कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे. पण माझ्या बाबतीत
हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान
संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता
त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि
वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास
झाला नाही. माझ्या एका
मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य
असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली
शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे
नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास
करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे
वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच
करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो.
सौदी अरेबियाची राष्ट्रभाषा ही अरबी असल्यामुळे
इथले जवळपास सर्वच व्यवहार अरबी भाषेतून होतात. स्थानिक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स,आणि इतर अनेक गोष्टी अरबी भाषेतच असतात. अरबी
भाषेनंतर येथे हिंदी प्रामुख्याने बोलली जाते. बहुतेक कामगार हे भारतीय उपखंडातील
असल्यामुळे येथे हिंदी भाषेचा खूप प्रभाव आहे. आफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका या उपखंडातील
लोक चांगले हिंदी बोलतात. उर्दू आणि हिंदी भाषेमध्ये जरी साम्यता असली, आणि उर्दू भाषक जरीही या भाषेला उर्दू मालत असले तरीही सौदी मध्ये बोलली
जाणारी हिंदी - उर्दू या मिश्रित भाषेला 'हिंदी' या नावानेच ओळखले जाते. अरबीमध्ये भारतीय लोकांना हिंदी असेच संबोधतात तर
भारताला अलहिंद म्हणतात. अरबी व हिंदी या भाषानंतर येथे
बोलली जाणारी तिसरी महत्वाची भाषा म्हणजे मल्याळम. त्यानंतर बंगाली, तगालूक, तमिळ आणि इंग्रजी या भाषांचा क्रम लागतो. सरकारी कार्यालये, बँका, मनी एक्सचेंग या ठिकाणी विविध भाषामधून सूचना
फलक पाहण्यास मिळतात.
सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली
गरुड झेप. केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा येथे प्रत्येक व्यवसायात
बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही
केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लौंड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय
केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे पण केरळीच आहेत.
मी काम करत असलेल्या कंपनीत एकूण कामगारांच्या
संखेच्या पन्नास टक्क्याहून अधिक पण फक्त केरळीच
आहेत. केरळची बहुतेक लोक हे बहुभाषक असल्यामुळे त्यांच्याशी बोलण्यास भाषेची आडचन
जाणवत नाही. केरळी लोकांना त्यांची भाषा सोडून किमान हिंदी, तमिळ, इंग्लिश आणि अरबी या भाषा बोलता येतात. केरळी लोकांना त्यांच्या मातृभाषेचा खुपच
आभिमान आहे, कुठल्याही धर्माचा केरळी
माणूस संकटात असतांना सर्वजण त्याच्या मदतीला धावून जातात ही गोष्ट येथे आवर्जून
निदर्शनास येते.
सर्व धर्मीय केरळी लोक 'ओनाम' हा त्यांचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.
या दिवशी सर्व केरळी हॉटेल्स मध्ये केळीच्या पानावर वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल
असते. माझ्या माहिती प्रमाणे या एकाच दिवशी येथे शुद्ध शाकाहारी जेवण मळत असावे.
मल्याळम भाषेत येथून अनेक दैनिके प्रसिद्ध
होतात. भारता बाहेर
राहून ह्या केरळी लोकांनी आपली मातृभाषा आणि संस्कृती किती प्रेमाने जपली आहे हे
पाहून एखाद्या मराठी भाषाकाचे डोळे दिपून जावेत. मराठी माणसांना नवल वाटणारी हि
गोष्ट आहे. क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्र कितीतरी मोठा असला
तरी भाषेच्या बाबतीत आपण मराठी लोक किती भरकटलो आहोत याची खंत प्रत्येक मराठी
माणसाला येथे जाणवते. एखाद्या शुष्क
वाळवंटात हिरवेगार झाड क्वचितच किंवा पाहण्यासच भेटू नये तशीच गत येथे मराठी
भाषकांची आहे. हाजारात एखादा मराठी बोलणारा कधीतरी भेटतो.