शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

आखाती मोत्यांचा व्यवसाय (Gulf Pearling Industry)

संपूर्ण अरब खंड हा वाळवंटाने व्यापला आहे. अरब खंडाचा मध्य भाग तर प्रखर आणि अती उष्ण वातावरणामुळे निर्मनुष्य आहे. त्यामुळे येथील प्राचीन काळापासून लोकवस्ती ही सागर किनार्‍याच्या आवती भोवती व वाळवंटातील नैसर्गिक जलस्रोताच्या ठिकाणी असायची. या नैसर्गिक जलस्रोतांना मरूद्यान (Oasis) असे म्हणतात. इथली जमीन ही रेतीची आणि नापीक असल्याने शेती करण्यायोग्य नव्हती आणि लोक पाण्याच्या स्त्रोताबाबत नेहमीच चिंतेत असायचे. एकूणच शेती करण्याच्या संधी फारच कमी होत्या. वाळवंटात आणि कमी पाण्यात वाढणारे खजुराचे पिक हाच अरबांचा मुख्य शेती व्यवसाय होता. खजुराच्या झाडाच्या सावलीत खोडाशेजारी हे लोक काही प्रमाणात भाजीपाला आणि धान्य पिकवायचे. पण हे पिकवलेले अन्न सर्व जमातीच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे येथील मुख्य आहार हा उंटाचे मांस आणि मासे हाच होता. अरब हे प्राचीन काळापासून भटकणाऱ्या टोळ्यात रहायचे. पाण्याच्या स्त्रोतानुसार व हवामानानुसार त्यांच्या जमाती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थानांतरीत व्हायच्या. खजुराचे पिक उन्हाळ्यात येत असल्याने आणि समुद्र किनार्‍याचे भीषण दमट वातावरण टाळण्यासाठी अरबांच्या टोळ्या उन्हाळ्यात वाळवंटातील जलस्रोताच्या आसपास लोकवस्ती करायच्या. खजुराचा मोसम संपल्यावर अरब टोळ्या हिवाळ्यात मासेमारी करण्यासाठी परत समुद्र किनारी परतायच्या. कालांतराने काही कुटुंब ही मासेमारी करण्यासाठी समुद्र किनारीच स्थायिक झाले. मासेमारी करत असताना आखाताच्या उथळ पाण्यात अरबांना मोती शिंपल्यांचा शोध लागला. मासेमारी दरम्यान सापडलेले मोती हे अरब जमवून ते व्यापारी लोकांना विकत.

स्थानिक भाषेत 'लूलू' म्हणजे मोती हे मध्यपूर्वेतील खनिज तेलाचा शोध लागण्या आधी उत्पन्नाचे मुख्य साधन होते. मोती शिंपल्यांचे नैसर्गिकरीत्या आखाताच्या उथळ पाण्यात रोपन होत असे. मोती व्यवसाय ह्या भागाच्या संस्कृतीचा किती जुना भाग आहे हे सांगणे कठीण आहे, पण संयुक्त अरब अमिरात आणि आखाती देशातील विविध पुरातत्व उत्खनना वरून येथील जमाती अंदाजे 5000 वर्षापासुन हा व्यवसाय करत असावेत हे याठिकाणी सापडलेल्या मोत्यावरून स्पष्ट होते. मोत्यांचा व्यापार हा प्राचीन रोमन साम्राज्यातही चालत होता. रास अल खैमाह हे प्राचीन मोती व्यापाराचे केंद्र होते.

समुद्रकिनारी खेड्यात हळूहळू बंदरे विकसित होऊ लागली. आबू धाबी, दुबई, शारजा, रास अल खैमाह ही खेडी व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला येऊ लागली. वेगवेगळ्या अरब जमाती व्यवसायात उतरल्याने या खेड्यात लोकवस्ती वाढत गेली. या छोट्या छोट्या बंदरातून भारतीय उपखंडात आणि युरोप मध्ये व्यापार होऊ लागला. उद्योगधंदे करण्यासाठी पोषक वातावरण आणि साधन संपत्तीचा अभाव यामुळे विनियोगाचे एकच माध्यम होते ते म्हणजे जलमार्गे होणारी वाहतूक. अरब हे मोती, खजूर, उंट, घोडे यांच्या बदल्यात मसाले, चहा, कॉफी, तंबाखू, खाद्यान्न, कापड विकत घेत. पुढे आठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात आखातातील नैसर्गिक मोत्यांची मागणी विशेषतः भारतीय उपखंडातील राजे राजवाडे याच्याकडून वाढत गेली. मंबई हे त्या काळी आखाती मोत्यांची मोठी बाजारपेठ होती.

मोती शिंपल्यांचा शोध घेण्यासाठी 18 ते 20 लोक एका मध्यम आकाराच्या बोटीवर निघत. ही बोट साधारणे मे ते सप्टेंबर अशी चार पाच महिने समुद्रात मोती शोध करायची. या प्रवासात खाण्यासाठी लागणार्‍या वस्तू जसे तांदुळ, पीठ, काॅफी, तंबाखू, खजूर व इतर किराणा सामानाबरोबर मांसाहार करता यावा यासाठी काही वेळा शेळ्या मेंढ्याही बोटीत नेत. बहुधा ते कामगार समुद्रात पकडलेले ताजे मासे आणि भात असा आहार घेत. शरीराला पुरेशी ऊर्जा व जीवनसत्त्व मिळण्यासाठी हे कामगार खजुराचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत. किनार्‍यावरूनच गोड्या पाण्यानी भरलेले लाकडी पिंप बोटीत असत. पाणी व खाद्य पदार्थ संपल्यावर बोटी जवळपासच्या बेटावर किंवा किनार्‍याच्या गावात जाऊन जरूरी सामानाचा भरणा करत. बोटीत कमीत कमी आठ पानबुडे (Divers), बुड्यांना ओढणारे काही ताकतीचे लोक (Haulers), स्वयंपाकी, बोटीतील कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी एक गायक आणि या सर्वावर देखरेख ठेवणारा व काळजी घेणारा नायक ( Captain) असे. एकोणिसाव्या शतकाच्या प्ररंभी उपलब्ध माहितीनुसार जवळपास 1200 बोटी आणि 22000 कामगार या व्यवसायात सामील होते.

खोल समुद्रात बुडी घेणे हे फार कठीण व जोखमीचे काम होते. बरेचदा बुडी घेणार्‍याच्या हे काम जीवावर बेतायचे. बुड्याचे काम सकाळी सूर्योदया पासून ते सुर्यास्त होई पर्यंत चालायचे. बुडी मारणारे दिवसातून किमान 50 बुड्या घेत. बुडी साधारणपणे 40 मीटर खोल व जास्तीत जास्त दोन मिनिटे चालायची. जेवण करणे, काॅफी पिणे किंवा प्रार्थना करणे या कामासाठी पानबुडे यांना सुट्टी मिळायची. बुडी घेणार्‍याच्या पायाला दावे बांधलेले असत. पाण्यात लवकर बुडावे यासाठी त्यांच्या पायाला वजनी दगड बांधलेला असे. नाकात समुद्राचे पाणी जावू नये यासाठी नाक छोट्या चिमट्याने बंद केलेले असे. कानात विशिष्ट प्रकारच्या मेणाचे बोळे घालून बंद केलेले असत. हाताची बोटे चामड्याचे मोजे वापरून सुरक्षित केली जात. बुडी घेतल्या नंतर तळाला शक्य तेव्हढे शिंपले जमा करून पानबुडे त्यांच्या गळ्यात बांधलेल्या पिशवीत टाकत. काम संपल्यावर बोटीवरच्या ओढणार्‍यास इशारा केल्या नंतर तो संपूर्ण ताकदीनिशी पानबुड्याला वर ओढुन काढे. पानबुड्या पाण्यातून वर आल्यावर त्याच्या गळ्यातील पिशवी तत्काळ रिकामी करण्यात येई तोपर्यंत तो दम घेऊन पुढच्या बुडीसाठी तयार होत असे. दिवसभराच्या परिश्रमानंतर सर्व कामगारांना जेवण मिळायचे. थोड्या विश्रांती नंतर नायकाच्या कडक देखरेखी खाली दिवसभर जमलेले शिंपले फोडण्यात येत. अंदाजे 50 ते 200 शिंपल्यात एखाद दुसराच मोती मिळायचा. या शिंपल्यातून विविध आकाराचे लहान मोठे मोती मिळत. त्यांच्या आकारानुसार त्यांची वर्गवारी करण्यात येत. मोठ्या आकाराच्या मोत्यांना जास्त मागणी व भाव असे.

जमवलेले मोती व्यापाऱ्यांना विकण्यात येत. मोत्यांचा व्यवसायाच्या अर्थकारणाचे बरेच प्रकार होते. जर नायकाची स्वतःची बोट असल्यास त्याला सर्व मोती व्यापाऱ्याला विकण्याचा अधिकार असे. अन्यथा पतपुरवठा करणारे सावकार मंडळी हे सर्व मोती घेऊन कामगारांना त्याचा ठरलेला हिस्सा देत. कामगार हे रोजंदारीवर काम न करता उत्पन्नातून मिळणाऱ्या नफ्यात वाटा घेत. पानबुड्यांना ओढणार्‍या कामगारापेक्षा दुप्पट पैसे मिळत. या व्यवसायात रोजंदारीवर काम नसल्याने फार धोके होते. एकतर जीवावर बेतुन समुद्रात बुड्या मारायच्या आणि त्यात जर मोसम चांगला गेला नाहीतर कामगारचे मोठे आर्थिक नुकसान व्हायचे. हे कामगार पतपुरवठा करणाऱ्या सावकाराकडून आगाऊ उचल घ्यायचे त्यामुळे वाईट मोसमात मोती कमी मिळाल्यास त्यांना कर्ज बाजारीही व्हावे लागायचे. पण बरेचदा त्यांना मनाजोगती कमाई व्हायची. अशा वेळी हे कामगार त्या पैशातून उंट आणि खजुराच्या बागात गुंतवणूक करून वर्षभर आरामात जीवन जगायचे.

1920 नंतरचे दशक या व्यवसायासाठी काळ म्हणून सामोरे आले. जपानमध्ये कृत्रिमरीत्या मोत्याची लागवड सुरू झाली. हे मोती अतिशय कमी किंमतीत उपलब्ध होऊ लागल्याने आखाती मोत्याची मागणी घटत जावुन पुढे ती बंदच झाली. 1930 च्या दशकात खनिज तेलाचा शोध लागण्यापर्यंत येथील अर्थव्यवस्था कोलमडून पडली. या व्यवसाशी संबंधित सर्व कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आणि प्राचीन अशा मोती व्यवसायाची अखेर झाली.

_गणेश पोटफोडे (दुबई)

संदर्भ 
1. Abu Dhabi Authority for Culture & Heritage
2. Records of Dubai 1761-1960 (Volume 3)

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

कथा : मेट्रो फ्रेंड

पहाटेचे साडेपाच वाजले. राहुलच्या मोबाईलचा अलार्म वाजायला लागला. आज रविवार असल्याने राहुलने अलार्म स्नूज न करता तो बंद केला आणि बिछान्यावरून उठला. त्याने खिडकी थोडीशी उघडली. मंद वारा सुटला होता. हवेत छान गरवा होता. जानेवारी महिना असल्याने दुबईतील वातावरण फार प्रसन्न होते. खिडकीतून हवेची एक झुळुक घरात शिरली. त्या ताज्या हवेमुळे राहुलची झोप कुठच्या कुठे पळून गेली. बाथरूममध्ये शिरण्यापूर्वी त्याने आपल्या बायकोला उठवले. आज आठवड्याची सुरुवात असल्यामुळे त्याने दाढी करणे, बुटांना पॉलिश करणे ही सर्व कामे उरकून घेतली.

बाथरूम मधून आपली सकाळीची सर्व कामे संपेपर्यंत राहुलच्या बायकोने त्याच्यासाठी चहा नाष्टा आणि दुपारच्या जेवणाचा डब्बा तयार करून ठेवला. नेहमीचे गाणे गुणगुणत त्याने चहा नाष्टा फस्त केला. आपल्या आवडीचा परफ्यूम कपड्यावर मारून तो घरा बाहेर पडला. राहुलचे ऑफिस जबल अलीला शिफ्ट झाल्यापासून त्याला थोडेसे लवकर उठावे लागते. तो मेट्रोने प्रवास करीत असल्या कारणाने त्याला ट्रॅफिक जामची अजिबात चिंता नव्हती. तो आरामात आणि वेळेवर ऑफिसात पोहचायचा. पूर्वी त्याचे ऑफिस अल कुझला होते तेव्हा तो 10 नंबरची डबल डेकर बस पकडून जायचा.

अजुन उजाडले नव्हते. छान गार वारा अंगाला झोंबत होता. देअराच्या चिंचोळ्या रस्त्यावर सामसूम होती पण शाळेच्या पिवळ्या बस मात्र एकामागून एक येत होत्या. शाळेच्या बसचा थांबा राहुलच्या घराखालीच असल्याने त्याला ती रांगेत आणि शिस्तीत उभे राहिलेले विद्यार्थी पाहुन तो आपल्या बालपणीच्या आठवणीत हरवून जायचा. त्या पहिली दुसरीत शिकणाऱ्या गणवेशातील मुला मुलींना पाहुन त्याच्या चेहर्‍यावर रोज एक आनंदाची लकेर उमटायची. तो युनियन मेट्रो स्टेशनकडे चालू लागला. तसं मेट्रो स्टेशनवर पोहचायचा फक्त दहा बारा मिनिटे लागतात पण राहुल रमत गमत जायचा. त्याला रस्त्यावर ठराविक ठीकाणी रोज नेहमीची माणसे भेटायची.

मदिना सुपर मार्केट येईपर्यंत रोज भेटणारे अमिराती अजोबा आडवे आले. अंदाजे 70 वर्ष वयाचे, अंगात अरबी कंदुरा, डोक्यावर अमिरात स्टाईलचा केफिया बांधलेले आणि हातात काठी असलेले ते अजोबा रोज याच ठिकाणी त्याला भेटायचे. त्याच्या चेहर्‍यावरचा उत्साह पाहून राहुलला फारच नवल वाटायचे. ते येथेच जवळपास कुठेतरी राहात असावेत. नेहमी त्यांची नजरानजर व्हायची आणि दोघेही एकमेकांना स्मित हास्याचे आदानप्रदान करायचे. आज मात्र ते थांबले. राहुल जवळ जाताच ते म्हणाले
"सबाह अल खैर"
ते अनपेक्षित उद्गार ऐकून राहुल थोडा भांबावला
" सबाह अल नूर" म्हणून त्याने आजोबांना उत्तर दिले. राहुलचे उत्तर ऐकून बहुधा ते अजोबा चकित झाले असावेत.
"माशा अल्ला! भाईसाब" म्हणत ते वाटेला लागले. त्याच्या त्या पाठमोर्‍या आकृती कडे राहुलने कटाक्ष टाकला आणि तो पुढे चालू लागला. अल ऐन डेअरीची गाडी मदिना सुपर मार्केटच्या समोर उभी होती. रोजच्या प्रमाणे डेअरीचा कर्मचारी लाल, निळ्या झाकणांनी बंद  असलेल्या दुधाच्या बाटलीचे क्रेट उतरवत होता. राहुल डावीकडे वळला आणि थोडासा पुढे आला. कराची दरबार रेस्टॉरंट समोरच्या कचरा कुंडी शेजारी त्याची जवलग मैत्रीण त्याला भेटण्यासाठी उभीच होती. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती होती एक काळी मांजर. "म्याव म्याव" करत ती राहूलच्या पायाला खेटून गेली. तिला बहुतेक "गुड मॉर्निंग राहुल" म्हणायचे असेल. काही क्षण त्या गोंडस मांजरीकडे तो पहातच राहिला. ही मांजर राहुलला दोन वर्षापासून ओळखते. याचे कारणही तसेच होते. एक दिवस सकाळी त्या मांजरीचा पाय कचरा कुंडीत अडकला होता. ते मुके जनावर म्याव म्याव शिवाय काहीच करू शकत नव्हते. रस्त्यावरून जाताना राहूलला तो आवाज जरा वेदनामय वाटला. तो थांबला आणि त्याने मांजरीचा अडकलेला पाय मुक्त केला. तेव्हा पासून ही मांजर कृतज्ञता म्हणून रोज राहूलची  पावणे सातच्या दरम्यान वाट पहायची.

मेट्रो स्टेशनकडे जातांना अलमक्तूम हॉस्पिटलचा सिग्नल आला. समोर एक भारतीय बोरी जोडपे रस्ता ओलांडत होते. किती दिवसापासून राहुल या दोघांना पाहत होता. ते ऐकमेकांना ओळखत नव्हते पण आता त्याच्यात तोंड ओळख झाली होती. सिग्नल ओलांडताना राहुलने त्या मध्यम वयस्क जोडप्याला गुड मॉर्निंग ची खुण केली. आधिच प्रसन्न हवेचा आणि मॉर्निंग वॉकचा अस्वाद घेवुन आलेल्या त्या जोडप्याच्या चेहर्‍यावर सुंदर हास्य उमटले. तो आपल्या विचारात परत व्यग्र झाला ‘आपल्याला खूप मेहनत करायची आहे. इमानदारीने पैसा कमावून भारतातील कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायची आहेत’.

मेट्रो स्टेशन येण्यापूर्वी एका पाकिस्तानी कॉफी शॉपवर रात्रपाळीचे दमलेले टॅक्सी चालक आपल्या गाड्या पार्किंग मध्ये लावून गरम चहा कॉफीचा आस्वाद घेत होते. लाल, पिवळा, निळा, हिरवा रंग असलेल्या त्या टॅक्सी नजर वेधून घेत होत्या. युनियन मेट्रो स्टेशन बस स्टॉपवर एकामागून एक बसेस येत होत्या. त्यातील प्रवासी आपली नेहमीची गाडी पकडण्यासाठी धावत होते. राहुल स्टेशनच्या आत शिरला तसे त्याच्या कानावर मेट्रोच्या उद्घोषणा येवू लागल्या.

"Your attention please! Train to Creek will arrive at Creek platform"
"You attention please!  Train to Rashidiya will arrive at Rashidiya platform"

युनियन मेट्रो स्टेशनवर ग्रीन आणि रेड लाईन एकत्र येत असल्याने या स्टेशनवर नेहमी प्रवाशांची गर्दी होते. विशेषतः शारजा, किसेस भागात राहणारे प्रवासी ग्रीन लाईने येतात आणि युनियन मेट्रो स्टेशनवरून ते रेड लाईनची ट्रेन पकडतात. रशीदियाकडे जाणाऱ्यांच्या तुलनेत जबल अलीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. राहुल रोज सात तीन ची गाडी पकडायचा. खरतर तो थोडा उशिरा पण जाऊ शकत होता पण उशिरा कामावर जाणे जणू त्याच्या रक्तातच नव्हते. सात तीन ची ट्रेन आली. तो आपल्या नेहमीच्या समोरून तिसऱ्या डब्यात चढला. सकाळी कधी कधी गाडीत गर्दी असायची कधी नसायची. काही वेळेला एअरपोर्ट वरून चढलेले विदेशी पाहुणे गाडीत असायचे. जेव्हा मेट्रोत पुढील स्टेशनची उद्घोषणा व्हायची "Next station is Burj Khalifa Dubai Mall" तेव्हा ते पाहुणे त्या गगनभेदी इमारतीला शोधत खिडकीतून चौफेर पहायचे. बूर्ज खलिफा खिडकीतून दिसल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून कळायचे की ते प्रथमच दुबईत येत असावेत.

आज राहुलची नजर आपले नेहमीचे सहप्रवासी शोधत होती. राहुल प्रमाणे काही वक्तशीर प्रवासी न चुकता सात तीनचीच गाडी पकडायचे. कित्येकांचे चेहेरे राहुलच्या पाठ झाले होते. मेट्रोने युनियन वरून यु ए ई एक्सचेंज स्टेशनवर पोहचायला साधारणपणे 50 मिनिटे लागतात. मग ही 50 मिनिटे राहुल पुस्तक वाचन अथवा मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून बातम्याचे वाचन यासाठी वापरायचा. आज तो मोबाईलवर लोकसत्ता पेपर वाचत होता. वाचनात मग्न असतांना त्याच्या कानावर शब्द पडेल.
 "कुठल्या गावचे"
 शेजारी बसलेला व्यक्ती राहुलला म्हणाला. या अधी राहुलने त्यांना बर्‍याच वेळा याच डब्यात पाहिले होते.
"मी मंबईचा. आपण?"
"मी पुण्याचा"
निळा टि शर्ट घातलेले ते गृहस्थ म्हणाले. साधारण त्याचे वय राहुलच्या वयापेक्षा किंचित जास्त असेल.
"तुम्ही मराठी वाचताय ना म्हणून वाटल आपल्या कडचेच असतील. कुठे काम करता?"
"मी जबल अली फ्री झोनमध्ये आहे. तुम्ही?" राहुल म्हणाला.
"अरे वा! मी पण जबल अलीलाच आहे. कुठली कंपनी तुमची?" ते गृहस्थ मराठीत बोलतांना फार आनंदी वाटत होते. त्यांना फार दिवसांनी मराठी बोलणारा माणूस भेटला असावा. ते आपुलकीने प्रत्येक प्रश्न विचारत होते आणि राहुलही त्याच पद्धतीने उत्तर देत होता.
"मी अमेरिकन एअर फिल्टर मध्ये ड्राफ्समन आहे. तुम्ही कोणत्या कंपनीत अहात?
"मी डबल ए मध्ये आहे. प्रोडक्शन मॅनेजर"

नंतर दोघेही गप्पात मग्न झाले. स्टेशना मागून स्टेशने जात होती. प्रवासी चढत होते. उतरत होते. पण ते दोघेही बोलण्यात हरवून गेले होते. बोलता बोलता यु ए ई एक्सचेंज स्टेशन कधी आले ते त्यांना कळालेच नाही. मेट्रोत जेव्हा उद्घोषणा झाली
" your attention please! This train will be terminated at the next station. Please take your all belongies before leaving the train" तेव्हा ते भानावर आले.
दोघेही यु ए ई एक्सचेंज स्टेशनवर उतरले.
"अरे मी नाव विचारायचे विसरलोच?"
"मी राहुल"
"मी शंकर. भेटुन आनंद झाला. मी रोज हीच ट्रेन पकडतो."
"मी पण याच ट्रेन मध्ये असतो रोज. भेटुयात मग उद्या" राहुल म्हणाला.
दोघेही नूल कार्ड पंच करून बाहेर पडले. शंकर नॉर्थ फ्री झोनकडे वळला आणि राहुल साउथ फ्री झोन कडे.
मेट्रो स्टेशनच्या पायर्‍या उतरताना राहुल मनाशीच बोलत होता.
"खरच जीवन म्हणजे एक प्रवास आहे. या प्रवासात आपण एकटे नाहीत तर आपल्या बरोबर सारेच आहेत. ते सकाळी भेटणारे शेख अजोबा, बोरी दाम्पत्य, ती काळी मांजर, दुबई मेट्रो आणि आज भेटलेला शंकर"
राहुलच्या संग्रहात अजून एका नवीन मित्राची भर पडली होती. मेट्रो फ्रेंडची. तो स्टेशनच्या बाहेर पडला आणि आपल्या ऑफिसच्या दिशेने झरझर पाऊले टाकत चालू लागला.
(सत्य घटनेवर आधारित)

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

स्वामी (रणजीत देसाई)


स्वामी ही रणजीत देसाई यांची थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. मराठी साहित्य जगात सर्वाधिक गाजलेली आणि सुरेख लेखन शैलीने नटलेली अद्वितीय कलाकृती असाही तिचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत या कादंबरी बाबतीत अनेकांनी लिहिले आहे आणि भविष्यातही लिहिले जाईल यात शंका नाही. लेखकाने खऱ्या अर्थाने माधवरावांचा जीवन पटाला बोलके करून वाचकांपर्यंत पोहोचवले आहे ते 'स्वामी' च्या 30 पेक्षा अधिक निघालेल्या आवृत्त्यावरून स्पष्ट होते. रणजीत देसाई यांनी विपुल लेखन कार्य करून मराठी भाषेला समृद्ध केले त्यांची छत्रपती शिवाजी महाराजावरील 'श्रीमान योगी', कर्णा वरील 'राधेय' आणि बाजी प्रभू देशपांडे वरील 'पावनखिंड' या इतर प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबर्‍या आहेत. स्वामीने वाचकांच्या मनावर कसे अधिराज्य गाजवले हे या कादंबरीस मिळालेल्या पुरस्कारावरून दिसते. 1963 ला स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि हरी नारायण आपटे पुरस्कार मिळाले तर 1964 ला साहित्य वर्तुळात नावाजलेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

स्वामी वैशिष्ट्य म्हणजे यात केलेले स्थलवर्णन, व्यक्तीवर्णन. ही वर्णने वाचताना हुबेहुब व्यक्ती आणि प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. असली वर्णने साकारणे हे कादंबरीकारासाठी मोठे दिव्य असते. यासाठी त्यांना इतर किती गोष्टींचा अभ्यास करावा लागत असेल हे त्यानाच ठाऊक, असो. ह्या कादंबरीत माधवरावाच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना, त्या भोवती फिरणारे राजकारण, सरदार आणि कारभारी लोकात बसलेली तरूण पेशव्याची वचक, राघोबादादांची कारस्थाने आणि महत्वाचे म्हणजे रमाबाई आणि माधवराव याचे प्रेम संबंध यावर सविस्तर विश्लेषण केले आहे. स्वामी तीन प्रकरणात विभागली गेली आहे. ही तीन प्रकरणे विभागतांना लेखकाने फार काळजी घेतली आहे.

14  जानेवारी 1761 ला पानपतावर सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेचा पराजय होतो. या युद्धात भाऊंसह विश्वासराव हा भावी पेशवा धारातिर्थी पडतो. गिलच्यांचा हातुन मराठी फौजेची व बाजार बुणग्यांची बेसुमार कत्तल होते. नानासाहेब पेशवे हा धक्का सहन न करू शकल्याने पानपतानंतर काही महिन्यातच (23 जुन 1761) त्यांचा मृत्यु होतो. पेशवाईचे मुख्य वारस विश्वासराव आधीच लढाईत मारले गेल्याने पेशवाईची वस्त्र नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांना मिळतात. अवघ्या सोळाव्या वर्षी 20 जुलै 1761 रोजी माधवराव पेशव्यांच्या मसनदीवर आरूढ होतात. पेशवे पदासाठी गुडघ्यावर बाशिंग बांधुन बसलेल्या नानासाहेब पेशव्यांचे धाकले भाऊ राघोबादादांना हे सहन होत नाही आणि येथूनच सुरूवात होते ती गृह युद्धाला.

पानपतावर जबरदस्त हानी नंतर दख्खन मधील निजाम व कर्नाटकातील हैदर अली यांना जोर चढतो. त्यात अजून कमी की काय नागपूरकर भोसल्यांना देखील सातारा गादीचे स्वप्न पडू लागतात. माधवरावाची जेमतेम 11 वर्षांची कारकीर्द याच घटनांनी व्यापून जाते. हैदरचा बिमोड करण्यासाठी कर्नाटकच्या चार, निजाम विरूद्ध दोन आणि भोसल्या विरूद्ध दोन अश्या एकूण आठ स्वाऱ्या हा तरूण पेशवा जबाबदारीने पार पाडतो. राघोबादादांना अनेक वेळा समजावून सांगितो, त्याच्या कडे आळेगावत स्वतःला ओलिस ठेवतो परंतु राघोबादादांच्या कारवायांना पुर्णपणे पायबंद बसत नसल्याने शेवटी माधवराव त्यांना नजर कैदेत ठेवण्याचा हुकूम देतात.

माधवरावाच्या जीवनातील महत्वाची भावनिक बाजू म्हणजे त्यांची आई गोपिकाबाई. निजामाच्या स्वारीत असतांना निजाम पुण्यात येऊन सर्व शहर लुटतो. पर्वतीवर श्री भंग करतो. यावेळी पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते हे निजामाला मदत करतात म्हणून माधवराव त्यांना 5000 रूपये दंड ठोठावतात. दंड मागे घे नाहीतर मी शनिवारवाड्यात पाणी पिण्यासही थांबणार नाही असे गोपिकाबाई माधवरावास ठणकावून सांगतात. परंतू कर्तव्यदक्ष माधवराव दंड मागे घेत नाहीत. याचा राग येऊन गोपिकाबाई कायमच्या गंगापूरला निघून जातात. परत माधवरावांची व गोपिकाबाई यांची भेट होत नाही. माधवराव एकाकी पडतात. रमाबाई सोडल्यास त्यांना जवळचे असे कोणीच रहात नाही. सारख्या धकाधकीच्या जीवनात त्याना रमाबाईना वेळ देता येत नाही. यातच माधवरावना क्षयाचा गंभीर आजार होतो. या आजारात माधवराव थेऊर येथे दि. 18 नोव्हेंबर 1772  रोजी मरण पावतात. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. माधवरावाच्या आदेशानुसार नुसार रमाबाई सहगमन करतात. तिचे वृंदावन थेऊरयेथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.

स्वामीची शेवटची 20 पाने फार भावनिक आहेत. रमाबाई सती जातानांचा प्रसंग वाचतांना काळजात फार कालवा कालव होते. डोळ्यात अश्रु तरळतात.

मी ही कादंबरी आत्तापर्यंत दोनदा वाचली आहे. अजून किती वेळेस वाचेल हे सांगता येत नाही.