बुधवार, ७ एप्रिल, २०२१

२०२१/ बखर

२०२१/ बखर ४ : कॅपिटाॅल वर हल्ला
७ जानेवारी २०२१
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसऱ्या कार्यकाळासाठी अध्यक्षीय निवडणूकीत झाला. हा झालेला पराभव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी आज राजधानी वाॅशिंग्टन येथील कॅपिटाॅल इमारतीवर (अमेरिकेचे संसद भवन) ताबा मिळवून तोडफोड केली. यावेळी प्रदर्शन करणाऱ्या ट्रम्प समर्थक व पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला. जगाला लोकशाहीचे धडे देणाऱ्या अमेरिकेसारख्या विकसित देशात लोकशाही अशाप्रकारे पायदळी तुडवली गेल्यामुळे या देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. ३ नोव्हेंबर २०२० ला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष व रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता.
●●●

२०२१/बखर ५ : भंडारा अग्नितांडव
१० जानेवारी २०२१
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागाला रात्री शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात भरती असलेल्या १७ नवजात बालकांपैकी १० बालकांचा यात गुदमरून मृत्यू झाला तर ७ बालकांना वाचवण्यात आले.
●●●

२०२१/ बखर ६ : कोरोना लसीकरण
१७ जानेवारी २०२१
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ची 'कोव्हिशिल्ड' आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक ची 'कोव्हॅक्सिन' या लसींना केद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर देशभर कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. लसीकरण मोहिमेची औपचारिक सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस व सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

जगभरात कोरोना विषाणू विरूद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. जगभरातील विविध देशात वेगवेगळ्या लसी देण्यात येत आहेत. काही महत्त्वाच्या लसींची यादी
१. माॅडर्ना व्हॅक्सिन (अमेरिकेत वापर)
२. फायझर-बायोटेक व्हॅक्सिन (विविध देशात वापर)
३. स्पुटनिक पाच (रशियात वापर)
४. ऑक्सफर्ड एस्ट्राझेनिका (विविध देशात वापर)
५. सायनोफार्म (चीनसह विविध देशात वापर)
६. कोरोनाव्हॅक (ब्राझीलमध्ये वापर)

यात फारझर-बायोटेक ची लस खूप लोकप्रिय झाली आहे.
●●●

२०२१/ बखर ७ : नवे राष्ट्राध्यक्ष
२० जानेवारी २०२१
अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन यांचा मोठ्या थाटात शपथविधी संपन्न झाला. उपाध्यक्ष म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी शपथ घेतली. विषेश म्हणजे ज्या कॅपिटाॅल इमारतीवर काही दिवसांपूर्वी गोंधळ घातला होता तिथेच हा सोहळा संपन्न झाला. दोघांना अमेरिकेचे सर न्यायाधीश जाॅन जी. राॅबर्ट ज्युनिअर यांनी शपथ दिली. जगभरात दुरदर्शनवर लाखो नागरिकांनी हा शपथविधी सोहळा बघितला.

कमला हॅरिस यांच्या तमिळनाडूतील तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू या मुळ गावी यावेळी उत्साहाचे वातावरण होते. या गावातील लोकांनी फटाके वाजवून आणि मिठाई भरवून आपला आनंद साजरा केला. कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपलन यांचे हे मुळ गाव. अजूनही त्यांचे अनेक नातेवाईक या गावात राहातात.
●●●

२०२१/ बखर ८ : सेन्सेक्सची पन्नास हजारी
२१ जानेवारी २०२१
मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकाने आज पहिल्यांदाच ५०,००० ची पातळी ओलांडली. गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात हाच निर्देशांक तीस हजारा खाली गेला होता. कोरोनाचे कमी होत जाणारे रुग्ण, उठवलेले टाळेबंदी आणि बाजारात आलेल्या विविध कोरोना लसींमुळे गुंतवणूकदार जोमाने शेअर खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
●●●
२०२१/ बखर ९ : शेतकरी आंदोलन आणि ट्रॅक्टर मोर्चा
२६ जानेवारी २०२१ 
गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब, हरियाणा येथील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन करत आहेत. ते केंद्र सकारने दिनांक २० सप्टेंबर २०२० रोजी मंजूर झालेल्या  वेगवेगळ्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात या आंदोलनाने आक्रमक रूप घेतले. विविध शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला. ऑक्टोबरपासून अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी अनेकवेळा चर्चा केल्या परंतु सर्व संघटना हे कायदे रद्द करण्याचा हट्ट धरत आहेत. 

या तीन कायद्यांची नावे
१. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०
२. शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा २०२०
३. अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) कायदा २०२०

शेतकरी या कायद्यांना विरोध करत असणारी कारणे
१. हे कायदे खासगी कंपन्यांना फायद्याचे आहेत
२. शेतकऱ्याचे नुकसान होईल
३. कृषी उत्पन्न बाजार समित्या हद्दपार होतील
४. उत्पन्नाला किमान आधारभूत किंमत मिळणार नाहीत
५. कंत्राटी शेतीमुळे कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करतील वगैरे

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यानी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत मोठा ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसाचाराचे गालबोट लागले.
●●●

२०२१/ बखर १० : बर्ड फ्लू
कोरोना विषाणूची साथ अजून ओसरली नसताना देशातील काही भागात बर्ड फ्लू पसरला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी मरत असल्याचे आढळून येत आहे. बर्ड फ्लू आल्याचे कळताच चिकनची मागणी घटली असून मटनाचे भाव वधारले आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात बाधित कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. कोंबड्यांसह या विषाणूमळे इतर पक्षी, उदाहरणार्थ कावळा, पारवा, मोर वगैरे मरत असल्याचे नोंदवले गेले आहे.
●●●

२०२१/ बखर ११ : डाॅक्टर रवी गोडसे, पेनसिल्व्हेनिया
"नमस्कार मी डाॅक्टर रवी गोडसे, पेनसिल्व्हेनिया, लोकमत करता लाईव्ह!" असं म्हणत गेली वर्षभर एक मराठी अमेरिकन डाॅक्टर समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. डाॅ. रवी गोडसे कोरोना विषाणू आणि लसी संबंधी फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून मराठी भाषेत महत्वाचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या बोलण्याच्या विनोदी शैलीमुळे ते महाराष्ट्रबर खूप लोकप्रिय झाले आहेत.
●●●

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा