रविवार, १९ मार्च, २०२३

सिगिरीया-Sigiriya (सिंहगिरी) चा इतिहास

सिगिरिया किल्ला 

श्रीलंकेच्या अगदी मध्यभागी घनदाट जंगलाने वेढलेल्या भागात जमीनीपासून २०० मीटर उंचीचा एक भला मोठा खडक आहे. इ. स. ५ व्या शतकात कश्यप राजाची राजधानी असणारा आणि नियोजनपूर्वक नगररचनेचे उत्कृष्ट उदाहरण असणारा हा किल्ला युनेस्को ने जागतिक वारसा स्थळात सामिल केला आहे. जगभरातील लाखो पर्यटकांचे आकर्षक असणारा हाच तो जगप्रसिद्ध सिगिरीया किल्ला अर्थात सिंहगिरी. सिगिरीयाचा परिसर जितका निसर्गसंपन्न आहे तितकाच त्याचा इतिहास देखील अतिशय रंजक आहे. 

श्रीलंकेच्या इतिहासाची साधणे - चूलवंश/महावंश :
श्रीलंकेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला महावंश आणि चूलवंश या ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. सिगिरीया किल्ल्याची बांधणी संबंधित माहिती आपल्याला चूलवंश मध्ये मिळते. चूलवंश हा पाली भाषेत लिहिलेला ग्रंथ असून यात श्रीलंकेतील बौद्ध राजांच्या ऐतिहासिक नोंदी काव्यशैलीत लिहिलेल्या आहेत. त्यात इ. स. ४ थ्या शतकापासून तर थेट श्रीलंकेत ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापर्यंत म्हणजे इ.स. १८१५ पर्यंतच्या नोंदी आढळतात. या ग्रंथाची रचना विविध बौद्ध भिक्षूंनी केली आहे. चूलवंश हा ग्रंथ महावंश ग्रंथाचा उत्तरार्ध मानला जातो. महावंश (अर्थात महान इतिहास) हा देखील पाली भाषेतील काव्यग्रंथ असून त्यात कलिंग देशाचा राजा विजय (इ. स. पुर्व ५४३) याच्या श्रीलंकेतील आगमनापासून ते थेट राजा महासेन (इ. स. ३३४ - इ. स. ३६१) पर्यंतचे वर्णन आढळते. महावंश ग्रंथात तथागत गौतम बुद्धांच्या श्रीलंका भेटेचे उल्लेखही आढळतात. 

धातूसेन कालखंड : 
धातूसेन हा श्रीलंकेचा राजा होऊन गेला. त्याचा कालखंड इ. स. ४५५ ते इ. स. ४७३ असा होता. धातूसेनने अनुराधापूरा येथून राज्य केले. धातूसेन राजा सत्तेत येण्यापूर्वी श्रीलंकेच्या उत्तर भागावर द्रविडांनी (तमिळ) सत्ता स्थापन केली होती. वेगवेगळ्या सहा द्रविड राजांनी श्रीलंकेवर राज्य केले. म्हणून त्यांना 'सहा द्रविडांचे राज्य' असे म्हणतात. हे सगळे राजे पांडियन राजाचे प्रतिनिधी होते. उत्तरेतील या तमिळ आक्रमणाला प्रतिकार करत धातूसेनने एक एक करत सगळ्या द्रविड राजांचा पराभव करून श्रीलंकेला स्वातंत्र्य आणि एकसंघ केले. गादीवर आल्यानंतर धातूसेन राजाने राज्याची विस्कटलेली शासन व्यवस्था पूर्वपदावर आणली आणि जनतेच्या हितासाठी अनेक विकासकामे केली. सामान्य लोकांच्या हितासाठी धातूसेन राजाने एकूण १८ तलाव बांधल्याची नोंद सापडते. त्याच बरोबर त्याने 'योधा इला' नावाचा सिंचन कालवा बांधला. अवुकाना येथील १२ मी. उंचीची बुद्ध प्रतिमेची निर्मिती देखील याच्याच कालखंडात झाली. एकूणच धातूसेनच्या काळात शेती व्यवसायाची पुन्हा भरभराट झाली.

धातूसेन राजाला कश्यप आणि मोघलान नावाचे दोन पुत्र होते. त्यात कश्यप सर्वात मोठा होता परंतु तो दासीपुत्र होता. तर मोघलान हा त्याच्या आवडत्या राणीचा पुत्र होता. मोघलान हा अधिकृत राजकुमार असल्याने तोच राज्याचा खरा उत्तराधिकारी होता. धातूसेन राजाला एक मुलगी देखील होती. तिचा विवाह त्याने आपल्या सख्ख्या बहिणीच्या मुलाशी लावून दिला होता. धातूसेनच्या बहिणीचा नवरा अर्थात त्याचा मेहुणा हा सेनापती होता. त्याचे नाव मीगारा असे होते. 

कश्यपला आपणच राजा व्हावं अशी महत्त्वाकांक्षा होती. तो मोघलानचा खूप तिरस्कार करत असे. धातूसेनची मुलगी आणि बहिण या सासू सूनात भांडणे होऊ लागली. एकदा भांडण इतके विकोपाला गेले की, धातूसेनाने आपल्या बहिणीस ठार मारण्याची आज्ञा दिली. मीगाराला या घटनेचा खूप राग आला. त्याला कश्यपची राजा होण्याची महत्त्वाकांक्षा माहिती होती. म्हणून त्याने कश्यपला पित्याविरुद्ध बंड करण्यासाठी उद्युक्त केले. आपण जर उठाव केला नाही तर आपल्याला राजसिंहासन कधीही मिळणार नाही याची कश्यपला जाणीव होती. म्हणून तो या संधीचा फायदा घेऊन आपल्या पित्याविरुद्ध बंड करून धातूसेनास कैद करतो आणि स्वतःला राजा घोषीत करतो. मोघलान आपल्या जीवाच्या भितीने जंगलात पळून जातो. 

मीगाराच्या सांगण्यावरून कश्यप धातूसेनाचा शाही खजिन्यासाठी खूप छळ करतो. धातूसेनने मोघलानला देण्यासाठी खूप मोठा खजिना दडवून गुप्त ठिकाणी ठेवला असल्याचे त्याला वाटत असते. धातूसेन त्रासाला कंटाळून दडवून ठेवलेला खजिना कश्यपला दाखवण्यास तयार होतो. त्या बदल्यात धातूसेन केलावेवा कालव्यात अंघोळ करण्याची अट घालतो. केलावेवा कालव्याची निर्मिती स्वतः धातूसेनने केलीली असते. जेव्हा त्याला कालव्यात आणण्यात येते तेव्हा तो ओंजळीत पाणी घेऊन कश्यपला सांगतो की, तू जो खजिना शोधत होतास तो हाच आहे. या सगळ्या घटनेचा कश्यपला अतिशय संताप येतो आणि तो धातूसेनला जिवंत गाडण्याची आज्ञा देतो. 

कश्यप कालखंड :
इ. स. ४७३ साली आपल्या पित्याची हत्या करुन कश्यप श्रीलंकेचा राजा होतो. कश्यप हा इ. स. ४९५ पर्यंत राजा म्हणून राहिला. एका दासीपुत्राने अधिकृत राजकुमाराला डावलून आणि पित्याची हत्या करुन सिंहासन काबीज करणे हे जनतेला आणि खास करुन बौद्ध भिक्षूंना रूचनारे नव्हते. ते सर्व कश्यपचा तिरस्कार करू लागले. पित्याच्या हत्तेनंतर बौद्ध भिक्षू त्याला 'पितृ घातक कश्यप' या नावाने ओळखू लागले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळालेला मोघलान हा पूढे दक्षिण भारतात जातो आणि स्थानिक राजाच्या मदतीने तो स्वतःची सैन्य दल निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कश्यपला नेहमी भिती वाटत रहाते की मोघलान कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो म्हणून तो आपली राजधानी अनुराधापूरा येथून हलवून दक्षिणेला काहीशा सुरक्षित अशा सिगिरीया येथे नेण्याचा निर्णय घेतो. 


सिगिरीयाची निर्मिती आणि रचना:
कश्यप राजाने आपली राजधानी सिगिरीया येथे हलवण्यापूर्वी तिथे काही शकतं आधीपासून बौद्ध भिक्षूंच्या गुहा आणि मंदिरे होते. बौद्ध भिक्षूच्या वास्तव्याचे पुरावे तेथिल शिलालेखातून मिळतात. या शिलालेखानुसार हे ठिकाण बौद्ध भिक्षूंना दान दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखांचा कालावधी इ. स. पुर्व ३ रे शतक ते इ. स. १ ले शतक असा आहे. 

सिगिरीया किल्ल्याची निर्मिती खूप नियोजनपूर्वक करण्यात आली. हा किल्ला म्हणजे नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. इ. स. ५ व्या शतकात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञान, अभियांत्रिकी कौशल्ये आणि कल्पकता याची सांगड घालून या किल्ल्याची निर्मिती केली गेली. संपूर्ण किल्ला बांधून तयार व्हायला जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला. रुंद खंदक, चौफेर भक्कम तटबंदी, बगीचे, महाल, पिण्याच्या पाण्याचे तलाव, जलतरण तलाव, कारंजे, भित्तीचित्र, रंगमहाल, राजसभा आणि बालेकिल्ला आदींचा यात समावेश होता. सिगिरीयामध्ये दोन राजवाड्यांची निर्मिती करण्यात आली होती. डोंगर माथ्यावर पावसाळी राजवाडा तर पायथ्याशी उन्हाळी राजवाडा. 


उन्हाळी राजवाड्याचे अवशेष 
शाही उद्याने :
सिगिरीयाचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेला आहे. हे प्रवेशद्वार भल्या मोठ्या तटबंदीवर बनवलेले आहे. तटबंदी समोर रुंद आणि खोल खंदक असून त्यात मगरीचा मुक्त संचार असायचा. कश्यप राजा हा खूप विलासी वृत्तीचा होता. म्हणून त्याने सिगिरीया किल्ल्याच्या आतमध्ये विविध उद्याने बनवून घेतली. त्यात जल उद्यान (Water Garden), शिळा उद्यान (Bolder Garden) आणि गच्चीवरचे उद्यान (Terraced Garden) यांचा समावेश होतो. 

i) जल उद्यान (Water Garden) :
पश्चिम प्रवेश द्वारातून आत गेल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूस समरुप (Symmetrical) असे जल उद्यान बनवलेले आहे. या उद्यानात पिण्याच्या पाण्याचे तलाव, तरण तलाव, फुलांचे बगीचे, भूमिगत पाईपलाईन करून कारंजे बनवले होते. या कारंज्याचे पाणी एक मीटर पेक्षा उंच उडायचे. यातील काही कारंजे आजही व्यवस्थित चालतात. विविध तलावातील पाणी भूमिगत पाईपलाईनने या उद्यानात आणून हायड्रोलिक्स आणि गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांताची सांगड घालून ही कारंजे बनवलेली गेली. जल उद्यानाच्या तरण तलावात कश्यप राजा आपल्या अप्सरांबरोबर जलक्रिडा करत असे. जल उद्यानाच्या थोडे पुढे गेल्यावर तलाव आणि कालव्यांनी वेढलेली दोन्ही बाजूस बेटे आहेत. या बेटांवर उन्हाळी राजवाडा बनवलेला होता. उद्यानातील सर्व तलाव हे भूमिगत पाईपलाईनने एकमेकांना जोडलेले होते. 


पश्चिम महाद्वार 

 ii) शिळा उद्यान (Bolder Garden) :
जल उद्यानानंतर सिगिरीयाच्या अगदी पायथ्याशी विविध गोलाकार खडकांची सुंदर रांग लागते. हेच ते शिळा उद्यान. मोठमोठ्या खडकांच्या मधून येण्याजाण्यासाठी पदपथ बनवलेले आहेत. अनेक खडकांवर इमारती आणि गच्च्या बनवल्या होत्या. तर गोलाकार खडकांखाली नैसर्गिक देवड्या किंवा गुहा बनलेल्या आहेत. अनेक खडकांवर एका विशिष्ट आकाराचे चौकोनी काप किंवा खड्डे कोरलेले दिसतात. या कापांचा उपयोग लाकडी किंवा विटांच्या इमारतींना आधार किंवा टेकू देण्यासाठी करण्यात येत असे. शिळा उद्यानाचा वापर कश्यप राजाच्या पुर्वी आणि नंतर बौद्ध भिक्षूंनी मोठ्या प्रमाणात केलेला आढळतो. याठिकाणी साधारणपणे २० विविध आकाराच्या गुहा आहेत. या गुहांचे छत हे प्लास्टरने सजवून त्यावर सुंदर भित्तीचित्र साकारण्यात आली होती. यातील काही गुहांवर ब्रह्मी लिपीतील शिलालेख पाहण्यास मिळतात. या गुहांच्या छतावरचे पावसाचे पाणी ओघळून गुहेत जावू नये म्हणून त्यावर काप देण्यात आले होते जेणेकरून पाणी बाहेरच पडेल.
 
शिळा उद्यानातील गुहा 

iii) गच्चीवरचे उद्यान (Terraced Garden) :
गच्चीवरचे उद्यान किंवा टेरेस गार्डन हा सिगिरीया डोंगराचा सपाट भाग असून तिथे डोंगर माथ्यावर जाण्यासाठी मुख्य जिना आहे. हा जिना पूर्वी डोंगरात कोरलेल्या भल्यामोठ्या सिंह प्रतिमेच्या तोडांतून जायचा. या मोठ्या सिंहावरूनच याला सिंहगिरी असे संबोधण्यात येत असे. सिंहगिरीचा पुढे अपभ्रंश होऊन त्याचे सिगिरीया झाले. या गच्चीवरून पुर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेचा परिसर न्याहाळता येतो. या गच्चीच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला खाली-वर जाण्यासाठी जिने बनवलेले आहेत. खडकात कोरलेल्या सिंहाचे तोंड काळाच्या ओघात नष्ट झाले असले तरी दोन पंजे अजूनही अस्तित्वात आहेत. 


टेरेस गार्डन 

पावसाळी बालेकिल्ला:
पावसाळी बालेकिल्ला हा सिगिरीया खडकाच्या अगदी माथ्यावर बांधण्यात आला होता. या बालेकिल्ल्यावर पोहचवण्यासाठी खडकात कोरलेल्या सिंहाच्या तोंडातून मार्ग होता. सिंहाच्या तोंडातून आत गेल्यावर वर जाण्यासाठी अवघड जिना लागतो. बालेकिल्ल्यात विविध इमारती होत्या. त्यात रंगमहाल, तरण तलाव, पिण्याच्या पाण्याचे तलाव, राण्यांची दालणे, मुदपाकखाना आदींचा समावेश होता. रंगमहाल खास पद्धतीने बनवलेला होता. कश्यप राजा या रंगमहालाच्या आसनावर बसून अप्सरांचे नृत्य आणि गायनाचा आनंद घेत असे. पावसाळी बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ जवळपास दोन हेक्टर असून त्यावर अनेक दुमजली इमारती बनवलेल्या होत्या. पायथ्या पासून पावसाळी राजवाड्यापर्यंत येण्यासाठीच्या सर्व पायऱ्या या पांढऱ्या रंगाच्या चमकदार खडकापासून (Moonstone) बनवलेल्या होत्या. चांदण्या रात्री त्या पायऱ्या चमकत असत. 



पावसाळी बालेकिल्ला

भित्तीचित्र (Frescoes) आणि आरसा भिंत (Mirror Wall) :
पायथ्याला शिळा उद्यान जिथे संपते तिथे दोन भलेमोठे गोलाकार खडक एकमेकांना चिटकून उभे आहेत. त्या दोघांमधल्या पोकळीत नैसर्गिक कमान (Natural Arch) तयार झाली आहे. ही कमान ओलांडल्यावर जिन्याने पायथ्यापासून १०० मी उंचीवर सिगिरीयाच्या पश्चिम कड्यावर प्लास्टर लावून त्याकाळी अंदाजे ५०० विविध अप्सरांची भित्तीचित्रे साकारण्यात आली होती (आज त्यातील फक्त २१ अस्तित्वात आहेत). या कड्याच्या कडेने जाण्यासाठी पुल बनवण्यात आला आहे. हा पुलचा काही भाग नैसर्गिक तर काही कृत्रिम फलाट तयार करून बनवला आहे. पुलाच्या डाव्या बाजूस आरसा भिंत (Mirror Wall) आणि उजव्या बाजूस डोंगराची कपार आहे. मधोमध दिड मीटर रुंदीचा पदपथ आहे. या पदपथाच्या जवळपास वीस ते तीस फुट उंचीवर डोंगराचा थोडासा भाग आत गेलेला असून तिथे थोडेसे नैसर्गिक छत तयार झाले आहे. त्या छताला देखील प्लास्टर लावून भित्तीचित्रे साकारण्यात आली आहेत. आरसा भिंत ही अत्युच्च दर्जाच्या प्लास्टर पासून बनवलेली होती. तिच्या आतल्या बाजून चमकदार पाॅलिश करून त्याला आरशा सारखे चकचकीत करण्यात आले होते. डोंगर कपारीवर रंगवलेल्या भित्तीचित्रांचे व येता जाता कश्यप राजाला स्वतःचे प्रतिबिंब या भिंतीवर दिसायचे म्हणून तिला आरसा भिंत असे म्हणले जात असे. सिगिरीया येथील भित्तीचित्राची शैली महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यातील चित्राच्या शैलीशी मिळती जुळती आहे. 

आरसा भिंत 

भित्तीचित्र 
कश्यपचा मृत्यू :
अनेक वर्ष हद्दपार असणारा मोघलान दक्षिण भारतातून स्वतःचं सैन्यदल घेऊन श्रीलंकेत दाखल होतो. सिगिरीया जवळील हाबरणा मैदानात मोघलान आणि कश्यप एकमेकांसमोर उभे ठाकतात. कश्यप हत्तीवर स्वार होऊन आपल्या सेनेचे नेतृत्व करत असतो. युद्धात मोघलानच्या सैन्यावर चाल करतांना कश्यपचा हत्ती एकेठिकाणी थोडासा वळसा मारण्यासाठी मागे वळून पुढे जातो. जेव्हा हत्ती मागे वळतो तेव्हा सैन्याला वाटते की कश्यप राजाने हार पत्करली असून तो मागे धावत आहे. कश्यपच्या सगळ्या सैन्यात एकच गदारोळ उडतो आणि ते विचलित होऊन मागे धावू लागते. पण सैन्य आपल्याला सोडून पळ काढत आहे हे कश्यपला कळत नाही. त्याचा हत्ती युद्धभूमीत अगदी मधोमध जाऊन थांबतो. सैन्याविना कश्यपचा हत्ती एकटाच युद्धभूमीत दाखल होतो. शत्रू सैन्याने घेरले गेल्यावर तो शरणागती स्विकारण्यास तयार होत नाही आणि स्वतःचा गळा चिरुन कश्यप राजा आत्महत्या करतो.

मोघलान कालखंड आणि बौद्ध माॅनेस्ट्री :
आपला सावत्र बंधू कश्यपच्या मृत्यूनंतर मोघलान राजगादीवर विराजमान होतो. वडिलांची हत्या करुन कश्यपने उभा केलेले सिगिरीयाचे वैभव त्याला नकोसे वाटते. तो सिगिरीया किल्ल्याचा त्याग करुन आपली राजधानी परत अनुराधापूरा येथे हलवतो. कश्यपने आपल्या विलासासाठी उभी केलेली सिगिरीया नगरी तो बौद्ध भिक्षूंना दान करुन टाकतो. परत एकदा सिगिरीयाच्या विविध गुहा बौद्ध भिक्षूंनी फुलून जातात. कश्यपच्या कालखंडानंतर जवळपास १३ व्या शतकापर्यंत सिगिरीयामध्ये बौद्ध भिक्षूंचा वावर होता. १३व्या शतकानंतर बौद्ध भिक्षू हे ठिकाण सोडून जातात. इ. स. १८३१ साली पोलोननरुवा येथून अनुराधापूरा कडे जात असताना इंग्रज अधिकारी मेजर जाॅनाथन फोर्ब्ज हा कुतूहलाने सिगिरीया डोंगराजवळ येतो. त्याला तेथे झाडीत इमारतींचे अवशेष सापडतात आणि सिगिरीया किल्ला परत जगासमोर येतो.



Reconstruction of Sigiri Lion Entrance and Palace. Sirinimal Lakdusinghe Felicitation Volume (2010)


संदर्भ आणि बाह्य दुवे :

. Sigiriya : M. M. Ananda Marasinghe
http://www.archaeology.gov.lk/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा