पहाटेचा साडे चारचा अलार्म वाजला. काल मनाशी फारच निश्चय करून वगैरे झोपलो होतो. असा निश्चय गेल्या वर्षभर करतोय. पण साडे चारचा अलार्म वाजून वाजून कंटाळतो अन बंद होतो. परंतू आजचा माझा निश्चय फारच थोर वगैरे. आज उठलोच. हो चक्क. पायात जोडे चढवले आणि घराबाहेर पडलो. पहाटे रस्त्यावरून जातांना एसी चा आवाज येत होता. आता दुबईत हे अजून एक विशेष. हर खोली गणीक एक एसी. त्या सर्व एसी चा आवाज एकमेकांत मिसळून कसलातरी मोठ्या वादळा सारखा भासत होता. थोडेसे पुढे आल्यावर कचरा कुंडीवर दोन मांजरे पेंगळून पडली होती. गल्ली ओलांडून थोडसं पुढे गेल्यावर मेन रस्ता. तिथे मात्र गडबड वाटली. सकाळी बांधकामाच्या कामावर जाणारे कामगार हातात हेलमेट व पिशवीत काहीतरी वगैरे घेऊन निघाली होती. त्यात पाकिस्तानी लोक जास्त. एवढ्या पहाटेही एखाददुसरी गाडी सिग्नलवर थांबत होती. हे फारच थोर. म्हणजे आपल्या पुण्या मुंबईत एकतर असल्या भल्या पहाटे कोन सिग्नलवर थांबतो वगैरे. मग मी खरोखरच पार्कला पळत दोन फेऱ्या मारल्या. हवा फारच छान होती. घरी आल्यावर फारच फ्रेश वाटले.
मग सहा वाजता आक्कासाहेब उठल्या. तसे त्यांना रोज बळजबरीने उठवावे लागते. मग अंघोळ करेपर्यंत इकडून चहा नाष्टा बनवून तयार होता. इकडची स्वारी म्हणजे देवाने दिलेली मोठी देणगी. असो. आज टिफीनला बिस्कीटं होती त्यामुळे आक्कासाहेब फार खुश. आवरून आम्ही दोघेही निघालोत. आक्कासाहेबांनी इकडे निघतांना हात जोडून नमस्कार केला. खाली गेल्यावर आक्कासाहेबांची बेबी फिंगर बस आली ( आपल्या इंग्रजीत मीनी स्कूल बस ). मला बाय बाय वगैरे बोबड्या बोलात करून त्या खाडीत बसल्या. मग मी मेट्रो अन मेट्रोतून ऑफीसात आलो.
आज दिवसभर कामाचा ताप. ऑफीसामधल्या त्या भंकस मिटींगा म्हणजे नुसता वैताग. म्हणजे काय तर एक डिपार्टमेन्ट दुसर्या डिपार्टमेन्टवर चिखलफेक वगैरे. मग ते फिल्टर कसे बसवायचे. त्यात छिद्र पाडून तो प्रोब की काय कसा घालायचा. यावर थोर इंजिनियरची संभाषणे. आपण नूसतच मान डोलवत त्यांचे चेहरे पहात बसलो. त्यांच्यात मी माझ्या कथेसाठी कोणी नायक मिळतो काय? आणि मिळाला तर त्याचे संवाद हे असेच लिहायचे वगैरे या विचारात मी मिटींग घालवली. वाळवंटात झरा सापडवा तशी ही ऑर्डर मिळाली. तहानलेली सगळीच यावर तुटून पडली. आपण सूम मध्ये. कारण हे काम म्हणजे किस झाड की पत्ती वगैरे.
साडे पाच वाजले. आपण वेळेला फार प्रामाणिक. एक मिनिट उशीर झाल्याला चालत नाही. मग मेट्रोने घरी. घरी आल्यावर परत जाॅगींग. सकाळी भेटलेल्या मांजरी ताज्या तवाण्या होऊन कचारा कुंडीवर मस्तपैकी बसून येणार्या जाणार्या लोकांकडे पहात होत्या. मी मग पार्कला फेर्या वगैरे मारल्या. घरी आल्यावर आक्कासाहेब त्यांच्या इंग्रजी कम मराठी असल्या कसल्यातरी भाषेत आज शाळेत घडलेले प्रसंग सांगत होत्या.
~ गणेश
(१२.१०.२०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा