दुबई शहराला विभागणारी निळीशार खाडी पाहिली की मन प्रसन्न होऊन जाते. याच खाडी भोवती दुबई शहराची स्थापना झाली होती. एका बाजूला बर दुबई तर दुसरीकडे देअरा एवढीच पूर्वी शहराची लोकवस्ती होती. खाडी तून प्रवासी व सामानाची ने आण होत असे. आजही अनेक होड्या प्रवाशांची ने आण करतांना दिसतात. या होड्यांना स्थानिक भाषेत आब्रा असे म्हणतात. जून्या लाकडी बांधणीच्या पण आधुनिक डिझेल इंजिनवर चालणाऱ्या या होड्यात बसून प्रवास करणे म्हणजे एक सुखद अनुभव होय.
बर दुबई बाजूच्या किनार्यावर उंच उंच मशिदीचे मनोरे आपली नजर आकर्षून घेतात. अल फाहेदी किल्ल्या मागच्या (आत्तचे दुबई संग्रहालय) मशिदीतून जेंव्हा मग्रीबची अजाण होते त्याचवेळी अगदी 10 पावलांच्या अंतरावरील कृष्ण मंदिरात घंटानाद आणि आरतीची सुरुवात झालेली असते. मशिदीच्या ईमाम वाड्याच्या अंगणातच कृष्ण मंदिर वसलेले आहे. शतकाहून आधिक काळ लोटला पण कुठल्याही अनुचित घटने शिवाय संध्याकाळी अजाण व आरती चालू होतात. 1902 साली स्थापन झालेले हेच ते कृष्ण मंदिर ऊर्फ हवेली.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणावर सिंधी व्यापारी दुबईत येवू लागले. दुबईच्या राज्यकर्त्यांनी त्यांना दुकाने उघडण्याचे परवाने दिले. सिंधी लोक त्या काळी कपड्यांचा व्यापार करायचे. पूढे चालून तेथे मोठी व्यापार पेठ बनली. कपड्यांच्या दुकाना बरोबर मसाले, धान्य, मोती यांच्या दुकानाही स्थापन झाल्या. व्यापारी सिंधी लोकांना स्थानिक अरबी लोक बानिया म्हणत, म्हणून या बाजार पेठेला अरबी मध्ये 'सूक अल बानिया' असे नाव पडले. सूक अल बानिया म्हणजे बानिया लोकांचा बाजार.(आजचा मीना बाजार)
दुबईत सर्वात आधी तत्कालीन अखंड भारताच्या सिंध प्रांतातील थट्टा मधून भाटिया नावाच्या व्यापाऱ्यांचा समूह येथे आला. त्यानंतर काही वर्षांनी ग्वादर मधून अनेक व्यापारी येवू लागले. हे सर्व व्यापारी हिंदू होते. तत्कालीन दुबईच्या शेखनी यांचे महत्त्व ओळखून यांना त्यांच्या धर्मा प्रमाणे वागण्याची मोकळीक दिली. एवढेच नाही तर खुद्द दुबईच्या राज्यकर्ते शेख यांनी सिंधी व्यापाऱ्यांना मंदिर बांधण्यासाठी जागा दिली. 1902 मध्ये कृष्ण मंदिर ऊर्फ हवेली तयार झाले. कालांतराने उपखंडात अखंड भारताचे तुकडे पडून धर्माच्या आधारावर पाकिस्तान वेगळा झाला. तोपर्यंत आलेले सिंधी व पाकिस्तानच्या भागातील मुस्लिम लोक दुबईत स्थायिक झाले होते. उपखंडात भडकलेल्या दंगलीचा परीणाम दुबईत झाला नाही. येथे लोक गुण्यागोविंदाने राहात होते.
रामचंद सालवाणी व्यापाऱ्याच्या पुढाकाराने 1958 साली कृष्ण मंदिराच्या मागे अजून एक मंदिर बांधण्यात आले. सालवाणी यांच्या सिंध प्रांतातील गावी गुरु ग्रंथ साहेबची एक प्रत शिल्लक होती. त्यांनी ती पाकिस्तानातून मागवून घेऊन गुरु मंदिराची स्थापना केली. आज हे गुरु मंदिर शीख लोकांबरोबरच हिंदुचेही श्रद्धास्थान आहे. गुरु मंदिर परिसरातच नंतर महादेव व साई बाबा मंदिर बनवण्यात आले.
स्थानिक अमिराती ज्यांच्या दुकाना बानिया लोकांबरोबर आहेत ते म्हणतात की आमच्या पूर्वजांचे शतकाहून आधिक काळ बानिया लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बानिया त्यांच्या पद्धतीने मूर्तिपूजा करतात आम्ही आमच्या पद्धतीने प्रार्थना करतो. अजून आमच्यात कुठलाही वाद, तंटा झाला नाही. आम्ही एकमेकांचे सण मोठ्या हौसेने साजरे करतो. दुबईतील माजी शासक शेख रशीद तर दर वर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी व फराळाला हिंदू व्यापाऱ्यांच्या घरी आर्वजूण जात होते.
या सर्व मंदिरात नियमित आरती होते. शुक्रवारी व इतर सणासुदीच्या दिवशी येथे फार गर्दी होते. दसरा, दिवाळी, ओणम, अक्षय तृतिया, चैत्र पाडवा, नवरात्र आणि गणपती हे दुबईत साजरे होणारे मोठे उत्सव. दिवाळीला बर दुबईत घराघरावरील रोषणाई पाहून मुंबई-पुण्यात असल्याचा भास होतो. अक्षय तृतियाला सोने खरेदीला होणारी गर्दी हेही दुबईचे मोठे आकर्षण आहे.
गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५
दुबईतील मंदिरे आणि हिंदु समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा