स्फुट लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्फुट लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जुलै, २०२०

साकुळामाई



"संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही"

गदिमांच्या अजरामर गीतातील आणि सुधीर फडके यांच्या सुमधूर आवाजातील ह्या ओळी ऐकल्या की मला आमच्या गावची साकुळामाई आठवते. जशी प्रत्येक गावाला कुठलीतरी एक नदी असते तशीच ही आमच्या गावची नदी. आपली भारतीय संस्कृती आणि नदी यांचे एक अतूट नातं आहे. आपण नदीला माता मानतो, तिला जीवनदायिनी संबोधतो. प्राचीन काळी मानवाने पाण्याच्या सोयीसाठी नदीकाठी वस्त्या केल्या. विहीरी किंवा बंधारे यांचे तंत्रज्ञान विकसित होईपर्यंत नद्या ह्याच एकमेव जलस्त्रोताचे साधन होत्या. म्हणूनच कदाचित आपल्या संस्कृतीत नदीला एवढे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असेल. पुढे याच नदीकाठी निर्माण झालेल्या वस्त्यांचे रुपांतर कायम स्वरुपातील गावात आणि शहरात झाले. शेकडो वर्षांपूर्वी आमच्याही गावच्या पुर्वजांनी पाणवठा बघून या साकुळामाईच्या तीरावर वस्ती केली असेल आणि याच वस्तीचे रूपांतर पुढे आमच्या गावात झाले असेल.

आमची साकुळामाई एरवी कोरडी ठाक असली तरी एखाद्या पावसाळ्यात ती हमखास वाहती होते. अलिकडे आमच्या तालुक्यातील सततचे दुष्काळी वातावरण हे साकुळामाई कोरडी असण्याचे महत्वाचे कारण. त्यात गावोगावी राबवलेल्या 'पाणी आडवा। पाणी जीरवा॥' योजनेमुळे ठिकठिकाणी बंधारे बनवल्याने नदीच्या प्रवाहाला आता खूप मर्यादा आल्या आहेत. आजोबा सांगायचे की, त्यांच्या बालपणी साकुळामाई बारमाही वाहत असे. एखाद्या साली कधी दुष्काळ पडला तर ती उन्हाळ्यात कोरडी पडायची पण संक्रांती पर्यंत तिचे पात्र हमखास वाहत असे. माझ्या बालपणी देखील काही महिन्यांसाठी का असेना पण साकुळामाई वाहत असे. पावसाळ्यात कित्येकदा नदी वाहू लागताच बेडकांडे डराव-डराव गीत हमखास ऐकू येई. नदीला पूर आल्यास आम्ही सगळे पाणी पाहण्यासाठी धाव घेत असू. ते फेसाळणारे गढूळ पाणी आम्ही तासोंतास बघत बसायचो. साकुळामाईच्या पुराचे पाणी गावात घुसून नुकसान झाल्याचे कधी ऐकण्यात नाही.

साकुळामाई ही गोदावरीची लेक. इतर नद्यांच्या तुलनेत ती लांबीने अगदीच छोटी. जेमतेम पंचवीस तीस किलोमीटरचा तिचा एकूण प्रवास. नवनाथांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगेत देवीचे धामणगाव या गावाजवळ ती उगम पावून उत्तरेला गोदीवरीकडे वाहत जाते. विशेष म्हणजे देवीचे धामणगाव हे माझे अजोळ. येथे तिला जमनागिरी या नावाने ओळखतात. धामणगावातून ती पुढे माळी बाभुळगाव, डांगेवाडी, साकेगाव आणि काळेगाव ह्या तिच्या काठी वसलेल्या गावांतून वाहत आमच्या अमरापूरमध्ये प्रवेश करते. अमरापूरला तिचे पात्र थोडेसे रुदांवलेले आहे. अमरापूर नंतर ती शहाजापूर, सुलतानपूर या गावांना तृप्त करून भगूर गावाजवळ नंदिनी नदीस मिळते. नंदिनी पुढे ढोरा नदीस आणि ढोरा गोदावरीत एकरूप होते. 

माझं संपूर्ण बालपण हे साकुळा काठच्या अमरापूर येथे गेले. लहानपणी मी मित्रांसोबत नदीवर गुपचूप पोहायला जात असे. घरचे नदीवर कधी पोहायला जावू देत नसायचे. नदीवर स्मशानभूमी होती. कुणाची भूतबाधा होईल म्हणून आम्हाला घरचे तिकडे जाऊ नका असे बजावून सांगायचे. तरीही मित्रांसोबत गुपचूप पोहायला जाण्यात खूप मज्जा येई. नदीचे पात्र फार खोल नसल्याने पोहण्याऐवजी फक्त पाण्यात मनसोक्त खेळाणे हाच आम्हा मित्रांचा एकमेव उद्देश असायचा. पाण्यात धराधरी खेळणे हा आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ होता. मला त्यावेळी पोहताही येत नव्हते आणि नदीपत्रात पाणी खोल नसल्यामुळे बुडायची भिती देखील नसायची. नदीला पाणी असले की आम्ही दिवाळीच्या सुट्टीत हे पोहण्याचे बेत आखत असू. साकुळामाईच्या काठावर एक भला मोठी जुनी बारव आणि महादेवाचे मंदिर आहे. कधीकधी नदीचे पाणी आटले तरी बारव भरलेली असे. मोठाली मुलं जी पोहण्यात तरबेज होती, ती बारवेत पोहायची. बारव फार खोल होती. माझे कधी त्यात पोहण्याचे धाडस झाले नाही. 

मला अजूनही आठवते गावात नळयोजना झाली नव्हती. त्यावेळी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असे. घरोघरच्या बायकांना पाण्यासाठी नदीकाठच्या विहीरींवर पायपीट करावी लागे. साकुळामाईच्या पात्रात काही बायका झीरा खोदून त्यातून वाटीने पाणी भरायच्या. हे काम फार जिकिरीचे आणि वेळकाढू असायचे. एक हंडा भरायला खूप वेळ लागायचा. बायकांना एका हंड्यासाठी तासभर वाट पहावी लागे. पुढे चालून गावच्या ग्रामपंचायतीने साकुळामाईवर छोटासा बांध घालून पाणी उडवले आणि त्या शेजारी मोठी विहीर खोदली. या पाण्यातून आमची साकुळामाई घरोघरी जाऊन पोहचली.

साकुळामाईचे पात्र एकाठिकाणी खूप रुंद होते. त्या रुंद पात्राच्या एका बाजूच्या काठावर उंच चिंचेच्या झाडांची रांग तर दुसऱ्या बाजूच्या काठावर वेड्या बाभळी आणि बेशरमच्या झाडांची ताटी होती. या दोन्ही काठांच्या मधोमध क्रिकेटच्या मैदानाएवढी मोठी सपाट जागा होती. या मोकळ्या मैदानात मोठी मुलं क्रिकेट खेळायचे. त्यावेळी मी फार लहान असल्याने मला कुणी खेळात घेत नसे. पण साकुळामाईच्या काठावर बसून क्रिकेटचा तो खेळ बघायला खूप मज्जा यायची. काही वर्षांनी या जागेवर सरकाने भलामोठा बंधारा बांधला आणि क्रिकेटचे मैदान त्या बंधाऱ्यात गुडूप झाले. बंधाऱ्यात पाणी साचायला लागल्यावर पोहण्यासाठी गावातील मुलांना हक्काचे ठिकाण मिळाले. क्रिकेट खेळणारी मुलं आता या बंधाऱ्यात पोहू लागली. मी याकाळात पोहायला शिकण्याचा प्रयत्न केला पण मला काय ते जमलेच नाही. 

आम्ही मित्र खूपदा नदीकाठच्या लिंबाच्या झाडावर सुरपारंब्याचा खेळ खेळायला जायचो. या व्यतिरिक्त नदीच्या पत्रातून मित्रांसोबत भटकणे, सागरगोटे, गुंजा आणि खडे जमवणे अशा गोष्टी करायला मला खूप आवडायचे. एकदा नदीपत्रातून भटकत असताना मला चलनातून बाद झालेला एक नया पैसा सापडला. नदीपात्रात नाणी अर्पण करण्याची आपली परंपरा माहीत होती. मी स्वतः चंद्रभागेत आणि गोदावरीत नाणे टाकले आहे. आजही विविध नद्यांच्या पोटात वेगवेगळ्या कालखंडातील कितीतरी नाणी असतील. पण या एका नाण्याच्या कुतूहलाने मला पुढे वेगवेगळ्या देशांची नाणी जमवण्याचा छंद जडला. हा छंद मी आजगायत जोपासला आहे. आमच्या साकुळामाईने मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे. साकुळामाईने जसे माझे जीवन समृद्ध केले तशा तिने अनेक पिढ्यांना आपल्या पाण्याने समृद्ध केले आहेत. आमची साकुळामाई डोंगरदऱ्यात खळखळत, अडखळत जाणाऱ्या नद्यांसारखी नसली तरी ती मला खूप प्रिय आहे. 

शनिवार, २३ मे, २०२०

आजोबा

आमच्या आजोबांना आम्ही दादा म्हणत असू. जुन्या पिढीतील करारी स्वभावाच्या माणसांपैकी ते एक होते. स्वतः पुरता विचार न करता भविष्यातील आपल्या कित्येक पिढ्यांच्या उद्धारासाठी विचार करणारे ही माणसं होती. दादांचे शेतीवर विशेष प्रेम होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक व्यवसाय करून शेती वाढवली. दादा खूप कष्टाळू व प्रामाणिक होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नसते असे ते नेहमी म्हणायचे. त्यांना जाऊन आता खूप वर्षे झाली आहेत पण त्यांच्या अनेक आठवणी आजही स्मरणात आहेत.

दादांचा आवाज खूप कणखर होता. त्यांचा आवाज अजूनही कानात घुमत असल्याचा भास होता. सुगीचे दिवस सुरू झाले कि दादांचा मुक्काम वाडग्यातून खळ्यात सुरू व्हायचा. काढणी केलेले गहू, हरभरा, तूर किंवा ज्वारी या पिकांचे जनावरांपासून रक्षण करण्यासाठी ते दिवसरात्र खळ्यातच असायचे. मग त्यांना जेवण पाणी सगळं काही तिथेच नेऊन द्यावे लागे. पाणी संपले कि त्यांनी जोराने आवाज द्यावा,
"ये बाळ जग भरून पाणी आण रे!"
दादांचा आवाज खळ्यातून थेट वाड्यात अगदी स्पष्ट ऐकू येत असे. इतरवेळी देखील दादांचे जेवण हे वाडग्यात नेऊन द्यावे लागे. उतारवयात दादांना वाड्याच्या पायऱ्या चढता येत नसत. वाडग्यात कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत किंवा मग गोठ्यात त्यांना झोपण्यासाठी केलेला ओट्यावर ते जेवण करत. भाकरी किंवा कालवण पाहिजे असल्यास दादा नेहमीप्रमाणे हाक मारत.
"ये बाळ वाटीभर कालवण आण रे!"
"ये बाळ दोन कोरा भाकर आण रे!"
दादा सगळ्यांना बाळ म्हणूनच हाक मारायचे. जेवण करतांना दादांना भाकरीचे पापुद्रे चावत नसत. सगळे पापुद्रे काढुन ते बाजूला ठेवीत. जेवण झाल्यावर ते सर्व पापुद्रे कुत्र्यांना टाकीत असत. कुत्र्यांनाही हाक मारण्याची त्यांची वेगळीच पद्धत होती. यु यु असं न म्हणता दादा ऊ स्वराचा आलाप घेऊन "ऊsक" असा मोठा आवाज काढायचे. आवाज दिल्यावर गल्लीतले आणि वाडग्यातले कुत्रे आवाजाचा माग घेत पापुद्रे खाण्यासाठी जोराने धावत येत. दादा आलेल्या सगळ्या कुत्र्यांना पापुद्रे विभागून टाकत.

वाडग्यातील चिंच म्हणजे दादांची संपत्ती होती. तिच्या चिंचावर दादा सोडून कुणाचाच हक्क नव्हता. चिंचा विकुन येणारे पैसे ते वर्षभर पुरवून पुरवून वापरत. ज्यावर्षी चिंच चांगली बहरेल त्यावर्षी दादा लगेच त्या चिंचेचा सौदा करून टाकायचे. गावात अनेक मुस्लिम व्यापारी चिंचा विकत घेत असत. एकदा का चिंचेचा सौदा झाला मग कुणालाही चिंचेच्या सावलीला उभे रहाण्याचाही हक्क नसायचा. व्यापारी जोपर्यंत चिंच झोडून नेत नाही तोपर्यंत दादा दिवसभर चिंचेला राखण बसायचे. घरातील माणसांना देखील ते चिंचा तोडू देत नसत. दादा जेव्हा केव्हा फेरफटका मारण्यासाठी जात, त्यावेळी आम्ही चिंचेच्या झाडावर चढून गाभोळ्या चिंचा खात असू. एकदा असेच दादा वाडग्यात नव्हते. मी गुपचूप चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडत होतो. त्यावेळी अचानक दादा वाडग्यात परत आले व त्यांनी मला झाडवर पाहीले. गडबडीत उतरण्याच्या नादात माझा पाय एका फांदीत अडकला. मी घाबरून ओरडू लागलो. दादा आता आपल्याला काठीने मारणार असे वाटत असतानाच कशीबशी पायाची सुटका करून मी पळ काढला. त्यांनतर मी दादांच्या हयातीत परत कधी त्या झाडावर चढलो नाही.

शेणखत आणि शेती हे गणित दादांच्या मनात पक्के होते. शेणखता शिवाय शेतीला दुसरा पर्यायच नाही असे ते नेहमी म्हणायचे. या त्यांच्या स्वभावामुळे ते गावातील अनेकांकडून शेणखत विकत घेत. पुर्वी प्रत्येकाच्या वाडग्यात किंवा खळ्यात उकीरडे असायचे. या उकीरड्या मध्ये जनावरांचे शेण, मुत्र किंवा न खाल्लेला चारा टाकला जायचा. पावसाच्या पाण्यामुळे वर्षभर या उकीरड्यातील सगळे घटक कुजून त्याचे चांगले खत तयार व्हायचे. हे खत उन्हाळ्यात शेतात नेऊन टाकले जायचे. आमच्या घरचे शेणखत हे शेतीसाठी अपुरे पडायचे. त्यामुळे दादा गावातील इतर लोकांचे उकीरडे धान्याच्या किंवा पैशाच्या मोबदल्यात विकत घ्यायचे. अशा उकीरड्यातून शेणखत वाहून नेण्याचे संपल्यावर; ते गड्यांना उकीरड्याच्या तळाची चारबोटं खोल माती देखील खोदून न्यायला सांगायचे. पावसाळ्यात पाणी उकीरड्यात उतरते. पाण्यामुळे शेणखताचे बरेचशे अंश जमिनीत मुरतात त्यामुळे उकीरड्याच्या तळाची माती देखील शेणखता एवढीच गुणकारी होते असे ते म्हणायचे. शेणखत गोळा करण्याचा विलक्षण छंद दादांना होता. ते रोज गावात फेरफटका मारायला गेल्यावर; परत येताना आपल्या हातातील काठी बगलेत धरून रस्त्यावर पडलेले शेण गोळा करत यायचे. एखाद्या दिवशी रस्त्यावर जास्तच शेण मिळाल्यावर ते स्वतःच्या धोतराची झोळी करून शेण आणायचे व वाड्याच्या भिंतीला लागून असलेल्या उकीरड्यावर टाकायचे. हा दादांनी गोळा केलेल्या शेणाचा एक स्वतंत्र उकीरडा होता. वर्षाकाठी यातून एक दोन बैल गाड्या शेणखत निघायचे. शेतात फेरफटका मारायला जाताना देखील ते रस्त्याने पडलेले शेण गोळा करून वावरात नेऊन टाकायचे. जमिनीला अजून शेणखत मिळावे म्हणून ते वावरात मेंढ्या बसवत. मेंढ्या बसवणे हा देखील दादांचा एक छंदच होता. त्यामुळे कित्तेकदा उन्हाळ्यात धनगर लोक मेंढ्याचे कळप घेऊन बिनबोभाट आमच्या शेतात जावून बसायचे. दुसऱ्या दिवशी जेव्हा धनगर धान्य मागायला यायचे त्यावेळी घरच्यांना कळायचे कि रानात मेंढरे बसली आहेत. परिसरातील धनगर समाज दादांना फार मानायचा.

लहानपणी मी दादांना खाऊसाठी पैसे मागायचो. दुकानातील गोळ्या, बिस्किटे किंवा मग उन्हाळ्यात मिळणारी गारीगार यासाठी मी त्यांच्याकडे पैशाचा हट्ट धरत असे. पैसे मिळवण्यासाठी दादांचे खूप काम करावे लागत. वेळच्या वेळी त्यांना चहा, पाणी किंवा जेवण वाडग्यात नेऊन देणे वगैरे. त्यांच्याकडे पैसे असल्यावर ते देऊन टाकत. ते कधी नाही म्हणायचे नाहीत. पण जेव्हा त्यांच्याकडे पैसे नसायचे तेव्हा ते नेहमीच गमतीशीर उत्तर द्यायचे,
"पैशाचा टेम्पो भरून येवू राहीलाय, पण तो करंजीच्या घाटात पंग्चर झालाय. टेम्पो आल्यावर देतो तुला पैसे." कालांतराने त्यांच्या पैशांचा टेम्पो मला पैसे देण्यासाठी कधी भरून आलाच नाही. परंतू त्यांनी कमवलेल्या शेतीतून आणि शेतीसाठी घेतलेल्या कष्टातून आजही आम्हीला खूप काही मिळत आहे. त्यांच्या आशिर्वादाचा टेम्पो आम्हाला भरभरून देत आहे. 

गुरुवार, १४ मे, २०२०

पहाटेचा प्रवास



प्रवास हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मलाही प्रवास करणे, भटकंती करणे खूप आवडते. आपल्यातील प्रत्येकाला अनेक कारणांसाठी कधीना कधी प्रवास करावाच लागतो, परंतु एखाद्या प्रवासाची सुरूवात ही पहाटेच्या आल्हाददायक वातावरण व्हावी यासारख्या आनंदाची दुसरी गोष्ट नाही. पहाटेचा प्रवास आवडण्याची अनेक कारणं असू शकतात. सगळी माणसं पहाटेच्या साखर झोपेत असतांना नेहमीच वर्दळीने व्यापून जाणारे रस्ते हे मोकळे आणि शांत असतात. वातावरणात सुखद गारवा आणि हवा स्वच्छ असते. यामुळे पहाटेचा प्रवास सुसह्य आणि गतीमान होतो. माझ्या आयुष्यात खुपदा पहाटे प्रवास करण्याचा योग आला. गावाहून अनेकदा कामानिमित्त विविध ठिकाणी गेलो आहे. पुण्यामुंबईस जायचे म्हटलं तर पहाटे निघाल्यावाचून गत्यंतर नसते.

सकाळी उठल्यावर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून मी आधल्या रात्रीच प्रवासाची सगळी तयारी करून ठेवतो. लागणारी कागदपत्रे, कपडे आणि इतर गरजेचे साहित्य बॅगेत व्यवस्थित ठेवले आहेत ना? प्रवासात घालण्यासाठीचे कपडे काढून ठेवले आहेत ना? मोबाईलवर अलार्म लावला आहे ना? याची खात्री केल्याशिवाय मी झोपी जात नाही. हल्ली सगळे जण मोबाईल वापरतात त्यामुळे अलार्म लावणे सापे झाले आहे. पण मी असाही काळ अनुभवला आहे जेव्हा सामान्य माणसं मोबाईल फोन वापरत नव्हते, त्यावेळी 'आई' हाच सगळ्यात मोठा अलार्म असायचा. दिवसभर शेतात काम करूनही आई बरोबर वेळेवर उठून सगळी तयारी करायची. मोबाईलच्या जमान्यात देखील कित्येकदा आई अलार्म वाजायच्या आधीच उठून कामाला लागलेली असते.

पहाटेच्या थंड वातावरणात गरम पाण्याने अंघोळ करण्याची वेगळीच मजा असते. गरम पाण्याने भरलेला तांब्या अंगावर घेताना बादलीतील पाणी कधी संपूच नये असे वाटत रहाते. ही अमृत प्रहरातील अंघोळ शरीराला हलकं आणि मनाला प्रसन्न करते. गाडी पकडण्याची घाई असल्याने कितीही वाटले तरी अंघोळ आवरती घ्यावी लागते. अंघोळ होईपर्यंत आईने गरमागरम चहा आणि नाष्टा बनवून ठेवलेला असतो. नाष्ट्याबरोबर वाफाळलेल्या चहाचे घोट शरीराला अजूनच तरतरीत करतात. चहा नाष्टा फस्त केल्यानंतर गाडीच्या आधी किमान दहा मिनिटे मी स्टँडवर पोहोचेल अशा बेताने घरातून निघतो. शेवटच्या क्षणी काही विसरायला नको म्हणून मी परत एकदा बॅग तपासून पहातो. प्रवासात पैसे मुद्दाम दोन तीन ठिकाणी विभागून ठेवणे कधीही चांगले. न करो पैसे हरवले किंवा पाकिट मारले गेले तर काही पैसे तरी शिल्लक रहातील. घराबाहेर पडण्यापुर्वी हात आईचे आशिर्वाद घेण्यासाठी आपोआप वळतात. बॅग पाठीवर घेऊन मग मी एसटी स्टँडकडे मार्गस्थ होतो. आई मला दुरवर जाईपर्यंत दारात उभी दिसते.

बाहेर सगळीकडे शांतता असते. थंड हवेची झुळूक हळूच अंगाला स्पर्शून जाते. रस्त्याने चालत जाताना इथे तिथे भटके कुत्रे आळं करून झोपलेली असतात. एखाद्या घरातील पाळलेले कुत्रे कधीकधी अंगावर धावूनही येतात. माणसांनी गजबजलेल्या स्टँडवर पहाटे सगळीकडे शुकशुकाट असतो पण चहाचे एक दुकान उघडलेले असते. भल्या पहाटे उद्योग धंद्याला जाणारे लोक या दुकानात चहा पिण्यासाठी थांबतात. गाडीची वेळ झाल्यावर मी सारखा गाडी येणाऱ्या रस्त्याकडे पहात रहातो. लांबून खडखड आवाज करत एसटी ही स्टँडच्या दिशेने धावत येताना दिसते. हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतर ती थांबते. गाडी तालुक्याच्या ठिकाणाहून येत असल्याने त्यात अगोदरच अनेक प्रवासी बसलेले असतात. सामान्यतः विद्यार्थी, शिक्षण, कर्मचारी किंवा उपचारासाठी जाणारे रुग्ण असे प्रवासी नेहमी आढळतात. कंडक्टर टिंग टिंग अशी घंटी वाजवतो आणि थंडीत शांत झोपलेल्या गावाला मागे टाकत गाडी भरधाव वेगाने धावू लागते. तिकीट काढून आपल्या बाकावर स्थिरस्थावर होईपर्यंत एसटी गावच्या नदीचा पुल ओलांडून लांबवर आलेली असते. चंद्रास्थानंतरच्या काळ्याकुट्ट अंधाराने सगळ्या शिवाराला व्यापलेले असते. दुरवर एखाद्या वस्तीवर लुकलुकणारा दिवा, आकाशात उलटी झालेली सप्तर्षी, आणि पूर्वेकडे चमचमणारी शुक्राची चांदणी मात्र नजरेस पडते. काळ्या गर्द अंधाराला एसटीचे समोरील दिवे जणू चिरत जातात. रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर पडणारा गाडीचा प्रकाशझोत एखाद्या गुहेसारखा भासतो. या अंधाऱ्या गुहेत आपण कुठेतरी गुढ प्रवासाला निघालो आहोत असे भासते. एसटीच्या इंजिनची घरघर आणि खिडक्यांची थरथर या गुढ प्रवासाची तंद्री मात्र भंग करत रहातात.

काहीवेळेने पुढचे थांबे येत रहातात, प्रवासी चढत जातात. गाव आल्यावर थांबने, नवीन प्रवाशांना आत घेणे हे चालक आणि वाहक यांचे लयबद्ध काम चालू रहाते. ही सकाळीची गाडी म्हणजे अनेक प्रवाशांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली असते. रोज ह्याच गाडीने नियमीत प्रवास करणारे कदाचित अनेक जण असतील. आर्धा पाऊन तासाच्या प्रवासानंतर अंधार संपायला सुरूवात होते. अंधाराची जागा आता उजेड हळूहळू घेऊ लागतो. वाटेत अनेक ठिकाणी व्यायाम व फिरायला आलेले विविध वयोगटातील लोक दिसायला लागतात. जोर, बैठका मारणारे तरुण, झरझर चालत जाणारे स्त्री पुरुषांचे गट एसटीच्या समोरील काचेतून दिसत रहातात. रस्त्याकडेची गावं आता जागी झालेली असतात. माता भगिनी अंगणात झाडलोट आणि सडा टाकण्यात व्यग्र असतात. शेतकरी गायी म्हशींच्या धारा काढताना दिसतात. रात्रभर खुराड्यात बंदिस्त केलेल्या कोंबड्या आता मोळल्या होऊन इथे तिथे चोचीने दाणे टिपत असतात. सायकल, मोटारसायकल स्वार मोठ्या संख्येने रस्त्यावर धावू लागतात. रस्ते, गावातील चहाची दुकानं लोकांनी फुलू लागतात. भाजीपाला बाजारात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याची घाई गडबड चाललेली असते. सकाळच्या शाळेसाठी गणवेषातील मुलंमुली शाळेकडे जाताना दिसू लागतात.

पांढरे आकाश केशरी छटांनी व्यापून जाते. अंधार हटून स्वच्छ प्रकाशाने सगळंकाही उजळून निघते. पक्षांचे थवे आकाशात भरारी घेताना दिसायला लागतात. गाडीत झोपी गेलेले प्रवासी जागे होऊन सावध व्हायला लागतात. दिड तासाच्या प्रवासानंतर काही प्रवाश्यांचे उतरण्याची ठिकाणं येऊ लागतात. सूर्योदय होऊन आकाशात केशरी किरणे सर्वदूर पसरतात. पहाट सरून आता सकाळचे हे कोवळे ऊन झाडांच्या फांद्यावर खेळू लागते. पहाटेचा प्रवास आता सरून गेलेला असतो मात्र गाडी अजूनही आपल्या अंतीम गंतव्याकडे धावत असते.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

गाडीवाट




गाडीवाट म्हटलं तर मला अजूनही आमच्या शेतात जाणारी वाट आठवते. खाच खळग्यांची ही कच्ची वाट इतकी वर्षे झाली पण ती काही बदलली नाही. दगड-गोटे, काटे-सराटे जणूकाही या गाडीवाटेचे अलंकारच म्हणावे लागतील. पावसाळ्यात चिखलाने रापून जाणारी, उन्हाळ्यात फुफाट्याने माखून निघणारी ही वाट काळाच्या ओघात का बदलली नसावी? याचं कधी कधी मला नवल वाटतं. प्रत्येक गोष्टीत काळानुरुप थोडेफार बदल होत असतात. आलिकडच्या काळात वाटेच्या दुतर्फा दिसणाऱ्या वेड्या बाभळी आता बऱ्याचशा कमी झाल्या आहेत. पावसाळ्यात वाहणाऱ्या एका नाल्यावर सिमेंटची नळी बसवून तात्पुरता पुल सदृश्य केलेला उंचवटा हेच ते काय बदल या गाडीवाटेने अनुभवले आहेत. पण याला बदल म्हणावं का? हा प्रश्नही मला पडतो. कारण वाट शतकानुशतके कच्ची होती, आणि ती आजही आहे.

दररोज संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी माणसाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत असते. मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. आपल्याला त्या गोष्टीचा स्वभाव आणि गुण अवगत होत असतात. गाडीवाटेचे देखील तसेच आहे. नियमीत वापरामुळे कुठे चढउतार आहे, कुठे खड्डा आहे, कुठे हळू चालायचे हे सगळे अंगवळणी पडते. म्हणूनच ही वाट बदलली किंवा अद्ययावत झाली नसली तरी ती आता जीवनाचा एक भाग बनून गेली आहे. ये जा करणाऱ्या प्रत्येकाने तिला स्विकारले आहे कारण या वाटेवरुन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आमच्या पुर्वजांचा या वाटेवरुन खूप वावर असायचा आणि आमच्या आजच्या पिढीचाही तितकाच आहे. ही वाट आम्हाला शेतात घेऊन जाते; म्हणूनच कदाचित आमचं या वाटेशी इतकं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं असावं.

का कुणास ठाऊक? पण आजही मला या वाटेने आमच्या खाल्लाकडच्या शेतात चालत जायला खूप आवडते. सुट्टीवर गावी गेलो की मी बरेचदा या वाटेने एकटाच चालत जातो. गाडीबैल, सायकल, मोटारसायकल किंवा ट्रॅक्टर यावरून मी कित्येकदा या वाटेवरुन गेलो असेल पण पायी चालत जाण्याचा प्रत्येक अनुभव वेगळा वाटतो. शीळ घालत भिरभिरणारा वारा, अचानक हवेच्या वावटळीत झेपावणारा पाला पाचोळा जणूकाही आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास होतो. वाटेकडेच्या झाडांवर पक्षांची चुळबुळ, त्यांचे वेगवेगळे आवाज, दूरवरुन बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घोगरमाळेचा आवाज, औत हकणाऱ्या गड्याने बैलाला ओरडल्याचा आवाज किंवा गुराख्यांनी जनावरांना दिलेली आरोळी यासारखे नानाविध आवाज मला वेगळ्याच विश्वास घेऊन जातात. चालता चालता कुठेतरी मधेच पाय थबकतात आणि एखाद्या पक्षाचा येणारा आवाज तसाच ऐकत रहावसं वाटतं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये विविध किटक, पक्षी आणि प्राणी या वाटेवरुन नेहमीच दिसतात. कधीकधी अचानक काळ्याभोर मुंगळ्यांची रांग नजर चुकवत घाईघाईने आडवी येते. दुरवर उड्या मारत जाणारा हरणांचा कळप तर नियमीत दिसतो. आपल्या लक्षावर नजर केंद्रीत करून एकाच जागेवर पंख हलवत असलेल्या बहिरी ससाण्याला सूर मारतांना पाहाणे म्हणजे पर्वणीच असते. पानाफुलांवर उडणारी छोटी छोटी पिवळी आणि राखाडी रंगाची फुलपाखरं नजर वेधून घेत रहातात. पावसाळ्यात गाळामध्ये वळवळ करणारे पांढरे गुलाबी गांडूळ पाहायला गंमत वाटते. गवतात सळसळ करत जाणारे साप नेहमीच भिती दाखवतात. मोकळ्या वावरात घरटं करून फिरणाऱ्या टिटवीचा कर्णकर्कश आवाज तर कानात घुमत रहातो.

लहानपणी आजी आजोबा यांच्या कडून त्यांनी केलेल्या कष्टाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यांच्या बोलण्यात शेताचा आणि या वाटेचा नेहमी उल्लेख असायचा. आजी नेहमी सांगायची की, पहाटे शुक्राची चांदणी उगवली की, सगळा वाडा जागा व्हायचा. बाया माणसं दोन दोन पायलीची दळणं जात्यावर दळायच्या तर कुणी घागर घेऊन पाणी भरायच्या. घरातील कर्ती माणसं गाडीबैल जुंपून खाल्लाकडच्या शेतात जायचे. बैल अंधारातही या गाडीवाटेने बरोबर शेतात पोहचायचे. घरचं काम उरकल्यावर बाया शेतात गेलेल्या माणसांना न्याहारीच्या भाकरी घेऊन याच वाटेने चालत जायच्या. न्याहारीचे गाठोडे दिल्यावर घरच्या जनावरासाठी ओझंभर गवत कापायच्या आणि ते ओझं डोक्यावर घेऊन याच वाटेने माघारी यायच्या.