे अनेक ठिकाणी तपासणी चालू होती. गाडी सिग्नला थांबल्यावर पोलिसांनी आम्हाला इकामा दाखवण्यासाठी सांगितले. सर्वांनी आपआपले इकामे दाखवले पण माझ्याकडे फक्त कंपनीने दिलेला कागद होता. पोलिसांनी आम्हाला गाडी बाजूला लावायला सांगितली. त्यांनी माझ्या कडील कागदाची बरीकीने तपासणी केली, त्यावर कंपनीचा शिक्का आणि अरबी भाषेत मजकूर लिहिलेला होता, त्यामुळे माझी सुटका झाली अन्यथा मला सौदी मधील तुरुंगाची (कालाबुस) हवा खावी लागली असती. बाहेर गेल्यावर जर तुमच्याकडे इकामा नसेल आणि पोलिसांनी पकडले तर ते तुम्हाला तुरुंगात टाकतील आणि जो पर्यत कंपनीचा प्रतिनिधी (स्थानिक अरबी) येवून तुमची सुटका करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुरुंगातच राहावे लागते. इकामा बनवण्याची सर्व जबाबदारी आपल्या कफिलची किंवा कंपनीची असते. सौदी मध्ये आल्यावर इकामा बनवण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय चाचणी (Medical Test) द्यावी लागते. यामध्ये सर्व आजारांची सखोल चाचणी करतात. जर तुम्ही वैद्यकीय तपासणीत नापास झालात तर तुम्हाला इकामा मिळत नाही आणि जेणेकरून तुम्हाला परत मायदेशी यावे लागते.

साप्ताहिक इतर सुट्ट्या : येथे प्रत्येक शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्याच बरोबर रमादान ईद साठी दिवस, हज यात्रा (बकरी ईद) साठी दिवस आणि राष्ट्रीय दिन २३ सप्टेंबर एक दिवस सुट्टी असते. या व्यतिरिक्त कुठलीच सुट्टी नसते.

रमजान महिना : रमजान हा मुस्लिमांचा पवित्र महिना आहे. या महिन्यात सौदी मध्ये फार कडक नियम पाळले जातात. उपवासाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी खाण्यास पिण्यास बंदी असते. रस्त्यावर तुम्ही पाणी पण पिवू शकत नाहीत. या काळात सर्व खानावळी बंद असतात. कंपनी मध्ये मुस्लिम कामगारांना अर्धा दिवसच काम असते. नियम मोडणाऱ्या अमुस्लीमांना कडक शिक्षा होवू शकते.

नमाजाच्या वेळा : नमाजाच्या वेळी सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, खानावळी, हे नमाज संपे पर्यंत बंद असतात. कंपनीचे मुस्लिम कामगार नमाजासाठी १५ ते २० मिनिटे सुट्टी घेवू शकतात. सर्व कंपन्या, शॉपिंग मॉल्स, जेथे कामगारांची संख्या जास्त आहे तेथे प्रार्थना स्थळ (मस्जिद) असणे सक्तीचे आहे.     

मृत्युदंड : सौदी अरेबिया मध्ये मुस्लिमांची शरीया कायदा लागू असल्यामुळे येथे मृत्युदंडाची शिक्षा मोठ्या प्रमाणात दिली जाते. मादक पदार्थांची तस्करी किंवा विक्री करणे, खून, बलात्कार, मुस्लिम धर्म सोडणे (मुस्लिम धर्मातून दुसऱ्या धर्मात जाने), लुटमार दरोडा टाकणे, विवाह बाह्य अनैतिक संबंध आणि समलिंगी संबंध या कारणांसाठी येथे मृतुदंड दिला जातो. त्याच प्रमाणे चोरी करणाऱ्याचे हात चाटले जातात

मृत्युदंडाची पध्दत : मुस्लिम धर्माच्या शरीया कायद्याप्रमाणे येथे सार्वजनिक ठिकाणी (शक्यतो शुक्रवारी दुपारची नमाज झाल्या नंतर मस्जिदिसमोर) आरोपीचे मुंडके धारदार  तलवारीने छाटण्यात येतो. जो आरोपीचे मुंडके  छाटतो त्याला अरबी भाषेत जल्लाद म्हणतात. सौदी मध्ये महिलांचेही शिरच्छेद झालेले आहेत. काहीवेळा आरोपींना सार्वजनिक ठिकाणी (शक्यतो शहराच्या मुख्या चौकात) फासावर दिले जाते. मृत्युदंडाची हि पध्दत सर्व देशी-विदेशी नागरिकांना लागू आहे

सौदीतील महिलामुस्लिम देश असल्यामुळे येथे महिलांवर अनेक बंधने आहेत. मुस्लिम आणि अमुस्लिम महिलांना बुरखा (अभाया) घालणे बंधनकारक आहे. परदेशातून आलेल्या सर्व महिलांना बुरखा परिधान करावा लागतो. येथे कुठल्याही धर्माच्या महिलांना वाहन चालवण्यास बंदी आहे

काही महत्वाचे नियम :
दारू पिणे विक्री करणे यावर बंदी त्यामुळे बिअर बर नाहीत.
सिनेमा थियटर नाही.
अमुस्लीमांना हज प्रांतात (मक्का आणि मदिना) येथे जाण्यास बंदी.
अमुस्लिमांना सौदीत अंत्यविधी करण्यास बंदी.

सौदी अरेबियाचा राजा, राजपुत्र,राजघराणे आणि इस्लाम, यांच्या विषयी उपशब्द केल्यास कडक शासन

बुधवार, ४ जून, २०१४

सूर्य मावळला


खिन्न झाल मन
चहूकडे अंधार दाटला
उगवतीचा सूर्य मध्यांनीच
मावळतीला गेला….
ओस पडले रान
कंठ दाटुनिया आला
पाहिलेल्या स्वप्नांचा
सगळा चुराडा झाला
स्वतःच्या तेजाने
उजवळीले आम्हाला
अविरत कष्टाने
दाविल्या वाटा भविष्याच्या
प्रकाशाविना तुझ्या रे !
कोमेजुनी आम्ही जाणार
तुझ्या आठवणी नेहमी
चटका काळजाला देणार
खिन्न झाल मन
चहूकडे अंधार दाटला
उगवतीचा सूर्य मध्यांनीच
मावळतीला गेला…. 

मंगळवार, ३ जून, २०१४

गोपीनाथ मुंढे साहेबांच्या आठवणी



सुषमा मुंढे आणि एकाच हश्या......
गोपीनाथ मुंढे हे राजकीय विनोद करण्यात आणि आपल्या खास शैलीत चिमटे काढण्यासाठी प्रसिद्ध होते. एकदा असाच एक विनोद मुंढे साहेबांच्याच अंगलट आला. १९९८ सालातील घटना आहे. स्वर्गीय प्रमोद महाजन केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री होते. त्यावेळी राज्यात युतीचे राज्य होते आणि गोपीनाथ मुंढे उप मुख्यमंत्री तर शिवसेनेचे प्रमोद नवलकर सांस्कृतिक कार्य मंत्री होते. दूरदर्शनच्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुंढे साहेबांना आमंत्रित केले होते तर प्रमुख पाहुणे हे अर्थातच केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजन हे होते.
   
मुंढे साहेबांनी भाषणाला सुरुवात चिमटा काढूनच केली.
"मला असे वाटते आहे कि मी पण माझे नाव बदलून प्रमोद मुंढे ठेवू. कारण दूरदर्शन वाल्यांना प्रमोद नावाच्या लोकांशिवाय दुसरे कोणी दिसताच नाही"
सभागृहात एकच हश्या पिकला. प्रमोद महाजन काय चिमटे काढण्यात कमी नव्हते. जेव्हा महाजन साहेबांची बारी आली त्यावेळी त्यांनीही स्वतःच्या शैलीत मुंढे यांना उत्तर दिले.
"जर केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्याचे नाव स्वतः पुढे लावल्याने दूरदर्शन वर प्रसिद्धी मिळणार असेल, असे मुंढे साहेबांना वाटत असेल तर ते एक गोष्ट विसरत आहेत कि मी आत्ताच काही दिवसापूर्वी या मंत्रालयाचा पदभार स्वकारला आहे. माझ्या आधी या मंत्रालयाच्या सुषमा जी मंत्री होत्या. मुंढे साहेबांनी स्वतःचे नामकरण प्रमोद मुंढे न करता सुषमा मुंढे केल्यास दूरदर्शन नक्कीच प्रसिद्धी देईल"

