वेळ मध्यान्हाची, स्थळ एक दक्षिण भारतीय नामांकित सोन्याचे दालन, मीना बाजार, बर दुबई.
दुबईतील सोने हा आता भारतीयांच्या जीवनातील एक मायावी घटक बनला आहे. दुबईत कुठल्याही कामासाठी आलेला भारतीय सोने खरेदी केल्या खेरीज आभावानेच जात असावा. माझे काही ओळखीचे लोक पर्यटनाला म्हणून दुबईत आले होते. त्यांना सोने खरेदी करण्याची फार इच्छा. म्हणून मी त्यांना घेऊन मीना बाजार आलो होतो.
"या" दालनात आल्यावर साखळी घेण्याचे ठरले. ही डिझाईन, ती डिझाईन, दुबई मेक, सिंगापूर मेक. मेकिंग चार्जेस मध्ये किती कमी करतो? हे ते अशी बरीच घासाघीस. मग ही साखळी घालून पाहा, ती घालून पाहा वगैरे अक्षरशः दोन तास चालू होते. तो सेल्समन पूरा वैतागला होता. साखळी घेणार्या पाहुण्यांचे प्रश्न संपत नव्हते. तेच तेच प्रश्न 10 वेळेस विचारले जात होते. शेवटी एक सिंगापूर डिझाईन पसंत पडली. 11 दिरहम प्रति ग्रॅम मेकिंग चार्जेस सह. बील झाले. मी मनात 'सुटलो बुवा एकदाचे' म्हणत बाहेर पडलो.
आता एकाची खरेदी झाली. दुसर्याची बाकी होती म्हणून परत एका वेगळ्या दालनात गेलोत. मीना बाजार मध्ये सोन्याची दालने उदंड. या दालनातही परत तिच घासाघीस. एकाने साखळी घालण्यासाठी गळ्या भोवती नेली. तर काय एक साखळी गळ्यात अगोदरच होती. म्हणजे आधीच्या दुकानात साखळी घालून पाहतांना ती तशीच राहिली होती. आमच्या दोघांची नजरा नजर झाली. ते म्हणाले आता काय करायचे? माझ्या पाया खालचा वाळवंटच सरकला होता. हा प्रकार तोही हायटेक दुबईत? बापरे. माझ्या काळजाचे ठोके आता वाढत होते. जरी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नसली तरी आम्हाला पकडने म्हणजे चूटकीचा खेळ.
क्षणार्धात आम्ही ते दालन गाठले. त्या सेल्समनला बाजूला घेऊन घडला प्रकार सांगितला. दोन तोळे वजनाची साखळी आम्ही परत केली. तो सेल्समन आमच्या कडे अवाक होऊन पाहात राहिला. त्यालाही त्याची चूक समजली होती.
आम्ही मोकळ्या मनाने दालना बाहेर पडलो. ही आमची इमानदारी होती का भिती देव जाणे (?)
-गणेश