पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात
आजोबांनी कष्टाने उभारलेला
एक एक दगड निखळून पडतोय
आजीच्या फडताळाची भिंत
कधीच खचून गेलीय
पावसात क्वचित गळनारे खण
आता पावसाळाभर गळतायेत
पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....
बैठकीची उखणलेली ओसरी
आता कोण सारवत नाय
तो भला मोठा उंबरा
ते अभेद्य सागाचे दार
चौकातला हपश्या, दगडी चौरंग
सर्व काही ओस पडलेय
दिवाळीचा माळदावरला झगमगाट
आता कधीच दिसणार नाय
पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....
चार पिढ्यांचा साक्षीदार
पाचव्या पिढीस दिसणार नाय
आजोबा आजीने देह ठेवलेल्या
खोलीत आता दिवे पेटणार नाय
आलिशान घरामध्ये राहूनही
वाड्याच सुख लाभायच नाय
पडक्या भिंती सोडून
आता काय राहीलय त्या वाड्यात.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा