शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

दैनदिनी : देवा म्हातारीला बरं वाटू दे!

आता ह्या मालाबाई, मालाताई ऊर्फ मालाबया कोण? ह्या आमच्या थोर चुलत आजी. माझ्या आजीची तीन नंबरची जाऊबाई. म्हणजे या मालाताई माझ्या बालपणीच्या दुश्मन वगैरे नंबर वन. तर त्यांना गायीने मारले आणि त्या डोक्यावर पडल्या. मग दहा पंधरा दिवस काहीच झाले नाही. काल परवा वगैरे त्या बेशुद्ध पडल्या. मग त्यांना नगरला कुठल्यातरी हाॅस्पिटलमध्ये नेले. लोक म्हणतात त्या वाचण्याची गॅरंटी नाही. आधीच आता म्हातारपण आणि त्यात मुलगा चिकट भोकर. कुणी तब्यतीच्या चौकशीसाठी फोन वगैरे केला तर त्याचं एकच वाक्य, आत्तापर्यंत दोन लाख वगैरे लागले. म्हणजे याला आईच्या तब्यती पेक्षा अजून ही म्हातारी कितीला टाकतेय याची चिंता. म्हणजे कुणाचे काय? अन याचे काय? दोन लाख देऊन एकदम फरक पडतोच का? असा काय नियम आहे का?

या म्हातारा म्हातारीचा याने शासनाकडून पैसा मिळवण्यासाठी वगैरे खूप उपयोग केला. उदाहरणार्थ कुणाच्यातरी पडक्या घरापाशी उभे करून या दोघांचा फोटो काढला आणि इंदिरा आवास योजना की काय त्याच्यासाठी अर्ज भानगडी केल्या. घरी भरपूर जमीन तरी पण निराधार की भूमिहीन दाखवून ह्याने त्यांचे डोल चालू केले. असो. आपल्या काय बापाचे जातयं पण म्हातारपणात कप भर चहा प्यायची ह्या म्हातारा म्हातारीची सत्ता राहिली नाही. सून जे उष्टे-पाष्टे, शिळे-पाके इत्यादी खाऊ घालते त्यावरच यांची पोटं.

आपलं कधी या म्हातारीशी जमलं नाही. आपूण शाळेत असतांना हिच्याशी खूप भांडायचो वगैरे. म्हणजे ही बाई फार भामटी. एकमेकांच्यात भांडणे लीलया लावून देण्यात हिची कला. म्हणजे हिने अनेकांच्यात भांडणे लावून दिली. आमच्या घराची आणि हिच्या घरची भिंत एकच. हिचा रोख जेंव्हा आमच्या घराकडे असायचा तेंव्हा मी बुरूज होऊन उभा वगैरे रहायचो. मग आमची लढाई ठरलेलीच. तिला कधी आमच्या घरात ढवळा ढवळ करू दिली नाही. असो.

आपल्याला जूनी माणसं फार आवडतात. कारण की, ही माणसं आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि इलाख्याचा चालता बोलता जीवंत इतिहास असतात. आज मला मालाताईची फारच कीव आली. म्हणजे उष्टे, शिळेपाके खाण्याची वेळ आपल्या दुश्मनावरही येऊ नये. आपण तिच्या तब्यतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. नातू म्हणाला की म्हातारी कोमात आहे.

आपली जरी दुश्मन असली तरी पण तिला चांगले बरे वाटावे हीच माझी इच्छा. परत एकदा या म्हातारीशी भांडाण्याची माझी दिली ख्वाईश आहे. म्हणून देवा म्हातारीला बरं वाटू दे!

~ गणेश
(१४.१०.२०१६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा