घरासाठी मला परत दुसऱ्यांदा आखाती देशात
नोकरीसाठी यावे लागले. पहिल्यांदा गावी राहायला घर नव्हते आणि मी स्वतःशीच हट्ट
करून बसलो होतो कि जोपर्यंत गावी घर होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. माझ्या
घराच्या स्वप्नाला साकार कण्यासाठी मी २००६ साली सौदी अरेबिया मध्ये पहिल्यांदा
नोकरीसाठी आलो होतो. २००६ ते २००९ या तीन वर्ष्यात शक्य तेव्हढे पोटाला चिमटे काढत
कसे तरी गावी डोक्यावर छप्पर बनवण्यासाठी मी घरच्यांना मदत केली. २००९ ला मी
भारतात परतलो ते सौदीत फिरून कधीच न येण्यासाठी. कारण इथल्या धार्मिक कट्टरतेला मी
वैतागलो होतो. सौदीत स्थायिक झालेला भारतीय मुस्लीम समाजच आम्हाला पाण्यात पहात
होता. बरेच जन त्यांच्या मनातील द्वेष ते उघडपणे व्यक्त करत होते. २००९ ला
दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात परतलो आणि सौदी अरेबियाच्या मोहिमेवर पडदा पडला.
२०१० ला मला मुंबईत नोकरी मिळाली. गावाकडच्या
घराची सोय झाली होती. आता मी शहरात घर घेण्याचे दिवसा स्वप्न पाहू लागलो होतो. याचे
कारणही तसेच होते. माझ्या जवळच्या मित्रांपैकी बऱ्याच जणांनी मुंबईत हक्काचे घर
घेतले होते. अर्थात ते जरी गृहकर्ज काढून विकत घेतलेले असले तरी ‘मुंबईत घर’ या
शब्दाला फारच किंमत होती. मुंबईला नोकरीसाठी गेलो तेंव्हा मला अमोल कार्ले या
माझ्या L&T मध्ये असतांनाच्या मित्राने फार सहकार्य केले. त्याची स्वतःची
कल्याणला सदनिका होती. मला तेथे त्याने राहायला जागा दिली. त्यावेळी तोही अविवाहित
होता. नितीन पाटील व अमोल कार्ले हे दोघे आधीपासूनच तेथे राहत होते. या दोघांच्या
सदनिका याच इमारतीमध्ये होत्या. लग्न होईपर्यंत मी अमोल कडेच राहिलो. मे २०१० ला
लग्न झाल्यानंतर मी अमोल शेजारीच घर भाड्याने घेवून राहू लागलो. या दरम्यान मी
नवीन घराच्या शोधात होतो.
मुंबईत माझी नोकरी चांगल्या पगाराची होती तरी नोकरीवर
कायम तलवार लटकलेली असायची. कंपनीचा मालक सुहास चव्हाण हा फार लहरी आणि क्रूर
स्वभावाचा होता. त्याने सुहास हायड्रो सिस्टम्स नावाची कंपनी विक्रोळीत चालू केली
होती. तो एकटाच सगळ्या कंपनीचा कर्ता धर्ता होता. त्यामुळे त्याचा कोणावरच विश्वास
नव्हता. कंपनीत ज्या प्राथमिक गरजा मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसायचे. तेही घरूनच न्यावे लागे. शौचालय एव्हढे घाणेरडे
होते कि त्यात जाने म्हणजे एक मोठी शिक्षा होती. प्रत्येक आठवड्याला कोणाच्या ना
कोणाच्या नोकरीवर तलवार पडायची. सुहासच्या स्वभावामुळे मी पहिल्या पाच-सहा
महिन्यातच दहा-बारा कर्मचारी बदललेले पाहिले. काही जन सुहासच्या स्वभावाला भिवून
पळाले तर काहींना सुहासने पळवले. एक दिवस यात माझाही नंबर लागणार हे नक्की होते.
तरीही मी येथे एक वर्ष काढले. पहिल्या महिन्यापासूनच मी दुसरीकडे नोकरी शोधण्याचा
फार प्रयत्न करत होतो. अनेक ठिकाणी मुलाखती देवूनही काहीच उपयोग झाला नाही.
नवीन नोकरी शोधणे आणि नवीन घर शोधणे या दोन्ही
गोष्टी समांतरपणे चालू होत्या. अश्यातच कल्याण मध्ये आधारवाडीला रोनक कॉर्पोरेशनचा
सदनिकेचा प्रकल्प चालू झाला आणि मी त्यामध्ये सदनिका घेण्याचे ठरवले. बरोबर त्याच
काळात मला L&T मधील माझे जुने सहकारी दीपक पांचाळ यांचा दुबई मधून फोन आला.
दीपक हे L&T ची नोकरी सोडून दुबईत नोकरीला लागले होते. त्यांच्या कंपनीत ड्राफ्टसमनसाठी
जागा होती. खरेतर माझा दुबईत जाण्यात होकार देणेच म्हणजे माझी त्या कंपनीत निवड होती.
हि घटना एव्हढी अनपेक्षित घडली कि मला विचार करायला संधीच मिळाली नाही. मी ज्या
दिवशी हो म्हणालो त्याच्या दहा दिवसाच्या आतच मला दुबईला जायचे होते. व्हिजासाठी
लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यात नवीन घर खरेदीची प्रक्रिया यात
माझे फार हाल झाले. या सर्वावर मत करून मी २० फेब्रुवारी २०११ ला दुबईला आलो.
माझे दुबईला येणे याला सुहास मधील नोकरी जशी
कारणीभूत होती तशी नवीन घरासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा हि काळजी सुध्दा
तितकीच. म्हणूनच दुबईची नोकरी माझ्यासाठी मोठी स्वर्णसंधीच होती. मी या संधीचा
फायदा घेतला आणि माझ्या स्वप्नातील दुसऱ्या घराला गवसणी घातली. दुबईस जाण्यापूर्वी
मी माझ्या मोठ्या भावाच्या नवे मुखत्यारपत्र करून ठेवले होते त्यामुळे माझ्या मागे
त्याने सर्व कामे व्यवस्थित व चोखपणे केली.
२००४-०५ साली घरच्यांकडे भाजीपाला व किरणा समान
आणण्यासाठी सुद्धा पैश्याची आडचन होती. या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी
पहिल्यांदा मी आखातात आलो होतो. पण दुसऱ्यांदा आखातात आलो ते भावी आयुष्यास आर्थिक
स्थैर्य येण्यासाठी.
- ©गणेश पोटफोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा