रविवार, १९ मार्च, २०२३

श्रीलंका : डांबुला येथील बौद्ध लेणी

 बौद्ध धर्म आणि डोंगरात कोरलेल्या लेणी यांच्यात एक घट्ट नाते आहे. भारतीय उपखंडातील बहुतांश लेणी या बौद्ध धर्माशी निगडीत आहेत. बौद्ध लेणी म्हणजे थोडक्यात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या भिक्खुसाठी बनवलेले निवासस्थान. बौद्ध लेणी समुहात विशेषकरून विहार, प्रार्थनास्थळ, भिक्खुसाठी निवासस्थान, स्वयंपाकगृह आदींचा समावेश असायचा. अशा अनेक लेणी समुहात गौतम बुद्धाच्या कोरलेल्या मुर्ती पाहण्यास मिळतात. गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना चारही दिशांना धर्मप्रचारासाठी पाठवले होते. हे शिष्य अर्थात भिक्खु वर्षभर बुद्धाने सांगितलेल्या मार्गाने धर्म प्रसार करत आणि पावसाळ्यात सर्वजण डोंगरात कोरलेल्या लेण्यात वास्तव्यासाठी येत. या ठिकाणांना विहार, संघराम किंवा बौद्ध मठ असे देखील संबोधतात. या विहारातून बौद्ध धर्माचे शिक्षण देखील देण्यात येत असे. भारतात, खास करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बौद्ध लेण्या आढळतात. यात वेरुळ, अजंठा, कान्हेरी, कार्ले आणि घारापुरी आदी महत्त्वाच्या लेणी समुहांचा समावेश होतो. यातील कुठल्या ना कुठल्या लेणी समुहास आपण नक्कीच भेट दिलेली असणार. भारताबाहेर विविध देशात देखील बौद्ध लेण्या आढळतात. त्यात आपल्या शेजारच्या श्रीलंका देशाचा समावेश होतो. 


डंबुला बौद्ध लेणी 

श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील मातले जिल्हात डांबुला शहराजवळील डोंगरात असाच एक लेणी समुह आहे. त्याचा युनेस्कोने १९९१ साली जागतिक वारसा स्थळात समावेश केलेला आहे. डांबुला लेणी समुह हा श्रीलंकेतील सर्वात मोठा लेणी समुह असून त्याचे उत्तम रित्या संवर्धन करण्यात आलेले आहे. डांबुला शहराच्या जवळपास ८० लेणी असल्याचा उल्लेख आहे पण त्यातील रणगिरी येथील पाच लेण्यांचा समुह हा मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. या पाच लेण्यांचे एकूण क्षेत्रफळ हे २१०० चौ. मीटर इतके असून हा समूह डोंगर पायथ्यापासून जवळपास १६० मीटर उंचीवर आहे. या लेणी समुहात एकूण १५३ बुद्ध मुर्ती आहेत. याबरोबर तीन मुर्ती या श्रीलंकेच्या राजांच्या असून चार मुर्ती या हिंदू देवता विष्णू व गणेश यांच्या आहेत. गौतम बुद्धाच्या विविध मुद्रा येथील मुर्तीतून पहाण्यास मिळतात.

गौतम बुद्धाची प्रतिमा 

डांबुला लेण्यांची निर्मिती श्रीलंकेचा राजा वत्तागामिनी अभया याने इ. स. पुर्व पहिल्या शतकात केली. द्रविड आक्रमणामुळे वत्तागामिनी राजाने जवळपास १५ वर्षे भूमिगत होऊन याठिकाणी वास्तव्य केले होते. अनुराधापूरावर पुन्हा राज्य स्थापन केल्यानंतर वत्तागामिनीने (इ. स. पुर्व ८९ - इ. स. पुर्व ७७) या लेण्यांना मूर्त रूप देऊन तिथे बौद्ध विहार बनवले. वत्तागामिनी राजाने या लेण्या बनवण्यापुर्वी येथे काही लेणी या नैसर्गिक होत्या आणि त्यांचा वापर हा बौद्ध भिक्खुंकडून साधनेसाठी होत होता असे याठिकाणी आढळलेल्या ब्रह्मी लिपीतील शिलालेखातून अधोरेखित होते. या लेण्यांच्या छतावर आणि भिंतीवर सुंदर चित्रकारी केलेली आहे. ही चित्रे गौतम बुद्धाच्या आयुष्याशी संबंधित आहेत तर काही चित्रे ही श्रीलंकेच्या इतिहासावर साकारलेली आहेत. 

लेण्यातील भिक्तिचित्र

वत्तागामिनी राजाच्या कालखंडानंतर हा लेणी समुह प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून उदयास आले. विविध कालखंडातील राजांनी या लेणी समुहाचा जिर्णोद्धार केला. पोलोननरुवाचा राजा निशंका मल्ला (इ. स. ११८७-११९६) याने याठिकाणी अनेक बौद्ध मुर्ती कोरल्या तर लेण्यातील चित्रांवर त्याने सोनेरी मुलामा दिला. यानंतर या लेणी समुहास 'सुवर्णगिरी गुहा' असे नामकरण केले गेले.

या लेणी समुहाचा खालील राजांनी जिर्णोद्धार केला

Koota Kanna Thissa (BC 44-20)
Maha Vijayabahu (1056-1114)
Sri Nissabkamalla (1187-1196)
Vikrambahu (1360-1374)
5th Buwanekabahu (1374-1408)
1st Vimaladarmasuriya (1592-1604)
Senarath (1604-1635)
2ed Vimaladarmasuriya (1667-1707)
Keerthi Sri Rajasingha (1747-1782)
Rajadhirajasingha (1782-1798)

लेण्यातील भिक्तिचित्र

देवराजा विहार (लेणी क्रमांक १)
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या हाताला ही पहिली लेणी आहे. या लेणीत गौतम बुद्धाची महापरिनिर्वान स्थितीतील ४७ फूट लांबीची मुर्ती आहे. या लेणीत हिंदू देवता विष्णूचे मंदिर देखील आहे.

महाराजा विहार (लेणी क्रमांक २)
ही डांबुला लेणी समुहातील सर्वात मोठी लेणक आहे. या लेणीस दोन प्रवेशद्वार असून आतमधील छतावर सुंदर चित्रे काढलेली आहेत. या लेणीत बुद्धाच्या एकूण ५६ मुर्ती आहेत. यातील ३९ मुर्ती या बसलेल्या मुद्रेत आहेत तर १६ या उभ्या स्थितीत आहेत. या लेणीत एक धातूचे मोठे भांडे असून त्यात छतातून कायमस्वरूपी पाणी गळत असते.

निद्रिस्त गौतम बुद्धाची प्रतिमा 

निद्रिस्त गौतम बुद्धाची प्रतिमा 

महाअलूथ विहार (लेणी क्रमांक ३)
इ. स. १७४७ किर्ती श्रीराजासिंघा राजाने या लेणीची निर्मिती केली. या लेणीत बुद्धाच्या एकूण ५७ मुर्ती आहेत. यातील ४२ मुर्ती या बसलेल्या मुद्रेत आहेत,१४ या उभ्या आहेत आणि एक मुर्ती निद्रिस्त स्थितीत आहे.

पश्चिम विहार (लेणी क्रमांक ४)
या लेणीची निर्मिती देखील वत्तागामिनी राजाने केलेली आहे. लेणीत बुद्धाच्या एकूण २१ मुर्ती आहेत. यातील १९ मुर्ती या बसलेल्या मुद्रेत आहेत तर २ या उभ्या आहेत स्थितीत आहेत.

बुद्ध प्रतिमा  


डांबुला लेण्यांसमोरील बोधी वृक्ष 

डांबुला स्वर्ण मंदिर 

डांबुला भौगोलिक स्थान 

डांबुला येथील लेण्यांचा पॅनोरमा फोटो 


डांबुलायेथील लेण्यांचा नकाशा 
डांबुला लेण्यातील विविध ब्राह्मी लिपीतील शिलालेख 



संदर्भ : Dambulla Cave Temple, M. M. Ananda Marasinghe

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा