सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवले होते. माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी
बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच
मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे
मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.
संजय माने हे कल्याण (मुंबई) मधील सद्ग्रहस्थ आमच्या
कंपनी मध्ये मागील तीन वर्षांपासून कामाला होते. त्यांना जेंव्हा एक नवीन मराठी
माणूस कंपनी मध्ये आलाय असे कळाल्यावर ते
माझी भेट घेण्यासाठी आवर्जून आले. त्यांच्याकडून मला कंपनीतील रत्नाकर हिरे आणि
कमलेश बुजाडे या इतर दोन मराठी माणसां विषयी माहिती मिळाली. त्यावेळी रत्नाकर हे कंपनीच्या कामानिमित्त जर्मनीला गेलेले
होते. या तिघांनी एक मराठी माणूस या नात्याने मला फार मदत केली. नवीन देशात आणि
त्यातल्या त्यात जगावेगळे नियम असणाऱ्या सौदीमध्ये त्यांचे मार्गदर्शन मोलाचे
होते.
संजय माने दिसायला उंच, गोरा वर्ण, मध्यम बांधा, हसरा चेहरा, फ्रेंच कट दाढी असे त्यांचे वर्णन करता येईल. स्मित भाषी आणि मन मिळावू
स्वभावामुळे ते संपूर्ण कंपनीमध्ये प्रसिद्ध होते. तसं त्यांच्या आणि माझ्या वयात
२०-२१ वर्षांचा फरक असूनही आमच्या देघांची खूप गट्टी जमली.
काही महिन्यांच्या काळानंतर कमलेश बुजाडे याच्या प्रयत्नाने आम्हा दोघांना कंपनी अकॉमोडेशन मध्ये सेम रूम मिळाली. मी शाकाहारी असल्यामुळे आम्ही दोघे एकत्र
स्वयंपाक बनवायचो. माने हे कोकणातील असल्यामुळे ते मांस मच्छी खायचे पण माझ्या
शाकाहारीपाना मुळे त्यांनी कधी घरी मांस मच्छी वगैरे बनवले नाही. थोड्याच
दिवसामध्ये मी जेवण बनवण्यात पटाईत झालो. शाकाहारी भाज्या, कांदा पोहे, शिरा, वाडा पाव, मिसळ, रव्याचे व बेसनाचे लाडू, थालपीठ हे अस्सल मराठमोळे पदार्थ मी बनवू
लागलो. मी बनवलेला शिरा आणि कांदा पोहे हे सर्वांना फार आवडायचे. एका वेगळ्या
प्रकारची फोडणीचे वरण मी बनवायचो ते माझ्या इतर दक्षिणात्य मित्रांना फार आवडायचे, मी गमतीने त्या डिशचे नामकरण "दाल पूना" असे केले होते.
रत्नाकर हिरे हे कुशाग्र बुद्धीचे धनी होते.
सौदी अरेबियातील महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ किंवा मराठी माणसाचा बुलंद आवाज
अशा भाषेत मी त्यांचे वर्णन करेल. मराठी भाषा आणि मराठी लोक यांच्यावर त्यांचे खूप
प्रेम होते. मराठी लोकांची निंदा त्यांना अजिबात सहन व्हायची नाही. त्यांचा स्वभाव भयंकर तापड होता, कामगार लोक त्यांच्यापुढे जाण्यास घाबरत असत. त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय
घेऊन कंपनीला प्रगती पथावर नेले.
या मराठी मित्रां व्यतिरिक्त विविध देशातील आणि
भारताच्या इतर राज्यातील मित्र मला येथे आल्यावर मिळाले. यामुळे वेगवेगळ्या भाषा
आणि संस्कृती यांचा परिचय अगदी जवळून अनुभवता आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा