गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
सोमवार, २२ मे, २०२३
सहाम खोऱ्यातील कातळचित्रे (Petroglyphs of Wadi Saham, Fujairah)
सोमवार, ८ मे, २०२३
हायस्कूलचे दिवस
१९९२ साली मी अमरापूर हायस्कूलला इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी हायस्कूलला पश्चिमाभिमुखी पत्र्याच्या खोल्यांचे वर्ग आणि तीन उत्तराभिमुखी स्लॅबचे अपुर्ण बांधलेले वर्ग होते. शाळेला बोर्डिंग देखील होते. एका ग्रामीण भागातील शाळेत ज्या सुविधा असाव्यात त्या सगळ्या सुविधा आम्हाला हायस्कूलमध्ये मिळत असत. शाळेला प्रशस्त मैदान होते. प्रयोगशाळेचे साहित्य होते तसेच ग्रंथालय देखील होते. त्याकाळी शिक्षकांविषयी सगळ्यांनाच आदरयुक्त भीतीचे वातावरण असे. गृहपाठ न करणार्या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद खावा लागत असे. लवांडे सर, गरड सर, पुजारी सर, खोले सर, बेहळे सर, भिसे सर, वावरे सर असे आदर्श शिक्षक आम्हाला लाभले. त्याच बरोबर वांद्रे सर आणि कांबळे सर यांच्यासारखे आदर्श आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापकही लाभले. तुपे सर क्लार्क म्हणून काम बघत असत. आराख मामा, औतडे मामा, लवांडे मामा आणि वांढेकर मामा या सारखे प्रेमळ शिपाई त्यावेळेस हायस्कूलवर कार्यरत होते.
सगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी होती. पुजारी सर आणि बेहळे सर शिकवताना खूप विनोद करत आणि संपूर्ण वर्गाला नेहमीच हसवत असत. बेहळे सर आम्हाला विज्ञान विषय शिकवायचे. बेहळे सरांना आध्यात्माची खूप आवड होती. ते स्वतः एक उत्तम कीर्तनकार देखील होते. लवांडे सर आम्हाला समाज अभ्यास शिकवायचे. ते पाचवी ते सातवीपर्यंत माझे वर्गशिक्षक होते. आम्हाला खोले सरांची अतिशय भीती वाटत असे, कारण ते इंग्रजी विषय शिकवायचे. वावरे सर हिंदी आणि खेळाचे शिक्षक होते. वावरे सरांनी शाळेत अनेक खेळाडू घडवले. खो-खो आणि कबड्डी या मैदानी खेळाकडे आमचा फार ओढा असायचा. भिसे सर माझे आठवी ते दहावीपर्यंत वर्ग शिक्षक होते. ते आम्हाला गणित विषय शिकवायचे.
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट व्यतिरिक्त शाळेत विविध सण आणि उत्सव साजरे केले जात असत, त्याच प्रमाणे विविध स्पर्धा आणि शैक्षणिक सहली देखील आयोजित केल्या जात. शाळेत दहा दिवसाचा गणपती बसवला जायचा. सकाळी प्रार्थनेच्या वेळी आरती केली जाई. रोज एक वर्ग आरतीसाठी प्रसाद म्हणून घरून मोदक बनवून आणायचे. रोज सकाळी मोदक खायला मिळायचे. काही विद्यार्थी मुद्दाम साखरे ऐवजी मोदकात मीठ किंवा मिरचीचा ठेचा घालत असत. हायस्कूलमध्ये रक्षाबंधन साजरा करण्याची देखील त्यावेळी प्रथा होती. प्रत्येक वर्गात त्यावेळी दत्ताचा फोटो असे. दर गुरूवारी पहिल्या तासाला दत्ताची आरती केली जात असे. क्रमाक्रमाने प्रत्येकाला आरतीसाठी प्रसाद आणावा लागे. याशिवाय विविध राष्ट्र पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जात असत. त्याच आमचा नेहमीच सक्रिय सहभाग असे.
आयुष्यातील यशात अमरापूर हायस्कूल मधील शिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. हायस्कूलमध्ये दाखल झालो तेव्हा बॅकबेंचर आणि ढ विद्यार्थी म्हणून माझी गणती होत असे. कालांतराने आमच्या आदर्श शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने मी १९९७ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो. त्यावर्षी मी शाळेत पहिला येण्याचा मान पटकावला. आज मागे वळून बघतांना ज्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतले ती परिस्थितीच आमच्या यशासाठी कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल. आज शाळेला सुसज्ज इमारत आहे. शाळा ज्ञान दानाचे आणि विद्यार्थी घडवण्याचे काम अखंडपणे करते आहे याचे कौतुक वाटते. भविष्यातही अमरापूर हायस्कूलने खूप प्रगती करेल आणि येथून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करत राहतील.
रविवार, २ एप्रिल, २०२३
गुदौरीतील हिमवृष्टीचा आनंद
जॉर्जिया भ्रमंती मधला आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा होता कारण आम्ही आज बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेणार होतो. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फवृष्टी अनुभवणार असल्याने आम्ही फार उत्साही होतो. सकाळीपासूनच तिब्लिसी शहरात पाऊस कोसळत होता. पावसामुळे तापमान शून्य अंशाच्या खाली आले होते. सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर गेलोत. चहा नाश्ता झाल्यावर रेस्टॉरंटच्या गच्चीवर जाऊन गारठ्याचा जरा अंदाज घेतला. बापरे! बाहेर कमालीचा गारवा होता. हात पाय लटलटायला लागले. आम्ही तर पटकन आत आलोत. तेंव्हाच जानवले की आज जरा जास्तच गरम कपडे घालावे लागतील. मी रूमवर आल्यावर शर्टवर स्वेटर आणि त्यावर टोपीचे जॅकेट घातले. कानटोपी, हातमोजे, असे साहित्यही बरोबर घेतले.
आजही ऐका आणि डेव्हिड आम्हाला बरोबर सकाळी दहा वाजता घेण्यासाठी हॉटेलवर आले. आजचा प्रवास जरा लांबचाच होता. म्हणजे संपूर्ण दिवस आमचा फिरण्यातच जाणार होता. सकाळी तिब्लिसी शहर पावसात न्हाऊन निघाले होते. रहदारीचे नियम सगळीकडे पाळले जात होते. कर्णकर्कश हॉर्न कुठे वाजवतांना जाणवले नाही. एक गोष्ट मला प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते ती म्हणजे जॉर्जियात दोन्ही बाजूने ड्रायव्हींग करणाऱ्या गाड्या होत्या. मला हे जरा विचीत्रच वाटले. एखाद्या देशात एका विशिष्ट पद्धतीचीच ड्रायव्हींग असतं, उदाहरणार्थ डावीकडून किंवा उजवीकडून. जशी भारतामध्ये उजव्या हाताला ड्रायव्हर सीट असते. पण जॉर्जिया मध्ये मिस्त्र प्रकारची ड्रायव्हिंग होती. बहुतांश गाड्यांचे ड्रॉयव्हर सीट हे डाव्या हाताला होते तर तुरळक गाड्यांचे ड्रायव्हर सीट हे उजव्या बाजूला होते, तरीही सगळीकडे डव्या हाताच्या ड्रायव्हींगचे नियम पाळले जात होते.
कुरा नदीच्या किनाऱ्यावरून वळणे घेत गाडी तिब्लिसी शहराबाहेर पडत होती. कुरा नदीचे हिरवेगार पाणी आणि त्यावरील विविध पूल नजर वेधून घेत होते. गाडीत डेव्हिडने जॉर्जियन भाषेत गाणी लावली होती. त्या भाषेतील गाणी न समजणारी होती पण त्याचे संगीत खूप छान होते. म्हणतात ना सांगितला भाषा नसते. गाडी तिब्लिसी शहराबाहेर पडली, तसे आम्हाला पांढरे डोंगर दिसायला लागले. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या टपावर बर्फाचे मोठे थर दिसत होते. म्हणजे जवळपास बर्फवृष्टी चालू होती. सकाळी ऐकाने सांगितले होते की, बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत त्यामुळे पुढे काझबेगि याठिकाणी जायला जमणार नाही. आजच्या नियोजनानुसार आम्ही अनानुरी किल्ला आणि चर्च, गुदौरी स्की रिसॉर्ट, रशिया-जॉर्जिया सीमा आणि काझबेगि याठिकाणी जाणार होतो.
आमची गाडी एव्हाना शहर सोडून बरीच लांब आली होती. पावसाचे थेंब आता बर्फात रूपांतरित होतांना दिसत होते. काही वेळाने बर्फवृष्टीची तीव्रता वाढत गेली आणि सगळीकडे फक्त बर्फाची पांढरी चादर दिसू लागली. बर्फाचे कण अलगद जमिनीवर पडत होते. डेव्हिडने काहीतरी खाण्यासाठी गाडी एका रेस्टॉरंटवर थांबवली. तसा मी बाहेर आलो. अतिशय थंड हवा, आकाशातून होणारी बर्फवृष्टी हे वातावरण खरोखरच अवर्णनीय असेच होते. मी हातमोजे गाडीतच विसरलो होतो. माझी बोटं गारठ्याने थिजायला लागली म्हणून मी चटकन गाडीत शिरलो. तोपर्यंत माझ्या कानटोपीवर बर्फाचे शिंपण झाले होते. काही अंतर गेल्यावर सगळीकडे नुसता बर्फच बर्फ दिसत होता. घरं, गाड्या, झाडं सगळी बर्फाखाली बुजली जात होती. निष्पर्ण झालेल्या झाडांना जणू बर्फाची पालवी फुटली होती. काही रहिवाशी आपल्या दरातील बर्फ खोऱ्याने बाजीला सारून येजा करण्यासाठी रस्ता बनवत होते. काही लोक आपल्या अडकलेल्या गाड्यासमोरील बर्फ हटवून मार्ग बनवत होते. रस्त्याकडेच्या गावातील लोक अंदाजे दोन फुटापर्यंत साचलेल्या बर्फातून येजा करत होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. पुढे रस्ता बंद असल्याने मालाचे अनेक ट्रक मधेच अडकून पडले होते. हा रस्ता पुढे रशियाला जात होता. कदाचित हा व्यापारी मार्ग असावा.
गुदौरीत पर्यटकांची गर्दी होती. जिकडे तिकडे बर्फाच्या छोट्या मोठ्या टेकड्या तयार झाल्या होत्या. बुलडोझर रस्त्यावर पडलेला बर्फ बाजूला सारून रास्ता मोकळा करत होते. इमारतींची फक्त दारं उघडतील एवढीच जागा शिल्लक होती. बाकी सगळीकडे बर्फाने त्यांना झाकून टाकले होते. या इमारती जणू बर्फाच्या गुहा भासत होत्या. बर्फवृष्टी मात्र थांबत नव्हती. आम्हाला स्कीईंग रिसॉर्टवर जवळ सोडण्यात आले. तासाभरात स्कीईंग रिसॉर्टची भेट आटपून परत सोडले त्याच ठिकाणी भेटा, आणि लवकरात लवकर येथून आपल्याला निघावे लागेल नाहीतर येथे आपण अडकून पडू असे आम्हाला ऐकाने बजावले. गाडीच्या खाली उतरल्यावर मला तर हुडहुडीच भरली. आमचे पाय बर्फात फसत होते. आम्ही वाट काढत स्कीईंग रिसॉर्टवर पोहचलो. तिथे विविध देशातून आलेले असंख्य पर्यटक स्कीईंगचा आनंद घेत होते. तिथे आम्हाला जॉर्जियात MBBS शिकत असलेल्या मराठी मुलामुलींचा मोठा ग्रुप भेटला. जॉर्जियामध्ये अनेक भारतीय, विशेषतः मराठी विद्यार्थी हे MBBS शिकण्यासाठी येतात.
जॉर्जियातील अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च
ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटी हा जाॅर्जियाचा अधिकृत राष्ट्रीय धर्म आहे. लोकसंख्येच्या जवळपास ८५% नागरीक हे या धर्माचे आहेत. सोव्हिएत युनियन वगळता प्राचीन काळापासून सर्वच राज्यकर्त्यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीला अधिकृतपणे राष्ट्रीय धर्माचा दर्जा दिल्याने येथे त्या धर्माशी निगडीत प्राचीन खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. या प्राचीन खुणा म्हणजे जाॅर्जियन बनावटीची अप्रतिम ऑर्थोडॉक्स चर्च. ही सर्व चर्च म्हणजे वास्तुशास्त्रातील आश्चर्य म्हणावे लागतील. यातील काही चर्चचा युनेस्को जागतिक वारसा स्थळात समावेश झाला आहेत.