माझा जगप्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझा जगप्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ एप्रिल, २०२३

गुदौरीतील हिमवृष्टीचा आनंद

 जॉर्जिया भ्रमंती मधला आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा होता कारण आम्ही आज बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेणार होतो. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फवृष्टी अनुभवणार असल्याने आम्ही फार उत्साही होतो. सकाळीपासूनच तिब्लिसी शहरात पाऊस कोसळत होता. पावसामुळे तापमान शून्य अंशाच्या खाली आले होते. सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर गेलोत. चहा नाश्ता झाल्यावर रेस्टॉरंटच्या गच्चीवर जाऊन गारठ्याचा जरा अंदाज घेतला. बापरे! बाहेर कमालीचा गारवा होता. हात पाय लटलटायला लागले. आम्ही तर पटकन आत आलोत. तेंव्हाच जानवले की आज जरा जास्तच गरम कपडे घालावे लागतील. मी रूमवर आल्यावर शर्टवर स्वेटर आणि त्यावर टोपीचे जॅकेट घातले. कानटोपी, हातमोजे, असे साहित्यही बरोबर घेतले.


आजही ऐका आणि डेव्हिड आम्हाला बरोबर सकाळी दहा वाजता घेण्यासाठी हॉटेलवर आले. आजचा प्रवास जरा लांबचाच होता. म्हणजे संपूर्ण दिवस आमचा फिरण्यातच जाणार होता. सकाळी तिब्लिसी शहर पावसात न्हाऊन निघाले होते. रहदारीचे नियम सगळीकडे पाळले जात होते. कर्णकर्कश हॉर्न कुठे वाजवतांना जाणवले नाही. एक गोष्ट मला प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते ती म्हणजे जॉर्जियात दोन्ही बाजूने ड्रायव्हींग करणाऱ्या गाड्या होत्या. मला हे जरा विचीत्रच वाटले. एखाद्या देशात एका विशिष्ट पद्धतीचीच ड्रायव्हींग असतं, उदाहरणार्थ डावीकडून किंवा उजवीकडून. जशी भारतामध्ये उजव्या हाताला ड्रायव्हर सीट असते. पण जॉर्जिया मध्ये मिस्त्र प्रकारची ड्रायव्हिंग होती. बहुतांश गाड्यांचे ड्रॉयव्हर सीट हे डाव्या हाताला होते तर तुरळक गाड्यांचे ड्रायव्हर सीट हे उजव्या बाजूला होते, तरीही सगळीकडे डव्या हाताच्या ड्रायव्हींगचे नियम पाळले जात होते.

कुरा नदीच्या किनाऱ्यावरून वळणे घेत गाडी तिब्लिसी शहराबाहेर पडत होती. कुरा नदीचे हिरवेगार पाणी आणि त्यावरील विविध पूल नजर वेधून घेत होते. गाडीत डेव्हिडने जॉर्जियन भाषेत गाणी लावली होती. त्या भाषेतील गाणी न समजणारी होती पण त्याचे संगीत खूप छान होते. म्हणतात ना सांगितला भाषा नसते. गाडी तिब्लिसी शहराबाहेर पडली, तसे आम्हाला पांढरे डोंगर दिसायला लागले. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या टपावर बर्फाचे मोठे थर दिसत होते. म्हणजे जवळपास बर्फवृष्टी चालू होती. सकाळी  ऐकाने सांगितले होते की, बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत त्यामुळे पुढे काझबेगि याठिकाणी जायला जमणार नाही. आजच्या नियोजनानुसार आम्ही अनानुरी किल्ला आणि चर्च, गुदौरी स्की रिसॉर्ट, रशिया-जॉर्जिया सीमा आणि काझबेगि याठिकाणी जाणार होतो.

आमची गाडी एव्हाना शहर सोडून बरीच लांब आली होती. पावसाचे थेंब आता बर्फात रूपांतरित होतांना दिसत होते. काही वेळाने बर्फवृष्टीची तीव्रता वाढत गेली आणि सगळीकडे फक्त बर्फाची पांढरी चादर दिसू लागली.  बर्फाचे कण अलगद जमिनीवर पडत होते. डेव्हिडने काहीतरी खाण्यासाठी गाडी एका रेस्टॉरंटवर थांबवली. तसा मी बाहेर आलो. अतिशय थंड हवा, आकाशातून होणारी बर्फवृष्टी हे वातावरण खरोखरच अवर्णनीय असेच होते. मी हातमोजे गाडीतच विसरलो होतो. माझी बोटं गारठ्याने थिजायला लागली म्हणून मी चटकन गाडीत शिरलो. तोपर्यंत माझ्या कानटोपीवर बर्फाचे शिंपण झाले होते. काही अंतर गेल्यावर सगळीकडे नुसता बर्फच बर्फ दिसत होता. घरं, गाड्या, झाडं सगळी बर्फाखाली बुजली जात होती. निष्पर्ण झालेल्या झाडांना जणू बर्फाची पालवी फुटली होती. काही रहिवाशी आपल्या दरातील बर्फ खोऱ्याने बाजीला सारून येजा करण्यासाठी रस्ता बनवत होते. काही लोक आपल्या अडकलेल्या गाड्यासमोरील बर्फ हटवून मार्ग बनवत होते. रस्त्याकडेच्या गावातील लोक अंदाजे दोन फुटापर्यंत साचलेल्या बर्फातून येजा करत होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. पुढे रस्ता बंद असल्याने मालाचे अनेक ट्रक मधेच अडकून पडले होते. हा रस्ता पुढे रशियाला जात होता. कदाचित हा व्यापारी मार्ग असावा.




गुदौरी हे ठिकाण काकेशस पर्वत रांगेत असून ते तिब्लिसी शहरापासून उत्तरेला १२० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गुदौरीची समुद्र सपाटीपासून उंची ७२०० फूट एवढी असल्याने हे ठिकाण उन्हाळ्यातही अतिशय थंड असते. गुदौरीपर्यंत पोहचण्यासाठी काकेशस पर्वत रांगेत अनेक घाट चढून जावे लागते. या मार्गाने बर्फाने झाकलेले पर्वतांचे मनोहारी दृश्य बघण्यास मिळते.  घाटातून वळणं घेत आमची गाडी गुदौरीला पोहचेपर्यंत वाटेत बर्फवृष्टीने अगदी डोळ्याचे पारणे फेडले. दुतर्फा निष्पर्ण झालेल्या आणि बर्फाची शाल पांघरलेल्या दाट झाडीतून जेंव्हा गाडी पुढे जात होती तेंव्हा आपण स्वर्गात आहोत की काय? असा भास होत होता. मी असला बर्फ फक्त द्वितीय महायुद्धाशी संबंधित युद्धपटात पहिला होता. ‘स्टॅलिनग्राड’ हा मला आवडलेला एक युद्धपट. यात देखील अशाच बर्फात नाझी सैन्य अडकून पडले होते. त्या नाझी सैन्याचे काय हाल झाले असतील याचा प्रत्यय मात्र मला आज आला.

गुदौरीत पर्यटकांची गर्दी होती. जिकडे तिकडे बर्फाच्या छोट्या मोठ्या टेकड्या तयार झाल्या होत्या. बुलडोझर रस्त्यावर पडलेला बर्फ बाजूला सारून रास्ता मोकळा करत होते. इमारतींची फक्त दारं उघडतील एवढीच जागा शिल्लक होती. बाकी सगळीकडे बर्फाने त्यांना झाकून टाकले होते. या इमारती जणू बर्फाच्या गुहा भासत होत्या. बर्फवृष्टी मात्र थांबत नव्हती. आम्हाला स्कीईंग रिसॉर्टवर जवळ सोडण्यात आले. तासाभरात स्कीईंग रिसॉर्टची भेट आटपून परत सोडले त्याच ठिकाणी भेटा, आणि लवकरात लवकर येथून आपल्याला निघावे लागेल नाहीतर येथे आपण अडकून पडू असे आम्हाला ऐकाने बजावले. गाडीच्या खाली उतरल्यावर मला तर हुडहुडीच भरली. आमचे पाय बर्फात फसत होते. आम्ही वाट काढत स्कीईंग रिसॉर्टवर पोहचलो. तिथे विविध देशातून आलेले असंख्य पर्यटक स्कीईंगचा आनंद घेत होते. तिथे आम्हाला जॉर्जियात MBBS  शिकत असलेल्या मराठी मुलामुलींचा मोठा ग्रुप भेटला. जॉर्जियामध्ये अनेक भारतीय, विशेषतः मराठी विद्यार्थी हे MBBS  शिकण्यासाठी येतात. 

जॉर्जियातील अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च

 ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटी हा जाॅर्जियाचा अधिकृत राष्ट्रीय धर्म आहे. लोकसंख्येच्या जवळपास ८५% नागरीक हे या धर्माचे आहेत. सोव्हिएत युनियन वगळता प्राचीन काळापासून सर्वच राज्यकर्त्यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीला अधिकृतपणे राष्ट्रीय धर्माचा दर्जा दिल्याने येथे त्या धर्माशी निगडीत प्राचीन खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. या प्राचीन खुणा म्हणजे जाॅर्जियन बनावटीची अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च. ही सर्व चर्च म्हणजे वास्तुशास्त्रातील आश्चर्य म्हणावे लागतील. यातील काही चर्चचा युनेस्को जागतिक वारसा स्थळात समावेश झाला आहेत. 


ऐतिहासिक ज्वारी माॅनेस्ट्री (Jvari Monastery) ही तिब्लिसी शहराजवळ आहे. शहरापासून गाडीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे लागतात. ज्वारी माॅनेस्ट्री हे चर्च ज्वारी नावाच्या डोंगराच्या शिखरावर बांधले असून याच्या दोन बाजूंनी खोल दरी आहे. या माॅनेस्ट्रीची निर्मिती ६ व्या शतकात करण्यात आली होती. चर्चच्या दोन बाजूंच्या भिंती या निसटत्या कड्याला लागून बांधलेल्याआहेत. त्या आपल्याकडील किल्ल्याच्या तटबंदीसारख्या भासतात. ६ व्या शतकातील बांधकाम अजूनही सुस्थितीत असून त्यात काहीही बदल करण्यात आलेले नाही, हे या चर्चचे आश्चर्य म्हणावे लागेल. या माॅनेस्ट्रीला चर्च ऑफ होली क्राॅस म्हणूनही संबोधिले जाते. संपुर्ण चर्च हे पिवळ्या रंगाच्या दगडांपासून बनवले असल्याने ते खूप आकर्षक दिसते. चर्चच्या प्रवेशद्वारावर आणि अजूबाजूच्या भिंतीवर प्राचीन जाॅर्जियन भाषेतील शिलालेख पहाण्यास मिळतात. भिंतीवर अनेक मुर्ती कोरलेल्या आहेत. चर्चच्या आतमध्ये मुख्य घुमटाखाली प्राचीन लाकडी क्रॉस असून तो ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन लोकांसाठी खूप पवित्र मानण्यात येतो. जाॅर्जियासह शेजारील काॅकेशस देशांचे अनेक श्रद्धाळू येथे दर वर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.




ज्वारी माॅनेस्ट्री पाहण्यासाठी आम्ही सकाळीच तेथे पोहचलो. पहाटे नुकतीच बर्फ वृष्टी होऊन गेलेली होती. ज्वारी डोंगर चढताना सगळीकडे पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली दिसली. गाडीतून खाली उतरताच अतिशय थंड वाऱ्याने आमचे स्वागत केले. तापमान हे उणे चार अंश इतके होते. डोंगर माथ्यावर आल्याने तिथे खूप जोरदार वारा जाणवत होता. ज्वारी माॅनेस्ट्री हे पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण असल्याने इथे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. वाहनतळाहून आम्ही चर्चच्या दिशेने जात असताना वाटेत अनेक भिकारी बसलेले आढळले. चर्चच्या प्रवेशद्वाराजवळच्या मोकळ्या जागेत आल्यावर आम्हाला समोर निसर्गाचे खूप सुंदर रुप पाहण्यास मिळाले. निळी जांभळी डोंगर रांग आणि त्यांची शिखरं पांढऱ्या बर्फाने चमकत होती. याच डोंगरांच्या आडून लपाछपी खेळत येणाऱ्या कुरा आणि अराग्वी या दोन नद्यांच्या संगमाचे दृश्य नजर वेधून घेत होते. हिरव्यागार रंगाचे पाणी असणारी अराग्वी तर दुसरी गढूळ पाणी असणारी कुरा अशा दोन नद्या एकमेकीत एकरूप होत होत्या. त्या दोन नद्यांच्या दुआबात मत्सखेटा हे छोटेसे टुमदार शहर वसलेले होते. मत्सखेटा हे आयबेरीया (प्राचीन जाॅर्जिया) राज्याच्या राजधानीचे शहर होते. डोंगर माथ्यावरून मत्सखेटा शहरातील कौलारू घरं कोकणातील गावाची आठवण करून देत होती. ज्वारी माॅनेस्ट्री आणि त्या समोरचे निसर्गचित्र मनाला भुरळ घाडणारे असेच होते. जणूकाही आपण एखाद्या चित्रकाराने साकारलेले सुंदर चित्र बघत आहेत असाच भास होत होता. 

लोखंडी दार ओलंडल्यानंतर आम्ही माॅनेस्ट्रीच्या आत आलोत. आतमध्ये वातावरण थोडेसे उबदार होते. प्रकाश खेळता राहावा म्हणून माॅनेस्ट्रीच्या घुमटावर चार बाजूंनी झरोके होते तर भिंतीवर खिडक्या बनवलेल्या होत्या. आतमधली बांधकामाच्या पद्धतीवरून ही वास्तू प्राचीन असल्याचे जाणवत होते. इथे एक पुजारी मेणबत्त्या विकत होता. आम्ही त्याच्याकडून दोन छोट्या मेणबत्त्या घेऊन तेथील ख्रिस्ताच्या फोटो समोर प्रज्वलित केल्या. आमची गाईड आम्हाला एकेका गोष्टीची माहिती देत होती. ज्वारी माॅनेस्ट्री खरोखरच जाॅर्जियन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असल्याचे आम्हाला जाणवले. 




ज्वारी माॅनेस्ट्री पाहिल्यानंतर आम्ही मत्सखेटा या शहराकडे जाण्यासाठी निघालो. मत्सखेटा हे शहर जाॅर्जियन संस्कृतीचे आणि आजच्या घडीला जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीचे धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराच्या प्राचीन महत्त्वामुळे १९९४ साली युनेस्कोने याला Historical Monuments of Matskheta या नावाने जागतिक वारसा स्थळात सामिल केले गेले आहे. ज्वारी डोंगराहून खाली उतरले की कुरा नदिच्या किनाऱ्यावर वळणं घेत अगदी दहा बारा मिनिटात आम्ही मत्सखेटा या शहरात पोहचलो. जुन्या दगडी फरशीच्या रस्त्याने चालत आम्ही स्वेटित्सखोवेली कॅथेड्रलच्या (Svetitskhoveli Cathedral, Mtskheta) प्रवेशद्वारापाशी पोहचलो. स्वेटित्सखोवेली कॅथेड्रलचा अर्थ जिवंत खांबाचे चर्च असा काहीसा होतो. हे चर्च अतिशय भव्य असे आहे. आपल्याकडील भोईकोटांसारखी त्याला चारही बाजूंनी भली मोठी तटबंदी आहे. तटबंदीच्या पश्चिमेला महाद्वार असून त्यावर बनवलेल्या मनोऱ्यावर मोठी घंटा बांधलेली आहे. 




कॅथेड्रलचे छत खूप उंच असून त्याला भल्या मोठ्या खाबांनी आधार दिला आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कॅथेड्रलची गणना होते. या कॅथेड्रलमध्ये अनेक शाही कार्यक्रम व्हायचे. जसे की, राजाचा राज्याभिषेक, लग्न वगैरे. त्याचबरोबर हे कॅथेड्रल शाही परिवाराची दफनभूमी म्हणून देखील वापरले जायचे. यामध्ये विविध कालखंडात होऊन गेलेले राजे किंवा राणी यांना दफन करण्यात आले आहे. एरेकल द्वितीय, वखतांग गोर्गासाली आणि सहावा जाॅर्ज यासारख्या प्रमुख राजांच्या समाध्या येथे बघण्यास मिळतात. ४ थ्या शतकापासून या कॅथेड्रलच्या वास्तूमध्ये अनेक बदल करण्यात आहे आहेत. अरब, इराणी आणि रशियन आक्रमणात या कॅथेड्रलचे अनेकदा नुकसान झाले होते. त्यामुळे मध्ययुगात याच्या चौफेर तटबंदी बांधली असावी. या कॅथेड्रलमध्ये येशू ख्रिस्ताने वापरलेले कपडे पुरले असल्याची मान्यता आहे. पूर्वीच्या काळातील बांधकामात सर्व कॅथेड्रलच्या आतील भिंतीवर चित्र काढण्यात आली होती परंतु रशियन कालखंडात ती नष्ट करण्यात आली. त्यात वाचलेली काही चित्र आजही येथील भिंतीवर बघायला मिळतात. येथू ख्रिस्ताचे भव्य चित्र आणि त्यासमोरील काचेचे तोरण खूप आकर्षक आहे. 



मत्सखेटा कॅथेड्रल अतिशय सुंदर असून जाॅर्जिया फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाने ते अवश्य बघायला पाहिजे. थोडक्यात ह्या वास्तू जरी बोलत नसल्या तरी त्यांची बांधकामाची शैली, आजूबाजूचा परिसर, वास्तूवर कोरलेल्या मुर्ती, रंगवलेली चित्रे हे सगळं वैभव आपल्याला तो ऐतिहासिक कालखंड कसा होतो याचा अनुभव करून देतात. स्वेटित्सखोवेली कॅथेड्रल फिरताना बाहेरील जगाचा पुर्णपणे विसर पडतो आणि आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास होतो.




कॅथेड्रलच्या आवारात अनेक दुकाणं थाटलेली पाहण्यास मिळतात. तिथे अनेक शेभेच्या वस्तू, दागिने, खाद्य पदार्थ आणि विशेषतः जाॅर्जियन बनावटीची वाईन विक्रीसाठी ठेवलेली असते. आम्ही कॅथेड्रडची सफर पुर्ण झाल्यानंतर या दुकानातून बरीच खरेदी केली. जाॅर्जियाची आठवण म्हणून मी काही पोस्टकार्ड, कीचेन यासारख्या गोष्टी आवर्जून विकत घेतल्या. 

(सूचना : पोस्ट मधील सर्व फोटोग्राफ हे लेखकाने स्वतः काढलेले आहेत) 

सोमवार, १८ मे, २०२०

माझा जगप्रवास : श्रीलंका पिन्नावाला हत्ती अनाथालय


कोलंबोतील बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळच्या बाहेर पडलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. पाऊस आल्यावर ओल्या मातीचा गंध यावा तसाच काहीसा आणि आपलासा वाटणारा गंध विमानतळच्या बाहेर पडल्यावर आला. आल्हाददायक गारवा आणि ताजी हवा जणू स्वागतासाठी धावून आली होती. विमानतळ परिसरातील हिरव्यागर्द झाडीतून पक्षांचा किलबिलाट चालू होता. गाडीत बसे पर्यंत हा किलबिलाट पार्श्वसंगीतासारखा कानात घुमत राहिला. रणजित नावाच्या ड्रायव्हरने आमचे स्वागत केले. सामान व्यवस्थित ठेवून आम्ही गाडीत विराजमान झालोत आणि आमची गाडी कोलंबो विमानतळाहून पिन्नावालाच्या दिशेने धावायला लागली.


पिन्नावाला हत्ती अनाथालय हा आमच्या श्रीलंका भेटीचा पहिला थांबा होता.

हत्तींचे अनाथालय?

असाच काहीसा प्रश्न मला देखील पडला होता. जेव्हा याविषयी अधिक माहिती घेतली तेव्हा मला या प्रकल्पाविषयी थोडी कल्पना आली. पिन्नावाला हत्ती अनाथालयाच्या स्थापने मागचा उद्देश जंगलात जखमी झालेल्या, कळपा पासून भरकटलेल्या किंवा अनाथ झालेल्या हत्तीच्या पिल्लांचा सांभाळ करणे असा आहे. जंगलात भटकत असताना विविध कारणांमुळे हत्तीची पिल्लं जखमी होत असतात. काही कारणांमुळे माता हत्ती मरण पडल्यास तिच्या पिल्लांची जंगलात फरफट होते. म्हणून अशा हत्तींच्या पिल्लांना नवीन जीवन आणि संरक्षण मिळावे या उदात्त हेतूने हे अनाथालय सुरु करण्यात आले आहे. याची स्थापना १९७५ साली श्रीलंकेच्या जंगली प्राणी संवर्धन विभागामार्फत (DWC) करण्यात आली. पुर्वी हे अनाथालय विलपट्टू राष्ट्रीय उद्यानात होते. त्यानंतर ते श्रीलंकेच्या विविध ठिकाणी हलवण्यात आले. नंतर मात्र ते पिन्नावाला गावाजवळील २५ एकरांच्या मोकळ्या जागेत आणण्यात आले.


मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी नजर वेधून घेत होती. श्रीलंकेतील प्रसिद्ध किंग कोकोनटची उंच झाडं आणि त्याच्यावर आलेले गर्द पिवळ्या रंगाच्या नारळाचे घस खूप आकर्षक वाटत होते. किंग कोकोनटची झाडं आपल्याकडील नारळाच्या झाडांपेक्षा थोडीसे वेगळे भासले. या झाडांची खोडं आकाराने खूपच छोटे तर त्यांची उंची खूप होती. या झाडांवर चढून नारळं तोडणाऱ्यांची कमालच म्हणावी लागेल. डिसेंबर महिना उजडला तरी परतीचा मान्सून अजून याठिकाणी घटमळत होता. रस्त्यात अनेकदा पावसाच्या सरींनी आमचे स्वागत केले. ड्रायव्हर आम्हाला मध्येच गाडी थांबवून विविध प्रकारची झाडं, फळं आणि पक्षी दाखवत होता आणि त्याविषयी माहिती देत होता.


तीन तासाच्या प्रवासानंतर सकाळी नऊ वाजता आमची गाडी पिन्नावाला अनाथालयाच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पिन्नावाला हे ओया नदीकाठी वसलेले छोटेसे गाव. ओया नदी किनाऱ्याच्या आसपासच्या प्रदेशावर नारळच्या बागा लावलेल्या आहेत. त्यामुळे हा परिसर खूपच निसर्गसंपन्न वाटतो. येथील हत्ती अनाथालयामुळे आज हे गाव जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. पर्यटकांच्या तिकीटांतून मिळणाऱ्या निधीचा उपयोग या अनाथालयाचे व्यवस्थापन करण्यासाठी होतो.




तिकीट काढून आम्ही अनाथालयात प्रवेश केला. अनेक पर्यटकांची एव्हाना गर्दी व्हायला लागली होती. भारतीय पर्यटकांची संख्या देखील लक्षणीय होती. विदेशी पर्यटकांच्या तुलनेत सार्क देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीटांचा दर कमी होता. अनाथालयाच्या आतमध्ये विविध प्रकारची झाडे लावून संपूर्ण परिसर बागेसारखा सजवलेला होता. आतील रस्ते सिमेंट आणि पेव्हिंग ब्लॉकने बनवलेले होते. दोन मिनिटं चालल्यानंतर आम्ही एका मैदानात पोहचलो. तिथे विविध वयोगटातील वीस पंचवीस हत्तींचा कळप मस्ती करताना दिसला. एवढे हत्ती एकत्र पाहण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग. यापूर्वी मी फक्त सर्कसमध्ये एखाद दुसरा हत्ती प्रत्यक्ष पाहिला असेन. मोकळ्या वातावरणात मौजमजा करणारा हत्तींचा कळप पाहणे हा वेगळाच अनुभव होता. या मैदानात काही हत्ती एकमेकांना ढकलण्याचा खेळ खेळत होते. तर काही हत्ती पुढच्या पायाने माती उकरून सोंडेने पाठीवर शिंपत होते. 


अनाथालयाच्या आतमध्ये हत्तींच्या निवाऱ्यासाठी बरेचसे शेड बांधलेले आहेत. संध्याकाळी हत्तीना या शेडमध्ये बांधून ठेवण्यात येते. याठिकाणी पर्यटकांना हत्तींच्या पिल्लांना बाटलीने दूध पाजण्याची तसेच प्रौढ हत्तींना फळे भरवण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे; पण यासाठी वेगळे पैसे आकारले जातात. 



मोकळ्या मैदानात काही काळ हत्तींना सोडल्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने ओया नदीवर आंघोळीसाठी नेण्यात येते. असा दिवसातून दोनदा त्यांना आंघोळीसाठी वेळ देण्यात येतो. मुख्य प्रवेशद्वारासमोरचा रस्ता ओलांडला की पाच मिनीटावर ओया नदीवर एक घाट आहे. याठिकाणीच हत्तींना आंघोळीसाठी आणले जाते. आम्ही या घाटावर पोहचलो तेव्हा तिथे काही हत्ती पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते. नदीपात्राच्या खडकांवरून खळखळणारे, फेसाळणारे पाणी सुंदर नाद करत धावत होते. ओया नदीच्या किनारी जाण्यासाठी तिकीट दाखवावे लागते अन्यथा पुढे हत्ती जिथे आंघोळ करतात त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. ओया नदीच्या घाटाकडे जाणारा रस्ता म्हणजे पिन्नावालाची मुख्य बाजारपेठ आहे. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस भेटवस्तूंची दुकानं आहेत. परदेशी पर्यटक येथे मनसोक्त खरेदी करतात. पोस्ट कार्ड, फ्रिज मॅग्नेट, लाकडापासून बनवलेल्या विविध मुर्ती, चामड्याच्या वस्तू यासारख्या विविध वस्तूंनी ही सगळी दुकाने नेहमीच सजलेली असतात. या बाजारपेठेत एक कागदांचा छोटासा कारखाना आहे. या कारखान्यात हत्तीच्या शेणापासून कागद बनवण्यात येतो. आम्ही या कारखान्यास भेट दिली. तेथील एका कर्मचाऱ्याने आम्हाला शेणापासून कागद कसा बनवतात याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली. मी हत्तीच्या शेणापासून बनवलेले एक पोस्टकार्ड आठवण म्हणून विकत घेतले.







आमची पिन्नावाला हत्ती अनाथालयाची भेट खूपच अविस्मरणीय ठरली. परदेशातून येणाऱ्या अनेक पर्यटकांना हे ठिकाण खूप आवडते. पण नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशीच याठिकाणाला विरोध करणारी दुसरी बाजू देखील आहे. जगभरातील अनेक प्राणीमित्र संघटनांकडून याठिकाणी हत्तींना डांबून ठेवण्यात येत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. हे ठिकाण म्हणजे हत्तींची छळ छावणी किंवा कैदखाना असून पर्यटकांनी पिन्नावाला हत्ती अनाथालया भेट देऊ नये असे आहवान विविध प्राणीमित्र संघटना करत असतात. मला येथे हत्तीवर अत्याचार होत असल्याचे काही जानवले नाही.


YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  :

https://www.youtube.com/watch?v=QdNTnYsA2BM&t=28s

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

जाॅर्जिया भ्रमंती : भाग २

२६ डिसेंबर २०१८ : तिब्लिसी शहर भ्रमंती
सकाळी साडेनऊ वाजता आम्ही नाश्ता करून हाॅटेलच्या लाॅबीत येऊन बसलो. हाॅटेलमधील इतर पर्यटक पाहुण्यांची फिरायला जाण्याची लगबग चालू होती. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांचे गाईड त्यांच्या पाहुण्यांना फिरायला घेऊन जात होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातले होते. आम्ही देखील जॅकेट, टोप्या, मफलरी घालून तयार होतो. बरोबर दहा वाजता आमची टूर गाईड ऐका आम्हाला घेऊन जाण्यासाठी आली. हाॅटेलच्या बाहेर पाउल ठेवताच वारा आणि थंडीने आमचे स्वागत केले. तापमान जवळपास ४ अंश सेल्सिअस होते. ऐका आणि डेव्हिड हे दोघे पुढील सर्व प्रवासात आमच्या बरोबर असणार होते. गाडी चालू झाली आणि जाॅर्जिया पाहण्याचा आमचा कार्यक्रम अधिकृतपणे सुरू झाला.

पंधरा मिनिटांनी आम्ही शहरातील एका उंच टेकडीवर आलो. आजही रस्त्याच्या दुतर्फा सुंदर मॅपलची झाडं दिसली. कुरा नदीवर ठिकठिकाणी अनेक पुल बांधलेले होते. काही पुल जुण्या बांधणीचे तर काही पुल नवीन होते. आम्ही ज्या टेकडीवर आलो होतो तिथं पहिल्या वख्तांग गोर्गासाली राजाचा भव्य अश्वारूड पुतळा होता. या टेकडीवरून कुरा नदी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येवू शकत होती म्हणून पहिल्या वख्तांग राजाने येथे भव्य किल्ला आणि चर्च बांधले. आजही तिथं एक चर्च मोठ्या डौलाने उभे आहे. त्या चर्चला मेटेखी चर्च असे संबोधले जाते. स्थानिक भाषेत मेटेखीचा अर्थ म्हणजे 'राजवाड्याच्या आजूबाजूची जागा' असा होतो. मेटेखी चर्च खूप भव्य आहे आणि त्याची बांधणी देखील खूप मजबूत आहे. आम्ही चर्च पाहण्यासाठी आत गेलोत. जाॅर्जियातील जवळपास ९० टक्के ख्रिश्चन हे ऑर्थोडॉक्स आहेत. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समजूतीनुसार महिलांना खूप नियम असतात. याची प्रचिती आम्हाला चर्चमध्ये प्रवेश करतांना झाली. चर्चमध्ये प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट पेहराव (ड्रेस कोड) असणे आवश्यक होते. शरीरभर कपडे, पायात बूट, महिलांचे डोके झाकलेले असावे वगैरे. चर्चमध्ये गेल्यावर महिला एका ठराविक ठिकाणानंतर पुढे जावू शकत नाहीत. सोव्हिएत राजवटीच्या काळात जेव्हा कुठलाही धर्म मानण्यास व धार्मिक कार्य करण्यास बंदी होती त्यावेळी या जागेचा उपयोग कैदखाना म्हणून व्हायचा.

मेटेखी चर्च पाहिल्यानंतर आम्ही टेकडीच्या खाली चालत गेलोत. काही अंतरावर युरोप स्केअर नावाचा चौक होता. येथून आम्ही केबल कारमध्ये बसून नारीकाला किल्यावर जाण्यासाठी निघालो. केबल कारमधून तिब्लिसी शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडत होते. जुनी तिब्लिसी, नवी तिब्लिसी, त्याच बरोबर कुरा नदीचे हिरवेगार पाणी, नदीवरचे विविध पुल, हे सर्व खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य होते. जुन्या तिब्लिसीतील घरं पाहुन कोकणातील घरांची आठवण झाली. कौलारू घराप्रमाणे दोन्ही बाजूला निमूळती घरं जुन्या तिब्लिसीत दिसत होती. केबल कारमधून उतरल्यावर संपूर्ण तिब्लिसी शहराचे दर्शन नारीकाला किल्ल्यावरून झाले. हा किल्ला प्राचीन असून त्याची तटबंदी अजूनही टिकून आहे. तटबंदीच्या आत एक चर्च आहे. या चर्चचे नाव सेंट निकोलस चर्च असून तेराव्या शतकातील जुने चर्च आगीत भस्मसात झाल्यानंतर त्याजागी हे नवीन चर्च उभारण्यात आले आहे. त्याच डोंगरावर एका बाजूला मदर ऑफ जाॅर्जिया चा भव्य पुतळा आहे. तिब्लिसी शहराच्या स्थापनेस १५०० वर्ष पुर्ण झाल्या प्रित्यर्थ सन १९५८ साली या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. किल्याच्या पाठीमागच्या बाजूस नॅशनल बोटॅनिकल गार्डन ऑफ जाॅर्जिया आहे. पुर्वी हे शाही परिवारासाठी बनवलेले एक सुंदर उद्यान होते. कालांतराने या उद्यानाच्या संवर्धनासाठी जाॅर्जिया सरकारने तेथे वनस्पती शास्त्राचे विद्यापीठ स्थापन करून हे उद्यान त्याच्या अखत्यारीत दिले असावे.

किल्ला पाहिल्यानंतर आम्ही मागच्या बाजूने डोंगर उतरू लागलो. थोड्यावेळतच आम्ही रहीवाशी भागात आलोत. निमुळत्या गल्ली बोळातून खाली उतरण्यासाठी वाट होती. किल्ल्याच्या डोंगरामागून एक ओढा वाहतो. त्या ओढ्यावर एक सुंदर पुल बनवला असून त्या पुलास 'प्रेम सेतू' (लव्ह ब्रीज) असे म्हणतात. या छोट्या पुलाच्या दोन्ही कठड्यावर प्रेमीयुगुलांनी छोटछोटी कुलपं लावली आहेत. प्रेमाचं प्रतिक म्हणून प्रियकर किंवा प्रेयसी या पुलावर येवून कुलुप लावतात आणि चावी वाहत्या पाण्यात फेकून देतात. प्रेमीयुगुलांनी आपल्या प्रियकर वा प्रेयसीचे नावे कुलपांवर आवर्जून लिहीलेली होती. त्या पुलाचे दोन्ही कठडे सोनेरी कुलपांनी भरून गेले होते. असे पूल पॅरिस आणि एमस्टरडॅम येथे देखील आहेत. गंमत म्हणून कुणीतरी सुरू केलेली ही संकल्पना जगभर प्रसिद्ध पावत आहे.

प्रेम सेतू ओलांडून आम्ही उताराने जुन्या तिब्लिसीकडे मार्गक्रमण करू लागलो. काही अंतरावर गेल्यावर उजव्या हाताला तिब्लिसीतील प्रसिद्ध जुमा मस्जिद दिसली. पारंपारिक लाल विटांच्या बांधकामातील ती मस्जिद जाॅर्जियातील मुस्लिमांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. जाॅर्जियाचा राष्ट्रीय धर्म जरी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असला तरी तिथं धार्मिक स्वातंत्र्य आहे असं आमची गाईड ऐका म्हणाली.

थोडंसं पुढे आल्यावर रस्त्यावर कला सादर करणाऱ्या काही स्थानिक कलाकारांनी आम्हाला आडवलं. बहुधा त्यांना भारतीय लोक बरोबर ओळखता येत असावेत. आम्हाला त्यांनी विचारले "इंडियन?" आम्ही मान डोलावलताच त्यांनी राज कपूरचे प्रसिद्ध गाणे गायला सुरूवात केली.

"मेरा जूता है जपानी
ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रुसी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी"

भारतीय सिनेमा येथे फार लोकप्रिय आहे असं समजले. विषेशतः राज कपूरचे जाॅर्जियामध्ये खूप फॅन आहेत. जुन्या पिढीतील लोक अजूनही त्यांचे नाव घेतात. या आधी मी कुठेतरी याबाबत वाचले होते पण आज ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.

प्रेम सेतू वरून आम्ही जो ओढा ओलांडून पलिकडे गेलो होतो त्याच ओढ्याच्या कडेने आम्ही जात होतो. थोडंसं पुढे आल्यावर आम्ही परत ओढ्यावरला एक पादचारी पुल ओलांडला. या पुलावर देखील काही कुलपं लावलेली आढळली. कदाचित भविष्यात हा देखील तिब्लिसीचा प्रेस सेतू नंबर दोन होईल. ओढा ओलांडताच तिब्लिसीतील प्रसिद्ध सल्फर बाथ (गरम पाण्याचे झरे) लागले. हे गरम पाण्याचे झरे छोट्या छोट्या इमरती बनवून त्यात बंदिस्त केले आहेत. आत अंघोळ करण्यासाठी पंचतारांकित हाॅटेलप्रमाणे सुविधा करण्यात आल्या आहेत. यात अंघोळ करण्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. आम्ही फक्त बाहेरूनच त्याची माहीती घेतली. पूर्वीच्या काळी येथे वर्षातील ठराविक कालावधीत यात्रा भरायची. बाया आपल्या मुलांसाठी योग्य वधू निवडण्यासाठी येथे येत असत. आणि सल्फर बाथ मध्ये अंघोळ केल्यावर अनेक प्रकारचे त्वचा रोग बरे होतात ही देखील मान्यता आहे. त्यामुळे अनेक पर्यटक आवर्जून येथे अंघोळ करतात.

जुनी तिब्लिसी खरोखरच फार सुंदर होती. रस्ते दगडी विटांनी बनवलेले (पेव्हींग ब्लॅक्स) होते. यावून चालतांना वेगळीच मजा येत होती. सल्फर बाथ नंतर आम्ही सायओनी चर्चमध्ये आलोत. आत्तापर्यंत बघीतलेली सगळी चर्च याच बांधनीची होती. आणि खरोखरच जाॅर्जियातील चर्चच्या इमारती खूपच सुंदर होत्या. पिवळसर रंगातील दगडांनी या चर्चची बांधणी केलेली आहे. काही अंतरावरून पाहिल्यास ही सगळी चर्च सोनेरी रंगाची वाटतात.
आम्ही ज्या रस्त्याने जात होते बहुधा तो जुना बाजार असावा. रस्त्याच्या दोन्ही बाजून असंख्य दुकाणं होती. गालीचे, स्थानिक पदार्थ, भेटवस्तू, सोव्हिनियर्स, पेंटींग त्याच बरोबर काही रेस्टॉरंट देखील होते. विशेष म्हणजे जाॅर्जियात शाकाहारी जेवन मिळते याचं मला नवल वाटलं. मी ऐकाला याविषयी विचारले असता ती म्हणाली की, जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन वर्षातील ठराविक काळ फक्त शाकाहारी जेवण घेतात. त्यामुळे येथे शाकाहारी जेवण मिळते. येथे शेपूची भाजी आणि वांग्याची भाजी फार प्रसिद्ध आहे.

काही अंतरावर आल्यानंतर आम्ही एका छान सोव्हिनियरच्या दुकानात गेलोत. तसं मलाही सोव्हिनियर्स जमा करण्याचा खूप छंद आहे. चलनी नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटे, पोस्ट कार्ड या गोष्टी मी मोठ्या प्रमाणात जमवलेल्या आहेत. माझ्याकडे जवळपास सव्वाशे देशांच्या नोटा आहेत. तसेच वेगवेगळ्या देशांची खूप पोस्टकार्ड देखील आहेत. मी युनेस्को जागतिक वारसास्थळांची पोस्टकार्ड जमवत असतो. या दुकानात गेल्या बरोबर मी माझ्या आवडीची पोस्टकार्ड विकत घेतली. ओवीने एक जाॅर्जियाचा झेंडा आणि एक किचैन विकत घेतले.

तिब्लिसी शहर फिरण्याचा आमचा महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला होता. यानंतर कुरा नदीवर बनवलेल्या शांती सेतू (ब्रीज ऑफ पीस) याला आम्ही भेट दिली. हा कुरा नदीवर बांधलेला एक पादचारी पुल आहे. यांचे बांधकाम हे लोखंडी असून त्याच्या छताची सजावट हिरवट रंगाच्या काचांनी केली आहे. संध्याकाळी यावर खूप आकर्षक रोषणाई करण्यात येते. शांती सेतू आता तिब्लिसी शहरातील एक आकर्षण बनले आहे. तिब्लिसीला भेट देणारे पर्यटक नक्की या पुलास भेट देतात. या पुला शेजारीच कुरा नदीत नौकाविहार करण्याची सुविधा आहे. आम्ही या शांती सेतूवर मनसोक्त फोटो काढले.

शेवटच्या टप्प्यात आम्ही तिब्लिसी शहरातील सर्वात उंच डोंगरावर आलो. येथे एक मनोरंजक पार्क बनवला आहे. यात मुंबईतील एस्सेल वर्ल्ड सारख्या गोष्टी आहेत. डोंगराच्या एका बाजूला तिब्लिसी दुरदर्शनचा उंच मनोरा आहे. याच डोंगरावर जाण्यासाठी सुप्रसिद्ध फनिक्युलर ट्रेन आहे. ही ट्रेन डोंगराच्या उतारावरून जवळपास साठ ते सत्तर अंशाच्या कोनात वर खाली जाते. आम्ही डोंगर कारमधून चढून गेलो होतो तर खाली उतरताना फनिक्युलर ट्रेनमध्ये बसून आलोत. इतक्या उतारावर ट्रेनमध्ये बसून येणे खूपच मजेशीर अनूभव होता.

फनिक्युलर ट्रेनमधून खाली उतरल्यानंतर आजचा तिब्लिसी पाहण्याचा कार्यक्रम संपला. आम्हाला ड्रायव्हरने हाॅटेलवर आणून सोडले. सकाळी गेलो होतो त्याच मार्गाने परत आलो. तिब्लिसी शहरात वाहतूकची कुठे कोंडी झालेली आढळली नाही. सगळे जण वाहतूकीचे नियम पाळतांना दिसत होते. शहरात सार्वजनिक वाहतूक चांगली होती. सरकारी पिवळ्या रंगाच्या खूप बस रस्त्याने ये जा करत होत्या. तिब्लिसी शहरात मेट्रो देखील आहे. तिब्लिसी हे इतर कुठल्याही युरोपियन शहरासारखे सुंदर होते.
□□□








गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

जाॅर्जिया भ्रमंती : भाग १

२५ डिसेंबर २०१८ : जाॅर्जियात आगमन
दुबईहून तीन तासांच्या प्रवासानंतर आमचे विमान तिब्लिसी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानाची उंची जशी कमी होऊ लागली तशी आम्हाला हिमाच्छादित पर्वतशिखरं दिसू लागली आणि माझी उत्सूकताही वाढू लागली. मी अजून हिमवृष्टी कधी अनूवली नव्हती म्हणूनच आम्ही हिवाळ्यात खास हिमवृष्टी अनूभवण्यासाठी जाॅर्जियात फिरायला येत होतो. तसे पाहिले तर जाॅर्जियामध्ये फिरण्यासाठी उन्हाळा हा योग्य ॠतू आहे (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर). या काळात जगभरातील असंख्य पर्यटक जाॅर्जियाचे निसर्गसौंदर्य अनूभवण्यासाठी येतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर हा छोटासा देश एखाद्या नवरीसारखा सौंदर्याने नटून जातो.
तिब्लिसी ही जाॅर्जियाची राजधानी आणि या देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर आहे. तिब्लिसी चा स्थानिक भाषेत अर्थ 'उबदार शहर' असा होतो. हे शहर एका खोऱ्यात वसलेले आहे. दोन बाजूंनी डोंगर रांग आणि शहराच्या मधोमध वाहणारी कुरा नदी, शहरात असणारे गरम पाण्याचे झरे यामुळे या शहराची ओळख ही उबदार शहर म्हणून प्रसिद्ध असावी. या शहराची स्थापना पहिल्या वख्तांग राजाने इ. स. पचव्या शतकात केली होती. तेंव्हापासून तिब्लिसी हे जाॅर्जियाच्या विविध राजघराण्याची राजधानी राहीली होती.
विमानतळच्या बाहेर पडल्याबरोबर आम्ही बॅगेत इतक्यावेळ ठेवलेली स्वेटर मफलर बाहेर काढले. पारा चार अंशावर होता आणि वाऱ्यामुळे थंडी अंगाला झोंबत होती. मला तर हुडहुडीच भरली. थंडीने अंग लटलट कापू लागले. ज्याचा अनूभव घ्यायचा होता त्याची सुरुवात विमानतळावरूनच झाली.
स्थानिक लोक बऱ्यापैकी इंग्रजी बोलत होते त्यामुळे भाषेची काही अडचण येणार नव्हती. आम्हाला विमानतळावर घेण्यासाठी आलेला ड्रायव्हर डेव्हिड हा सुद्धा चांगल्याप्रकारे इंग्रजी बोलत होता. विमानतळ ते हाॅटेल हे अंतर अर्ध्या तासाचे होते. रस्त्याच्या दुतर्फा खरीखुरी ख्रिसमसट्री पाहुन ओवीला फार आनंद झाला. आम्ही हाॅटेलवर पोहचलो तेव्हा अंधार पडू लागला होता. हिवाळ्यात जाॅर्जियात सुर्योदय सकाळी साधारण साडेआठला तर सुर्यास्त संध्याकाळी पावणे सहाच्या आसपास होतो. आमचे हाॅटेल छोटेखानीच होते आणि ते कुरा नदीच्या शेजारीच असल्याने खूप आनंद झाला. हाॅटेलच्या बाल्कनीतून तिब्लिसी शहर आणि बारमाही वाहणाऱ्या कुरा नदीचे विहंगम दृश्य नजरेस पडले.
सामान ठेवून आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालो. बाहेर खरोखरच खूप थंडी होती. शहरात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली मॅपलची झाडं शोभून दिसत होती. थंडीमुळे मॅपलची पानं पिवळी पडली होती. वाऱ्याने वाळलेली पानं रस्त्यावर पडत होती. चौका चौकात काही दुकाणे नजरेस पडली. बेकरी हा तिथला महत्वाचा व्यवसाय असावा कारण ठिकठिकाणी आम्हाला बेकरीची दुकाणे दिसली. हाॅटेलमध्ये आम्हाला पाणी विकत घ्यावे लागणार होते म्हणून आम्ही कॅरीफोर सुपरमार्केट मध्ये जाऊन स्वस्तातील पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या.
प्रवासाने आम्ही दमलो होतो त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही लवकरच झोपी गेलो. दुबई आणि जाॅर्जियाची प्रमाणवेळ सारखीच असल्याने काही त्रास झाला नाही.