वादी सहाम कातळचित्रे
सहाम खोरे अथवा 'वादी सहाम' हे फुजैरा शहरापासून पश्चिमेला असलेल्या हाजार डोंगर रांगेत स्थित आहे. फुजैरा शहरापासून वादी सहामचे अंतर अंदाजे १७ किलोमीटर आहे. वादी सहाम हे आपल्या निसर्गरम्य आणि सोप्या चढाईसाठी युएईतील गिर्यारोहकांचे (Hikers) आवडते ठिकाण आहे. वादी सहामच्या डोंगरा मधून पावसाळ्यात वाहणारा झरा हे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्र असते. जवळपास ४५० मीटर चढाई केल्यानंतर आपल्याला डोंगर माथ्यावर पोहचता येते. मथ्यावरून पुर्वेला असलेल्या फुजैरा शहराचे आणि आरबी समुद्राचे विहंगम दृश्य बघायला मिळते.
वादी सहाम हे जरी निसर्गरम्य चढाईसाठी प्रसिद्ध असले, तरी ते अजुनही एका कारणासाठी अनेकांच्या आवडीचे ठिकाण आहे. आणि ते कारण म्हणजे वादी सहाम येथील प्राचीन कालखंडातील कातळचित्रे (पेट्रोग्लिफ्स/Petroglyphs). वादी सहामचा आजूबाजूच्या परिसरात इ.स. पुर्व १३०० ते इ.स. पुर्व ३०० दरम्यान मानवी वस्ती असल्याच्या खाणाखुणा बघायला मिळतात. वादी सहामच्या पायथ्यालगत एक प्राचीन मार्ग आहे. या मार्गच्या बाजूलाच एका भल्या मोठ्या उभट त्रिकोणी कातळावर अनेक चित्रं रेखाटलेली पाहायला मिळतात. युएईचा प्राचीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी या कातळचित्रांचे विषेश महत्त्व आहे. या कातळचित्रांवरून प्राचीन काळी येथे राहणाऱ्या लोकांविषयी बहुमोल माहिती मिळते. ही कातळचित्रे ताम्र युग आणि लोह युग कालखंडात साकारण्यात आली असावीत, असा संशोधकांचा दावा आहे. फुजैरा अमिरातच्या पुरातत्व विभागच्या माहितीनुसार, फुजैरा राज्यात आजगायत जवळपास ३१ ठिकाणी कातळशिल्पे/कातळचित्रे आढळून आलेली आहेत. त्यात वादी सहाम मधील कातळचित्रांचा समावेश आहे.
वादी सहाम येथील त्रिकोणी कातळाच्या चारही बाजूंनी जवळपास तीस वेगवेगळी चित्रं रेखाटलेली आहेत. काळाच्या ओघात अनेक चित्रं ही आता अस्पष्ट झालेली आहेत. या चित्रात साप, मानव, घोडेस्वार, विविध प्राणी आणि चिन्हे तसेच इंग्रजी टी (T) आकाराचा समावेश आहे.
वादी सहाम कातळचित्रे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा