शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

क्रोध जीवनाचा शत्रू

क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ||
                                     (गीता - 2 : 63)

     भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात, "क्रोधामुळे विवेक सुटत जातो, अविवेकामुळे विस्मरण होते, विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धीनाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो."
     आजचा आधुनिक मनुष्य भौतिक सुखाच्या मागे धावताना आढळतो. पैसा आणि ऐश्वर्य हेच त्याला प्रिय वाटू लागतात. याच पैशाच्या लालसे पाई माणूस कुठल्याही थराला जाऊ लागला आहे. आजच्या जीवनात पैशासाठी अनेकांचे खून होतात, दरोडे पडतात. आणि एवढे होऊनही माणसाला पैसा मिळतो पण सुख मात्र मिळत नाही. पैसा मिळवूनही माणूस दुःखीच असतो. म्हणूनच पैसा हा माणसाच्या जीवनातला सुखाचा मार्ग नव्हे. खरा सुखाचा मार्ग आहे 'शांती'. जर जीवनात शांती लाभायची असेल तर आधी मनाला प्रसन्न करायला हवे. मन तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा आपल्या मनातून स्वार्थ, क्रोध, हाव आणि मत्सर यांचा नाश होईल.
     वरील गीतेच्या श्लोकावर विश्लेषक करतांना संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितात -

जरी हृदयीं विषय स्मरती| तरी निसंगाही आपजे संगती| संगें प्रगटे मूर्ति| अभिलाषाची ||३२१||
जेथ कामु उपजला| तेथ क्रोधु आधींचि आला| क्रोधीं असे ठेविला| संमोह जाणें ||३२२||
संमोहा जालिया व्यक्ति| तरी नाशु पावे स्मृति| चडवातें ज्योति| आहत जैसी ||३२३||
कां अस्तमानीं निशी| जैसी सूर्य तेजातें ग्रासी| तैसी दशा स्मृतिभ्रंशीं| प्राणियांसी ||३२४||
                                     (ज्ञानेश्वरी अध्याय 2)

     जर हृदयात, अंतःकरणात विषयाची नुसती आठवण जरी झाली तरी विरक्तालाही त्याच्या प्राप्ती विषयी मूर्तिमंत इच्छा म्हणजेच काम उत्पन्न होते. जेथे काम उत्पन्न झाला तेथे त्यापूर्वी आधी क्रोधही आलाच व क्रोधामध्ये अविचारही आला. म्हणून क्रोध हा जीवनातला शत्रू आहे. संत ज्ञानेश्वर पूढे क्रोधावर भाष्य करताना म्हणतात - ज्याप्रमाणे जोरदार वार्‍याने अथवा वादळाने दिव्याची ज्योत नाहीशी होते. त्याप्रमाणे क्रोधातील अविचाराने स्मृती आणि आत्मज्ञान नाश पावते. मग अज्ञानी पणामुळे त्याची बुद्धी केवळ आंधळी होऊन तो सर्व गोष्टी विसरतो आणि त्याला काहीच सुचत नाही. हीच घटिका त्याच्या अनर्थाला कारणीभूत असते.
     क्रोधामुळे खरोखरच जीवनात अनर्थ होत असतो. जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव शांत असेल, प्रसन्न असेल मग त्याला मनाला दुःख स्पर्श करू शकत नाही. अमक्याने एखादी चांगली वस्तू आणली म्हणुन माझ्या मनाला त्रास का व्हावा? त्याची ती वस्तू खरेदी करण्याची ऐपत आहे म्हणूनच त्याने ती वस्तू खरेदी केली. यामुळे माझ्या मनात लालसा, मत्सर, हाव का उत्पन्न व्हावी? हिच हाव द्वेष मनाला बैचेन करते. मनाला कधीच सुख लाभत नाही. जेव्हा आपण कष्ट करू, प्रयत्न करू त्याच वेळेस आपण ती वस्तू खरेदी करण्याच्या लायक ठरू. अन्यथा या द्वेषामुळे त्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात मत्सर निर्माण होतो. आणि याचेच रूपांतर पूढे क्रोधात होते.
     व्यक्तिमत्त्व सुधारायचे असेल तर क्रोधावर विजय मिळवायला हवा. आदर्श व्यक्तिमत्त्व हे शांत आणि प्रसन्न मनच तयार करू शकते, क्रोधी मन नव्हे. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय. संयम, शांती आणि प्रसन्न मनाच्या बळावर त्यांनी जागतिक धर्म परिषदेत सर्व श्रोत्यांची मने जिंकली आणि आपल्या आयुष्याचे सोने केले. आज विवेकानंद ओळखले जातात ते याच सुमधूर स्वभावामुळे.
     आजच्या वैज्ञानिक जगातही क्रोधाला अहितकारक मानण्यात आले आहे. क्रोधामुळे रक्तदाब वाढू शकतो. रक्तदाबामुळे हृदयविकाराचे झटके येवू शकतात. यामुळे क्रोध आणि तणाव यांना आयुष्यातून हद्दपार करायला हवे.
     समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या 'मनाचे श्लोक' या काव्यग्रंथात अनेक उपाय सुचवले आहेत. त्या विचाराचा अंगीकार केल्यास निश्चितच आत्म्याला सुखाचा मार्ग सापडेल.

मना सांग पा रावणा काय जाले|
अकस्मात तें राज्य सर्वे बुडाले||

     समर्थ सांगतात की अविचारी मनामुळे रावणाचे काय झाले? याच अविचारीपणुळे त्याचे राज्य बुडाले. रावणाने त्याचा मोह सोडून दिला असता तर त्याचे राज्य मुळीच बुडाले नसते.
     धर्मकार आणि शास्त्रकार सांगतात की मनुष्य जन्म हा मोक्ष मिळवण्यासाठी आणि ज्ञान संपादनासाठी मिळत असतो. मनुष्य जन्म हा इतर जन्माहून श्रेष्ठ मानण्यात आला आहे. अनंत जन्माच्या पापाचा नाश करायचा असेल आणि मोक्ष मिळवायचा असेल तर त्याने मनुष्य जन्मातच मिळवला पाहिजे. नाहीतर त्याचा आत्मा परत अनंत जन्मातून फिरेल. हे केवळ आध्यात्मिक कार्याने आणि तत्वज्ञानामुळेच होवू शकते.

जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं| तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं| जैसा पापियाच्या ठायीं| मोक्षु न वसे ||३४५||
देखैं अग्निमाजीं घापती| तियें बीजें जरी विरूढती| तरी अशांता सुखप्राप्ती| घडों शके ||३४६||
म्हणौनि अयुक्तपण मनाचें| तेंचि सर्वस्व दुःखाचें| या कारणें इंद्रियांचें| दमन निकें ||३४७||
                                      (ज्ञानेश्वरी अध्याय 2)

ज्ञानेश्वर म्हणतात ज्याप्रमाणे पापी माणसाकडे मोक्ष ढुंकूनही पाहत नाही. त्याप्रमाणे जिथे शांती नाही तेथे सूख लाभत नाही. म्हणून क्रोधावर नियंत्रण मिळणे फार आवश्यक आहे.

काळोख

डोंगरा आड
काळोख दाटला
झिमझिम चांदण्यात
दिवस आटला

निरागस पापण्या
मिटल्या क्षणभर
उद्याच्या भाकरीची
चिंता रात्रभर

दिवसभराचा थकवा
होतो हलका
दिवस उगवताच
जीव परका

दाही दिशा
हिंडल्या कशासाठी
दिवस रात्र एक
फक्त पोटासाठी

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

अपंगांना जपणारा देश

     अपंगांना विना सायास मुक्तपणे फिरताना काधी पाहिलय? जर पाहिले असेल तर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहा. आपल्याला किती समाधान देवून जातो तो. सर्व अपंगांची एकच इच्छा असते ती म्हणजे इतरांप्रमाणे फिरता येणे. जगभरातील अनेक देशात अपंगांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे कायदे कानून बनवलेले आहेत. काही देशात ते फक्त कागदोपत्रीच आहेत तर काही देशात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते. त्यातील एका देशाचे नाव आहे संयुक्त अरब अमिरात. येथे अपंगांना मिळणाऱ्या सुविधा पाहून मी फार प्रभावित झालो आहे. आता तूम्ही म्हणाल यात काय ते नवल? पण नवलच वाटावी अशी ही गोष्ट आहे. येथील सरकार अपंगांची फक्त काळजीच घेत नाही तर त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते. मग ते अपंग असोत, अंध वा मूकबधिर असोत.
     दुबईत अपंग व्यक्ती व्हीलचेअर घेऊन स्वतंत्रपणे कोठेही फिरू शकतात. येथील फुटपाथ आणि झेब्रा क्रॉसिंग हे अश्या पद्धतीने बनवलेले आहेत की अपंग व्हीलचेअर घेऊन अलगद रस्ता वा फूटपाथ बदलू शकतात. येथील सर्व सरकारी कार्यालये, हाॅटेल, शॉपिंग माॅल, दवाखाने, शाळा, विमानतळ, प्रमुख पर्यटन स्थळे, खासगी कार्यालये, बँका, बस व मेट्रो स्थानकात व्हीलचेअर साठी स्वतंत्र प्रवेशद्वार बनवलेले आहेत. ज्याच्या साह्य़ाने अपंग आरामात या इमारतीमध्ये प्रवेश करू शकतात. या सर्व ठिकाणी अपंगांसाठी विशेष शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शौचालयात अपंग आपली व्हीलचेअर घेऊन जावू शकतात. स्थानिक अपंग व्यक्तींना सरकार बॅटरीवर चालणाऱ्या आधुनिक व्हीलचेअर देते. अपंगांना वरिल उल्लेखिलेल्या ठिकाणी खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेल्या असतात. सदर पार्किंग अपंगाचे चिन्ह काढून राखीव ठेवलेल्या असतात. या ठिकाणी सामान्य माणसाला पार्किंग करण्यास सक्त मनाई असते.
      #RTA (Road &Transport Authority) हे दुबईतील एक सरकारी खाते आहे. या खात्याच्या अंकित येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्ते येतात. RTA ने सर्व मेट्रो स्थानकात लिफ्टची व्यवस्था केली आहे. जेणेकरून अपंगांना एक मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर सहजपणे वर खाली जाता येईल. मेट्रोच्या  ठराविक डब्यात व्हीलचेअर साठी जागा ठेवलेल्या आहेत. अंधांसाठी मेट्रो स्थानकात एका विशिष्ट प्रकारची नक्षीदार फरशी बसवून मार्ग आखलेला आहेत. हे मार्ग प्रवेशद्वारा पासून ठिक ठिकाणी नेण्यात आले आहे. जसे की लिफ्ट, तिकीट घर, शौचालय, जिने, प्लॅटफॉर्म, ठराविक डब्यांची जागा वगैरे. अंधांसाठी मेट्रो स्थानकातील लिफ्टची बटने ही ब्रेल लिपीमध्येही आहेत. त्यामुळे अंध इच्छित मजल्यावर जावू शकतो.
     RTA बस मध्ये अपंगांना व्हीलचेअर घेऊन चढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसच्या दरवाज्यात एक उघडझाप होणारा प्लॅटफॉर्म असतो. बसचा ड्रायव्हर अपंगांसाठी चढउतार करण्यासाठी गरज भासल्यास मदत करतो. RTA ची खास अपंगांसाठी टॅक्सी सेवा आहे. या टॅक्सीमध्ये व्हीलचेअर चढण्यासाठी व उतरण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर टॅक्सी फोन करून बोलवून घ्याव्या लागतात.
     मूकबधिर लोकांसाठी सरकारी विभागात विशेष व्हिडिओ काॅल सेंटर आहेत. मूकबधिर लोक त्या विभागाच्या वेबसाईटवरून व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत शंकांचे निरसन करू शकतात.
     एवढ्या सुविधा असल्यावर कुठल्याही अपंगांना न्यूनगंड वाटणार नाही. ते आपल्या सारख्या सामान्य माणसाप्रमाणे समाजात वावरू शकतात. हे शक्य झाले आहे ते येथील शासनाच्या दूर दृष्टीने. जगभरात दुबईचे सर्व देशांनी अनुकरण करायला हवे. भारता सारख्या अनेक देशात अपंग आजही या सुविधांपासून वंचित आहेत.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

दुबईतील मंदिरे आणि हिंदु समाज

     दुबई शहराला विभागणारी निळीशार खाडी पाहिली की मन प्रसन्न होऊन जाते. याच खाडी भोवती दुबई शहराची स्थापना झाली होती. एका बाजूला बर दुबई तर दुसरीकडे देअरा एवढीच पूर्वी शहराची लोकवस्ती होती. खाडी तून प्रवासी व सामानाची ने आण होत असे. आजही अनेक होड्या प्रवाशांची ने आण करतांना दिसतात. या होड्यांना स्थानिक भाषेत आब्रा असे म्हणतात. जून्या लाकडी बांधणीच्या पण आधुनिक डिझेल इंजिनवर चालणाऱ्या या होड्यात बसून प्रवास करणे म्हणजे एक सुखद अनुभव होय.
     बर दुबई बाजूच्या किनार्‍यावर उंच उंच मशिदीचे मनोरे आपली नजर आकर्षून घेतात. अल फाहेदी किल्ल्या मागच्या (आत्तचे दुबई संग्रहालय) मशिदीतून जेंव्हा मग्रीबची अजाण होते त्याचवेळी अगदी 10 पावलांच्या अंतरावरील कृष्ण मंदिरात घंटानाद आणि आरतीची सुरुवात झालेली असते. मशिदीच्या ईमाम वाड्याच्या अंगणातच कृष्ण मंदिर वसलेले आहे. शतकाहून आधिक काळ लोटला पण कुठल्याही अनुचित घटने शिवाय संध्याकाळी अजाण व आरती चालू होतात. 1902 साली स्थापन झालेले हेच ते कृष्ण मंदिर ऊर्फ हवेली.
     19 व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणावर सिंधी व्यापारी दुबईत येवू लागले. दुबईच्या राज्यकर्त्यांनी त्यांना दुकाने उघडण्याचे परवाने दिले. सिंधी लोक त्या काळी कपड्यांचा व्यापार करायचे. पूढे चालून तेथे मोठी व्यापार पेठ बनली. कपड्यांच्या दुकाना बरोबर मसाले, धान्य, मोती यांच्या दुकानाही स्थापन झाल्या. व्यापारी सिंधी लोकांना स्थानिक अरबी लोक बानिया म्हणत, म्हणून या बाजार पेठेला अरबी मध्ये 'सूक अल बानिया' असे नाव पडले. सूक अल बानिया म्हणजे बानिया लोकांचा बाजार.(आजचा मीना बाजार)
     दुबईत सर्वात आधी तत्कालीन अखंड भारताच्या सिंध प्रांतातील थट्टा मधून भाटिया नावाच्या व्यापाऱ्यांचा समूह येथे आला. त्यानंतर काही वर्षांनी ग्वादर मधून अनेक व्यापारी येवू लागले. हे सर्व व्यापारी हिंदू होते. तत्कालीन दुबईच्या शेखनी यांचे महत्त्व ओळखून यांना त्यांच्या धर्मा प्रमाणे वागण्याची मोकळीक दिली. एवढेच नाही तर खुद्द दुबईच्या राज्यकर्ते शेख यांनी सिंधी व्यापाऱ्यांना मंदिर बांधण्यासाठी जागा दिली. 1902 मध्ये कृष्ण मंदिर ऊर्फ हवेली तयार झाले. कालांतराने उपखंडात अखंड भारताचे तुकडे पडून धर्माच्या आधारावर पाकिस्तान वेगळा झाला. तोपर्यंत आलेले सिंधी व पाकिस्तानच्या भागातील मुस्लिम लोक दुबईत स्थायिक झाले होते. उपखंडात भडकलेल्या दंगलीचा परीणाम दुबईत झाला नाही. येथे लोक गुण्यागोविंदाने राहात होते.
     रामचंद सालवाणी व्यापाऱ्याच्या पुढाकाराने 1958 साली कृष्ण मंदिराच्या मागे अजून एक मंदिर बांधण्यात आले. सालवाणी यांच्या सिंध प्रांतातील गावी गुरु ग्रंथ साहेबची एक प्रत शिल्लक होती. त्यांनी ती पाकिस्तानातून मागवून घेऊन गुरु मंदिराची स्थापना केली. आज हे गुरु मंदिर शीख लोकांबरोबरच हिंदुचेही श्रद्धास्थान आहे. गुरु मंदिर परिसरातच नंतर महादेव व साई बाबा मंदिर बनवण्यात आले.
     स्थानिक अमिराती ज्यांच्या दुकाना बानिया लोकांबरोबर आहेत ते म्हणतात की आमच्या पूर्वजांचे शतकाहून आधिक काळ बानिया लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बानिया त्यांच्या पद्धतीने मूर्तिपूजा करतात आम्ही आमच्या पद्धतीने प्रार्थना करतो. अजून आमच्यात कुठलाही वाद, तंटा झाला नाही. आम्ही एकमेकांचे सण मोठ्या हौसेने साजरे करतो. दुबईतील माजी शासक शेख रशीद तर दर वर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी व फराळाला हिंदू व्यापाऱ्यांच्या घरी आर्वजूण जात होते.
     या सर्व मंदिरात नियमित आरती होते. शुक्रवारी व इतर सणासुदीच्या दिवशी येथे फार गर्दी होते. दसरा,  दिवाळी, ओणम, अक्षय तृतिया, चैत्र पाडवा, नवरात्र आणि गणपती हे दुबईत साजरे होणारे मोठे उत्सव. दिवाळीला बर दुबईत घराघरावरील रोषणाई पाहून मुंबई-पुण्यात असल्याचा भास होतो. अक्षय तृतियाला सोने खरेदीला होणारी गर्दी हेही दुबईचे मोठे आकर्षण आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

दुबई : मांजरींचा देश

    दुबईत भटकी कुत्री शोधूनही सापडणार नाहीत , पण मला दुबईत भटक्या मांजरी फार दिसल्या. कचरा कुंडी म्हणजे या मांजरींचा अड्डा. एखाद्या गल्लीतील किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा कुंड्या हेच त्यांचे साम्राज्य. आपल्या कडील कुत्री दुसर्‍या गल्लीत जातांना जसे घाबरत जातात तसे येथील मांजरी दुसर्‍या कचरा कुंड्यात जाताना घाबरतात. शक्यतो या मांजरी आपल्या कचरा कुंडीशी फार प्रामाणिक असतात, त्या  कोणाच्या मालकीच्या कुंडीत कधी जात नाहीत. गेला तर बोकोबा कोणाचा माग काढीत जातो पण त्याला त्या अड्ड्यातील बोक्याशी दोन पाय करायची तयारी ठेवावी लागते. बोक्याचे महत्वाचे काम म्हणजे दुसर्‍या बोक्यां पासून आपल्या आड्ड्याचे रक्षण करणे आणि कचर्‍याच्या गाड्या आल्यावर कुटुंबातील इतरांना म्याव म्याव करत चेतावणी देणे. बरेचदा बोकोबा हे कचरा कुंडीच्या टपावर बेवड्या सारखे पडलेले आढळतात.
   दुबईतील मांजरी फार धष्टपुष्ट असतात. एखाद्या रेस्टॉरंट शेजारच्या कचरा कुंडीतील मांजरीं या सर्वात श्रीमंत. त्यांना पाहून पैलवानांना घाम फुटावा अश्या त्या तगड्या असतात. त्यांचे महत्त्वाचे खाद्य म्हणजे माणसांनी उष्टे सोडून दिलेले नॉनव्हेज. दुबईतील मांजरींचा आवडता पदार्थ म्हणजे अर्धवट खाल्लेल्या चिकनच्या टंगड्या. चिकन हा दुबईत सर्वात जास्त खपणारा पदार्थ आहे. चिकनच्या अती वापरामुळे आजकालच्या मांजरींना हृदयविकारा सारखे आजार होतात असे ऐकण्यात आहे. रोजच्या पाहण्यातील एखादी तगडी मांजर बरेच दिवस जर दिसली नाही तर समजून जायचे की ही अ‍ॅटॅक येवून गचकली असावी. रेस्टॉरंट मधील कचरा फेकणारे हे मांजरींच्या आवडते व्यक्ती. या लोकांना कोणती मांजर व्याली, कोणती मेली याची सर्व माहिती असते.
   रोज घरातून कुठल्याही कामासाठी बाहेर पडले तर येथे मांजर आडवी जाणार नाही असे सहसा होत नाही. एखाद्या दिवशी जर मांजर आडवी गेली नाही तर फारच दुःख होते. आज आपले काम होणार का? याची शंका वाटते. (दुबईत मांजर आडवी न जाने हा अपशकुन समजला जात असावा कारण माजरांची येथे ऐव्हढी सवय पडली आहे.) उन्हाळ्यात मांजरींचे फार हाल होतात. जास्त उष्णता असल्यास या दुकानाच्या दारापाशी  AC ची एक झुळुक घेण्यासाठी घोंगत असतात. गाड्यांच्या टपावर लोळत गारव्याचा आनंद घेणे हा मांजरांचा अजून एक छंद. पार्किंग लॉट मध्ये हमखास हे दृश्य पाहण्यास मिळते.
    गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहत आलेलो हे मांजरींचे निरीक्षण आहे. दरम्यान येता जाता रोज भेटणाऱ्या मांजरीशी माझी चांगली तोंड ओळख झाली आहे. एखादी मांजर चालता चालता माझ्या पायाला पाठ घासून जाते. तेव्हा आपण समजून घ्यायचे की ती आपल्याला हाय हेलो वगैरे म्हणत असावी.दुबईत सर्वच चैनीचे जीवन जगतात आता त्याला मांजरी पण अपवाद नाहीत.