शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

माझी दिवाळी

आज दिवाळी सण होता. मी सकाळी उठून कामावर जाण्यासाठी स्नान (अभ्यंग नव्हे) केले. मेट्रोत बसण्याआधी मल्लूच्या हाटलीत दाबून फराळ खाल्ले (तीन इडल्या, वाटीभर सांभर, तीन चार पळ्या चटणी वरून कपभर चहा) मग मेट्रो पकडून कामावर गेलो. चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. पाकिस्तान पासून ते फिलिपिन्स पर्यंतची जनता शुभेच्छा देत होती पण आम्ही जसा काय राष्ट्रीय दुखवटा असल्या प्रमाने स्तब्ध होतो. चेहर्‍यावर कसलाच हावभाव नव्हते. व्हाट्सअप तर आज पार गळूनच गेला होता.

दूपारी छान चपाती कोंबोचा फडशा पाडला. देह ऑफिसात म्हणजे दुबईत होता पण आत्मा न जाने आरबी समुद्राच्या पैलतीरावर कोठेतरी घुटमळत होता.

संध्याकाळी घरी आलो. फुटपाथ वरून चलताना अनेक ईमारतीवर रोषणाई दिसत होती. घरी आल्यावर अंघोळ करून ग्रंथ पुजा उरकून घेतली. (ग्रंथ म्हणजेच आपली हक्काची दौलत. त्यात कोणी वाटेकरी नाही) दिवा पेटवायला पंती नव्हती तर वातीला कापूस (तीन वर्षे झाली गावी कापूसच पिकत नाही त्यामुळे वातीच्या पंचाती) मग जेवणाची लहानशी वाटी घेतली त्यात कान कोरण्यासाठी असलेल्या काड्याच्या कापसापासून वात बनवली. दिवा पेटवून पूजा पूर्ण केली (मनोभावे हात जोडले, ग्रंथासमोर डोके आपटले)

मग मोर्चा पोटोबा कडे वळला. वाटीभर भात शिजवला त्याला कशीबशी फोडणी देवीली. लालजरात चिली साॅस बरोबर खिचडी हा हा म्हणता कधी संपली कळालेच नाही.

भांडी आज घालावीत की उद्या यावर विचार मंथन चालू होते पण म्हणोलो सणासुदीचा घरात उगी र्हाडा नको. भांडी घासली चूळ भरली. खिडकीतून दूरवर कोठेतरी फटाके फोडल्याचा आवाज येत होता. तस माझ्या फोटात भात असूनही तोडीत होतं.

अंगावर गावाकडून आणलेली गोधडी कानावर कचकन आवळून झोपलो. त्याआधी दिवा विझल्याची खात्री केली. उगाच फायर अलार्म वाजयला नको. फटाक्यांचा अवाज अधूनमधून येतच होता. मी मात्र झोपण्याचा प्रयत्न करत होतो.

शुभ दिवाळी....
गूड नाईट

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

वाडा

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात

आजोबांनी कष्टाने उभारलेला
एक एक दगड निखळून पडतोय
आजीच्या फडताळाची भिंत
कधीच खचून गेलीय
पावसात क्वचित गळनारे खण
आता पावसाळाभर गळतायेत

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....

बैठकीची उखणलेली ओसरी
आता कोण सारवत नाय
तो भला मोठा उंबरा
ते अभेद्य सागाचे दार
चौकातला हपश्या, दगडी चौरंग
सर्व काही ओस पडलेय
दिवाळीचा माळदावरला झगमगाट
आता कधीच दिसणार नाय

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....

चार पिढ्यांचा साक्षीदार
पाचव्या पिढीस दिसणार नाय
आजोबा आजीने देह ठेवलेल्या
खोलीत आता दिवे पेटणार नाय
आलिशान घरामध्ये राहूनही
वाड्याच सुख लाभायच नाय

पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

क्रोध जीवनाचा शत्रू

क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ||
                                     (गीता - 2 : 63)

     भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात, "क्रोधामुळे विवेक सुटत जातो, अविवेकामुळे विस्मरण होते, विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धीनाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो."
     आजचा आधुनिक मनुष्य भौतिक सुखाच्या मागे धावताना आढळतो. पैसा आणि ऐश्वर्य हेच त्याला प्रिय वाटू लागतात. याच पैशाच्या लालसे पाई माणूस कुठल्याही थराला जाऊ लागला आहे. आजच्या जीवनात पैशासाठी अनेकांचे खून होतात, दरोडे पडतात. आणि एवढे होऊनही माणसाला पैसा मिळतो पण सुख मात्र मिळत नाही. पैसा मिळवूनही माणूस दुःखीच असतो. म्हणूनच पैसा हा माणसाच्या जीवनातला सुखाचा मार्ग नव्हे. खरा सुखाचा मार्ग आहे 'शांती'. जर जीवनात शांती लाभायची असेल तर आधी मनाला प्रसन्न करायला हवे. मन तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा आपल्या मनातून स्वार्थ, क्रोध, हाव आणि मत्सर यांचा नाश होईल.
     वरील गीतेच्या श्लोकावर विश्लेषक करतांना संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितात -

जरी हृदयीं विषय स्मरती| तरी निसंगाही आपजे संगती| संगें प्रगटे मूर्ति| अभिलाषाची ||३२१||
जेथ कामु उपजला| तेथ क्रोधु आधींचि आला| क्रोधीं असे ठेविला| संमोह जाणें ||३२२||
संमोहा जालिया व्यक्ति| तरी नाशु पावे स्मृति| चडवातें ज्योति| आहत जैसी ||३२३||
कां अस्तमानीं निशी| जैसी सूर्य तेजातें ग्रासी| तैसी दशा स्मृतिभ्रंशीं| प्राणियांसी ||३२४||
                                     (ज्ञानेश्वरी अध्याय 2)

     जर हृदयात, अंतःकरणात विषयाची नुसती आठवण जरी झाली तरी विरक्तालाही त्याच्या प्राप्ती विषयी मूर्तिमंत इच्छा म्हणजेच काम उत्पन्न होते. जेथे काम उत्पन्न झाला तेथे त्यापूर्वी आधी क्रोधही आलाच व क्रोधामध्ये अविचारही आला. म्हणून क्रोध हा जीवनातला शत्रू आहे. संत ज्ञानेश्वर पूढे क्रोधावर भाष्य करताना म्हणतात - ज्याप्रमाणे जोरदार वार्‍याने अथवा वादळाने दिव्याची ज्योत नाहीशी होते. त्याप्रमाणे क्रोधातील अविचाराने स्मृती आणि आत्मज्ञान नाश पावते. मग अज्ञानी पणामुळे त्याची बुद्धी केवळ आंधळी होऊन तो सर्व गोष्टी विसरतो आणि त्याला काहीच सुचत नाही. हीच घटिका त्याच्या अनर्थाला कारणीभूत असते.
     क्रोधामुळे खरोखरच जीवनात अनर्थ होत असतो. जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव शांत असेल, प्रसन्न असेल मग त्याला मनाला दुःख स्पर्श करू शकत नाही. अमक्याने एखादी चांगली वस्तू आणली म्हणुन माझ्या मनाला त्रास का व्हावा? त्याची ती वस्तू खरेदी करण्याची ऐपत आहे म्हणूनच त्याने ती वस्तू खरेदी केली. यामुळे माझ्या मनात लालसा, मत्सर, हाव का उत्पन्न व्हावी? हिच हाव द्वेष मनाला बैचेन करते. मनाला कधीच सुख लाभत नाही. जेव्हा आपण कष्ट करू, प्रयत्न करू त्याच वेळेस आपण ती वस्तू खरेदी करण्याच्या लायक ठरू. अन्यथा या द्वेषामुळे त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात मत्सर निर्माण होतो. आणि याचेच रूपांतर पूढे क्रोधात होते.
     व्यक्तिमत्त्व सुधारायचे असेल तर क्रोधावर विजय मिळवायला हवा. आदर्श व्यक्तिमत्त्व हे शांत आणि प्रसन्न मनच तयार करू शकते, क्रोधी मन नव्हे. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय. संयम, शांती आणि प्रसन्न मनाच्या बळावर त्यांनी जागतिक धर्म परिषदेत सर्व श्रोत्यांची मने जिंकली आणि आपल्या आयुष्याचे सोने केले. आज विवेकानंद ओळखले जातात ते याच सुमधूर स्वभावामुळे.
     आजच्या वैज्ञानिक जगातही क्रोधाला अहितकारक मानण्यात आले आहे. क्रोधामुळे रक्तदाब वाढू शकतो. रक्तदाबामुळे हृदयविकाराचे झटके येवू शकतात. यामुळे क्रोध आणि तणाव यांना आयुष्यातून हद्दपार करायला हवे.
     समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या 'मनाचे श्लोक' या काव्यग्रंथात अनेक उपाय सुचवले आहेत. त्या विचाराचा अंगीकार केल्यास निश्चितच आत्म्याला सुखाचा मार्ग सापडेल.

मना सांग पा रावणा काय जाले|
अकस्मात तें राज्य सर्वे बुडाले||

     समर्थ सांगतात की अविचारी मनामुळे रावणाचे काय झाले? याच अविचारीपणुळे त्याचे राज्य बुडाले. रावणाने त्याचा मोह सोडून दिला असता तर त्याचे राज्य मुळीच बुडाले नसते.
     धर्मकार आणि शास्त्रकार सांगतात की मनुष्य जन्म हा मोक्ष मिळवण्यासाठी आणि ज्ञान संपादनासाठी मिळत असतो. मनुष्य जन्म हा इतर जन्माहून श्रेष्ठ मानण्यात आला आहे. अनंत जन्माच्या पापाचा नाश करायचा असेल आणि मोक्ष मिळवायचा असेल तर त्याने मनुष्य जन्मातच मिळवला पाहिजे. नाहीतर त्याचा आत्मा परत अनंत जन्मातून फिरेल. हे केवळ आध्यात्मिक कार्याने आणि तत्वज्ञानामुळेच होवू शकते.

जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं| तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं| जैसा पापियाच्या ठायीं| मोक्षु न वसे ||३४५||
देखैं अग्निमाजीं घापती| तियें बीजें जरी विरूढती| तरी अशांता सुखप्राप्ती| घडों शके ||३४६||
म्हणौनि अयुक्तपण मनाचें| तेंचि सर्वस्व दुःखाचें| या कारणें इंद्रियांचें| दमन निकें ||३४७||
                                      (ज्ञानेश्वरी अध्याय 2)

ज्ञानेश्वर म्हणतात ज्याप्रमाणे पापी माणसाकडे मोक्ष ढुंकूनही पाहत नाही. त्याप्रमाणे जिथे शांती नाही तेथे सूख लाभत नाही. म्हणून क्रोधावर नियंत्रण मिळणे फार आवश्यक आहे.

काळोख

डोंगरा आड
काळोख दाटला
झिमझिम चांदण्यात
दिवस आटला

निरागस पापण्या
मिटल्या क्षणभर
उद्याच्या भाकरीची
चिंता रात्रभर

दिवसभराचा थकवा
होतो हलका
दिवस उगवताच
जीव परका

दाही दिशा
हिंडल्या कशासाठी
दिवस रात्र एक
फक्त पोटासाठी