मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

२०२१/बखर २ : कोरोनाची ओळख

२०२१/बखर २ : कोरोनाची ओळख

३ जानेवारी २०२१

कोरोना विषाणू अर्थात कोव्हिड-१९ हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू नाक, तोंड किंवा डोळ्यातून मानवी शरीरात प्रवेश करतो. एखाद्या बाधित व्यक्तीच्या खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे किंवा बोलल्यामुळे तो जवळपास असलेल्या इतर व्यक्तींना बाधित करू शकतो. त्याचबरोबर बाधित व्यक्ती शिंकल्यावर किंवा खोकल्यावर थुंकीचे जे तुषार बाहेर पडून आजूबाजूचा पृष्ठभाग किंवा वस्तू ते दुषित करतात. अशा पृष्ठभागावर किंवा वस्तूला जर स्पर्श करून तोच हात नाकातोंडाला किंवा चेहऱ्याला लावल्यास या विषाणूची बाधा होऊ शकते. हा विषाणू पृष्ठभागावर जवळपास ७२ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो.

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर ताप, खोकला, सर्दी, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. इतर लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी, घशात खवखव, जुलाब, वास न येणे, चव ओळखता न येणे किंवा पोटदुखी यांचा समावेश आहे. बाधित झाल्यानंतर ते लक्षण दिसेपर्यंतचा कालावधी हा दोन ते चौदा दिवसांचा असू शकतो. लक्षणे दिसेपर्यंत बाधित व्यक्ती अनेकांना संक्रमित करू शकतो. कोरोनाची बाधा झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसतात आणि बरेचदा तो साध्या औषधोपचाराने बरा देखील होतो. परंतु वृद्ध, आगोदरच व्याधी असलेले रुग्ण, जाड व्यक्ती, मधमेह, उच्च रक्तदाब  किंवा कमी रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्यांनाच्या जीवावर हा आजार बेतू शकतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता, श्वासोच्छ्वासास अडचणी, न्यूमोनिया किंवा इतर अवयव निकामी होणे असल्या कारणामुळे रुग्णांचा मृत्यू होतो. बाधित अनेक रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता पडते.

हा आजार होवू नये म्हणून खालील काही उपाय आहेत.
१. इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे (Social Distancing)
२. चेहऱ्यावर मास्क लावून तोंड व नाक झाकणे
३. नियमित साबणाने किमान २० सेकंद हात धुणे
४. एखाद्या पृष्ठभागाला किंवा वस्तूला हात लावल्यावर ते न धुतलेले हात चेहऱ्यावर न लावणे
●●●

२०२१/ बखर ३ : २०२० चा कोरोना कालखंड

५ जानेवारी २०२१
इ.स. २०२० हे वर्ष मानवी इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहील. यावर्षी कोरोना विषाणू "कोव्हिड-१९ (Covid19)" ची साथ जगभर पसरली. २०१९ च्या अखेरीस चीनच्या वूहान शहरात हा विषाणू सगळ्यात आधी सापडला. त्यानंतर काही महिन्यातच प्रवाशांमार्फत तो जगभर पसरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात तर त्याने संपूर्ण जगभर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. जागतिक आरोग्य संघटनेने याला साथीचा रोग ( Pandemic) म्हणून घोषित केले. या साथीच्या रोगाने लाखो लोकांचे प्राण घेण्यास सुरुवात केली. चीन पाठोपाठ इटली, फ्रान्स, स्पेन, ब्रिटन, अमेरीका, ब्राझील, भारत आणि इराण या देशात तर या विषाणूने हाहाकार माजवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० पासून पुढील २१ दिवस भारतभर संपूर्ण टाळेबंदीची घोषणी केली. टाळेबंदी म्हणजे एकप्रकारची संचारबंदी होती. या टाळेबंदीमुळे अनेक लोकांचे आतोनात हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले. परप्रांतीय मजूरांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला. रेल्वेसेवा बंद झाल्याने अनेक जण अडकून पडले. यातील अनेकांनी पायी किंवा मिळेल त्या साधनांनी प्रवास सुरू केला. आर्थिक चक्र थांबल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचे दुरगामी परिणाम झाले. करसंकलन थंडावल्याने तिजोरीत खडखडाट झाला.

दुसरीकडे अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्य सेवांवर कमालीचा ताण आला. ठिकठिकाणी दवाखाने भरून गेले. सरकारला तात्पुरते दवाखाने उभारावे लागले. पोलिस दल व आरोग्य कर्मचारी अपुरे पडू लागले. यातील अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. दवाखान्यात गेलेले अनेक रुग्ण घरी परत आलेच नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना तर दवाखान्यातून थेट अत्यंतसंस्कार करण्यासाठी नेण्यात येत होते. त्यामुळे नातेवाईकांना आप्तस्वकीयांचे अंत्यदर्शन देखील घेता आले नाही. कोरोना विषाणूचा काळ खरोखरच माणसासाठी खूप कसोटीचा काळ होता. या भीषण साथीचा प्रभाव आता भारतात तरी कमी होतांना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा