बुधवार, १२ जुलै, २०१७

कथासंग्रह : आभाळ (शंकर पाटील)


कथासंग्रह : आभाळ
लेखक : शंकर पाटील
प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
किंमत : १०० रू

शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे. त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे. ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण तसेच त्यांचे चटपटीत संवाद आपल्याला त्यांच्या कथांतून अनूभवायला मिळतात. नैसर्गिकपणे आलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. खेड्यातील माणसं, त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय.

कथा, कादंबरी, वगनाट्य, स्फुटलेखन, चित्रपट कथा सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांचे योगदान मोठे आहे. ऊन, खुशखरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, टारफुला, धिंड, पाऊलवाटा यासारखे अनेक कथासंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. 

समाज हा नेहमीच परिवर्तनशील राहीला आहे. समाजातील घटकांचा त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गाचा, मानसांचा आणि आपल्या वयाचा परिणाम झालेला आपल्याला नेहमी दिसतो. नैसर्गिक कारणांमुळे ग्रामीण भागात होणारे परिवर्तन आपल्यातील अनेकांनी अनुभवले आहे. अशाच ग्रामीण जीवनावर भाष्य करणारा "आभाळ" हा कथासंग्रह आहे. यात लेखकाने ग्रामीण जीवनातील विविध विषय टिपलेले आहेत. या कथासंग्रहात एकून १३ कथा आहेत. या कथांच्या माध्यमातून लेखक समकालीन परिस्थितीचे चित्र हुबेहुब आपल्या डोळ्यासमोर साकारण्यात यशस्वी होतात.

म्हातारपणात आपल्या आगोदर सोडून गेलेली बायको, स्वतःच्या संसारात व्यस्त झालेला मुलगा आणि रामजी काकांना आलेले मानसिक एकटेपण, मुलाचे बापाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे रागावून रानातल्या खोपीत आलेले रामजी काका. भर पावसात खोपीच्या तोंडाशी अंधारात बसून आपल्या भूतकाळातील आठवणीत हरवून गेलेले आणि खोपीबाहेर डोळे किलकिले करून अनंतात पहात बसलेले असतात. भाकरीचं गटळं घेऊन आलेला चंद्रप्पा आणि रामजी काका यांच्यातील संवाद मनाची घालमेल करतात. आपल्या हृदयाला स्पर्श करणारी "निचरा" ही पहिली कथा आहे. या कथेतून आईबापानी बालपणात आणि आपल्या सुखासाठी, आपल्याला वाढवण्यात घेतलेले कष्ट मुलं लग्न झाल्यावर कसे विसरतात; या सामाजिक समस्येवर या कथेतून भाष्य केले आहे.

कधीकाळी आपल्या पळवून नेलेल्या बायकोला परत घेऊन जाण्यासाठी गाढवावर बसून व एका प्रतिष्ठित पाटलाकडे फिर्याद घेऊन आलेला बेलदार. हातावर असलेले पोट. आपण चार आणे कमवले तर बायको किमान तीन आणे तरी कमवील हा त्याच्या जगण्याचा हिशोब आपल्याला "हिशोब" या कथेतून पाहण्यास मिळतो. 

रादूबाई ही आपली बायको याच गावात असून तिला आपल्याला परत करावी याची विनंती तो पाटलाला करतो. पाटील तपास घेतात तेंव्हा त्यांना समजते की बेलदाराची बायको गावातील राऊ जांबळ्याकडे आहे. त्याला चावडीत बोलावण्यात येते. नागू पैलवानानं पळवलेली बेलदाराची बायको आपण दोनशे रूपयात घेतली. जर बेलदाराला ती परत पाहीजे असेल तर त्याने ती दोनशे रूपये देऊन घेऊन जावी. बेलदाराची गरीब परिस्थिती कळल्यावर राऊ जांबळ्यात शंभर रूपयावर ती देण्यास तयार होतो. पण रादूबाईला दोन मुलं आहेत हे कळल्यावर बेलदाराच्या जगण्याचा हिशोबच चुकतो. ही मुलं जर बायकोबरोबर आली तर ती आपल्याला परवडणारी नाहीत. म्हणून तो बायको न घेताच परत जातो.

म्हातारपणीही बाई माणसाचं संसारात किती मन गुंतलेले असते याचे सुरेख वर्णन आपल्याला "कावळा" आणि "वावटळ" या दोन कथांमधून अनुभवायला मिळते. म्हातारपणी उसणवारी, व्याजावर दिलेले पैसे तसेच राहतात. मेल्यावर मात्र त्या पैशांसाठी आत्मा घटमळत असतो.

म्हातारपणी वावराशिवारातही बाई माणसांचा जीव अडकलेला असतो. भर पावसात, वा-या वादळात आंब्याच्या कै-या गोळा करण्यासाठी आर्ध्या रस्त्यातून परत फिरणारी व त्या पडलेल्या कै-या कुणी चोरून नेवू नये म्हणून रात्री भर पावसात त्याला राखन बसणारी म्हतारी. या दोन्ही कथा फारच सुंदर असून ग्रामीण स्त्री मनाचा त्या वेध घेतात.


"सोबत" कथेत तालुक्याच्या ठिकाणीहून गावाकडे निघालेला गोपाळ. एका तरूण व देखण्या आणि आड वाटेने एकट्याच निघालेल्या बाईवर भुलतो. या नादात स्वतःची वाट सोडून त्या बाईबरोबर निघतो. इचलकरंजीहून बदलून आलेली शिक्षिका उद्या शनिवारची सकाळच्या शाळेत वेळेवर पोहण्यासाठी आधल्या दिवशीच त्या गावी निघालेली असते. पण गाडीच्या बिघाडीमुळे तिला उशीर झालेला असतो. गोपाळ त्या तरूण बाईला तिच्या ठिकाणापर्यंत सोबत करतो. पण शेवटी त्याला निराशाच मिळते.

ग्रामीण जीवनात आपल्याला पदोपदी उपेक्षित जीवन कंठत असलेले म्हातारे आईबाप नेहमीच दिसतात. भीमा व शिवा या दोन भावांच्या वाटणीत भलडलेले गेलेले म्हतारे आईबाप आणि त्यांचे शेवटी होणारे हाल हे "वाटणी" या कथेतून लेखक मांडतात.

"आभाळ" ही शिर्षक कथा शेतक-यावर निसर्गामुळे येणा-या मानसिक दडपणाचे वर्णन करते. कधी पाऊस वेळेवर येत नाही, आला तर पिक जेंव्हा काढणीला आलेले असते नेमका त्याचवेळी पाऊस येतो. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला जातो आणि या परिस्थितीत जेंव्हा शेतकरी सापडतो तेव्हा तो फार मानसिक दडपणाखाली असतो. अशाच एका प्रसंगाचे वर्णन आपल्याला या कथेतून प्रतिबिंबित झालेले दिसते.

आकाश ढगांनी भरून येते, शेतात कापून वाळत घातलेल्या तंबाखूच्या चापाचे काय होणार याची चिंता हरीबाला सतावत असते. तर पाऊस आला तर सगळ्यांचेच नुकसान होईल या विचारात त्याची बायको बिनघोर झोपलेली असते. आपले कष्ट काया जातात की काय याची चिंता मात्र हरीबाला असते. तो मनाचे समाधान होण्यासाठी गावभर फेरी मारतो व पावसाचा अंदाज घेतो.

"कोंडी", "अर्धली", "जीत" आणि "वंगण" या कथादेखील ग्रामीण जीवनाचे व ग्रामीण कौटुंबिक समस्यांचे यथार्थ वर्णन करतात. तर शेवटच्या दोन कथा "पानगळ" आणि "वाटचाल" या कौटुंबिक वातावरणात उद्भवणा-या समस्यांमुळे माणसाच्या मनावर होणार आघात आणि त्यामुळे होणारे मानसिक विकार अत्यंत चपखलपणे मांडतात.

_ गणेश भाऊसाहेब पोटफोडे