युएईत येऊन मला आता जवळपास सहा वर्ष झाली. पहिल्यांदा आल्यावर मला येथील हवामाना व्यतिरिक्त भारतापेक्षा काही वेगळेपण जाणवले नाही. याचे महत्वाचे कारण दुबईत मोठ्या प्रमाणात असणारी मराठी माणसांची संख्या असू शकेल. दुबईला प्रती मुंबई म्हटले जाते ते बहुतेक यामुळेच. मराठी माणूस म्हणला तर आपली संस्कृती, साहित्य आणि कला जोपासणारा समुह. त्यामुळे दुबई कलागुण जोपासणाऱ्या अनेक संघटना होत्या. येथे आल्यावर मराठी माणसांनी सुरू केलेल्या विविध क्षेत्रातील संघटनांशी माझा परिचय होत गेला.
साधारणपणे दिडएक वर्षापूर्वी उमानंद बागडे नावाच्या एका सदगृहस्थशी माझी ओळख फेसबूकच्या माध्यमातून झाली. मैत्री होण्याचे कारण म्हणजे मी एकदा फेसबुकवरील कुठल्यातरी समुहावर "दुबईत कुणाकडे मराठी पुस्तकं वाचण्यासाठी मिळतील का?" असा संदेश पोस्ट केला होता. मला शालेय जीवनापासून वाचन, लेखन करण्याची आवड होती. मी भारतात सुट्टीवर गेल्यावर पुस्तकं खरेदी करून परत येतांना ती दुबईत घेऊन यायचो. प्रत्येक सुट्टीत मी वाचलेली पुस्तकं परत भारतात नेत असे व येतांना नवी पुस्तकं अनत असे. हा क्रम सुरूवातीला बरीच वर्ष चालू होता. यामुळे व्हायचे काय की, विमान प्रवासातील सामानाच्या बंधनामुळे मला जास्त पुस्तकं आणता येत नसत. आणि आणलेली पुस्तकं दोन तीन महीन्यातच वाचून संपायची. मग परत तिच तिच पुस्तकं कितीदा वाचायची? नंतर मी ऑनलाईन किंवा डिजिटल पुस्तकंही वाचायला लागलो. सतत मोबाईल व लॅपटॉपच्या स्क्रीनच्या प्रकाशाने डोळ्याला त्रास जाणवू लागला. त्यामुळे पारंपरिक छापील पुस्तकं वाचण्यासाठी योग्य वाटल्याने मला दुबईत एखाद्या मराठी लायब्ररीची गरज भासू लागली. अशातच बागडे यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी चळवळीशी माझा जवळचा संबंध आला.
ग्रंथ तुमच्या दारी ही संकल्पना भारतात प्रथमतः राबवली ती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे श्री विनायक रानडे यांनी. आजकालच्या धावत्या युगात वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच वाचकांना आवड असूनदेखील ग्रंथालयात जाण्यास जमत नाही. वाचकांची ही गरज ओळखून विनायक रानडे यांनी ग्रंथच आपल्या दाराशी आणून ठेवले. भारताबाहेर प्रथम ही संकल्पना दुबईतून सूरू झाली. प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे यांनी विनायक रानडे यांच्या मदतीने २०१४ ला या योजनेचा दुबईत शुभारंभ केला. प्रत्येकी २५ पुस्तकांच्या पेट्या वेगवेगळ्या विभागातल्या समन्वयकांना देण्यात आल्या. त्यामुळे दर्जेदार मराठी पुस्तकं वाचकांना मोफत उपलब्ध होऊ लागली. दर तीन महिन्यांनी समन्वयक आपापसात ग्रंथ पेटी बदलत असल्यामुळे वाचकांना सतत नवनवीन पुस्तकं वाचायला मिळू लागली. भारताबाहेर प्रथमच अशी मराठी वाचन चळवळ उभी राहिली याचा आम्हा सर्व वाचकांना अभिमान वाटतो. कालांतराने पेट्यांची संख्या वाढत जावून वाचकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील पुस्तकं दुबईत येऊ लागली.
डाॅक्टर संदिप कडवे यांच्याशी माझी ओळख देखील उमानंद बागडे यांच्यामुळेच झाली. ते आखाती देशातील मराठी वाचकांसाठी विश्व पांथस्थ नावाचे नवीन मासिक सुरू करणार असल्याचे मला उमानंद बागडे यांनी सांगितले होते आणि डाॅक्टर कडवे दुबईतील स्थायिक मराठी, कवी यांचा शोध घेत होते. तत्पूर्वी मी बरेचदा फेसबुकवर वेगवेगळे लेख लिहीत होतोच. माझे लेख आवडल्याने उमानंद बागडे यांनी डॉक्टर कडवे यांना माझे नाव सुचवले. विश्व पांथस्थच्या लिखाणासाठी मी डॉक्टर कडवे यांना अनेकदा भेटलो. त्याच्याकडून मला ग्रंथ तुमच्या दारी ची अजून माहिती होत गेली. वेगवेगळ्या ग्रंथच्या समन्वयकांचाही परिचय होत गेला.
ग्रंथ तुमच्या दारीचे सर्व समन्वयक आणि वाचक हे एक भले मोठे कुटुंब बनले. या सर्वांचा व्हाट्सअप ग्रुप बनवला गेला. विविध वाचक व समन्वयक यांच्यात साहित्याशी संबंधित वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. मला चर्चा करण्यासाठी एक हक्काचे आणि आवडीचे व्यासपीठ उपलब्ध झाले. तुमच्या पेटीत अमूक अमूक पुस्तकं आहे का? किंवा दुबईतील सर्व ग्रंथ पेट्यात अमूक एखादे पुस्तक आहे का? असले प्रश्न वाचक विचारू लागले. त्यांनी व्हाट्सअप वर विचारलेल्या प्रश्नची तात्काळ उत्तर मिळू लागली. विनायकजी भारतातून संदेश पाठवत की हवे असणारे अमूक एक पुस्तक पेटी क्रमांक अमूक अमूक मध्ये उपलब्ध आहे. वाचकांच्या शंकांचे निरसन तर व्हायचेच शिवाय त्यांना हवे असलेले विशिष्ट पुस्तक मिळायचे. आपले आवडते पुस्तक दुबईत वाचण्यास उपलब्ध आहे हाच मुळी अद्भुत आणि आनंदित करणारा अनुभव असायचा.
ग्रंथमुळे माझे आयुष्य पार बदलून गेले. अनेक नवे मित्र मिळाले, अनेक जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्याच बरोबर पुस्तकरूपी जीवलग सवंगडी मिळाले.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा