खेड्यातला माणूस मुंबई - पुण्यात जावा आणि परत खेड्यात परतल्यावर तो ज्याप्रमाणे आपले अनुभव नातेवाईक आणि
मित्रांना सांगतो तसेच काहीतरी माझ्या बाबतीतही झाले आहे. मीही खेड्यातलाच होतो. खेड्यातून जाऊन नोकरीसाठी मुंबई – पुण्यात राहिलो आणि पुढे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. मी माझ्या पहिल्या विदेश प्रवासात आलेल्या काही कडूगोड आठवणी सांगणार आहे.
प्रत्येक मराठी माणसाने विमानातून प्रवास करणे ,
विदेशात जाणे अशी अनेक स्वप्ने उराशी बाळगलेली
असतात परंतु त्यातील काही जनच प्रयत्न करतात
आणि यशस्वी होतात. मी ही त्यामाधालाच होतो. विदेशात नोकरी
मिळावी यासाठी मी फार प्रयत्न केले. माझ्या अथक
परिश्रमानंतर मला शेवटी ऑक्टोबर २००६ मध्ये यश मिळाले आणि आयुष्यात पहिल्यांदाच विदेशात काम करण्याची
संधी मिळाली.
सौदी अरेबिया! हे नाव लहानपणा पासून ऐकले होते
आणि दूरदर्शनवर या देशाविषयी बरेच काही पहिलेल होते. इथली धार्मिक कट्टरता, नियम याबाबत मला थोडी पुसटशी कल्पना आधीपासूनच होती. हा देश आपल्या धर्माबाबत
किती कट्टरता पाळतो याची प्रचीती मला दम्माम विमानतळावर उतरल्या बरोबर आली. सौदी अरेबियन एरलाइन्सच्या मुंबई दम्माम
फ्लाईटने मी सौदी अरेबियात दाखल झालो. माझा हा पहिला विमान प्रवास सुरक्षित आणि
आनंदात झाला. सकाळी १० वाजता (भारतीय वेळेप्रमाणे) विमानाने मुंबईहून उड्डाण केले
आणि साडेतीन तासात स्थानिक
वेळेप्रमाणे ११ वाजता दम्मामला पोहचले. (सौदी अरेबियाची
प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ यामध्ये अडीच तासांचा फरक आहे. सौदी अरेबियाची
प्रमाण वेळ +३.०० GMT आहे तर भारताची प्रमाण वेळ +५.३० GMT आहे)
जेंव्हा आपण एखाद्या नवीन
देशात प्रवेश करतो तेंव्हा आपल्याला तिथल्या इमिग्रेशनच्या प्राथमिकता पूर्ण कराव्या
लगतात. जसे आपण कुठल्या देशातून आलो, कश्यासाठी आलो, किती दिवस राहणार
आणि पासपोर्टची माहिती वगैरे. परंतू इथल्या इमिग्रेशन फॉर्मवर तुमचा धर्म कोणता
आहे हा प्रश्न ठळक अक्षरात लिहिलेला होता हे पाहून मला जरा नवलच वाटले. इमिग्रेशन संपून मी
कस्टमसाठी रांगेत उभा रहिलो. रांगेत उभा असताना मी जे काही पाहत होतो ते तर खूपच
भयंकर वाटत होते. सौदी कस्टम अधिकारी गैरमुस्लिम लोकांच्या गळ्यात मनगटावर काय काय
बांधलेले आहे, काही धार्मिक माळा, चिन्हे आहेत का? हे तपासात होता. माझ्या गळ्यात वारकरी
संप्रदायाची तुळशीची माळ आणि उजव्या हाताच्या मनगटावर मढी येथील कानिफनाथाचा नाडा
बांधलेला होता. दुर्दैवाने त्या अधिकाऱ्याच्या नजरेत त्या गोष्टी आल्या. त्याने
मला ती माळ व हातात बांधलेला नाडा तोडून फेकण्यास सांगितला. त्या अधिकाऱ्याच्या पुढे
अनेक माळा आणि हिंदू देवी देवतांच्या फोटो यांचा खच पडला होता. नवीन जाणाऱ्या माणसांना
याची कल्पना नसल्यामुळे अश्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मला आधी याची माहिती
होती पण सौदी अधिकारी एव्हढी कसून तपासणी करतील असे वाटले नव्हते. सौदीतील माझा प्रवेशच अश्या वाईट प्रसंगा पासून
चालू झाला होता. हा देश १००% मुस्लिम असल्यामुळे येथे दुसऱ्या धर्माला अजिबात थारा
नाही. देव पूजा, धार्मिक ग्रंथ बाळगणे, धार्मिक फोटो किंवा मूर्ती पूजा यांना कायद्याने सक्त मनाई आहे. तसे काही
आढळल्यास शिक्षा पात्र गुन्हा ठरू शकतो. माझ्या सारख्या धार्मिक माणसाचे काय होणार
असा विचार करत मी विमानतळाच्या बाहेर पडलो. विमानतळावर
आम्हाला घेण्यासाठी कंपनीची गाडी आली होती. त्या कंपनी मध्ये आमचा १४ जणांचा ग्रुप
मुंबईहून एकाच विमानाने गेला होता.
किंग फाहद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शहराच्या
खूपच बाहेर आहे. विमानतळाहून मुख्य शहरात पोहचण्यासाठी दिडतास लागला. रस्ते सुंदर
आणि दुतर्फा खजुरांच्या झाडाच्या रंगा होत्या. विमानतळाचा परिसर अत्यंत सुंदर वाटला.
थोडे बाहेर पडल्यावर चहूकडून वाळ्वंट आणि मधेच रस्ता होता. गाडीतून वाळवंटात दूरवर चरणारी उंट नजरेत येत होती.
एकदाच सौदी
अरेबिया मध्ये पोहचलो होतो, आता येथील वातावरणाशी एकरूप होण्यासाठी खूप
प्रयत्न करावे लागणार होते. सौदी मध्ये वाळवंटच आहे म्हणजे फक्त कडक उन्हाळा!
एव्हढच समीकरण माझ्या मनात पक्क होत. येथे आल्यावर कळाले की इकडे भयंकर थंडी पडते.
सोसाट्याचा वारा, रात्रीचे तापमान शुन्य अंश असे वातावरण डिसेंबर
ते फेब्रूवारी दरम्यान असते. थंडीसाठी लागणारे गरम कपडे मी आणले नव्हते त्यामुळे
माझी चांगलीच पंचाईत झाली. सुरुवातीचे दोन महिने खूप वाईट गेले. मी
जन्मापासून शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझे खाण्यापिण्याचे थोडे हालच झाले.
सौदी मध्ये शुद्ध शाकाहारी अश्या खानावळीच नाहीत. हॉटेल मध्ये फक्त मौंसाहारी
पदार्थ मिळायचे. क्वचितच एखाद्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण मिळायचे. दक्षिण भारतीय
हॉटेल्स मध्ये इडली, डोसा आणि परोठा खाऊन थोडे दिवस काढले.
स्वयंपाकाचे माझे ज्ञान शुन्य होते तरीही काही दिवसांनी कसेतरी जेवण बनवायला लागलो.
असे अनुभव मला नवीन देशात गेल्यावर आले. माझी
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी परदेशात कामाला
आलो होतो त्यामुळे मोठ्या हिमतीने प्रत्येक खडतर प्रसंगाचा सामना करत राहिलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा