गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

गाडीवाट




गाडीवाट म्हटलं तर मला अजूनही आमच्या शेतात जाणारी वाट आठवते. खाच खळग्यांची ही कच्ची वाट इतकी वर्षे झाली पण ती काही बदलली नाही. दगड-गोटे, काटे-सराटे जणूकाही या गाडीवाटेचे अलंकारच म्हणावे लागतील. पावसाळ्यात चिखलाने रापून जाणारी, उन्हाळ्यात फुफाट्याने माखून निघणारी ही वाट काळाच्या ओघात का बदलली नसावी? याचं कधी कधी मला नवल वाटतं. प्रत्येक गोष्टीत काळानुरुप थोडेफार बदल होत असतात. आलिकडच्या काळात वाटेच्या दुतर्फा दिसणाऱ्या वेड्या बाभळी आता बऱ्याचशा कमी झाल्या आहेत. पावसाळ्यात वाहणाऱ्या एका नाल्यावर सिमेंटची नळी बसवून तात्पुरता पुल सदृश्य केलेला उंचवटा हेच ते काय बदल या गाडीवाटेने अनुभवले आहेत. पण याला बदल म्हणावं का? हा प्रश्नही मला पडतो. कारण वाट शतकानुशतके कच्ची होती, आणि ती आजही आहे.

दररोज संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी माणसाच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत असते. मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. आपल्याला त्या गोष्टीचा स्वभाव आणि गुण अवगत होत असतात. गाडीवाटेचे देखील तसेच आहे. नियमीत वापरामुळे कुठे चढउतार आहे, कुठे खड्डा आहे, कुठे हळू चालायचे हे सगळे अंगवळणी पडते. म्हणूनच ही वाट बदलली किंवा अद्ययावत झाली नसली तरी ती आता जीवनाचा एक भाग बनून गेली आहे. ये जा करणाऱ्या प्रत्येकाने तिला स्विकारले आहे कारण या वाटेवरुन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आमच्या पुर्वजांचा या वाटेवरुन खूप वावर असायचा आणि आमच्या आजच्या पिढीचाही तितकाच आहे. ही वाट आम्हाला शेतात घेऊन जाते; म्हणूनच कदाचित आमचं या वाटेशी इतकं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं असावं.

का कुणास ठाऊक? पण आजही मला या वाटेने आमच्या खाल्लाकडच्या शेतात चालत जायला खूप आवडते. सुट्टीवर गावी गेलो की मी बरेचदा या वाटेने एकटाच चालत जातो. गाडीबैल, सायकल, मोटारसायकल किंवा ट्रॅक्टर यावरून मी कित्येकदा या वाटेवरुन गेलो असेल पण पायी चालत जाण्याचा प्रत्येक अनुभव वेगळा वाटतो. शीळ घालत भिरभिरणारा वारा, अचानक हवेच्या वावटळीत झेपावणारा पाला पाचोळा जणूकाही आपल्याशी संवाद साधत आहेत असा भास होतो. वाटेकडेच्या झाडांवर पक्षांची चुळबुळ, त्यांचे वेगवेगळे आवाज, दूरवरुन बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घोगरमाळेचा आवाज, औत हकणाऱ्या गड्याने बैलाला ओरडल्याचा आवाज किंवा गुराख्यांनी जनावरांना दिलेली आरोळी यासारखे नानाविध आवाज मला वेगळ्याच विश्वास घेऊन जातात. चालता चालता कुठेतरी मधेच पाय थबकतात आणि एखाद्या पक्षाचा येणारा आवाज तसाच ऐकत रहावसं वाटतं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये विविध किटक, पक्षी आणि प्राणी या वाटेवरुन नेहमीच दिसतात. कधीकधी अचानक काळ्याभोर मुंगळ्यांची रांग नजर चुकवत घाईघाईने आडवी येते. दुरवर उड्या मारत जाणारा हरणांचा कळप तर नियमीत दिसतो. आपल्या लक्षावर नजर केंद्रीत करून एकाच जागेवर पंख हलवत असलेल्या बहिरी ससाण्याला सूर मारतांना पाहाणे म्हणजे पर्वणीच असते. पानाफुलांवर उडणारी छोटी छोटी पिवळी आणि राखाडी रंगाची फुलपाखरं नजर वेधून घेत रहातात. पावसाळ्यात गाळामध्ये वळवळ करणारे पांढरे गुलाबी गांडूळ पाहायला गंमत वाटते. गवतात सळसळ करत जाणारे साप नेहमीच भिती दाखवतात. मोकळ्या वावरात घरटं करून फिरणाऱ्या टिटवीचा कर्णकर्कश आवाज तर कानात घुमत रहातो.

