आपल्यातला प्रत्येक जण एक उत्कृष्ट कवी असतो. कवी मन ही मनुष्यास देवाने दिलेली फार मोठी देणगी आहे. शाळेत कविता शिकता शिकता आपले मन कधी कविता करू लागते हे आपले आपल्याच उमगत नाही. कविता करण्यासाठी शाळेत जावेच लागतं असंही नाही. कधीही शाळेत न गेलेले किंवा अक्षर ज्ञान नसलेले अनेक कवी होऊन गेले आहेत. आपल्या आवडत्या गोष्टीत रमतांना मनातल्या कविता नकळत ओठांवर येतात. काहींच्या कविता शब्दात अवतरूण कागदावर मुर्त रूप घेतात. कागदावर अवतरलेल्या कविता फुलत जाते आणि आपला एक नाजुकसा गंध दुसर्यापर्यंत पोहचवते. या सुगंधात वाचकही देहभान विसरून तल्लीन होतो. तेव्हा मनात आलेली प्रत्येक ओळ अन ओळ कागदावर लिहायलाच हवी. कारण कागदावर लिहीलेली ती ओळ टिकते तिचा विसर पडत नाही. बरेचदा सगळ्यांच्याच कविता कागदावर येतात असेही नाही. अनेकांच्या कविता मनातच साठवून राहतात आणि काही कालावधीनंतर मनातच विरघळून त्या माणसाबरोबर लुप्त होतात. कायमच्या. एखादा कवी शेकडो, हजारो कविता लिहीतो पण त्याला प्रत्येक कवीता पाठ असते असे नाही. कविता म्हणजे तत्कालीन परिस्थितीतून मार्गक्रमण करतांना मनात उठलेले विचारांचे वादळ होय. हे विचार आणि प्रसंग दरवेळेस वेगळे असू शकतात. काही कालावधीनंतर आपलेच विचार आपल्या आठवत नाहीत. जसे की परवा आपण कोणती भाजी खाल्ली हे आठवणे अवघड तसे. म्हणून कविता लिहून काढणे हे उत्तम.
प्रत्येक कवीची एक वेगळी शैली असते. एकाच विषयावर लिहलेल्या प्रत्येक कवीची कविता ही वेगळीच असते. तिला ज्या त्या कवीच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांची आणि त्याच्या बुद्धीमत्तेची किनार असते. त्यामुळेच एकाच विषयावरच्या कविता वाचतांना कंटाळवाने वाटत नाही. उदाहरणार्थ पाऊस आणि प्रेम यावर तर अनंत कविता असतील पण तुम्ही कुठलीही कविता वाचा त्यात काहीतरी वेगळं असतं. म्हणून कविता वाचतांना ती मन केंद्रीत करून वाचायला पाहिजे. त्या प्रत्येक कवितांचा फरक आपोआपच जाणवेल.
आपल्यातला कवीला चांगले घडवायचे असेल, आपल्या कवितांचा दर्जा उंचवायचा असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काव्य वाचन. कुठल्याही विषयावरची, भाषेतली किंवा प्रकारातल्या कविता वाचायलाच हव्यात. कविता वाचन ही एक कला आहे. जास्तीत जास्त कवितांचे वाचन करून त्याचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. तसेच जेंव्हा आपल्याला वाटते की आपल्याही कविता लोकांनी वाचाव्यात, आपल्याला शाब्बासकी द्यावी वगैरे. हे तेंव्हाच शक्य होईल जर आपण इतरांच्या कविता वाचून त्या कविला अभिप्राय कळवू. अर्थातच मी हे नवोदित कवीं बद्दल बोलतो आहे. ज्या कवींनी आधिच यशाची शिखरे पदक्रांत केली आहेत त्यांना आता कशाचीच गरच नाही. ते तर नवोदितांसाठी प्रेषितांचे काम करत आहेत.
नवोदित कवींना जास्त सुख कशात वाटत असेल तर ते म्हणजे त्यांनी रचलेल्या कविता लोकांपर्यंत पोहचाव्यात, त्या त्यांनी वाचाव्यात, त्याचा प्रतिसाद वाचकांकडून मिळावा. बस्स! एवढंच. हे मिळाल्यावर त्याला कशाचा कशाचाच मोह नाही. हे सुख अनंत आहे. म्हणून प्रत्येकाची कविता वाचा आणि कवींना आणि जमले तर त्याचा अभिप्राय त्याना नक्की कळवा.
~ एक नवोदित कवी ;)