गद्य-पद्य, राजकारण, अर्थकारण । इतिहासापासून ते भूगोल, खगोल । भ्रमंती, चिंतन, मनन, वर्णन । आणि अजूनही बरेच काही.......
मंगळवार, २६ जानेवारी, २०१६
अरबी वेशभूषा
बुधवार, १३ जानेवारी, २०१६
कविता : वाळवंटातील तुळस
एक हिरवीगार तुळस नियमित बहरते
पूर्वजांच्या देशातल्या आम्हा बांधवांना
ती रोज आपुलकीने निरखते
कोण कुठली मी आभागी म्हणत
आपली केविलवाणी पाने फडफडवते
स्वच्छंदी होऊन वार्या बरोबर झुलते
स्वतःशीच कधी हसते कधी रुसते
सणासुदीला ती फार एकटी पडते
कार्तिक द्वादशीला तिची नजर
चातका सारखी चहूकडे भिरभिरते
चिंचा सीताफळ बोरांची ती वाट पहाते
या ओसाड वाळवंटातील उन्हात
ती फार तळमळतेय घुटमळतेय
गटारीच्या पाझरात मुळं घट्ट करून
आपुलकीची आपली माणसं शोधतेय
तिची इवली इवलीशी हिरवी पाने
जांभळ्या फुलांच्या कोवळ्या मंजिऱ्या
वाळून उगवलेल्या बियांची टवटवीत रोपं
नियतीच्या तुरुंगात पडलीयेत दूर देशी
रोज जाता येता ती आमच्याकडे पहाते
पण जाणिवेच्या तप्त निखाऱ्यात
निरंतर जाळणाऱ्या स्वतःच्या मनाला
कवटाळून ती अबोल होऊन जाते
ती म्हणत असेल मला नाही पण
माझ्या सावलीत वाढणाऱ्या रोपांना तरी
एखाद्या वृंदावनाची कुंडी मिळेल का?
रविवार, १० जानेवारी, २०१६
'शाळा' (लेखक : मिलिंद बोकील)
ते रोज त्या बिल्डिंग मधून येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलींना व शिक्षकांना चिडवायचे.
सुऱ्या आठवीच्या गुप्ते वर लाईन मारायचा. ती केवड्याच्या फुलांची वेणी घालून यायची म्हणून तिचे टोपणनाव केवडा पडले. सुऱ्या तिच्यावर फारच फिदा झाला होता. तो सारखा केवड्याचाच विचार करायचा. शाळेत कोण कोणावर लाईन मारतो याची सर्व माहिती मुलांना असायची. लेखकही वर्गात नवीन आलेल्या शिरोडकर नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो ही मग शिरोडकर वर लाईन गुपचूप लाईन मारू लागतो. यावर कोणी डाऊट खाऊ नये म्हणून तो बर्याच गोष्टींची काळजी घेतो. सुऱ्या सारखा तो उघड उघड बोलत नाही.
लेखक आपल्या बहिणीला आंबाबाई म्हणायचा. ती सारखी प्रत्येक कामात लुडबुड करायची. वडील शांत होते. ते सचिवालयात नोकरीला होते. आई जरी शांत असली तरी ती चिडल्यावर लेखक तिला घाबरत असे. तो आईला आईसाहेब म्हणायचा. या कादंबरीत नरू मामा नावाचे एक महत्त्वाचे पात्र आहे. तो लेखकाचा सख्ख्या मामा असतो. आई पासुन तो वयाने लहान होता. तो शाळेत इंग्रजी शिकवायचा. तो जेव्हा जेव्हा मुंबईत यायचा तेव्हा तो लेखकाला इंग्रजी चित्रपट पहायला घेऊन जायचा. दोघांचे संबंध फार मैत्रीचे होते. लेखक आणि नरू मामा मुलींच्या विषयी गप्पा मारत. लेखक बर्याचदा मित्रांचे नाव सांगून त्याच्या कडून टिप्स मिळवायचा. ही कहाणी साधारणपणे 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळात घडलेली आहे. आणीबाणीचा बराच उल्लेख यामध्ये येतो. शाळेतही इंदिरा गांधींच्या सर्मथनात गाणी गायला लावायचे. या वेळची दडपशाही याची माहिती लेखक देतो.
शिरोडकर एक ठिकाणी क्लास लावते हे लेखकाला समजते. मग तोही तिथेच क्लास लावतो. तो सारखा शिरोडकरला भेटायचा प्रयत्न करतो. तिच्यावर पाळत ठेवून ती कुठल्या रस्त्याने येते जाते याची माहिती मिळवतो. शेवटी त्यांची भेट होते. शिरोडकरला कळते कि जोशी आपल्यावर लाईन मारत आहे. शाळेतल्या इंग्रजीच्या बेंद्रे बाई फारच कडक होत्या. त्यांच्या इंग्रजीच्या तासाच्या आधी तो फळ्यावर अनुशासनपर्व असे लिहीतो. तेव्हातर त्याला बेंद्रे बाई फार मारतात.