लहानपणी आजी आजोबा यांच्या कडून त्यांनी केलेल्या कष्टाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यांच्या बोलण्यात शेताचा आणि या वाटेचा नेहमी उल्लेख असायचा. आजी नेहमी सांगायची की, पहाटे शुक्राची चांदणी उगवली की, सगळा वाडा जागा व्हायचा. बाया माणसं दोन दोन पायलीची दळणं जात्यावर दळायच्या तर कुणी घागर घेऊन पाणी भरायच्या. घरातील कर्ती माणसं गाडीबैल जुंपून खाल्लाकडच्या शेतात जायचे. बैल अंधारातही या गाडीवाटेने बरोबर शेतात पोहचायचे. घरचं काम उरकल्यावर बाया शेतात गेलेल्या माणसांना न्याहारीच्या भाकरी घेऊन याच वाटेने चालत जायच्या. न्याहारीचे गाठोडे दिल्यावर घरच्या जनावरासाठी ओझंभर गवत कापायच्या आणि ते ओझं डोक्यावर घेऊन याच वाटेने माघारी यायच्या.

शनिवार, २० जुलै, २०१९

कविता : रोज तू स्वप्नात येतोस



रोज तू स्वप्नात येतोस
म्हणून कधी जाणवत नाही
आपल्या दोघांतील काळाच्या पडद्याचं अंतर...

हे अंतर
म्हटलं तर अगदीच जवळ
फक्त एका क्षणाचं
म्हटलं तर खूपच लांब
अनेक वर्षांचं

तू
चुकता, कंटाळता येतोस
आणि अजूनही माझ्यासोबत खेळत रहातोस
तेच बालपणीचे खेळ
रंगीत गोट्यांचे रिंगण,
सूरपारंब्या,
धप्पाकुटी आणि
विटी दांडूचा डाव,

पण खरं सांगू का?
स्वप्नाबाहेरील दुनियेत
मी आता खेळत नाही असले खेळ
कारण
मी तेव्हाच सोडून दिलंय खेळणं
तू पडद्याआड गेल्यापासून

तुला नवल वाटेल
पण सांगतो
मी या बाजूला आता मोठा झालोय
मोठा म्हणजे बघ, म्हातारा होईल काही वर्षात
केस पांढरे झालेत, डोक्यावर टक्कल पडलंय
तू मात्र आहे तसाच आहेस
अगदी लहानपणी होतास ना, तसा....
काय रे!
पडद्याआड तुझं वय वाढत नाही का?

रोज तू स्वप्नात येतोस
तेव्हा आपण दोघे मिळून अजूनही हिंडत असतो
रानातील ओढ्याकाठी
कधी मधाचे पोळे काढत
तर
कधी सापाची कात शोधत
तुला ती संग्रही ठेवायला खूप आवडायची
पण आता मी फार घाबरतो
सापाची कात बघीतली की
काळीज धडधडतं , हात थरथरतात

स्वप्नात तू अजूनही हट्ट धरतोस पोहण्याचा
पोहणे हा तुझा आवडता छंद
पोहायला जाता यावं म्हणून
कधी कधी तू शाळेला दांडी मारायचास
तू नेहमीच हट्ट करायचास
मी देखील पोहायला शिकावं म्हणून
पण
मला अजूनही पोहता येत नाही
तुझ्यानंतर कुणी मला पोहणे शिकवलेच नाही

तू रोज स्वप्नात नसता आलास
तर
माझ्या संसाराचा गाडा ओढता ओढता
कदाचित मला विसर पडला असता तूझा
तुझ्या बरोबर घालवलेल्या क्षणांचा
म्हणूनच
तू रोज स्वप्नात येतोस
आणि
मला जाणीव करून देतोस
अतूट आहे आपल्यातील मैत्रीचा धागा
कळाचे पडदे तोडू शकत नाहीत नातीगोती
नाती अमर असतात
आपल्या मैत्री सारखी

सोमवार, २५ मार्च, २०१९

सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित?


मार्च २०१९ चा महिना नगरच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या महिन्यात नगर जिल्ह्यात खूप राजकीय उलथापालथ झाली. विधान सभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. नगर लोकसभेच्या जागेसाठी हट्ट करून बसलेल्या सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडली अशी बातमी आली होती परंतू नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सावरासावर करून ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे स्पष्ट केले. पडद्याआड राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी देखील विखे पाटील यांनी प्रयत्न केले परंतू पवार - विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे हे देखील अशक्‍यच होते. तेंव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपाशी संधान साधन्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सुजय विखे पाटील यांची मुंबईला गुप्त बैठक झाल्यानंतर महाजन यांनी नगरचा अचानक दौरा केला. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते पण विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना जाणीवपूर्वक या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. खरंतर या बैठकीतच सुजय विखे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली होती पण राहीली होती ती फक्त त्यांच्या भाजपात प्रवेशाची औपचारिकता. गिरीश महाजन यांच्या या खासगी दौऱ्यामुळे गांधी संमर्थकात अस्वस्थता पसरली. डाॅ सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशाने दिलीप गांधी यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे हे भाजपाचे उमेदवारी असतील अशी घोषणा केली. 

भाजपा तर्फे डाॅ सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नक्की झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार शोधणे राष्ट्रवादी काँग्रेसपूढील मोठे आव्हानच होते. राष्ट्रवादी तर्फे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले गेले. अलीकडच्या काळात गडाख कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपला स्वतःचा नवीन पक्ष उभारला आहे. त्यामुळे गडाख कुटुंबातील कुणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होईल हे दुरापास्तच होते.

प्रशांत गडाख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर नगर शहरातील विद्यमान आमदार आणि माजी महापौर संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. खरंतर यामगे शरद पवार यांचे फार मोठे राजकारण होते. एक तर त्यांना संग्राम जगताप यांच्यारूपाने तुल्यबळ उमेदवार मिळाला होता तसेच जगताप हे युवा असल्याने दोन युवकांमध्ये ही निवडणूक रंगणार होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप हे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई असल्याने कर्डिले यांना कैचीत पकडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. आता यंदाची निवडणूक म्हणजे शिवाजी कर्डिले यांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. कर्डिले जरी भाजपात असले तरी ते शेवटपर्यंत सुजय विखे पाटील यांचे काम करतील की जवायाला छुपी मदत करतील?? हा ही मोठा प्रश्न आहे. 

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी हे भाजपाकडून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. वडीलांना तिकीट नाकारल्याने दुखावल्या गेल्याने ते अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली. असं झाल्यास त्याचा फटका नक्कीच सुजय विखे पाटील यांना बसणार आहे. गांधी हे जैन समाजाचे आहेत आणि नगरदक्षिण मतदारसंघात जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष अर्ज भरल्यास यंदा तीन तरूणांमध्ये ऐतिहासिक लढत होईल यात शंकाच नाही.

शेवटी नगर दक्षिणमध्ये भाजपाला पोषक वातावरण आहे. त्यात विखे पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

शनिवार, २ मार्च, २०१९

नगरमध्ये विखे पाटील बाजी मारणार?


गेल्या काही महिन्यापासून नगर दक्षिणच्या लोकसभा जागेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील तिढा सुटला आहे. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजेच युवा नेते डाॅ सुजय विखे पाटील यांना सोडल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे विखे पाटीलांनी विजयाची पहीली पायरी सर केली आहे. गेल्या काही काळापासून विखे पाटील हे वेगवेगळ्या मार्गाने राष्ट्रवादीवर दबाव बनवत होते. कधी पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ अन्यथा गरज पडल्यास अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे सूतोवाच विखे पाटलांनी दिले होते. शेवटी मोठ्या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेसला झुकावे लागले आणि नगर दक्षिणची जागा पदरात पाडून घेण्यात विखे पाटील यांना यश आले.

डाॅ सुजय विखे पाटील यांनी गेल्या जवळपास दोन वर्षांपासून नगर दक्षिणमध्ये खूप जनसंपर्क वाढवला आहे. ठिकठिकाणी आयोग्य शिबिर आयोजित करून जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षापासून ते रोज मतदारसंघात नियमाने प्रचार करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणची जागा दोनदा लढवली आहे. १९९८ साली बाळासाहेब विखे पाटील यांनी नगर दक्षिणच्या जागेवर शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांचा वाजपेयी मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून देखील वर्णी लागली होती. अहमदनगर जिल्हा परिषद सध्या विखे यांच्याच ताब्यात आहे. सौ शालिनीताई विखे पाटील या वर्तमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांनी दुसऱ्यांना हे पद मिळवले आहे.

विखे पाटील यांची यंत्रणा खूप मोठी आहे. विविध शिक्षण संस्था, साखर कारखान्याचे सभासद, यामुळे नगर दक्षिणेत मोठा कर्मचारी व कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या दिमतीला आहे. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे मतदार संघात अजूनही खूप लोक आहेत. त्यामुळे डाॅ सुजय विखे पाटील यांना त्याचा मोठा फायदाच होणार आहे.

२०१४ च्या मोदी लाटेनंतर मतदार संघात लोकांच्या विचारात खूप मोठे बदल झाले आहेत. वर्तमान खासदार दिलीप गांधी हे तीनवेळा नगर दक्षिणेत निवडून आलेले आहेत. गेल्यावेळीची निवडणूक त्यांनी मोदी लाटेवर मोठ्या फरकाने जिंकली होती. पण आता २०१९ ची निवडणूक खासदार गांधीसाठी सोपी राहिलेली नाही कारण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हा मतदार संघ दुष्काळी असून शेतकऱ्याच्या विविध समस्यांनी हा मतदारसंघ घेरलेला आहे. यंदातर दक्षिणेतील तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गात खूप नाराजी आहे. कर्जमाफीत शेतकरी वर्गाला झालेला त्रास सर्वत्रूत आहे. तसेच कांद्याला गेल्या वर्षभरात भाव नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अक्षरशः वाटोळे झाले आहे. दक्षिणेतील शेतकरीवर्ग सध्या खूप असंतोषात आहे. याचा फायदा नक्कीच विखे पाटील घेतील अशी शक्यता आहे.

गेल्या अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेच्या हातून सत्तेचा घास भाजपने हिसकावून घेतला. त्यामुळे यंदा सेना भाजप युती होऊनही नगर शहरातील आणि एकूणच मतदार संघातील शिवसैनिक भाजपला किती मदत करतील हे सांगणे कठीण आहे. शिवसैनिकांना महानगरपालिकेतील वचपा काढण्याची आयती संधी चालून आली आहे. याचा फायदा विखे पाटील नक्कीच उचलतील यात शंका नाही.

डाॅ सुजय विखे पाटील हे तरुण असल्याने दक्षिणेतील तरुण वर्गात त्यांच्या विषयी आदर आणि खूप कुतुहल आहे. ठिकठिकाणच्या सभेत तरुणवर्ग मोठी गर्दी करत आहे. गेल्या दोन वर्षापासून डाॅ सुजय विखे पाटील करत असलेल्या प्रचाराचे रूपांतर नक्कीच मतदानात होईल अशी आशा आहे. तेंव्हा विखे पाटलांनी यंदाची नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची केली आहे. त्यात वर्तमान खासदार दिलीप गांधी यांची वाढलेली मुजोरी आणि गुंडगिरी ही नक्कीच वर्तमान खासदारांना त्रासदायक ठरणार आहे यात शंकाच नाही. तेंव्हा डाॅ सुजय विखे पाटील यांच्यारुपाने नगरला नक्कीच तरुण खासदार मिळणार असे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

~ @gbp125 ( गणेश भाऊसाहेब पोटफोडे )