रविवार, २ एप्रिल, २०२३

जॉर्जियातील अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च

 ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटी हा जाॅर्जियाचा अधिकृत राष्ट्रीय धर्म आहे. लोकसंख्येच्या जवळपास ८५% नागरीक हे या धर्माचे आहेत. सोव्हिएत युनियन वगळता प्राचीन काळापासून सर्वच राज्यकर्त्यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीला अधिकृतपणे राष्ट्रीय धर्माचा दर्जा दिल्याने येथे त्या धर्माशी निगडीत प्राचीन खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. या प्राचीन खुणा म्हणजे जाॅर्जियन बनावटीची अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च. ही सर्व चर्च म्हणजे वास्तुशास्त्रातील आश्चर्य म्हणावे लागतील. यातील काही चर्चचा युनेस्को जागतिक वारसा स्थळात समावेश झाला आहेत. 


ऐतिहासिक ज्वारी माॅनेस्ट्री (Jvari Monastery) ही तिब्लिसी शहराजवळ आहे. शहरापासून गाडीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे लागतात. ज्वारी माॅनेस्ट्री हे चर्च ज्वारी नावाच्या डोंगराच्या शिखरावर बांधले असून याच्या दोन बाजूंनी खोल दरी आहे. या माॅनेस्ट्रीची निर्मिती ६ व्या शतकात करण्यात आली होती. चर्चच्या दोन बाजूंच्या भिंती या निसटत्या कड्याला लागून बांधलेल्याआहेत. त्या आपल्याकडील किल्ल्याच्या तटबंदीसारख्या भासतात. ६ व्या शतकातील बांधकाम अजूनही सुस्थितीत असून त्यात काहीही बदल करण्यात आलेले नाही, हे या चर्चचे आश्चर्य म्हणावे लागेल. या माॅनेस्ट्रीला चर्च ऑफ होली क्राॅस म्हणूनही संबोधिले जाते. संपुर्ण चर्च हे पिवळ्या रंगाच्या दगडांपासून बनवले असल्याने ते खूप आकर्षक दिसते. चर्चच्या प्रवेशद्वारावर आणि अजूबाजूच्या भिंतीवर प्राचीन जाॅर्जियन भाषेतील शिलालेख पहाण्यास मिळतात. भिंतीवर अनेक मुर्ती कोरलेल्या आहेत. चर्चच्या आतमध्ये मुख्य घुमटाखाली प्राचीन लाकडी क्रॉस असून तो ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन लोकांसाठी खूप पवित्र मानण्यात येतो. जाॅर्जियासह शेजारील काॅकेशस देशांचे अनेक श्रद्धाळू येथे दर वर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.




ज्वारी माॅनेस्ट्री पाहण्यासाठी आम्ही सकाळीच तेथे पोहचलो. पहाटे नुकतीच बर्फ वृष्टी होऊन गेलेली होती. ज्वारी डोंगर चढताना सगळीकडे पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली दिसली. गाडीतून खाली उतरताच अतिशय थंड वाऱ्याने आमचे स्वागत केले. तापमान हे उणे चार अंश इतके होते. डोंगर माथ्यावर आल्याने तिथे खूप जोरदार वारा जाणवत होता. ज्वारी माॅनेस्ट्री हे पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण असल्याने इथे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. वाहनतळाहून आम्ही चर्चच्या दिशेने जात असताना वाटेत अनेक भिकारी बसलेले आढळले. चर्चच्या प्रवेशद्वाराजवळच्या मोकळ्या जागेत आल्यावर आम्हाला समोर निसर्गाचे खूप सुंदर रुप पाहण्यास मिळाले. निळी जांभळी डोंगर रांग आणि त्यांची शिखरं पांढऱ्या बर्फाने चमकत होती. याच डोंगरांच्या आडून लपाछपी खेळत येणाऱ्या कुरा आणि अराग्वी या दोन नद्यांच्या संगमाचे दृश्य नजर वेधून घेत होते. हिरव्यागार रंगाचे पाणी असणारी अराग्वी तर दुसरी गढूळ पाणी असणारी कुरा अशा दोन नद्या एकमेकीत एकरूप होत होत्या. त्या दोन नद्यांच्या दुआबात मत्सखेटा हे छोटेसे टुमदार शहर वसलेले होते. मत्सखेटा हे आयबेरीया (प्राचीन जाॅर्जिया) राज्याच्या राजधानीचे शहर होते. डोंगर माथ्यावरून मत्सखेटा शहरातील कौलारू घरं कोकणातील गावाची आठवण करून देत होती. ज्वारी माॅनेस्ट्री आणि त्या समोरचे निसर्गचित्र मनाला भुरळ घाडणारे असेच होते. जणूकाही आपण एखाद्या चित्रकाराने साकारलेले सुंदर चित्र बघत आहेत असाच भास होत होता. 

लोखंडी दार ओलंडल्यानंतर आम्ही माॅनेस्ट्रीच्या आत आलोत. आतमध्ये वातावरण थोडेसे उबदार होते. प्रकाश खेळता राहावा म्हणून माॅनेस्ट्रीच्या घुमटावर चार बाजूंनी झरोके होते तर भिंतीवर खिडक्या बनवलेल्या होत्या. आतमधली बांधकामाच्या पद्धतीवरून ही वास्तू प्राचीन असल्याचे जाणवत होते. इथे एक पुजारी मेणबत्त्या विकत होता. आम्ही त्याच्याकडून दोन छोट्या मेणबत्त्या घेऊन तेथील ख्रिस्ताच्या फोटो समोर प्रज्वलित केल्या. आमची गाईड आम्हाला एकेका गोष्टीची माहिती देत होती. ज्वारी माॅनेस्ट्री खरोखरच जाॅर्जियन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असल्याचे आम्हाला जाणवले. 




ज्वारी माॅनेस्ट्री पाहिल्यानंतर आम्ही मत्सखेटा या शहराकडे जाण्यासाठी निघालो. मत्सखेटा हे शहर जाॅर्जियन संस्कृतीचे आणि आजच्या घडीला जाॅर्जियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीचे धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहराच्या प्राचीन महत्त्वामुळे १९९४ साली युनेस्कोने याला Historical Monuments of Matskheta या नावाने जागतिक वारसा स्थळात सामिल केले गेले आहे. ज्वारी डोंगराहून खाली उतरले की कुरा नदिच्या किनाऱ्यावर वळणं घेत अगदी दहा बारा मिनिटात आम्ही मत्सखेटा या शहरात पोहचलो. जुन्या दगडी फरशीच्या रस्त्याने चालत आम्ही स्वेटित्सखोवेली कॅथेड्रलच्या (Svetitskhoveli Cathedral, Mtskheta) प्रवेशद्वारापाशी पोहचलो. स्वेटित्सखोवेली कॅथेड्रलचा अर्थ जिवंत खांबाचे चर्च असा काहीसा होतो. हे चर्च अतिशय भव्य असे आहे. आपल्याकडील भोईकोटांसारखी त्याला चारही बाजूंनी भली मोठी तटबंदी आहे. तटबंदीच्या पश्चिमेला महाद्वार असून त्यावर बनवलेल्या मनोऱ्यावर मोठी घंटा बांधलेली आहे. 




कॅथेड्रलचे छत खूप उंच असून त्याला भल्या मोठ्या खाबांनी आधार दिला आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कॅथेड्रलची गणना होते. या कॅथेड्रलमध्ये अनेक शाही कार्यक्रम व्हायचे. जसे की, राजाचा राज्याभिषेक, लग्न वगैरे. त्याचबरोबर हे कॅथेड्रल शाही परिवाराची दफनभूमी म्हणून देखील वापरले जायचे. यामध्ये विविध कालखंडात होऊन गेलेले राजे किंवा राणी यांना दफन करण्यात आले आहे. एरेकल द्वितीय, वखतांग गोर्गासाली आणि सहावा जाॅर्ज यासारख्या प्रमुख राजांच्या समाध्या येथे बघण्यास मिळतात. ४ थ्या शतकापासून या कॅथेड्रलच्या वास्तूमध्ये अनेक बदल करण्यात आहे आहेत. अरब, इराणी आणि रशियन आक्रमणात या कॅथेड्रलचे अनेकदा नुकसान झाले होते. त्यामुळे मध्ययुगात याच्या चौफेर तटबंदी बांधली असावी. या कॅथेड्रलमध्ये येशू ख्रिस्ताने वापरलेले कपडे पुरले असल्याची मान्यता आहे. पूर्वीच्या काळातील बांधकामात सर्व कॅथेड्रलच्या आतील भिंतीवर चित्र काढण्यात आली होती परंतु रशियन कालखंडात ती नष्ट करण्यात आली. त्यात वाचलेली काही चित्र आजही येथील भिंतीवर बघायला मिळतात. येथू ख्रिस्ताचे भव्य चित्र आणि त्यासमोरील काचेचे तोरण खूप आकर्षक आहे. 



मत्सखेटा कॅथेड्रल अतिशय सुंदर असून जाॅर्जिया फिरायला जाणाऱ्या प्रत्येकाने ते अवश्य बघायला पाहिजे. थोडक्यात ह्या वास्तू जरी बोलत नसल्या तरी त्यांची बांधकामाची शैली, आजूबाजूचा परिसर, वास्तूवर कोरलेल्या मुर्ती, रंगवलेली चित्रे हे सगळं वैभव आपल्याला तो ऐतिहासिक कालखंड कसा होतो याचा अनुभव करून देतात. स्वेटित्सखोवेली कॅथेड्रल फिरताना बाहेरील जगाचा पुर्णपणे विसर पडतो आणि आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास होतो.




कॅथेड्रलच्या आवारात अनेक दुकाणं थाटलेली पाहण्यास मिळतात. तिथे अनेक शेभेच्या वस्तू, दागिने, खाद्य पदार्थ आणि विशेषतः जाॅर्जियन बनावटीची वाईन विक्रीसाठी ठेवलेली असते. आम्ही कॅथेड्रडची सफर पुर्ण झाल्यानंतर या दुकानातून बरीच खरेदी केली. जाॅर्जियाची आठवण म्हणून मी काही पोस्टकार्ड, कीचेन यासारख्या गोष्टी आवर्जून विकत घेतल्या. 

(सूचना : पोस्ट मधील सर्व फोटोग्राफ हे लेखकाने स्वतः काढलेले आहेत) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा