सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

सौदी अरेबिया - रब-अल्-खाली वाळवंट

 आखाती देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी उभा रहातो, तो म्हणजे वाळवंट किंवा तेलाच्या विहीरी, इथली अरब संस्कृती, नाही तर मग या देशांतील आर्थिक संपन्नता. आखाती देशांचा बराचसा भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. आखाती देश हे आर्थिक दृष्ट्या खूप संपन्न आहेत, परंतु खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी इथले लोकजीवन अतिशय खडतर होते. मासेमारी किंवा समुद्रातून मोती शोधून त्यांचा व्यापार हेच इथल्या लोकांचे महत्त्वाचे व्यवसाय होते. खनिज तेलाच्या शोधानंतर मात्र या देशात मोठी आर्थिक संपन्नता आली. रोजगार निर्मितीमुळे इथले जीवनमान बदलून गेले. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यानी येथे कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक केली. आर्थिक क्रांतीमुळे स्थानिकांबरोबरच परदेशी लोकांनाही या देशांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या.


आखाती देशांची अर्थव्यवस्था ही अजूनही खनिज तेलावर अवलंबून आहे. खनिज तेलाच्या विहीरी या समुद्रात किंवा वाळवंटी प्रदेशात विखुरलेल्या आहेत. यातील बहुतांश विहीरी 'रब अल खाली' या वाळवंटात आहेत. रब अल खाली चा अर्थ 'रिक्त भाग' (Empty Quarter) असा होतो. हा अरब खंडातील सर्वात मोठा वाळवंटी प्रदेश आहे. सौदी अरेबिया, युएई, ओमान आणि येमेन या चार देशांचा बराचसा भूगभाग या वाळवंटाने वेढलेला आहे. साधारणपणे साडे सहा लाख वर्ग किलोमीटर (महाराष्ट्र राज्याच्या दुप्पट) एवढे याचे एकूण क्षेत्रफळ आहे. सौदी अरेबिया, ओमान आणि युएई या देशांच्या त्रिसीमा जिथे एकत्र येतात तो भाग तर खनिज तेलानी खूप समृद्ध मानला जातो. सौदी अरेबियाच्या एकुण क्षेत्रफळाच्या एक चर्तुथांश भाग या वाळवंटाने व्यापलेला असून हा संपूर्ण प्रदेश एकदम निर्जन आहे.
 
वाळवंटाने वेढलेले शेबा 

रब अल खालीचा हा प्रदेश पर्यटकांसाठी खुला नसला तरी अधिकृत कामानिमित्त कंपनी मार्फत येथे जाता येते. सुदैवाने मला तिन्ही देशातील या भूभागात जाण्याची संधी मिळाली. त्यात सौदी अरेबियातील शेबा (शायबाह किंवा इंग्रजी मध्ये Shaybah) येथील अनुभव तर खरोखरच रोमांचित करणारे होते. शेबा ऑईल फिल्ड ही सौदी अरेबियातील महत्वाचे खनिज तेल भांडार आहे. इथले तेल चांगल्या प्रतीचे गणले जाते. १९९८ सालापासून येथे तेल उत्पादनास सुरूवात झाली. येथे उत्पादित तेलाला पाईपलाईन मार्गे अबकैक या रिफायनरीत नेले जाते. या पाईपलाईनची लांबी सुमारे ६३८ किमी इतकी आहे. शेबातील तेलाच्या विहीरी युएईच्या सीमेपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहेत. शेबा येथील वातावरण खूपच शुष्क आहे. उन्हाळ्यात दिवसाचे तापमान ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते तर हिवाळ्यात रात्रीचे तापमान शून्य अंशापर्यत घसरते. येथे पाऊस जेमतेच पडतो. वर्षाकाठी सरासरी ३० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होते. मी ज्यावेळी शेबाला गेलो, तो डिसेंबर महिना होता. डिसेंबर महिन्यात इथले वातावरण थंड आणि आल्हाददायक असते. 

शेबातीळ वाळूच्या टेकड्या 

शेबामध्ये जाण्यासाठी हवाईमार्ग हाच एकमेव पर्याय आहे. शेबा हे ठिकाण अल-हफूफ (किंवा अल-हास्सा) आणि रियाध शहरांशी रस्त्याने जोडलेले असले तरी हा रस्तेमार्ग फक्त मालवाहतूकीसाठी वापरला जातो. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामको शेबासाठी विशेष विमानसेवा राबवते. अरामकोची स्वतःची एअरलाईन्स असून, महत्वाच्या सर्व प्लॅन्टवर कामगारांची ने-आण करण्याचे काम ही एअरलाईन्स करते. त्यासाठी ठिकठिकाणी अरामकोची स्वतःची विमानतळं आहेत. मी दम्मामच्या अरामको विमानतळाहून शेबाला हवाईमार्गे गेलो. दम्मामहून शेबाला जाण्यासाठी अंदाजे दोन तास लागतात. हे विमान अल-हफूफ मार्गे जाते. एकदा का विमानाने दम्माम सोडले तर आकाशातून दिसते ती चहूकडे शुष्कता आणि ओसाड जमिन. दम्माम आणि अल-हफूफ दरम्यान विमानातून तुरळक ठिकाणी मानवी वस्त्या नजरेस पडतात, परंतु अल-हफूफ ते शेबा या प्रवेसा दरम्यान रुक्ष वाळवंटाशिवाय काहीच नजरेस पडत नाही. या भागात तांबड्या वाळवंटाच्या उंचच उंच टेकड्या आहेत (Desert Dunes). रब अल खालीच्या काही भागात या वाळूच्या टेकड्यांची उंची २०० मीटरपर्यंत आहे. या वाळूच्या टेकड्यांदरम्यान ठिकठिकाणी तळ्यासारखी मोकळी जागा दिसते. हजारो वर्षांपूर्वी पावसाचे पाणी साचून ही तळी तयार झाली होती. आज फक्त या तळ्यांच्या खाणाखुणा तेव्हढ्या आकाशातून दिसतात. 

शेबातील तात्पुरती कामगार वसाहत 

शेबा हे एक छोटेसे विमानतळ आहे. दम्माम, जेद्धा, रियाध आणि अल-हफूफ या शहरांतून येथे रोज अनेक उड्डाणे संचलित केली जातात. वाळवंटाच्या टेकड्या चारही बाजूना सारुन निर्माण केलेल्या सपाट जागेत शेबा विमानतळासह कामगारांची निवास व्यवस्था, क्रीडांगण, खाणावळ, अग्नीशमन केंद्र आणि रूग्णालय यासारख्या इमारती बनवलेल्या आहेत. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर चारही बाजूना वाळूचे डोंगर दिसतात. वाळूच्या या डोंगरामुळे आपण एखाद्या खड्ड्यात आहेत की काय असा भास होतो. या एवढ्या ओसाड भागात अरामकोने नियोजनपूर्वक सर्व इमारती बांधलेल्या आहेत. या बांधलेल्या पक्क्या इमारती बघून नवल वाटल्याशिवाय रहात नाही. विमानतळा लागूनच कामगारांची निवास व्यवस्था आहे. शेबामध्ये येणाऱ्या सर्व कामगारांची अरामको मार्फत राहण्याची व तीन वेळ जेवणाची सोय केली जाते. शेबामध्ये राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा आहे. सर्व स्तरातील कामगार व अधिकारी वर्गासाठी एकच खाणावळ आहे. अरामकोने कामगारांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी येथे खेळाची मैदाने बनवली आहेत. त्यात फुटबॉल, जाॅगिंग ट्रॅक, बास्केटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, स्विमींगपुल आणि जीमचा समावेश आहे. शेबा कॅम्पच्या परिसरात झाडं लावल्यामुळे येथे पक्षांचे वास्तव्य जाणवते. या कॅम्पमध्ये अनेक मांजरी आणून सोडलेल्या आहेत. 

शेबातील तात्पुरती कामगार वसाहत 


शेबामध्ये अनेक वायू आणि खनिजतेल निर्मिती केंद्रे आहेत. ती कॅम्पपासून साधारणपणे दहा किमी च्या त्रिज्येत विविध दिशांना पसरलेली आहेत. याठिकाणी जाण्यासाठी देखील वाळूच्या टेकड्या बाजुला सारुन रस्ता बनवलेला आहे. या रस्त्यावरून जाताना आपण एखाद्या खिंडीतून प्रवास करत असल्याचा भास होतो. येथे वाहनांची गतीला मर्यादा घालून दिलेली आहे आणि त्या गतीच्या पुढे वाहन चालवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वाहनांची गती मोजण्यासाठी ठिकठिकाणी रेडार बसवलेले आहेत. संपूर्ण परिसराला सौदी अरेबियाच्या सैन्य दलाचे कडक सुरक्षा कवच असते. 

शेबातील तात्पुरती कामगार वसाहत 

शेबातील तेल-वायू निर्मिती प्रकल्प आणि इथल्या सुविधा म्हणजे रब अल खाली या सारख्या निर्जन वाळवंटात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मानवाने निसर्गावर मात करण्याचा जणू प्रयत्न केल्याचे दर्शविते. इथला वाळूच्या टेकड्या जरी उष्णतेने लालेलाल होत असतील, परंतु त्यातही एकप्रकारचे सौंदर्य दडलेले आहे. चहूकडे पसरलेली तांबडी वाळू आपण इतर जगापासून खूप लांब असल्याची जाणीव करून देते. रब अल खाली वाळवंट खरोखरच बघायला सुंदर आहे पण उन्हाळ्यात इथे काम करणे म्हणजे कदाचित नरकयातनाच असतील! 

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

वाकाटक राजा पृथ्वीसेन द्वितीयच्या राजमुद्रेचा शोध


महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक राजवंशापैकी वाकाटक हे महत्त्वाचे राजघराने आहे. आजही या घराण्याचा इतिहास तितकासा परिचित नाही. ज्या काही ठोस पुराव्याच्या आधारावर वाकाटक राजघराण्याचा इतिहास परिचित आहे ती साधने म्हणजे काही ताम्रपट, शिलालेख, नाणी आणि धार्मिक ग्रंथातील उल्लेख इत्यादी. नवीन सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावर या राजघराण्यावर सखोल संशोधन, अभ्यास आणि इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची आवश्यकता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अलिकडेच वाकाटक राजघराण्यातील शेवटचा राजा "पृथ्वीसेन द्वितीय" ची तांब्याची राजमुद्रा सापडली आहे. ही राजमुद्रा गोजोली गावातील प्रकाश उराडे यांनी व्यवस्थित जतन करून ठेवली होती. प्रकाश उराडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रंजित उराडे याने वडीलांची जुनी पेटी उघडली असता, त्यांना त्यात काही नाणी व तांब्याची नाण्यासारखी दिसणारी वस्तू आढळली. या तांब्याच्या गोल वस्तूवर काहीतरी लिहीलेले होते. रंजित यांनी कुतूहलापोटी याची अधिक माहीती घेतली असता इतिहास अभ्यासकांना ही वस्तू म्हणजे दुसरी तिसरी काही नसून ती वाकाटक राजा पृथ्वीसेन द्वितीय याची राजमुद्रा असल्याचे समजले. या राजमुद्रेमुळे वाकाटक राजघराण्याचा खूप मोठा इतिहासावर उजेड पडला आहे.

तांब्याच्या धातूपासून बनवलेली ही राजमुद्रा गोलाकार असून ती साधारण ६० ग्रॅम वजनाची आहे. या राजमुद्रेच्या सर्वात वरच्या भागावर बौद्ध देवता तारा (किंवा राज्यलक्ष्मी) हिचे चित्र आणि त्याखाली ब्रह्मी लिपीत (मध्यप्रदेशी लिपीत) आणि संस्कृत भाषेतील चार ओळींचा लेख कोरलेला आहे. लेख आणि देवतेची प्रतिमा ही उलटी कोरलेली आहे (Mirror Image). याचाच अर्थ या राजमुद्रेचा उपयोग राजआज्ञा, महत्त्वाचे आदेश साक्षांकित करण्यासाठी केला जात असे. या राजमुद्रेच्या मधोमध छिद्र असून तिथे कदाचित या राजमुद्रेला पकडण्यासाठी मुठ बसवण्याची व्यवस्था केलेली असण्याची शक्यता आहे. आणि कालांतराने ती मुठ विलग झाली असावी. या राजमुद्रेवरील लेखाचे देवनागरी लीप्यंतर पुढील प्रमाणे

"नरेन्द्रसेन - सत्सुनौ:
भुर्तरव्वाकाटक श्रीयः
प्रिथिविषेननृपते
जिगिशौर्ज्जयशासनं"


अर्थ : "नरेंद्रसेण याचा पुत्र पृथ्वीसेन याची ही राजमुद्रा"

या मुद्रेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या विनंतीवरून रंजित उराडे यांनी उदार मनाने ही राजमुद्रा नागपूर मध्यवर्ती संग्रहालयास दान केली आहे. लवकरच हा ठेवा इतिहास प्रेमी अभ्यासकांसाठी उपलब्ध होईल.

पृथ्वीसेन द्वितीय चा कालखंड हा इ. स. ४७५ ते इ. स. ४९५ असा होता. अलिकडच्या काळात सापडलेली ही वाकाटक राजघराण्यातील दुसरी राजमुद्रा आहे. याआधी नंदीवर्धन येथील उत्खननात राणी प्रभावतीगुप्त हिची राजमुद्रा सापडली होती.