१ जानेवारी २०२१
गेल्या शंभर वर्षांत माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उतुंग भरारी घेतलेली आहे. संगणक, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे, अवकाश संशोधन, आणि शिक्षण यासारख्या सगळ्याच क्षेत्रातील माणसाची प्रगती अचंबित करणारी आहे. शतकापूर्वीची आणि आजच्या परिस्थितीची तुलना केल्यास आपल्याला यातील जमिन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवेल. विसाव्या शतकात उपलब्ध असलेल्या कृष्णधवल फोटो किंवा चलचित्रफितीतून तेव्हाची आणि आजची परिस्थिती यात तुलना करता येवू शकते.
२०२१ ते २०३० या दशकाच्या नोंदी कुठेतरी लिहुन ठेवाव्यात असं मला वाटतं. जेणेकरून याचा कदाचित एखाद्या अभ्यासकाला येणाऱ्या कालखंडत फायदा होईल. आपण भारतीय आपल्या आजूबाजूचा इतिहास लिहून ठेवण्यात कुठेतरी कमी पडतो आहोत. जर घडलेल्या समकालीन घटनांची व्यवस्थित नोंद ठेवल्यास भविष्यात अनेकांचा या घटनांचे संदर्भ शोधण्यात मुळीच वेळ वाया घालावा लागणार नाही. तसं पाहिलं गेलं तर चालू घडामोडींचा नि:पक्षपणे नोंदी होणे खूप महत्वाचे आहे. मनात कुठलाच पुर्वग्रह न ठेवता असल्या नोंदीमुळे याला इतिहासाचे साधन म्हणून बघितले तर वावगे ठरू नये. मराठी भाषेत अशाप्रकारच्या नोंदी अलिकडच्या काळात कुणी करत असेल तर याची मला कल्पना नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी समकालीन नोंदी किंवा आधुनिक बखरी मराठी भाषेत लिहून ठेवणे माझ्यासाठी महत्त्वाचे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा