सोमवार, १८ मे, २०२०

माझा जगप्रवास : श्रीलंका पिन्नावाला हत्ती अनाथालय


कोलंबोतील बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळच्या बाहेर पडलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. पाऊस आल्यावर ओल्या मातीचा गंध यावा तसाच काहीसा आणि आपलासा वाटणारा गंध विमानतळच्या बाहेर पडल्यावर आला. आल्हाददायक गारवा आणि ताजी हवा जणू स्वागतासाठी धावून आली होती. विमानतळ परिसरातील हिरव्यागर्द झाडीतून पक्षांचा किलबिलाट चालू होता. गाडीत बसे पर्यंत हा किलबिलाट पार्श्वसंगीतासारखा कानात घुमत राहिला. रणजित नावाच्या ड्रायव्हरने आमचे स्वागत केले. सामान व्यवस्थित ठेवून आम्ही गाडीत विराजमान झालोत आणि आमची गाडी कोलंबो विमानतळाहून पिन्नावालाच्या दिशेने धावायला लागली.


पिन्नावाला हत्ती अनाथालय हा आमच्या श्रीलंका भेटीचा पहिला थांबा होता.

हत्तींचे अनाथालय?

असाच काहीसा प्रश्न मला देखील पडला होता. जेव्हा याविषयी अधिक माहिती घेतली तेव्हा मला या प्रकल्पाविषयी थोडी कल्पना आली. पिन्नावाला हत्ती अनाथालयाच्या स्थापने मागचा उद्देश जंगलात जखमी झालेल्या, कळपा पासून भरकटलेल्या किंवा अनाथ झालेल्या हत्तीच्या पिल्लांचा सांभाळ करणे असा आहे. जंगलात भटकत असताना विविध कारणांमुळे हत्तीची पिल्लं जखमी होत असतात. काही कारणांमुळे माता हत्ती मरण पडल्यास तिच्या पिल्लांची जंगलात फरफट होते. म्हणून अशा हत्तींच्या पिल्लांना नवीन जीवन आणि संरक्षण मिळावे या उदात्त हेतूने हे अनाथालय सुरु करण्यात आले आहे. याची स्थापना १९७५ साली श्रीलंकेच्या जंगली प्राणी संवर्धन विभागामार्फत (DWC) करण्यात आली. पुर्वी हे अनाथालय विलपट्टू राष्ट्रीय उद्यानात होते. त्यानंतर ते श्रीलंकेच्या विविध ठिकाणी हलवण्यात आले. नंतर मात्र ते पिन्नावाला गावाजवळील २५ एकरांच्या मोकळ्या जागेत आणण्यात आले.


मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी नजर वेधून घेत होती. श्रीलंकेतील प्रसिद्ध किंग कोकोनटची उंच झाडं आणि त्याच्यावर आलेले गर्द पिवळ्या रंगाच्या नारळाचे घस खूप आकर्षक वाटत होते. किंग कोकोनटची झाडं आपल्याकडील नारळाच्या झाडांपेक्षा थोडीसे वेगळे भासले. या झाडांची खोडं आकाराने खूपच छोटे तर त्यांची उंची खूप होती. या झाडांवर चढून नारळं तोडणाऱ्यांची कमालच म्हणावी लागेल. डिसेंबर महिना उजडला तरी परतीचा मान्सून अजून याठिकाणी घटमळत होता. रस्त्यात अनेकदा पावसाच्या सरींनी आमचे स्वागत केले. ड्रायव्हर आम्हाला मध्येच गाडी थांबवून विविध प्रकारची झाडं, फळं आणि पक्षी दाखवत होता आणि त्याविषयी माहिती देत होता.


तीन तासाच्या प्रवासानंतर सकाळी नऊ वाजता आमची गाडी पिन्नावाला अनाथालयाच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पिन्नावाला हे ओया नदीकाठी वसलेले छोटेसे गाव. ओया नदी किनाऱ्याच्या आसपासच्या प्रदेशावर नारळच्या बागा लावलेल्या आहेत. त्यामुळे हा परिसर खूपच निसर्गसंपन्न वाटतो. येथील हत्ती अनाथालयामुळे आज हे गाव जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. पर्यटकांच्या तिकीटांतून मिळणाऱ्या निधीचा उपयोग या अनाथालयाचे व्यवस्थापन करण्यासाठी होतो.




तिकीट काढून आम्ही अनाथालयात प्रवेश केला. अनेक पर्यटकांची एव्हाना गर्दी व्हायला लागली होती. भारतीय पर्यटकांची संख्या देखील लक्षणीय होती. विदेशी पर्यटकांच्या तुलनेत सार्क देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीटांचा दर कमी होता. अनाथालयाच्या आतमध्ये विविध प्रकारची झाडे लावून संपूर्ण परिसर बागेसारखा सजवलेला होता. आतील रस्ते सिमेंट आणि पेव्हिंग ब्लॉकने बनवलेले होते. दोन मिनिटं चालल्यानंतर आम्ही एका मैदानात पोहचलो. तिथे विविध वयोगटातील वीस पंचवीस हत्तींचा कळप मस्ती करताना दिसला. एवढे हत्ती एकत्र पाहण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग. यापूर्वी मी फक्त सर्कसमध्ये एखाद दुसरा हत्ती प्रत्यक्ष पाहिला असेन. मोकळ्या वातावरणात मौजमजा करणारा हत्तींचा कळप पाहणे हा वेगळाच अनुभव होता. या मैदानात काही हत्ती एकमेकांना ढकलण्याचा खेळ खेळत होते. तर काही हत्ती पुढच्या पायाने माती उकरून सोंडेने पाठीवर शिंपत होते. 


अनाथालयाच्या आतमध्ये हत्तींच्या निवाऱ्यासाठी बरेचसे शेड बांधलेले आहेत. संध्याकाळी हत्तीना या शेडमध्ये बांधून ठेवण्यात येते. याठिकाणी पर्यटकांना हत्तींच्या पिल्लांना बाटलीने दूध पाजण्याची तसेच प्रौढ हत्तींना फळे भरवण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे; पण यासाठी वेगळे पैसे आकारले जातात. 



मोकळ्या मैदानात काही काळ हत्तींना सोडल्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने ओया नदीवर आंघोळीसाठी नेण्यात येते. असा दिवसातून दोनदा त्यांना आंघोळीसाठी वेळ देण्यात येतो. मुख्य प्रवेशद्वारासमोरचा रस्ता ओलांडला की पाच मिनीटावर ओया नदीवर एक घाट आहे. याठिकाणीच हत्तींना आंघोळीसाठी आणले जाते. आम्ही या घाटावर पोहचलो तेव्हा तिथे काही हत्ती पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते. नदीपात्राच्या खडकांवरून खळखळणारे, फेसाळणारे पाणी सुंदर नाद करत धावत होते. ओया नदीच्या किनारी जाण्यासाठी तिकीट दाखवावे लागते अन्यथा पुढे हत्ती जिथे आंघोळ करतात त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. ओया नदीच्या घाटाकडे जाणारा रस्ता म्हणजे पिन्नावालाची मुख्य बाजारपेठ आहे. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस भेटवस्तूंची दुकानं आहेत. परदेशी पर्यटक येथे मनसोक्त खरेदी करतात. पोस्ट कार्ड, फ्रिज मॅग्नेट, लाकडापासून बनवलेल्या विविध मुर्ती, चामड्याच्या वस्तू यासारख्या विविध वस्तूंनी ही सगळी दुकाने नेहमीच सजलेली असतात. या बाजारपेठेत एक कागदांचा छोटासा कारखाना आहे. या कारखान्यात हत्तीच्या शेणापासून कागद बनवण्यात येतो. आम्ही या कारखान्यास भेट दिली. तेथील एका कर्मचाऱ्याने आम्हाला शेणापासून कागद कसा बनवतात याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली. मी हत्तीच्या शेणापासून बनवलेले एक पोस्टकार्ड आठवण म्हणून विकत घेतले.







आमची पिन्नावाला हत्ती अनाथालयाची भेट खूपच अविस्मरणीय ठरली. परदेशातून येणाऱ्या अनेक पर्यटकांना हे ठिकाण खूप आवडते. पण नाण्याला जशी दुसरी बाजू असते तशीच याठिकाणाला विरोध करणारी दुसरी बाजू देखील आहे. जगभरातील अनेक प्राणीमित्र संघटनांकडून याठिकाणी हत्तींना डांबून ठेवण्यात येत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. हे ठिकाण म्हणजे हत्तींची छळ छावणी किंवा कैदखाना असून पर्यटकांनी पिन्नावाला हत्ती अनाथालया भेट देऊ नये असे आहवान विविध प्राणीमित्र संघटना करत असतात. मला येथे हत्तीवर अत्याचार होत असल्याचे काही जानवले नाही.


YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  :

https://www.youtube.com/watch?v=QdNTnYsA2BM&t=28s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा