शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

दुबईतील मंदिरे आणि हिंदु समाज

     दुबई शहराला विभागणारी निळीशार खाडी पाहिली की मन प्रसन्न होऊन जाते. याच खाडी भोवती दुबई शहराची स्थापना झाली होती. एका बाजूला बर दुबई तर दुसरीकडे देअरा एवढीच पूर्वी शहराची लोकवस्ती होती. खाडी तून प्रवासी व सामानाची ने आण होत असे. आजही अनेक होड्या प्रवाशांची ने आण करतांना दिसतात. या होड्यांना स्थानिक भाषेत आब्रा असे म्हणतात. जून्या लाकडी बांधणीच्या पण आधुनिक डिझेल इंजिनवर चालणाऱ्या या होड्यात बसून प्रवास करणे म्हणजे एक सुखद अनुभव होय.
     बर दुबई बाजूच्या किनार्‍यावर उंच उंच मशिदीचे मनोरे आपली नजर आकर्षून घेतात. अल फाहेदी किल्ल्या मागच्या (आत्तचे दुबई संग्रहालय) मशिदीतून जेंव्हा मग्रीबची अजाण होते त्याचवेळी अगदी 10 पावलांच्या अंतरावरील कृष्ण मंदिरात घंटानाद आणि आरतीची सुरुवात झालेली असते. मशिदीच्या ईमाम वाड्याच्या अंगणातच कृष्ण मंदिर वसलेले आहे. शतकाहून आधिक काळ लोटला पण कुठल्याही अनुचित घटने शिवाय संध्याकाळी अजाण व आरती चालू होतात. 1902 साली स्थापन झालेले हेच ते कृष्ण मंदिर ऊर्फ हवेली.
     19 व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणावर सिंधी व्यापारी दुबईत येवू लागले. दुबईच्या राज्यकर्त्यांनी त्यांना दुकाने उघडण्याचे परवाने दिले. सिंधी लोक त्या काळी कपड्यांचा व्यापार करायचे. पूढे चालून तेथे मोठी व्यापार पेठ बनली. कपड्यांच्या दुकाना बरोबर मसाले, धान्य, मोती यांच्या दुकानाही स्थापन झाल्या. व्यापारी सिंधी लोकांना स्थानिक अरबी लोक बानिया म्हणत, म्हणून या बाजार पेठेला अरबी मध्ये 'सूक अल बानिया' असे नाव पडले. सूक अल बानिया म्हणजे बानिया लोकांचा बाजार.(आजचा मीना बाजार)
     दुबईत सर्वात आधी तत्कालीन अखंड भारताच्या सिंध प्रांतातील थट्टा मधून भाटिया नावाच्या व्यापाऱ्यांचा समूह येथे आला. त्यानंतर काही वर्षांनी ग्वादर मधून अनेक व्यापारी येवू लागले. हे सर्व व्यापारी हिंदू होते. तत्कालीन दुबईच्या शेखनी यांचे महत्त्व ओळखून यांना त्यांच्या धर्मा प्रमाणे वागण्याची मोकळीक दिली. एवढेच नाही तर खुद्द दुबईच्या राज्यकर्ते शेख यांनी सिंधी व्यापाऱ्यांना मंदिर बांधण्यासाठी जागा दिली. 1902 मध्ये कृष्ण मंदिर ऊर्फ हवेली तयार झाले. कालांतराने उपखंडात अखंड भारताचे तुकडे पडून धर्माच्या आधारावर पाकिस्तान वेगळा झाला. तोपर्यंत आलेले सिंधी व पाकिस्तानच्या भागातील मुस्लिम लोक दुबईत स्थायिक झाले होते. उपखंडात भडकलेल्या दंगलीचा परीणाम दुबईत झाला नाही. येथे लोक गुण्यागोविंदाने राहात होते.
     रामचंद सालवाणी व्यापाऱ्याच्या पुढाकाराने 1958 साली कृष्ण मंदिराच्या मागे अजून एक मंदिर बांधण्यात आले. सालवाणी यांच्या सिंध प्रांतातील गावी गुरु ग्रंथ साहेबची एक प्रत शिल्लक होती. त्यांनी ती पाकिस्तानातून मागवून घेऊन गुरु मंदिराची स्थापना केली. आज हे गुरु मंदिर शीख लोकांबरोबरच हिंदुचेही श्रद्धास्थान आहे. गुरु मंदिर परिसरातच नंतर महादेव व साई बाबा मंदिर बनवण्यात आले.
     स्थानिक अमिराती ज्यांच्या दुकाना बानिया लोकांबरोबर आहेत ते म्हणतात की आमच्या पूर्वजांचे शतकाहून आधिक काळ बानिया लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बानिया त्यांच्या पद्धतीने मूर्तिपूजा करतात आम्ही आमच्या पद्धतीने प्रार्थना करतो. अजून आमच्यात कुठलाही वाद, तंटा झाला नाही. आम्ही एकमेकांचे सण मोठ्या हौसेने साजरे करतो. दुबईतील माजी शासक शेख रशीद तर दर वर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी व फराळाला हिंदू व्यापाऱ्यांच्या घरी आर्वजूण जात होते.
     या सर्व मंदिरात नियमित आरती होते. शुक्रवारी व इतर सणासुदीच्या दिवशी येथे फार गर्दी होते. दसरा,  दिवाळी, ओणम, अक्षय तृतिया, चैत्र पाडवा, नवरात्र आणि गणपती हे दुबईत साजरे होणारे मोठे उत्सव. दिवाळीला बर दुबईत घराघरावरील रोषणाई पाहून मुंबई-पुण्यात असल्याचा भास होतो. अक्षय तृतियाला सोने खरेदीला होणारी गर्दी हेही दुबईचे मोठे आकर्षण आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

दुबई : मांजरींचा देश

    दुबईत भटकी कुत्री शोधूनही सापडणार नाहीत , पण मला दुबईत भटक्या मांजरी फार दिसल्या. कचरा कुंडी म्हणजे या मांजरींचा अड्डा. एखाद्या गल्लीतील किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा कुंड्या हेच त्यांचे साम्राज्य. आपल्या कडील कुत्री दुसर्‍या गल्लीत जातांना जसे घाबरत जातात तसे येथील मांजरी दुसर्‍या कचरा कुंड्यात जाताना घाबरतात. शक्यतो या मांजरी आपल्या कचरा कुंडीशी फार प्रामाणिक असतात, त्या  कोणाच्या मालकीच्या कुंडीत कधी जात नाहीत. गेला तर बोकोबा कोणाचा माग काढीत जातो पण त्याला त्या अड्ड्यातील बोक्याशी दोन पाय करायची तयारी ठेवावी लागते. बोक्याचे महत्वाचे काम म्हणजे दुसर्‍या बोक्यां पासून आपल्या आड्ड्याचे रक्षण करणे आणि कचर्‍याच्या गाड्या आल्यावर कुटुंबातील इतरांना म्याव म्याव करत चेतावणी देणे. बरेचदा बोकोबा हे कचरा कुंडीच्या टपावर बेवड्या सारखे पडलेले आढळतात.
   दुबईतील मांजरी फार धष्टपुष्ट असतात. एखाद्या रेस्टॉरंट शेजारच्या कचरा कुंडीतील मांजरीं या सर्वात श्रीमंत. त्यांना पाहून पैलवानांना घाम फुटावा अश्या त्या तगड्या असतात. त्यांचे महत्त्वाचे खाद्य म्हणजे माणसांनी उष्टे सोडून दिलेले नॉनव्हेज. दुबईतील मांजरींचा आवडता पदार्थ म्हणजे अर्धवट खाल्लेल्या चिकनच्या टंगड्या. चिकन हा दुबईत सर्वात जास्त खपणारा पदार्थ आहे. चिकनच्या अती वापरामुळे आजकालच्या मांजरींना हृदयविकारा सारखे आजार होतात असे ऐकण्यात आहे. रोजच्या पाहण्यातील एखादी तगडी मांजर बरेच दिवस जर दिसली नाही तर समजून जायचे की ही अ‍ॅटॅक येवून गचकली असावी. रेस्टॉरंट मधील कचरा फेकणारे हे मांजरींच्या आवडते व्यक्ती. या लोकांना कोणती मांजर व्याली, कोणती मेली याची सर्व माहिती असते.
   रोज घरातून कुठल्याही कामासाठी बाहेर पडले तर येथे मांजर आडवी जाणार नाही असे सहसा होत नाही. एखाद्या दिवशी जर मांजर आडवी गेली नाही तर फारच दुःख होते. आज आपले काम होणार का? याची शंका वाटते. (दुबईत मांजर आडवी न जाने हा अपशकुन समजला जात असावा कारण माजरांची येथे ऐव्हढी सवय पडली आहे.) उन्हाळ्यात मांजरींचे फार हाल होतात. जास्त उष्णता असल्यास या दुकानाच्या दारापाशी  AC ची एक झुळुक घेण्यासाठी घोंगत असतात. गाड्यांच्या टपावर लोळत गारव्याचा आनंद घेणे हा मांजरांचा अजून एक छंद. पार्किंग लॉट मध्ये हमखास हे दृश्य पाहण्यास मिळते.
    गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहत आलेलो हे मांजरींचे निरीक्षण आहे. दरम्यान येता जाता रोज भेटणाऱ्या मांजरीशी माझी चांगली तोंड ओळख झाली आहे. एखादी मांजर चालता चालता माझ्या पायाला पाठ घासून जाते. तेव्हा आपण समजून घ्यायचे की ती आपल्याला हाय हेलो वगैरे म्हणत असावी.दुबईत सर्वच चैनीचे जीवन जगतात आता त्याला मांजरी पण अपवाद नाहीत.

मंगळवार, १६ जून, २०१५

पहिला पाऊस

प्रतीक्षा संपली मृगसरींची
वाफाळलेल्या धरणीवरची
गार वारा उडवी धुराळी
आसुसलेली नजर आभाळी

दिली ललकारी कृष्णमेघांनी
घाई सर्वांना मन आनंदी
थेंब टपोरे धावती खाली
सडा शिंपिती माझ्या अंगणी

गाड्या भिंगोऱ्या दारोदारी
शाळेतील मधली सुट्टी
मृदुगंध पोहचला रानोरानी
कागदाची पहिली होडी

रानातून ढोरे परतली
गुरख्यांची ओली डोकी
टपरी वरली भाऊगर्दी
चहा पिणाऱ्यांची हुल्लडबाजी

मृगसरींनी हार गुंफला
बळीराजाचा चेहरा फुलला
समाधानाचा वर्षाव झाला
पाऊस आला पाऊस आला

मंगळवार, २ जून, २०१५

परत आखातात

घरासाठी मला परत दुसऱ्यांदा आखाती देशात नोकरीसाठी यावे लागले. पहिल्यांदा गावी राहायला घर नव्हते आणि मी स्वतःशीच हट्ट करून बसलो होतो कि जोपर्यंत गावी घर होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. माझ्या घराच्या स्वप्नाला साकार कण्यासाठी मी २००६ साली सौदी अरेबिया मध्ये पहिल्यांदा नोकरीसाठी आलो होतो. २००६ ते २००९ या तीन वर्ष्यात शक्य तेव्हढे पोटाला चिमटे काढत कसे तरी गावी डोक्यावर छप्पर बनवण्यासाठी मी घरच्यांना मदत केली. २००९ ला मी भारतात परतलो ते सौदीत फिरून कधीच न येण्यासाठी. कारण इथल्या धार्मिक कट्टरतेला मी वैतागलो होतो. सौदीत स्थायिक झालेला भारतीय मुस्लीम समाजच आम्हाला पाण्यात पहात होता. बरेच जन त्यांच्या मनातील द्वेष ते उघडपणे व्यक्त करत होते. २००९ ला दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात परतलो आणि सौदी अरेबियाच्या मोहिमेवर पडदा पडला.
२०१० ला मला मुंबईत नोकरी मिळाली. गावाकडच्या घराची सोय झाली होती. आता मी शहरात घर घेण्याचे दिवसा स्वप्न पाहू लागलो होतो. याचे कारणही तसेच होते. माझ्या जवळच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांनी मुंबईत हक्काचे घर घेतले होते. अर्थात ते जरी गृहकर्ज काढून विकत घेतलेले असले तरी ‘मुंबईत घर’ या शब्दाला फारच किंमत होती. मुंबईला नोकरीसाठी गेलो तेंव्हा मला अमोल कार्ले या माझ्या L&T मध्ये असतांनाच्या मित्राने फार सहकार्य केले. त्याची स्वतःची कल्याणला सदनिका होती. मला तेथे त्याने राहायला जागा दिली. त्यावेळी तोही अविवाहित होता. नितीन पाटील व अमोल कार्ले हे दोघे आधीपासूनच तेथे राहत होते. या दोघांच्या सदनिका याच इमारतीमध्ये होत्या. लग्न होईपर्यंत मी अमोल कडेच राहिलो. मे २०१० ला लग्न झाल्यानंतर मी अमोल शेजारीच घर भाड्याने घेवून राहू लागलो. या दरम्यान मी नवीन घराच्या शोधात होतो.
मुंबईत माझी नोकरी चांगल्या पगाराची होती तरी नोकरीवर कायम तलवार लटकलेली असायची. कंपनीचा मालक सुहास चव्हाण हा फार लहरी आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याने सुहास हायड्रो सिस्टम्स नावाची कंपनी विक्रोळीत चालू केली होती. तो एकटाच सगळ्या कंपनीचा कर्ता धर्ता होता. त्यामुळे त्याचा कोणावरच विश्वास नव्हता. कंपनीत ज्या प्राथमिक गरजा मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या. पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसायचे. तेही घरूनच न्यावे लागे. शौचालय एव्हढे घाणेरडे होते कि त्यात जाने म्हणजे एक मोठी शिक्षा होती. प्रत्येक आठवड्याला कोणाच्या ना कोणाच्या नोकरीवर तलवार पडायची. सुहासच्या स्वभावामुळे मी पहिल्या पाच-सहा महिन्यातच दहा-बारा कर्मचारी बदललेले पाहिले. काही जन सुहासच्या स्वभावाला भिवून पळाले तर काहींना सुहासने पळवले. एक दिवस यात माझाही नंबर लागणार हे नक्की होते. तरीही मी येथे एक वर्ष काढले. पहिल्या महिन्यापासूनच मी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा फार प्रयत्न करत होतो. अनेक ठिकाणी मुलाखती देवूनही काहीच उपयोग झाला नाही.
नवीन नोकरी शोधणे आणि नवीन घर शोधणे या दोन्ही गोष्टी समांतरपणे चालू होत्या. अश्यातच कल्याण मध्ये आधारवाडीला रोनक कॉर्पोरेशनचा सदनिकेचा प्रकल्प चालू झाला आणि मी त्यामध्ये सदनिका घेण्याचे ठरवले. बरोबर त्याच काळात मला L&T मधील माझे जुने सहकारी दीपक पांचाळ यांचा दुबई मधून फोन आला. दीपक हे L&T ची नोकरी सोडून दुबईत नोकरीला लागले होते. त्यांच्या कंपनीत ड्राफ्टसमनसाठी जागा होती. खरेतर माझा दुबईत जाण्यात होकार देणेच म्हणजे माझी त्या कंपनीत निवड होती. हि घटना एव्हढी अनपेक्षित घडली कि मला विचार करायला संधीच मिळाली नाही. मी ज्या दिवशी हो म्हणालो त्याच्या दहा दिवसाच्या आतच मला दुबईला जायचे होते. व्हिजासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यात नवीन घर खरेदीची प्रक्रिया यात माझे फार हाल झाले. या सर्वावर मत करून मी २० फेब्रुवारी २०११ ला दुबईला आलो.
माझे दुबईला येणे याला सुहास मधील नोकरी जशी कारणीभूत होती तशी नवीन घरासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा हि काळजी सुध्दा तितकीच. म्हणूनच दुबईची नोकरी माझ्यासाठी मोठी स्वर्णसंधीच होती. मी या संधीचा फायदा घेतला आणि माझ्या स्वप्नातील दुसऱ्या घराला गवसणी घातली. दुबईस जाण्यापूर्वी मी माझ्या मोठ्या भावाच्या नवे मुखत्यारपत्र करून ठेवले होते त्यामुळे माझ्या मागे त्याने सर्व कामे व्यवस्थित व चोखपणे केली.
२००४-०५ साली घरच्यांकडे भाजीपाला व किरणा समान आणण्यासाठी सुद्धा पैश्याची आडचन होती. या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पहिल्यांदा मी आखातात आलो होतो. पण दुसऱ्यांदा आखातात आलो ते भावी आयुष्यास आर्थिक स्थैर्य येण्यासाठी.
- ©गणेश पोटफोडे