आमच्या आजोबांना आम्ही दादा म्हणत असू. जुन्या पिढीतील करारी स्वभावाच्या माणसांपैकी ते एक होते. स्वतः पुरता विचार न करता भविष्यातील आपल्या कित्येक पिढ्यांच्या उद्धारासाठी विचार करणारे ही माणसं होती. दादांचे शेतीवर विशेष प्रेम होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक व्यवसाय करून शेती वाढवली. दादा खूप कष्टाळू व प्रामाणिक होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नसते असे ते नेहमी म्हणायचे. त्यांना जाऊन आता खूप वर्षे झाली आहेत पण त्यांच्या अनेक आठवणी आजही स्मरणात आहेत.
दादांचा आवाज खूप कणखर होता. त्यांचा आवाज अजूनही कानात घुमत असल्याचा भास होता. सुगीचे दिवस सुरू झाले कि दादांचा मुक्काम वाडग्यातून खळ्यात सुरू व्हायचा. काढणी केलेले गहू, हरभरा, तूर किंवा ज्वारी या पिकांचे जनावरांपासून रक्षण करण्यासाठी ते दिवसरात्र खळ्यातच असायचे. मग त्यांना जेवण पाणी सगळं काही तिथेच नेऊन द्यावे लागे. पाणी संपले कि त्यांनी जोराने आवाज द्यावा,
"ये बाळ जग भरून पाणी आण रे!"
दादांचा आवाज खळ्यातून थेट वाड्यात अगदी स्पष्ट ऐकू येत असे. इतरवेळी देखील दादांचे जेवण हे वाडग्यात नेऊन द्यावे लागे. उतारवयात दादांना वाड्याच्या पायऱ्या चढता येत नसत. वाडग्यात कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत किंवा मग गोठ्यात त्यांना झोपण्यासाठी केलेला ओट्यावर ते जेवण करत. भाकरी किंवा कालवण पाहिजे असल्यास दादा नेहमीप्रमाणे हाक मारत.
"ये बाळ वाटीभर कालवण आण रे!"
"ये बाळ दोन कोरा भाकर आण रे!"
दादा सगळ्यांना बाळ म्हणूनच हाक मारायचे. जेवण करतांना दादांना भाकरीचे पापुद्रे चावत नसत. सगळे पापुद्रे काढुन ते बाजूला ठेवीत. जेवण झाल्यावर ते सर्व पापुद्रे कुत्र्यांना टाकीत असत. कुत्र्यांनाही हाक मारण्याची त्यांची वेगळीच पद्धत होती. यु यु असं न म्हणता दादा ऊ स्वराचा आलाप घेऊन "ऊsक" असा मोठा आवाज काढायचे. आवाज दिल्यावर गल्लीतले आणि वाडग्यातले कुत्रे आवाजाचा माग घेत पापुद्रे खाण्यासाठी जोराने धावत येत. दादा आलेल्या सगळ्या कुत्र्यांना पापुद्रे विभागून टाकत.
वाडग्यातील चिंच म्हणजे दादांची संपत्ती होती. तिच्या चिंचावर दादा सोडून कुणाचाच हक्क नव्हता. चिंचा विकुन येणारे पैसे ते वर्षभर पुरवून पुरवून वापरत. ज्यावर्षी चिंच चांगली बहरेल त्यावर्षी दादा लगेच त्या चिंचेचा सौदा करून टाकायचे. गावात अनेक मुस्लिम व्यापारी चिंचा विकत घेत असत. एकदा का चिंचेचा सौदा झाला मग कुणालाही चिंचेच्या सावलीला उभे रहाण्याचाही हक्क नसायचा. व्यापारी जोपर्यंत चिंच झोडून नेत नाही तोपर्यंत दादा दिवसभर चिंचेला राखण बसायचे. घरातील माणसांना देखील ते चिंचा तोडू देत नसत. दादा जेव्हा केव्हा फेरफटका मारण्यासाठी जात, त्यावेळी आम्ही चिंचेच्या झाडावर चढून गाभोळ्या चिंचा खात असू. एकदा असेच दादा वाडग्यात नव्हते. मी गुपचूप चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडत होतो. त्यावेळी अचानक दादा वाडग्यात परत आले व त्यांनी मला झाडवर पाहीले. गडबडीत उतरण्याच्या नादात माझा पाय एका फांदीत अडकला. मी घाबरून ओरडू लागलो. दादा आता आपल्याला काठीने मारणार असे वाटत असतानाच कशीबशी पायाची सुटका करून मी पळ काढला. त्यांनतर मी दादांच्या हयातीत परत कधी त्या झाडावर चढलो नाही.
शेणखत आणि शेती हे गणित दादांच्या मनात पक्के होते. शेणखता शिवाय शेतीला दुसरा पर्यायच नाही असे ते नेहमी म्हणायचे. या त्यांच्या स्वभावामुळे ते गावातील अनेकांकडून शेणखत विकत घेत. पुर्वी प्रत्येकाच्या वाडग्यात किंवा खळ्यात उकीरडे असायचे. या उकीरड्या मध्ये जनावरांचे शेण, मुत्र किंवा न खाल्लेला चारा टाकला जायचा. पावसाच्या पाण्यामुळे वर्षभर या उकीरड्यातील सगळे घटक कुजून त्याचे चांगले खत तयार व्हायचे. हे खत उन्हाळ्यात शेतात नेऊन टाकले जायचे. आमच्या घरचे शेणखत हे शेतीसाठी अपुरे पडायचे. त्यामुळे दादा गावातील इतर लोकांचे उकीरडे धान्याच्या किंवा पैशाच्या मोबदल्यात विकत घ्यायचे. अशा उकीरड्यातून शेणखत वाहून नेण्याचे संपल्यावर; ते गड्यांना उकीरड्याच्या तळाची चारबोटं खोल माती देखील खोदून न्यायला सांगायचे. पावसाळ्यात पाणी उकीरड्यात उतरते. पाण्यामुळे शेणखताचे बरेचशे अंश जमिनीत मुरतात त्यामुळे उकीरड्याच्या तळाची माती देखील शेणखता एवढीच गुणकारी होते असे ते म्हणायचे. शेणखत गोळा करण्याचा विलक्षण छंद दादांना होता. ते रोज गावात फेरफटका मारायला गेल्यावर; परत येताना आपल्या हातातील काठी बगलेत धरून रस्त्यावर पडलेले शेण गोळा करत यायचे. एखाद्या दिवशी रस्त्यावर जास्तच शेण मिळाल्यावर ते स्वतःच्या धोतराची झोळी करून शेण आणायचे व वाड्याच्या भिंतीला लागून असलेल्या उकीरड्यावर टाकायचे. हा दादांनी गोळा केलेल्या शेणाचा एक स्वतंत्र उकीरडा होता. वर्षाकाठी यातून एक दोन बैल गाड्या शेणखत निघायचे. शेतात फेरफटका मारायला जाताना देखील ते रस्त्याने पडलेले शेण गोळा करून वावरात नेऊन टाकायचे. जमिनीला अजून शेणखत मिळावे म्हणून ते वावरात मेंढ्या बसवत. मेंढ्या बसवणे हा देखील दादांचा एक छंदच होता. त्यामुळे कित्तेकदा उन्हाळ्यात धनगर लोक मेंढ्याचे कळप घेऊन बिनबोभाट आमच्या शेतात जावून बसायचे. दुसऱ्या दिवशी जेव्हा धनगर धान्य मागायला यायचे त्यावेळी घरच्यांना कळायचे कि रानात मेंढरे बसली आहेत. परिसरातील धनगर समाज दादांना फार मानायचा.
लहानपणी मी दादांना खाऊसाठी पैसे मागायचो. दुकानातील गोळ्या, बिस्किटे किंवा मग उन्हाळ्यात मिळणारी गारीगार यासाठी मी त्यांच्याकडे पैशाचा हट्ट धरत असे. पैसे मिळवण्यासाठी दादांचे खूप काम करावे लागत. वेळच्या वेळी त्यांना चहा, पाणी किंवा जेवण वाडग्यात नेऊन देणे वगैरे. त्यांच्याकडे पैसे असल्यावर ते देऊन टाकत. ते कधी नाही म्हणायचे नाहीत. पण जेव्हा त्यांच्याकडे पैसे नसायचे तेव्हा ते नेहमीच गमतीशीर उत्तर द्यायचे,
"पैशाचा टेम्पो भरून येवू राहीलाय, पण तो करंजीच्या घाटात पंग्चर झालाय. टेम्पो आल्यावर देतो तुला पैसे." कालांतराने त्यांच्या पैशांचा टेम्पो मला पैसे देण्यासाठी कधी भरून आलाच नाही. परंतू त्यांनी कमवलेल्या शेतीतून आणि शेतीसाठी घेतलेल्या कष्टातून आजही आम्हीला खूप काही मिळत आहे. त्यांच्या आशिर्वादाचा टेम्पो आम्हाला भरभरून देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा