रविवार, १९ मार्च, २०२३

दुबईतील टेहाळणी बुरुज (Watchtowers of Dubai)

 दुबई शहर हे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फक्त एक खेडेगाव होते यावर आज क्वचितच कुणाचा विश्वास बसेल. मध्ययुगीन दुबई शहर हे समुद्र किनाऱ्या लगत वसलेले होते. इराणच्या आखातातून नदीसारखी एक खाडी काहीशी मुख्य भागात घुसून तिने जमीनीचे दक्षिणोत्तर असे दोन भाग पाडलेले आहेत. या खाडीलाच आज दुबई क्रिक (Dubai Creek) म्हणून संबोधले जाते. खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर देअरा आणि दक्षिण किनाऱ्यावर बरदुबई अशा दोन छोट्या गावांच्या वसाहती त्याकाळी अस्तित्वात होत्या. विसाव्या शतकाच्या आरंभी या दोन वसाहतींची लोकसंख्या पाच ते आठ हजारा दरम्यान होती. मासेमारी आणि इराणच्या आखातातील उथळ पाण्यात बुडी मारून मोती गोळा करणे (Peal Diving) असे व्यवसाय त्याकाळी दुबईचे लोक करत असत. कुडामातीच्या घरात राहणाऱ्या येथील लोकांचे जीवन खूप खडतर होते. मोत्याच्या बदल्यात खाद्यपदार्थ, मसाले आणि कापड अशा जीवनावश्यक वस्तू दुबईत येऊ लागल्या. या व्यापारामुळे दुबईत एक प्रकारची सुबत्ता आली.




हल्लोखोरांपासून दुबईचे संरक्षण करण्यासाठी बरदुबई आणि देअरा या दोन्ही वसाहती भोवती तटबंदी बांधून त्यांना सुरक्षित केले होते. शहराचा विस्तार करण्यासाठी कालांतराने ही तटबंदी पाडावी लागली. तटबंदी पाडल्यामुळे दुबईच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा नव्याने विस्तृत भागात तटबंदी बांधणे खूप खर्चिक होते म्हणून बरदुबई आणि देअरा भागात मोक्याच्या ठिकाणी टेहाळणी बुरुज (Watchtower) बांधण्यात आले. एकूण २७ टेहाळणी बुरुज त्याकाळी अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळतात. पैकी २० बुरुज हे देअरा भागात तर ७ बुरुज बरदुबई भागात उभारले होते. यातील काही टेहाळणी बुरुज आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

दुबई समुद्र किनाऱ्यावरचे शहर असल्यामुळे लुटारु टोळ्यांचे हल्ले जमिनी मार्गापेक्षा समुद्र मार्गाने जास्त होत असत. समुद्र मार्गाने होणाऱ्या हल्ल्याची पुर्व कल्पना देण्यासाठी अनेक टेहाळणी बुरुज हे किनाऱ्यालगत उभारले गेले होते. नागरिकांना हल्ल्याची सुचना देण्याबरोबरच या बुरुजांचा उपयोग इतर कारणांसाठी देखील केला जात असे. ईदचा चंद्र पाहण्यासाठी त्याकाळी हेच शहरातील सर्वात उंच ठिकाण होते. दौऱ्यावरुन परतणारा राजा, राजकुमार किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या आगमनाची सूचना शहरवासीयांना याच ठिकाणाहून दिली जात असे. सूचना मिळाल्यावर शहरातील लोक त्यांच्या स्वागतासाठी वेशींपर्यंत जायचे. याबरोबरच महत्त्वाच्या दवंडी याच टेहाळणी बुरुजावरुन दिल्या जायच्या. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या जवळीची शस्त्रे ही बुरुजांवरील पहारेकऱ्याकडे जमा करावी लागत असे. व्यापारासाठी येणाऱ्या जहाजांना दुबई खाडीत प्रवेश करण्यापूर्वी टेहाळणी बुरुजांवर नोंदणी करावी लागे. 


टेहाळणी बुरुजांची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण होती. प्रारंभीचे बुरुज हे गोलाकार होते. गोलाकार बुरुजांचा मुख्य फायदा म्हणजे याला कुठेच कोपरा नसल्यामुळे हल्लेखोरांना लपुन बसण्यास संधी मिळत नसे. गोलाकार बुरुज निर्माण करणे हे खूप वेळखाऊ, खर्चिक आणि किचकट काम होते. नंतरच्या काळात अनेक बुरुजांची आवश्यकता भासू लागल्याने चौकोनी आकाराचे बुरुज बांधण्यात आले. चौकोनी बुरुज कमी खर्चात आणि कमी वेळत पुर्ण व्हायचे. टेहाळणी बुरुज बांधण्यासाठी प्रवाळ दगड (Coral Stone), जिप्सम, चुनखडी आणि वाळू अशी सामग्री वापरली जायची. बुरुजात प्रवेश करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने तळमजल्यावर कुठलेच प्रवेशद्वार नसायचे. त्याऐवजी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर एक खिडकी असे. बुरुजांवरील पहारेकरी या खिडकीतून दोर किंवा शिडीच्या माध्यमातून खालीवर ये-जा करत. चढतांना पायाला आधार मिळावा म्हणून भिंतीवर छोट्या चौकोनी खाचा केलेल्या असत. बुरुजात पहारेकरी राहण्याची सोय होती. हल्लेखोरांवर उकळते तेल ओतण्यासाठी इतर बाजूंनी खिडक्या होत्या. या खिडक्यांना बाहेरील बाजूने नाकासारखा आकार देऊन त्यांना हल्लेखोरांच्या माऱ्यापासून सुरक्षित केले होते. बुरुजाचे छत हे खजुराच्या पानाने अच्छादून पहारेकऱ्यांसाठी सावली बनवली जात असे. बुरुजावर गरजेपुरता दारुगोळा ठेवण्यासाठी कोठार देखील असायचे. बुरुजाच्या मोक्याच्या जागी बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी चौकोनी छिद्र (जंग्या) असत. या छिद्रांचे बांधकाम विविध अंशाच्या कोनात केल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या शत्रूला टिपणे शक्य होते. बाहेरून या छिद्रांच्या आत मारा करता येत नसल्याने आतला पहारेकरी सुरक्षित राही. बुरुजाच्या सगळ्यात वरच्या भागावर सुंदर पाकळ्यांची नक्षी (Castellation) केलेली असायचे. या पाकळ्यांची त्रिकोणी रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर होती. या पाकळ्यांची आडून शत्रूवर मारा करता येत असे.

~ गणेश भाऊसाहेब पोटफोडे (दुबई)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा