अपंगांना विना सायास मुक्तपणे फिरताना काधी पाहिलय? जर पाहिले असेल तर त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहा. आपल्याला किती समाधान देवून जातो तो. सर्व अपंगांची एकच इच्छा असते ती म्हणजे इतरांप्रमाणे फिरता येणे. जगभरातील अनेक देशात अपंगांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे कायदे कानून बनवलेले आहेत. काही देशात ते फक्त कागदोपत्रीच आहेत तर काही देशात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते. त्यातील एका देशाचे नाव आहे संयुक्त अरब अमिरात. येथे अपंगांना मिळणाऱ्या सुविधा पाहून मी फार प्रभावित झालो आहे. आता तूम्ही म्हणाल यात काय ते नवल? पण नवलच वाटावी अशी ही गोष्ट आहे. येथील सरकार अपंगांची फक्त काळजीच घेत नाही तर त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते. मग ते अपंग असोत, अंध वा मूकबधिर असोत.
दुबईत अपंग व्यक्ती व्हीलचेअर घेऊन स्वतंत्रपणे कोठेही फिरू शकतात. येथील फुटपाथ आणि झेब्रा क्रॉसिंग हे अश्या पद्धतीने बनवलेले आहेत की अपंग व्हीलचेअर घेऊन अलगद रस्ता वा फूटपाथ बदलू शकतात. येथील सर्व सरकारी कार्यालये, हाॅटेल, शॉपिंग माॅल, दवाखाने, शाळा, विमानतळ, प्रमुख पर्यटन स्थळे, खासगी कार्यालये, बँका, बस व मेट्रो स्थानकात व्हीलचेअर साठी स्वतंत्र प्रवेशद्वार बनवलेले आहेत. ज्याच्या साह्य़ाने अपंग आरामात या इमारतीमध्ये प्रवेश करू शकतात. या सर्व ठिकाणी अपंगांसाठी विशेष शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शौचालयात अपंग आपली व्हीलचेअर घेऊन जावू शकतात. स्थानिक अपंग व्यक्तींना सरकार बॅटरीवर चालणाऱ्या आधुनिक व्हीलचेअर देते. अपंगांना वरिल उल्लेखिलेल्या ठिकाणी खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेल्या असतात. सदर पार्किंग अपंगाचे चिन्ह काढून राखीव ठेवलेल्या असतात. या ठिकाणी सामान्य माणसाला पार्किंग करण्यास सक्त मनाई असते.
#RTA (Road &Transport Authority) हे दुबईतील एक सरकारी खाते आहे. या खात्याच्या अंकित येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्ते येतात. RTA ने सर्व मेट्रो स्थानकात लिफ्टची व्यवस्था केली आहे. जेणेकरून अपंगांना एक मजल्यावरून दुसर्या मजल्यावर सहजपणे वर खाली जाता येईल. मेट्रोच्या ठराविक डब्यात व्हीलचेअर साठी जागा ठेवलेल्या आहेत. अंधांसाठी मेट्रो स्थानकात एका विशिष्ट प्रकारची नक्षीदार फरशी बसवून मार्ग आखलेला आहेत. हे मार्ग प्रवेशद्वारा पासून ठिक ठिकाणी नेण्यात आले आहे. जसे की लिफ्ट, तिकीट घर, शौचालय, जिने, प्लॅटफॉर्म, ठराविक डब्यांची जागा वगैरे. अंधांसाठी मेट्रो स्थानकातील लिफ्टची बटने ही ब्रेल लिपीमध्येही आहेत. त्यामुळे अंध इच्छित मजल्यावर जावू शकतो.
RTA बस मध्ये अपंगांना व्हीलचेअर घेऊन चढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसच्या दरवाज्यात एक उघडझाप होणारा प्लॅटफॉर्म असतो. बसचा ड्रायव्हर अपंगांसाठी चढउतार करण्यासाठी गरज भासल्यास मदत करतो. RTA ची खास अपंगांसाठी टॅक्सी सेवा आहे. या टॅक्सीमध्ये व्हीलचेअर चढण्यासाठी व उतरण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर टॅक्सी फोन करून बोलवून घ्याव्या लागतात.
मूकबधिर लोकांसाठी सरकारी विभागात विशेष व्हिडिओ काॅल सेंटर आहेत. मूकबधिर लोक त्या विभागाच्या वेबसाईटवरून व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत शंकांचे निरसन करू शकतात.
एवढ्या सुविधा असल्यावर कुठल्याही अपंगांना न्यूनगंड वाटणार नाही. ते आपल्या सारख्या सामान्य माणसाप्रमाणे समाजात वावरू शकतात. हे शक्य झाले आहे ते येथील शासनाच्या दूर दृष्टीने. जगभरात दुबईचे सर्व देशांनी अनुकरण करायला हवे. भारता सारख्या अनेक देशात अपंग आजही या सुविधांपासून वंचित आहेत.
गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५
अपंगांना जपणारा देश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा