बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

कुणबी नोंद कशी शोधावी?

सर्वांनी कुणबी नोंदी शोधणे सुरु करा. शोधा म्हणजे सापडेल. कुणबी नोंदी कुठे मिळतील याबाबत काही माहिती.

१. सर्वात आधी आपल्या शेताचे आज जे गट नंबर आहेत त्यांना आधी सर्वे नंबर होते ते शोधा. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून ९(३)९(४) मिळवा.  मिळालेल्या सर्वे नंबर ची हक्क नोंदणी ( याला मराठवाड्यात खासरा म्हणतात)  रेकॉर्ड रूम , तहसील कार्यालय येथुन मिळावा. यावर कुठे कुणबी नोंद आहे का पहा. ही पाने सविस्तर वाचा. अधिक माहिती xyz पानावर असेही तिथे नोंद असते.
२. भूमी अभिलेख कार्यालयातून नमुना ३३ व ३४ मागवा.  यातही अनेक कुणबी नोंदी मिळत आहेत.
३. जन्म मृत्यू नोंदी कोटवार बुकात(गाव नमुना नंबर 14) असतात त्या पाहाव्यात.(रेकॉर्ड रूम,तहसील)
४. पीक पेरे जुने यात अनेक नोंदी कुणबी मिळत आहेत. (रेकॉर्ड रूम,तहसील)
५. पोलीस स्टेशन मधील नोंदी जर एखाद्या प्रसंगात कोणी जेल मध्ये गेला असेल वा गुन्हा नोंद असेल.
६. शिक्षण विभागात जुन्या मराठी शाळेत पूर्वजांचे दस्त तपासा त्याचे नक्कल मिळावा.

शासन शोधत आहेच पण आपल्या पूर्वजांच्या लिंक्स आपल्याला जास्त माहिती आहेत.

मुख्यतः शेती , जन्म मृत्यू , भूमी अभेलेख, शिक्षण/शाळा येथे या कुणबी नोंदी मिळत आहेत. कृपया सर्वानि शोधा . 

१ कुणबी नोंद २० ते ३० लोकांना आरामात certificate देऊन जाईल.

सर्वांचे पूर्वज पाहिले शेतीच करत होते. त्यामुळे १००% नोंदी कुणबी मिळणार आहेत. मनापासून शोधा.

सुरुवात शेती पासून करा.
आज जे गट नंबर आहेत त्याला आधी सर्वे नंबर होते ते मिळवा. त्याआधारे पीक पेरा व हक्क नोंदणी पाहिल्यान्दा शोधा. बरकाईने वाचा. 

ज्यांनी शेती विकली आहे. त्यांनी सुद्धा त्या शेतीचे जुने दस्त वरीलप्रमाणे शोधायचे आहे. आपले पूर्वज कुणबी होते फक्त एवढं सिद्द करायचे आहे. ती शेती आज रोजी आपल्याकडे नसेल किंवा आपण भूमिहीन झाला असल तरीही. 

*यासाठी सर्वांनी पाहिलं पाऊल - भूमी अभेलेख कार्यालयातून आपल्या गटाचा ९(३)९(४) काढा. त्यावर सर्वे नंबर आहे. नंतर या सर्वे नंबर चे सर्व दस्त आपण तपासायचे आहेत. जसे की खासरा(हक्क नांदणी) , पिक पेरा.
*प्लस नमुना ३३ व ३४ भूमी अभिलेख मधून.  येथे शक्यता जास्त आहे.*

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

 कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?

रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.

स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा, त्या नोंदी मिळवा.

आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

भूमि अभिलेख कार्यालयातील फॉर्म न. 33 व 34 वरील नोंदी तपासाव्यात, यातही सर्वत्र कुणबी नोंदी आढळून येतात .

रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

सभार : मराठा क्रांती मोर्चा, फेसबुक पेज