समाज
माध्यमांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समविचारी लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी क्षणार्धात
होणारा संपर्क. आज फेसाबुकवर संपादक मा. मोतीराम पौळ यांच्याशी जोडले गेलो आणि त्यांनी
लगेच अगत्याने 'अक्षरदान' २०२० चा दिवाळी अंक पाठवला. परदेशात असल्याने छापील अंक मिळण्याला
अनेक बंधने आहेत; हि अडचण ओळखून मोतीराम पौळ यांनी दिवाळी अंकाची पीडीएफ फाईल प्रेमपूर्वक
पाठवून मला वाचनाच्या फराळाचा जणू डब्बाच भेट दिला आहे. खरं तर इ. स. २०२० हे खूप कठीण
आणि मानवतेला वेठीस धरणारे साल होते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाचे
अर्थचक्र थांबले होते. अनेकांना आपले जीव गमावले लागले. जे वाचले त्यातील कित्येकांचे
रोजगार गेले. जगातल्या प्रत्येक माणसाला या काळात कुठल्या ना कुठल्या आर्थिक संकटाला
सामोरे जावे लागले. या काळात अनेक नामांकित दिवाळी अंक बाजारात येऊ शकले नाहीत. तरीही
या कठीण परिस्थितीशी दोन हात करत संपादक मोतीराम पौळ यांनी 'अक्षरदान' अंकाचे शिवधनुष्य
पेलून तो वाचकांसमोर ठेवून खूप मोठे योगदान दिले आहे. 'साहित्य निर्मिती प्रक्रिया'
हा अत्यंत महत्वाचा विषय घेऊन त्यांनी यावर्षीच्या अंकाची निर्मिती केली आहे. एखाद्या
साहित्याची निर्मिती प्रक्रिया खुद्द लेखकाकडून जाणून घेणे किंवा लेखनामागची त्यांची
पार्श्वभूमी समजावून घेणे, लेखन करताना कुठल्या दिव्यांचा सामना करावा लागला या सगळ्या
गोष्टींचा हा लेखाजोखा खरोखरच नोवोदित लेखकांना तसेच संशोधकांसाठी मोलाचे दस्तऐवज ठरतो.
यंदाचा 'अक्षरदान' दिवाळी अंक हा या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून भविष्यात तो संदर्भ
म्हणून वापरला जाईल यात शंका वाटत नाही.
■ सुरुवातीलाच
जेष्ठ पत्रकार तथा लेखक महावीर जोंधळे यांची दीर्घ मुलाखत फार वाचनीय आहे. जोंधळे सर
हे मराठी साहित्यातील ललित, कथा, कादंबरी, वैचारिक तसेच बालसाहित्य आशा सर्व प्रकारात
विपुल लेखन करणारे साहित्यिक म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत. गांधीवादी विचारांचं
आयुष्यभर पालन करत असलेल्या जोंधळे सरानी आपण गांधींच्या विचाराकडे कसे आकर्षित झालो?
यावर सविस्तर भाष्य या मुलाखतीत वाचायला मिळते. त्याचबरोबर गांधीवादी विचारांचा प्रभाव
एकूणच त्यांच्या लेखनावर, आयुष्यावर कसा पडला? या प्रश्नांची वाचकांना उकल होत जाते.
अत्यंत सध्या आणि प्रवाही भाषेत ही मुलाखत आहे.
लेखनाला
कशी प्रेरणा मिळते? या प्रश्नवर सरानी खूप सुंदर उत्तर दिलेले आहे. ते म्हणतात – “(लेखन) प्रक्रिया हि काही एका थांब्यावर थांबण्याची
गोष्ट नाही. ती बदलत जाते. रस्ता मिळेल तशी बदलते. विषय मिळेल तसे त्यात बदल होतात.
विषयाचे गांभीर्य कळेल तसे त्याला आकार येतो. ही प्रक्रिया सतत चालणारी प्रक्रिया आहे.
त्यासाठी तुमच्याकडे चिंतन, वाचन आणि मनन या तीन सूत्रांची गरज असते.”
करोना
लॉकडाऊनमुळे जवळपास सात महिने जोंधळे सरांनी घरातच काढले. या सगळ्या काळाचा त्यांनी
वाचनासाठी आणि लेखनासाठी सदुपयोग करून घेतल्याचे दिसते. अनेक वर्षांपासून त्यांच्या
मनात घोळत असलेली महात्मा गांधी विषयीची दीर्घ कविता त्यांनी या काळात पूर्ण केली.
'जमीन अजून बरड आहे' ही ११० पानांची दीर्घ कविता लिहून तिला गांधी जयंतीला पुस्तक स्वरूपात
आणले. त्याचबरोबर सरानी 'ललित गद्याची चिकित्सक समीक्षा' हा ग्रंथ देखील याच कालखंडात
लिहून पूर्ण केला. या मुलाखतीत त्यांच्या बालपणीच्या आठवणी, शिक्षणासाठी घ्यावे लागलेले
कष्ट, परदेश प्रवास, ग्रामीण जीवनाच्या साहित्यावर पडलेला प्रभाव, विद्यार्थ्यांसाठी
राबवलेले उपक्रम, मनात दडलेला चित्रकार, विविध आंदोलने व चळवळीतील सहभाग, तरुणाविषयीचा
सकारात्मता आणि समाज माध्यमाविषयीचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.
■ स्वामी
रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख तथा जेष्ठ कवी डॉ. केशव सखाराम
देशमुख यांचा 'लिहिणं: माझी ताकद आणि गरजही' या लेखात त्यांनी आपल्या कविता निर्मिती
प्रक्रियेबद्दल सविस्तर भाष्य केलेले आहे. 'पाढा', 'चालणारे अनवाणी पाय', 'अथक', 'गाभा'
आणि 'तंतोतंत' असे त्यांचे एकूण पाच काव्यसंग्रह आजगायत प्रकाशित झालेले आहेत. गाव, शेत-शिवारात वाढलेल्या देशमुख सरांच्या कवितेत
या गोष्टींचा कसा प्रभाव पडला तसेच आयुष्याकडे बघण्याच्या त्यांच्या अतिसूक्ष्म संवेदना
या लेखातून वाचायला मिळतात. शेती करत असतांना तिच्यावर अनेक घटक अवलंबून असतात. या
घटकांचा अंतर्भाव सरांनी कवितेत कसा केला आहे याची अनेक उदाहरणे या लेखात दिलेली आहेत.
बैल, गाय या शेतीतल्या प्राण्यांशिवाय चिमण्या, विविध पक्षी, साप, मुंग्या, कीडे, विविध
कीटक या सूक्ष्म जीवांचाही प्रभाव त्यांच्या कवितेत पडल्याचे ते सांगतात. बैलाबद्दल
कृतज्ञता म्हणून त्यांनी अनेक कविता लिहिल्याचे दिसते. उदारणार्थ -
पायांपेक्षा
प्रिय मला बैलांचे खूर
बैलांच्या
डोळ्यातील प्रार्थनांचे मुक्काम
मी
लिहून ठेवतो काळजावर...
(चालणारे अनवाणी पाय: ७०)
■ महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांचा 'माझी जडणघडण आणि लेखन' हा लेख खूप महत्त्वाचा वाटतो. आपण शिकून मोठं झाल्यावर पोलिस व्हावं हे स्वप्न बाळगणारा एक शाळकरी मुलगा प्र. के. अत्रे यांचे 'मी कसा झालो?' हे आत्मचरित्र वाचून आपल्यालाही असंच लिहिता आलं पाहिजे, असे ठरवून लेखनाकडे वळतो. लेखक होणार एवढं ठरवून तो मुलगा थांबत नाहीत तर त्यासाठी पाठपुरावा करतो. ऐंशी पानाची कोरी वही आणून भांड सरांनी यातून आपला लेखन प्रवास सुरू केला. आयुष्यात येणारे एक एक प्रसंग ते या डायरीत लिहू लागले. शालेय जीवनात शिक्षकांनी केलेल्या वाचन संस्कारमुळे त्यांच्यातील साहित्यिक जन्माला आल्याचे ते ठकळपणे नमुद करतात. स्काऊटमध्ये मिळालेल्या पदकामुळे त्यांना तरुण वयातच दहा देशात जाण्याची संधी मिळाली. या प्रवासात आलेले अनुभव त्यानी 'लागेबांधे' या प्रवासवर्णनातून लिहून काढले. परंतु हे पुस्तक छापण्यासाठी आलेल्या अडचणी आणि यातूनच पुढे एक तरुण लेखक ते प्रकाशक होण्याचा प्रवास वाचायला मिळतो. भांड सरांनी 'धारा' आणि 'साकेत' प्रकाशन संस्थांची स्थापना, त्यासाठी कुटुंबाकडून मिळालेली साथ आणि या संस्थाची भरभराट यावर देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यावर बाबा भांड सरांनी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले. यात अनेक ग्रंथांचे मराठी भाषांतर, मराठी-उर्दू कोश आणि विविध विषयातील अनेक ग्रंथ व त्याचे खंड त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रकाशित केले.
■९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष आणि जेष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांचा 'माझ्या ग्लोकल लेखनाची
कहाणी!' या लेखातून ते त्यांची विचारधारा स्पष्टपणे अधोरेखित करताना दिसतात.
'मी
प्रेमचंद परंपरेचा म्हणजेच प्रगतशील लेखक चळवळीच्या पुरोगामी परंपरेचा पाईक आहे.'
'स्वस्तुती
टाळून मी असं म्हणू शकतो की, मी एक ग्लोकल लेखक आहे. आणि माझं लेखन आणि माझं प्रशासन
या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.'
बालपणी वडिलांच्या बदल्यामुळे तसेच
पुढे प्रशासन सेवेतील अनुभव हे त्यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेचा पाया असल्याचे
ते मान्य करताना दिसतात. एका संमेलनाध्यक्षांची साहित्य निर्मिती प्रक्रिया समजावून
घेण्यासाठी हा लेख वाचणे खूप महत्वाचे वाटते.
भालेराव सर म्हणतात कि
'या
कवितेनं कायम विरोधी पक्षाचं काम केलंय आणि या कवितेचा कर्ता म्हणून मला लोकांनी कायम
विरोधी पक्षाचा कवी समजलंय.'
'या
कवितेची आणखी एक गंमत म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांना ती नेहमी आवडते. आणि ते सत्तेत
आले की, त्यांना ती नको वाटते.'
‘लेखकाला
त्याची स्वतःची भाषा सापडावी लागते. ही भाषा त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचा भाग असते.
त्याच्या जगण्यामधून, वाचनामधून, भवतालच्या निरीक्षणांमधून, निसर्ग आणि समाजवाचनामधून
ही भाषा त्याला सापडू शकते. त्याला सापडलेली ही स्वतंत्र भाषा हीच लेखकाची खरी ओळख
असू शकते.’
दिवाळी अंक : अक्षरदान (साहित्य निर्मिती प्रक्रिया)
संपादक : मोतीराम पौळ
मुखपृष्ठ : शिवार्थ दिलीप दारव्हेकर
किंमत : १५० रु
~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे
दुबई, संयुक्त अरब अमिरात
२६ जानेवारी २०२१