मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

२०२१/बखर २ : कोरोनाची ओळख

२०२१/बखर २ : कोरोनाची ओळख

३ जानेवारी २०२१

कोरोना विषाणू अर्थात कोव्हिड-१९ हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू नाक, तोंड किंवा डोळ्यातून मानवी शरीरात प्रवेश करतो. एखाद्या बाधित व्यक्तीच्या खोकल्यामुळे, शिंकल्यामुळे किंवा बोलल्यामुळे तो जवळपास असलेल्या इतर व्यक्तींना बाधित करू शकतो. त्याचबरोबर बाधित व्यक्ती शिंकल्यावर किंवा खोकल्यावर थुंकीचे जे तुषार बाहेर पडून आजूबाजूचा पृष्ठभाग किंवा वस्तू ते दुषित करतात. अशा पृष्ठभागावर किंवा वस्तूला जर स्पर्श करून तोच हात नाकातोंडाला किंवा चेहऱ्याला लावल्यास या विषाणूची बाधा होऊ शकते. हा विषाणू पृष्ठभागावर जवळपास ७२ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो.

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर ताप, खोकला, सर्दी, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. इतर लक्षणांमध्ये थकवा, अंगदुखी, घशात खवखव, जुलाब, वास न येणे, चव ओळखता न येणे किंवा पोटदुखी यांचा समावेश आहे. बाधित झाल्यानंतर ते लक्षण दिसेपर्यंतचा कालावधी हा दोन ते चौदा दिवसांचा असू शकतो. लक्षणे दिसेपर्यंत बाधित व्यक्ती अनेकांना संक्रमित करू शकतो. कोरोनाची बाधा झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसतात आणि बरेचदा तो साध्या औषधोपचाराने बरा देखील होतो. परंतु वृद्ध, आगोदरच व्याधी असलेले रुग्ण, जाड व्यक्ती, मधमेह, उच्च रक्तदाब  किंवा कमी रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्यांनाच्या जीवावर हा आजार बेतू शकतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता, श्वासोच्छ्वासास अडचणी, न्यूमोनिया किंवा इतर अवयव निकामी होणे असल्या कारणामुळे रुग्णांचा मृत्यू होतो. बाधित अनेक रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता पडते.

हा आजार होवू नये म्हणून खालील काही उपाय आहेत.
१. इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे (Social Distancing)
२. चेहऱ्यावर मास्क लावून तोंड व नाक झाकणे
३. नियमित साबणाने किमान २० सेकंद हात धुणे
४. एखाद्या पृष्ठभागाला किंवा वस्तूला हात लावल्यावर ते न धुतलेले हात चेहऱ्यावर न लावणे
●●●

२०२१/ बखर ३ : २०२० चा कोरोना कालखंड

५ जानेवारी २०२१
इ.स. २०२० हे वर्ष मानवी इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहील. यावर्षी कोरोना विषाणू "कोव्हिड-१९ (Covid19)" ची साथ जगभर पसरली. २०१९ च्या अखेरीस चीनच्या वूहान शहरात हा विषाणू सगळ्यात आधी सापडला. त्यानंतर काही महिन्यातच प्रवाशांमार्फत तो जगभर पसरला. फेब्रुवारी-मार्च महिन्यात तर त्याने संपूर्ण जगभर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. जागतिक आरोग्य संघटनेने याला साथीचा रोग ( Pandemic) म्हणून घोषित केले. या साथीच्या रोगाने लाखो लोकांचे प्राण घेण्यास सुरुवात केली. चीन पाठोपाठ इटली, फ्रान्स, स्पेन, ब्रिटन, अमेरीका, ब्राझील, भारत आणि इराण या देशात तर या विषाणूने हाहाकार माजवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च २०२० पासून पुढील २१ दिवस भारतभर संपूर्ण टाळेबंदीची घोषणी केली. टाळेबंदी म्हणजे एकप्रकारची संचारबंदी होती. या टाळेबंदीमुळे अनेक लोकांचे आतोनात हाल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले. परप्रांतीय मजूरांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला. रेल्वेसेवा बंद झाल्याने अनेक जण अडकून पडले. यातील अनेकांनी पायी किंवा मिळेल त्या साधनांनी प्रवास सुरू केला. आर्थिक चक्र थांबल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचे दुरगामी परिणाम झाले. करसंकलन थंडावल्याने तिजोरीत खडखडाट झाला.

दुसरीकडे अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्य सेवांवर कमालीचा ताण आला. ठिकठिकाणी दवाखाने भरून गेले. सरकारला तात्पुरते दवाखाने उभारावे लागले. पोलिस दल व आरोग्य कर्मचारी अपुरे पडू लागले. यातील अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. दवाखान्यात गेलेले अनेक रुग्ण घरी परत आलेच नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना तर दवाखान्यातून थेट अत्यंतसंस्कार करण्यासाठी नेण्यात येत होते. त्यामुळे नातेवाईकांना आप्तस्वकीयांचे अंत्यदर्शन देखील घेता आले नाही. कोरोना विषाणूचा काळ खरोखरच माणसासाठी खूप कसोटीचा काळ होता. या भीषण साथीचा प्रभाव आता भारतात तरी कमी होतांना दिसत आहे.