आणि सभागृहात परत जोरदार हश्या पिकला .......
- गणेश पोटफोडे

शुक्रवार, ३० मे, २०१४

हरवलेले बालपण

बालपण किती गमतीशीर असते नाही का? म्हणूनच कोणी तरी म्हटले आहे कि "बालपण देगा देवा ". आयुष्य हे वाहत्या नदी सारखे आहे, वाहत असतांना किनाऱ्यावर आलेली ठिकाणे परत आयुष्यात येत नाहीत तसेच गेलेला काळ आणि बालपण आपल्या जीवनात येणार नाही. बालपण तर आता निघून गेले आपण कधी मोठे झालो हे कळलेच नाही. आजही एखाद्या लहान मुलांना खेळतांना पहिले कि मनात बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. भूतकाळातील गोष्टी आठवतात तेंव्हा ओठांवर अलगद हास्याची लकेर उमटते.

घरच्यांना सांगता पोहायला जाणे किंवा रात्री मित्रां बरोबर दुसऱ्याच्या बागेलीत फळे चोरून खाणे अश्या अनेक गोष्टी आपण केल्या. जी मजा तासंतास गावाच्या नदीत किंवा विहिरीत पोहण्याची होती ती मजा आजच्या नितळ पाण्याने भरलेल्या स्विमिंग पूल मध्ये मिळणार नाही. जी मजा दुसऱ्यांच्या चिंचा - बोरे चुरून खाण्यात होती ती आजच्या स्ट्रॉबेरी - सफरचंद खाण्यात नाही.

लहान असतांना आपण किती खोड्या केल्या हे आपल्याला माहित आहे तरीही आपण चांगले शिक्षण घेवून मोठे झालोत. आजच्या लहान मुलांनाही स्वातंत्र्य देवून त्यांना खूप खेळू दिले पाहिजे कारण अभ्यासाच्या धाकात ते कधी मोठे होतील हे त्यांनाही कळणार नाही आणि आपल्यालाही. त्यांचे बालपण आपण हिरावून तर घेत नाहीत ना? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.


शेवटी चांगले बालपण हाच चांगल्या आयुष्याचा पाया असतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त अभ्यासाचा धाक दाखवून मुलांचे बालपण हिरावून घेवू नका.

सोमवार, १९ मे, २०१४

चटके

उन्हाचे चटके
भेगाडले रान
पाण्याच्या आवाजाला
आतुरले कान

आटली विहीर
करपले पिक
पोटाला कोणी
घालेना भिक

लाचार नजर
आभाळी भिडली
कधी येईल
ढगांची सावली

थकले  सर्वांग
उपाशी पोट
कधी रे देशी
पाण्याचा घोट

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

कोयता (ऊस तोडणी कामगारांचे मनोगत)



भल्या पहाटे शुक्राची चांदणी उगवते
तांड्या वरल्या चुल्हीच्या धुराड्यात
परत ती लपून जाते
अन लगबग सुरु होते
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

कोपीतल्या मंद कंदिलाच्या प्रकाशात
भाजतात भाकरी दिवसभराच्या
मळकटलेल्या गोधडीवर निजलेली लेकरं
उठतात तांड्यावरल्या कलम्ह्यानं
अन न सांगताच जावून झोपतात गाडीत
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

जुंपल्या बैलगाड्या निघाल्या फडाकडे
सांगताच बैलही धावले रोजच्याच वाटानं
एका हातात 'कोयता' अन दुसऱ्या हातात?
'तान्ह लेकरू' गारठ्यानं कुडकुडनारं
उराशी बिलगलेलं अन शांत झोपलेलं 
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

चालत्या गाडीतच होते सकाळची न्याहारी
भाकरीच्या सोबतीला असते मीठ मिरची
उजाडायच्या आधीच होते कामाला सुरुवात
लेकरं खेळती पाचरटात आम्ही असतो फडात
गारठ्यातही फुटतो आम्हाला दरादरा घाम
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी! 

सपासपा चालतो जीवलग आमचा 'कोयता'
मग जमवतो  मागे कष्टाच्या मोळ्या
दिवस चढताच भरायची असते गाडी
फॅक्टरीच्या प्रवासात उरलेली चटणी भाकरी
रोजच्या दिवसाचा असाच आमचा पाढा
कश्यासाठी? कश्यासाठी? जगण्यासाठी!