कहाणीचा शेवट हा मोठा नाट्यमय होतो. सुऱ्या एकदा बिल्डिंगवरून केवड्याला एकटीच येताना पाहतो. सुऱ्या तिला लेखकाच्या मदतीने थेट जाऊन विचारतो. ये आपल्याला लाईन देते का? केवडा घरी आपल्या वडिलांना ही हकिकत सांगते. दुसर्या दिवशी त्याचे वडील शाळेत तक्रार घेऊन येतात. तेव्हा ते त्या दोघांना फार मारतात. त्याना पालकांना बोलवून घ्यायला सांगितले जाते. सुऱ्याच्या घरी जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याचे वडील त्याला फार मारतात. लेखकालाही घरी बोलणे बसतात. दुसर्या दिवशी पालक येतात. पण तोपर्यंत याचा बोभाटा शाळाभर होतो. शिरोडकर लेखकाकडे पहायचे सोडून देते. शाळेची परीक्षा संपून सुट्टी लागते. सुट्टीत लेखक आजोळी नरू मामाच्या लग्नाला जातो. शाळेचा निकाल लागतो. लेखक पाचवा नंबर मिळवतो. सुऱ्या आणि फावड्या नापास होतात. शिरोडकर निकाल घ्यायला आलेली नसते. नंतर लेखकाला तिच्या वडिलांची बदली झाल्याचे कळते. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो.
शाळा कादंबरीत अनेक ठीकाणी गमतीदार विनोद आढळतात. कादंबरी वाचताना आपण भूतकाळात जातो. आपल्या शाळेय जीवनाची आठवण येते.
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५
दुबईतील गुलाबी थंडी
ऑक्टोबर सरता सरता दुबईतील तापमानाचा पारा खाली उतरू लागतो. जीव नकोसा करणारा, अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपतो आणि चाहूल लागते ती हिवाळ्याची. नोव्हेंबर महिन्यात तापमान सामान्य होत जाते. बहुतेक घरातील ए सी बंद राहतात. भर दुपारी बाहेर फिरताना उन्हाची रखरख जाणवत नाही.
डिसेंबर महिन्यात बहुतेक वेळा आकाश काळ्या ढगांनी व्यापून जाते. या महिन्यात बरेचदा पाऊल अनुभवायला मिळतो. पाऊस आणि उत्तर पश्चिम दिशेकडून वाहणारा वारा यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. सलग आठ नऊ महिने अडगळीत पडलेली स्वेटर, मफलर बाहेर पडू लागतात. पावसाचे ठराविक प्रसंग सोडल्यास आकाश मोकळे असते. उबदार कोवळे उन अंगाखांद्यावर घ्यावेसे वाटते. दुबईतील बाग बगीचे, रस्ते मनमोहक सुगंधी फुलांनी सजवले जातात. स्वतःला वातानुकूलित घरात, गाडीत बंद करून ठेवणारे दुबईकर मुक्तपणे उघड्या गाडीतून फिरू लागतात.
दुबईतील रस्ते पर्यटकांनी भरून जातात. दुबईतील गुलाबी थंडी अनुभवायला देशविदेशातील पाहुणे डेरेदाखल होतात. परदेशी पाहुण्यात पक्षांचाही समावेश असतो. दुबई क्रिकवर परदेशी पक्षी मनमोकळेपणे वातावरणाचा आनंद लुटतात. आपल्या देशात अंग गोठणाऱ्या कडाक्याच्या थंडीपेक्षा इथले वातावरण त्यांना स्वर्गा सारखे भासू लागते.
नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबई आता जागतिक केंद्र बनले आहे. येथली आतिषबाजी पाहण्यास लाखो पर्यटक येतात. बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, पाम आयलंड वरील नयनरम्य आतिषबाजी अनुभवायला प्रचंड गर्दी होते. नाताळ व नवीन वर्षाची येथे सरकारी सुट्टी असल्याने डिसेंबरचा शेवटचा आठवडा उत्साहात सरून जातो.
जानेवारी महिन्यात दुबई शॉपिंग फेस्टिवलची सुरूवात होते. दुबईतील हाॅटेल व पर्यटन व्यावसायिकांसाठी हा सुवर्ण काळ असतो. विविध ऑफर्स आणि योजना घेऊन दुबईतील दुकाने व माॅल्स तयार होतात. सोने खरेदीला उधाण येते. सोन्याची या दिवसात एवढी मोठी खरेदी होते की दर दिवशी एका भाग्यवान विजेत्याला चक्क एक किलो सोने बक्षिस म्हणून दिले जाते.
ग्लोबल व्हिलेज, समुद्र किनारे, माॅल्स अक्षरश: भरून जातात. या दिवसात लोक डेझर्ट सफारीचा आनंद घेतात. थंड वातावरणात वाळवंट अनुभवायला मिळतो. बरेच लोक वाळवंटात कॅम्प करून राहतात. फेब्रुवारी सरता सरता दुबईतील पर्यटक मायदेशी निघतात.
मार्च सुरू झाल्यावर तापमानाचा पारा परत चढू लागतो. हवा हवासा वाटणारा हिवाळा संपलेला असतो. पूढील आठ महिने हिवाळ्याची वाट पाहण्यात कंठावे लागतात.