रविवार, ४ एप्रिल, २०२१

२०२१/बखर १ : दशकाची बखर

१ जानेवारी २०२१

एकविसाव्या शतकातील दोन दशके बोलता बोलता कधी संपून गेली हे समजले देखील नाही. २००१ ते २०२० या वीस वर्षांत खूप महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. ज्याची मानवी इतिहासात नोंद होईलच. या शतकातील हे सुरू झालेले तिसरे दशक देखील मला तितकेच महत्वाचे वाटते. मागच्या दोन दशकात मोबाईल युगाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवून आणली. सामान्य माणसाच्या हातात आलेले मोबाईल फोन हे या क्रांतीचे मोठे यश मानावे लागेल. मोबाईल क्रांतीमुळे एक नवे क्षेत्र तयार झाले. नव्या क्षेत्रामुळे नवनव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतही महत्वाचे बदल होत गेले. आणि असे काही होणे हे अपेक्षितच होते. जनसामान्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे अवघे जगच त्यांच्या मुठीत आले. त्यात फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप किंवा इंस्टाग्राम वगैरे समाज माध्यमांच्या उदयामुळे या क्रांतीला विविध पैलू पडत गेले. मोबाईल, इंटरनेट या गोष्टी आता मानवी जीवनाच्या गरजा बनू लागल्या आहेत.

गेल्या शंभर वर्षांत माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर उतुंग भरारी घेतलेली आहे. संगणक, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे, अवकाश संशोधन, आणि शिक्षण यासारख्या सगळ्याच क्षेत्रातील माणसाची प्रगती अचंबित करणारी आहे. शतकापूर्वीची आणि आजच्या परिस्थितीची तुलना केल्यास आपल्याला यातील जमिन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवेल. विसाव्या शतकात उपलब्ध असलेल्या कृष्णधवल फोटो किंवा चलचित्रफितीतून तेव्हाची आणि आजची परिस्थिती यात तुलना करता येवू शकते.

२०२१ ते २०३० या दशकाच्या नोंदी कुठेतरी लिहुन ठेवाव्यात असं मला वाटतं. जेणेकरून याचा कदाचित एखाद्या अभ्यासकाला येणाऱ्या कालखंडत फायदा होईल. आपण भारतीय आपल्या आजूबाजूचा इतिहास लिहून ठेवण्यात कुठेतरी कमी पडतो आहोत. जर घडलेल्या समकालीन घटनांची व्यवस्थित नोंद ठेवल्यास भविष्यात अनेकांचा या घटनांचे संदर्भ शोधण्यात मुळीच वेळ वाया घालावा लागणार नाही. तसं पाहिलं गेलं तर चालू घडामोडींचा नि:पक्षपणे नोंदी होणे खूप महत्वाचे आहे. मनात कुठलाच पुर्वग्रह न ठेवता असल्या नोंदीमुळे याला इतिहासाचे साधन म्हणून बघितले तर वावगे ठरू नये. मराठी भाषेत अशाप्रकारच्या नोंदी अलिकडच्या काळात कुणी करत असेल तर याची मला कल्पना नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी समकालीन नोंदी किंवा आधुनिक बखरी मराठी भाषेत लिहून ठेवणे माझ्यासाठी महत्त्वाचे वाटते.

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

बाल कविता : पक्षांची भरली शाळा

 

(Photo Credit : FLICKR USER SOROUSH JAVADI // CC BY-SA 2.0)

पक्षांची भरली शाळा

वीजेच्या खांबाजवळ
पक्षांची भरली शाळा
तारेचाच केला वर्ग
आकाशाचा झाला फळा

खंडोजी धीवर गुरूजी
आले निळा कोट घालून
कावळेराव मुख्याध्यापक
उभे चोचीत छडी घेऊन

टिटवीने जोरात केली
शाळा भरायची गर्जना
कोकिळा ताईने गायली
मग सकाळीची प्रार्थना

साळुंखी आणि पोपटाचे
नव्हते पाढे पाठ
बगळ्यांनी गिरवले मग
फळ्यावर पाढे आठ

चिमण्यांनी गायली
कविता एक छान
पारव्यांनी डोलावली
ताला सुरात मान

मोराने घातला होता
छान छान गणवेश
बदक आणि कोंबडीला
नव्हता वर्गात प्रवेश

होला आणि कोतवाल
आज होते गैरहजर
वेड्या राघुची नुसती
घड्याळाकडे नजर

चातक बघु लागला
शाळा सुटायची वाट
पिंगळ्याने वाजवली घंटा
पक्षी उडाले एकसाथ