शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

दैनदिनी : देवा म्हातारीला बरं वाटू दे!

आता ह्या मालाबाई, मालाताई ऊर्फ मालाबया कोण? ह्या आमच्या थोर चुलत आजी. माझ्या आजीची तीन नंबरची जाऊबाई. म्हणजे या मालाताई माझ्या बालपणीच्या दुश्मन वगैरे नंबर वन. तर त्यांना गायीने मारले आणि त्या डोक्यावर पडल्या. मग दहा पंधरा दिवस काहीच झाले नाही. काल परवा वगैरे त्या बेशुद्ध पडल्या. मग त्यांना नगरला कुठल्यातरी हाॅस्पिटलमध्ये नेले. लोक म्हणतात त्या वाचण्याची गॅरंटी नाही. आधीच आता म्हातारपण आणि त्यात मुलगा चिकट भोकर. कुणी तब्यतीच्या चौकशीसाठी फोन वगैरे केला तर त्याचं एकच वाक्य, आत्तापर्यंत दोन लाख वगैरे लागले. म्हणजे याला आईच्या तब्यती पेक्षा अजून ही म्हातारी कितीला टाकतेय याची चिंता. म्हणजे कुणाचे काय? अन याचे काय? दोन लाख देऊन एकदम फरक पडतोच का? असा काय नियम आहे का?

या म्हातारा म्हातारीचा याने शासनाकडून पैसा मिळवण्यासाठी वगैरे खूप उपयोग केला. उदाहरणार्थ कुणाच्यातरी पडक्या घरापाशी उभे करून या दोघांचा फोटो काढला आणि इंदिरा आवास योजना की काय त्याच्यासाठी अर्ज भानगडी केल्या. घरी भरपूर जमीन तरी पण निराधार की भूमिहीन दाखवून ह्याने त्यांचे डोल चालू केले. असो. आपल्या काय बापाचे जातयं पण म्हातारपणात कप भर चहा प्यायची ह्या म्हातारा म्हातारीची सत्ता राहिली नाही. सून जे उष्टे-पाष्टे, शिळे-पाके इत्यादी खाऊ घालते त्यावरच यांची पोटं.

आपलं कधी या म्हातारीशी जमलं नाही. आपूण शाळेत असतांना हिच्याशी खूप भांडायचो वगैरे. म्हणजे ही बाई फार भामटी. एकमेकांच्यात भांडणे लीलया लावून देण्यात हिची कला. म्हणजे हिने अनेकांच्यात भांडणे लावून दिली. आमच्या घराची आणि हिच्या घरची भिंत एकच. हिचा रोख जेंव्हा आमच्या घराकडे असायचा तेंव्हा मी बुरूज होऊन उभा वगैरे रहायचो. मग आमची लढाई ठरलेलीच. तिला कधी आमच्या घरात ढवळा ढवळ करू दिली नाही. असो.

आपल्याला जूनी माणसं फार आवडतात. कारण की, ही माणसं आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि इलाख्याचा चालता बोलता जीवंत इतिहास असतात. आज मला मालाताईची फारच कीव आली. म्हणजे उष्टे, शिळेपाके खाण्याची वेळ आपल्या दुश्मनावरही येऊ नये. आपण तिच्या तब्यतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. नातू म्हणाला की म्हातारी कोमात आहे.

आपली जरी दुश्मन असली तरी पण तिला चांगले बरे वाटावे हीच माझी इच्छा. परत एकदा या म्हातारीशी भांडाण्याची माझी दिली ख्वाईश आहे. म्हणून देवा म्हातारीला बरं वाटू दे!

~ गणेश
(१४.१०.२०१६)

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

दैनंदिनी

पहाटेचा साडे चारचा अलार्म वाजला. काल मनाशी फारच निश्चय करून वगैरे झोपलो होतो. असा निश्चय गेल्या वर्षभर करतोय. पण साडे चारचा अलार्म वाजून वाजून कंटाळतो अन बंद होतो. परंतू आजचा माझा निश्चय फारच थोर वगैरे. आज उठलोच. हो चक्क. पायात जोडे चढवले आणि घराबाहेर पडलो. पहाटे रस्त्यावरून जातांना एसी चा आवाज येत होता. आता दुबईत हे अजून एक विशेष. हर खोली गणीक एक एसी. त्या सर्व एसी चा आवाज एकमेकांत मिसळून कसलातरी मोठ्या वादळा सारखा भासत होता. थोडेसे पुढे आल्यावर कचरा कुंडीवर दोन मांजरे पेंगळून पडली होती. गल्ली ओलांडून थोडसं पुढे गेल्यावर मेन रस्ता. तिथे मात्र गडबड वाटली. सकाळी बांधकामाच्या कामावर जाणारे कामगार हातात हेलमेट व पिशवीत काहीतरी वगैरे घेऊन निघाली होती. त्यात पाकिस्तानी लोक जास्त. एवढ्या पहाटेही एखाददुसरी गाडी सिग्नलवर थांबत होती. हे फारच थोर. म्हणजे आपल्या पुण्या मुंबईत एकतर असल्या भल्या पहाटे कोन सिग्नलवर थांबतो वगैरे. मग मी खरोखरच पार्कला पळत दोन फेऱ्या मारल्या. हवा फारच छान होती. घरी आल्यावर फारच फ्रेश वाटले.

मग सहा वाजता आक्कासाहेब उठल्या. तसे त्यांना रोज बळजबरीने उठवावे लागते. मग अंघोळ करेपर्यंत इकडून चहा नाष्टा बनवून तयार होता.  इकडची स्वारी म्हणजे देवाने दिलेली मोठी देणगी. असो. आज टिफीनला बिस्कीटं होती त्यामुळे आक्कासाहेब फार खुश. आवरून आम्ही दोघेही निघालोत. आक्कासाहेबांनी इकडे निघतांना हात जोडून नमस्कार केला. खाली गेल्यावर आक्कासाहेबांची बेबी फिंगर  बस आली ( आपल्या इंग्रजीत मीनी स्कूल बस ). मला बाय बाय वगैरे बोबड्या बोलात करून त्या खाडीत बसल्या. मग मी मेट्रो अन मेट्रोतून ऑफीसात आलो.

आज दिवसभर कामाचा ताप. ऑफीसामधल्या त्या भंकस मिटींगा म्हणजे नुसता वैताग. म्हणजे काय तर एक डिपार्टमेन्ट दुसर्‍या डिपार्टमेन्टवर चिखलफेक वगैरे. मग ते फिल्टर कसे बसवायचे. त्यात छिद्र पाडून तो प्रोब की काय कसा घालायचा. यावर थोर इंजिनियरची संभाषणे. आपण नूसतच मान डोलवत त्यांचे चेहरे पहात बसलो. त्यांच्यात मी माझ्या कथेसाठी कोणी नायक मिळतो काय? आणि मिळाला तर त्याचे संवाद हे असेच लिहायचे वगैरे या विचारात मी मिटींग घालवली. वाळवंटात झरा सापडवा तशी ही ऑर्डर मिळाली. तहानलेली सगळीच यावर तुटून पडली. आपण सूम मध्ये. कारण हे काम म्हणजे किस झाड की पत्ती वगैरे.

साडे पाच वाजले. आपण वेळेला फार प्रामाणिक. एक मिनिट उशीर झाल्याला चालत नाही. मग मेट्रोने घरी. घरी आल्यावर परत जाॅगींग. सकाळी भेटलेल्या मांजरी ताज्या तवाण्या होऊन कचारा कुंडीवर मस्तपैकी बसून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडे पहात होत्या. मी मग पार्कला फेर्‍या वगैरे मारल्या. घरी आल्यावर आक्कासाहेब त्यांच्या इंग्रजी कम मराठी असल्या कसल्यातरी भाषेत आज शाळेत घडलेले प्रसंग सांगत होत्या. 

~ गणेश
(१२.१०.२०१६)

कविता : यजीदी संभोग

काळ्या श्वापदांच्या कळपाने घेरून ठेवलेल्या खंडरातील
अतृप्त संभोग गृहात बंदिवान झाल्या कित्येक नाजूक पर्‍या
होत्या त्यात चिमुकल्या आणि किशोरवयीन उमलत्या कळ्या

विवस्त्र करून करकचून आवळलेल्या त्यांच्या देहाचा
आस्वाद घेण्यासाठी लागलेल्या लांबलचक बारीत
लिंग ताठर करून उभी होती पिसाळलेली श्वापदे

अविरत चालणार्‍या बलात्कारामुळे गतप्राण झाल्यात सर्व
त्यांच्या फुटलेल्या हंबरड्याने भिंतीनांही तडे गेलेत
आणि ओरडून ओरडून देह चेतना हरवून बसलाय
मरणाच्या उंबरठ्यावर असलेले त्यांचे आत्मे
मोठ्याने किंचाळत आहेत......

मयुरेश्वरा! मयुरेश्वरा!
हे मयुरेश्वरा!.......

मृत्यूवर आमचा हक्क असतानाही
त्याने का पाठ फिरवली आहे रे?
आम्हाला मृत्युच्या कवेत घेऊन झेपवण्यास  
तुझे पंख आज कसे शक्तीहीन झाले आहेत?
अजून किती लिंगाचा मारा भोगावा लागेल?
म्हणजे कठोर बनलेल्या मृत्यूचे मन वितळेल
आणि आम्हाला घेऊन उडशील या रेताडातून दूर कुठेतरी.....

आणि जाताना फक्त तुझा मुलायम मोरपीस
एकदाच अंगावरून फिरवत तुझी तरी माया लाभूदे आम्हाला

आम्ही यातना भोगताना त्या यातनांनाही यातना झाल्या असतील रे!
आमच्या सहनशीलतेने एवढी उंची गाठलीय की
आता इच्छा असूनदेखील यातनेच्या खोल डोहात बुडताही येत नाही
वासनेच्या बिछायतीवर आमच्या देहाच्या मखमली झालरी
लोंबकळत आहेत किती दिवसापासून (?)

वस्रहीन आमच्या योनी सताड उघड्या आहेत
सर्वांनाच उपभोगण्यासाठी ........
त्यातून त्यांच्या वीर्याचा झरा अखंड वाहत आहे
स्तनं, गाल, ओठ, कान, मान अशा सर्व सर्व अंगावर
त्यांनी दाताने असे चावे घेतलेत की ते कधीही मिटणार नाहीत  
आमच्या अंगाची चाळणी करून ठेवलीय या धर्मवीरांनी (?)

विधात्या मयुरेश्वरा!
आम्हा यजीदी कळ्यांनी काय रे असा अपराध केला होता?
वाळवंटात फुलायचे होते, हा काय अपराध झाला?
यजीदी म्हणून जन्माला आलो, हा काय अपराध झाला?

श्वापदांच्या मगर मिठीतून आम्हाला आता सुटायचे आहे
आणि मृत्यूच्या गुलाबी आलिंगनात घुसायचे आहे


सोडव रे! आम्हाला सोडव....
या यजीदी संभोगातून सोडव......

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

तू भ्रमत आहासी वाया (वपु काळे)


प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे.

तैसी हे जाण माया|
तू भ्रमत आहासी वाया|
शस्त्री हाणीतलीया छाया|
जैसी अंगी न रूपे||

या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी निर्माण करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.

सायरा आपल्या प्रेमभंगा नंतर सावरते. नवीन आयुष्य जगते. जगत असतांना आपल्या सहकारी व बाॅसचेही आयुष्य पार बदलून टाकते. धर्माने मुस्लिम असणाऱ्या पण स्वतःला निधर्मी समजणारी सायरा शिक्षणासाठी आपले घर सोडते. प्रा. मंडलिकांच्या मदतीने आपले शिक्षक पूर्ण करते. या शैक्षणिक जीवनात तिच्या आयुष्यात समीर नावाचा प्रियकर येतो. पैशाच्या मागे धावणारा हा प्रियकर तिला सोडुन जातो आणि येथूनच सायरा बदलून जाते. कायमची. आपल्या बरोबर ती ओंकारनाथलाही बदलून टाकते.

नातरीं येथिचा दिवा|
नेलिया सेजिया गांवा|
तो तेथें तरी पाडवा|
दीपचि की||

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसर्‍या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म असतो. तसेच सायरासारखी काही उत्तुंग व्यक्तिमत्व असतात. त्या दिव्यासारखी ती सहवासात येणाऱ्या आपल्या अहंकारी बाॅस ओंकारनाथचे आयुष्य उजळून टाकते.
ही वाचकांना अंतर्मुख करणारी कादंबरी आहे त्यामुळे एकदातरी ही नक्की वाचावी.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं (पान १)
२. सांत्वन म्हणजे दुःखाचे मूल. मूल आईपेक्षा मोठे कसे होईल (पान १)
३. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करू शकतो. (पान ३)
४. प्रचिती आली की ती तुमची तत्वं होतात आणि तुमची तत्वं  इतरांसाठी थेअरी होतात. (पान ४)
५. प्रवाहाला साथ देणारी व्यक्ती फक्त सागराशी एकरूप झाल्यावर तृप्त होते. पण समर्पणाचं धाडस नसलं म्हणजे जात-पात, समाज, आर्थिक परिस्थिती, तारतम्य, विवेक असे किनारे सापडतात. (पान ११)
६. स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती (पान ४६)
७. वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. (पान ४६)
८. जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे. (पान ५५)


प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
प्रथमावृत्ती : २५ डिसेंबर १९९२
पाने : ८४
किंमत : ९०

~ गणेश