गुरुवार, १४ मे, २०२०

पहाटेचा प्रवास



प्रवास हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मलाही प्रवास करणे, भटकंती करणे खूप आवडते. आपल्यातील प्रत्येकाला अनेक कारणांसाठी कधीना कधी प्रवास करावाच लागतो, परंतु एखाद्या प्रवासाची सुरूवात ही पहाटेच्या आल्हाददायक वातावरण व्हावी यासारख्या आनंदाची दुसरी गोष्ट नाही. पहाटेचा प्रवास आवडण्याची अनेक कारणं असू शकतात. सगळी माणसं पहाटेच्या साखर झोपेत असतांना नेहमीच वर्दळीने व्यापून जाणारे रस्ते हे मोकळे आणि शांत असतात. वातावरणात सुखद गारवा आणि हवा स्वच्छ असते. यामुळे पहाटेचा प्रवास सुसह्य आणि गतीमान होतो. माझ्या आयुष्यात खुपदा पहाटे प्रवास करण्याचा योग आला. गावाहून अनेकदा कामानिमित्त विविध ठिकाणी गेलो आहे. पुण्यामुंबईस जायचे म्हटलं तर पहाटे निघाल्यावाचून गत्यंतर नसते.

सकाळी उठल्यावर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून मी आधल्या रात्रीच प्रवासाची सगळी तयारी करून ठेवतो. लागणारी कागदपत्रे, कपडे आणि इतर गरजेचे साहित्य बॅगेत व्यवस्थित ठेवले आहेत ना? प्रवासात घालण्यासाठीचे कपडे काढून ठेवले आहेत ना? मोबाईलवर अलार्म लावला आहे ना? याची खात्री केल्याशिवाय मी झोपी जात नाही. हल्ली सगळे जण मोबाईल वापरतात त्यामुळे अलार्म लावणे सापे झाले आहे. पण मी असाही काळ अनुभवला आहे जेव्हा सामान्य माणसं मोबाईल फोन वापरत नव्हते, त्यावेळी 'आई' हाच सगळ्यात मोठा अलार्म असायचा. दिवसभर शेतात काम करूनही आई बरोबर वेळेवर उठून सगळी तयारी करायची. मोबाईलच्या जमान्यात देखील कित्येकदा आई अलार्म वाजायच्या आधीच उठून कामाला लागलेली असते.

पहाटेच्या थंड वातावरणात गरम पाण्याने अंघोळ करण्याची वेगळीच मजा असते. गरम पाण्याने भरलेला तांब्या अंगावर घेताना बादलीतील पाणी कधी संपूच नये असे वाटत रहाते. ही अमृत प्रहरातील अंघोळ शरीराला हलकं आणि मनाला प्रसन्न करते. गाडी पकडण्याची घाई असल्याने कितीही वाटले तरी अंघोळ आवरती घ्यावी लागते. अंघोळ होईपर्यंत आईने गरमागरम चहा आणि नाष्टा बनवून ठेवलेला असतो. नाष्ट्याबरोबर वाफाळलेल्या चहाचे घोट शरीराला अजूनच तरतरीत करतात. चहा नाष्टा फस्त केल्यानंतर गाडीच्या आधी किमान दहा मिनिटे मी स्टँडवर पोहोचेल अशा बेताने घरातून निघतो. शेवटच्या क्षणी काही विसरायला नको म्हणून मी परत एकदा बॅग तपासून पहातो. प्रवासात पैसे मुद्दाम दोन तीन ठिकाणी विभागून ठेवणे कधीही चांगले. न करो पैसे हरवले किंवा पाकिट मारले गेले तर काही पैसे तरी शिल्लक रहातील. घराबाहेर पडण्यापुर्वी हात आईचे आशिर्वाद घेण्यासाठी आपोआप वळतात. बॅग पाठीवर घेऊन मग मी एसटी स्टँडकडे मार्गस्थ होतो. आई मला दुरवर जाईपर्यंत दारात उभी दिसते.

बाहेर सगळीकडे शांतता असते. थंड हवेची झुळूक हळूच अंगाला स्पर्शून जाते. रस्त्याने चालत जाताना इथे तिथे भटके कुत्रे आळं करून झोपलेली असतात. एखाद्या घरातील पाळलेले कुत्रे कधीकधी अंगावर धावूनही येतात. माणसांनी गजबजलेल्या स्टँडवर पहाटे सगळीकडे शुकशुकाट असतो पण चहाचे एक दुकान उघडलेले असते. भल्या पहाटे उद्योग धंद्याला जाणारे लोक या दुकानात चहा पिण्यासाठी थांबतात. गाडीची वेळ झाल्यावर मी सारखा गाडी येणाऱ्या रस्त्याकडे पहात रहातो. लांबून खडखड आवाज करत एसटी ही स्टँडच्या दिशेने धावत येताना दिसते. हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केल्यानंतर ती थांबते. गाडी तालुक्याच्या ठिकाणाहून येत असल्याने त्यात अगोदरच अनेक प्रवासी बसलेले असतात. सामान्यतः विद्यार्थी, शिक्षण, कर्मचारी किंवा उपचारासाठी जाणारे रुग्ण असे प्रवासी नेहमी आढळतात. कंडक्टर टिंग टिंग अशी घंटी वाजवतो आणि थंडीत शांत झोपलेल्या गावाला मागे टाकत गाडी भरधाव वेगाने धावू लागते. तिकीट काढून आपल्या बाकावर स्थिरस्थावर होईपर्यंत एसटी गावच्या नदीचा पुल ओलांडून लांबवर आलेली असते. चंद्रास्थानंतरच्या काळ्याकुट्ट अंधाराने सगळ्या शिवाराला व्यापलेले असते. दुरवर एखाद्या वस्तीवर लुकलुकणारा दिवा, आकाशात उलटी झालेली सप्तर्षी, आणि पूर्वेकडे चमचमणारी शुक्राची चांदणी मात्र नजरेस पडते. काळ्या गर्द अंधाराला एसटीचे समोरील दिवे जणू चिरत जातात. रस्त्याच्या दुतर्फा झाडांवर पडणारा गाडीचा प्रकाशझोत एखाद्या गुहेसारखा भासतो. या अंधाऱ्या गुहेत आपण कुठेतरी गुढ प्रवासाला निघालो आहोत असे भासते. एसटीच्या इंजिनची घरघर आणि खिडक्यांची थरथर या गुढ प्रवासाची तंद्री मात्र भंग करत रहातात.

काहीवेळेने पुढचे थांबे येत रहातात, प्रवासी चढत जातात. गाव आल्यावर थांबने, नवीन प्रवाशांना आत घेणे हे चालक आणि वाहक यांचे लयबद्ध काम चालू रहाते. ही सकाळीची गाडी म्हणजे अनेक प्रवाशांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली असते. रोज ह्याच गाडीने नियमीत प्रवास करणारे कदाचित अनेक जण असतील. आर्धा पाऊन तासाच्या प्रवासानंतर अंधार संपायला सुरूवात होते. अंधाराची जागा आता उजेड हळूहळू घेऊ लागतो. वाटेत अनेक ठिकाणी व्यायाम व फिरायला आलेले विविध वयोगटातील लोक दिसायला लागतात. जोर, बैठका मारणारे तरुण, झरझर चालत जाणारे स्त्री पुरुषांचे गट एसटीच्या समोरील काचेतून दिसत रहातात. रस्त्याकडेची गावं आता जागी झालेली असतात. माता भगिनी अंगणात झाडलोट आणि सडा टाकण्यात व्यग्र असतात. शेतकरी गायी म्हशींच्या धारा काढताना दिसतात. रात्रभर खुराड्यात बंदिस्त केलेल्या कोंबड्या आता मोळल्या होऊन इथे तिथे चोचीने दाणे टिपत असतात. सायकल, मोटारसायकल स्वार मोठ्या संख्येने रस्त्यावर धावू लागतात. रस्ते, गावातील चहाची दुकानं लोकांनी फुलू लागतात. भाजीपाला बाजारात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याची घाई गडबड चाललेली असते. सकाळच्या शाळेसाठी गणवेषातील मुलंमुली शाळेकडे जाताना दिसू लागतात.

पांढरे आकाश केशरी छटांनी व्यापून जाते. अंधार हटून स्वच्छ प्रकाशाने सगळंकाही उजळून निघते. पक्षांचे थवे आकाशात भरारी घेताना दिसायला लागतात. गाडीत झोपी गेलेले प्रवासी जागे होऊन सावध व्हायला लागतात. दिड तासाच्या प्रवासानंतर काही प्रवाश्यांचे उतरण्याची ठिकाणं येऊ लागतात. सूर्योदय होऊन आकाशात केशरी किरणे सर्वदूर पसरतात. पहाट सरून आता सकाळचे हे कोवळे ऊन झाडांच्या फांद्यावर खेळू लागते. पहाटेचा प्रवास आता सरून गेलेला असतो मात्र गाडी अजूनही आपल्या अंतीम गंतव्याकडे धावत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा