शुक्रवार, २९ जुलै, २०१६

कविता : आई


या वाळवंटात तुझी आठवण येते खूप आई
वाळूच्या कणाकणात दिसते तुझेच रूप आई

तुझ्या पुरण पोळीचा दरवळ आठवतो तेंव्हा
स्वप्नातही दोन चमचे जास्त वाढतेस तूप आई

दिवाळीचे खमंग फराळ संपून जायचे तेंव्हा
लपवून ठेवलेले लाडू द्यायचीस गुपचूप आई

खोड्यांना वैतागून शेजारी तक्रारीला यायचे तेंव्हा
माहित असुनही तोंडाला लावायचीस कुलूप आई

पावसात खेळून खेळून आजारी पडायचो तेंव्हा
हुरड्याच्या पीठाचे बनवून द्यायचीस सूप आई

बुधवार, २७ जुलै, २०१६

कविता : शाळेचं दप्तर

माझं शाळेचं दप्तर
होतं फार मजेशीर
पांढर्‍या खताच्या गोणीला
दोन बंध लावून शिवलेलं

त्यातच कोंबलेली असत
वह्या, पुस्तकं, लाकडी पट्टी
कोरे कागद, पॅड, रंगपेटी
आणि जेवणाचा डब्बा

ओमेगाच्या कंपास पेटीला
शिवलेला होता एक खिसा
कारण कंपास पेटीत
माझा फार जीव होता

वर्षात वह्या पुस्तकं बदलायची
पण कंपासपेटी तीच असायची
कंपास पेटीला आतून चिकटवलेली होती
दरवर्षीच्या ध्वज दिनाची तिकीटं

दप्तरात होती अजुन एक
खताची मोकळी पांढरी गोणी
स्वच्छ धुतलेली आणि
दाबून घडी करून ठेवलेली

वर्गात नव्हती बाकं तेंव्हा
आम्ही गोणी अंथरूणच बसायचो
पावसाळ्यात हीच गोणी
घोंगता करून वापरायचो

स्वतःला पावसात भिजायला
फार फार आवडायचं
पण दप्तर भिजल्यावर
फार वाईट वाटायचं

दप्तर जरी मळकटलेलं होतं
पण मला ते प्रिय होतं
कितीतरी वस्तूंनी भरलेल आसलं
तरी त्याचं कधी ओझं नाही वाटलं

एक दिवस शाळा संपली
ते कुठेतरी अडगळीत पडलं
पण मला अजूनही आठवतं
माझं 'शाळेचं दप्तर'

गुरुवार, २१ जुलै, २०१६

कविता : चल जाऊ पोहायला

पाणी आहे खूप
गावाच्या नदीला
मंदिराच्या बारवेला
रानातल्या विहीरीला
दगडाच्या खाणीला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

गवताची गर्दी झालीयं
रानातली पिकं वाढलीयं
मकाला कणसं आलीयं
लपायला जागा झालीयं
बोरं पिकलीत झाडाला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

शाळेला दांडी मारू
गुपचूप खाणीवर जाऊ
दुपारच्या सुट्टीत ऊस खाऊ
दप्तर लपवून ठेवू
कपडे लटकून झाडाला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

दगडाचा ठाव आणू
पाण्यात धराधरी खेळू
दोघात शर्यत लावू
पोहण्याची मज्जा लुटू
भांडणे ठेवून बाजूला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

उन्हात बसून चड्डी वाळवू
दुपारनंतर मुलांसोबत निघू
त्यांच्याकडून वर्गपाठ मिळवू
घरी जाऊन अभ्यास करू
पण सांगायचे नाही कोणाला
उठ मित्रा उठ! चल जाऊ पोहायला

मंगळवार, १२ जुलै, २०१६

कविता : धबधबा



झरझर धारा वाहत येती डोंगर माथ्यावरूनी
क्षणभर वाटे जणू दुध सांडले रंग त्यांचा पाहुनी

खळखळ वाहत त्या जल धारा भेटती मोठीच्या गळा
ओसंडूनी त्या पुढे धावती साकारण्या निसर्ग सोहळा

हिरव्या रंगात धवल शोभतो त्या दूर माथ्यावरी
गार तुषार पवन धावून आणतो नकळत गालावरी

कोसळणारा तो कोलहल चहूकडे रणभूमी सम भासे
किरणे त्या केशरी भास्कराची सप्तरंग उधळीत असे

कोण आडवी धबधब्यास? तो चिर तांडव नृत्य करी
खोल दरीतील अक्राळरूप त्याचे अंगावर रोमांच भरी

शुक्रवार, १ जुलै, २०१६

कविता: माझा ताजमहाल

तुझ्या प्रेमाखातर ताजमहाल मी
कसा कोठे बांधणार होतो

शब्दांचा जरी बादशाह मी
दगड कसे साळणार होतो

तुझ्या प्रेमाचा कवी मी
कविता एक करणार होतो

मुमताज तुला मानले मी
शहाजहान तुझा होणार होतो

ओळीत तुला साठवून मी
माझा ताजमहाल घडवणार होतो