बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

मला आखातात नोकरी मिळाली!

आखातात येऊन आता एका दशकाहून अधिक काळ लोटला आहे. माझं बालपण, शिक्षण हे भारतात जरी गेलं असलं तरी अख्खं तरूणपण आखातात गेलं. वयाच्या अगदी चोवीसाव्या वर्षात हातात मुठभर स्वप्न घेऊन मी इथं आलो होतो. इथल्या वाळूने कधी आपलंसं केलं हे कळले देखील नाही. सुरुवातीचा काळ वगळता नंतर मी देखील इथल्या वातावरणात रमून गेलो. एका दशकानंतर मी आज जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा मला जाणीव होते की ज्या स्वप्नासाठी एवढा खटाटोप केलो होता त्याचं फळ मला मिळाले आहे. पाहिलेली स्वप्न सत्यात उतरली आहेत. माझ्या कष्टाला आणि त्यागाला आखाताने भरभरून दिले.

परिस्थिती माणसाला विचार करण्यास आणि त्यागास प्रवृत्त करत असते. माझ्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरूणापुढं भविष्याची चिंता होती. परिस्थितीमुळे शिक्षण पुर्ण होऊ शकलं नाही. केवळ आयटीआय आरेखक यांत्रिकी एवढीच पात्रता मिळवून मी बाहेर पडलो. आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतरचा काळ माझ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होता. सतत काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्न फक्त खाण्यापूरतं व्हायचे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे हाच एकमेव पर्याय मला दिसत होता. कधी कधी वाटायचं की आरेखक यांत्रिकी हा ट्रेड करून चूक केलीये का? कारण या ट्रेडला नोकरी शिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिक्षण घेत असतांना याची मला सतत जाणीव होत होती. माझ्या आधीच्या काही बॅचमधील ठराविक दोनचार मुलांनाच नोकरी मिळाली होती. आपल्याला नोकरी मिळते की नाही याबाबत माझ्या मनात खूप भिती वाटायची. उत्तीर्ण झाल्यावर नोकरीसाठी संघर्ष करावाच लागणार होता हे उघड होते. 'शिक्षण कधीच वाया जात नाही!' या म्हणीने मला नेहमी प्रेरणा दिली. जेंव्हा मी उत्तीर्ण झालो त्यावेळी नोकरी मिळवण्यासाठी अनेक पुढारी व ओळखीच्या नातेवाइकांकडे गेलो पण अश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. मग मी स्वतःहून नोकरी शोधायला लागलो. त्याकाळी सकाळ पेपरात नोकरीच्या संदर्भात एक पुरवणी यायची, त्यातूनच मी एल अॅण्ड टी मुंबई येथे अॅप्रेंटीससाठी अर्ज केला आणि योगायोगाने माझी निवड देखील झाली. अॅप्रेंटीस पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई-पुण्यात काही काळ नोकरी केली. नोकरी मिळाली तरी घरातील परिस्थिती सुधारत नव्हती कारण मला मिळणारा पगार पुरेसा नव्हता.

२००५ ला मी एका कंपनीत कामाला असतांना तेथील माझे काही मित्र हे आखातात नोकरी करून आलेले होते. त्यांचे राहणीमान हे खूप सुधारलेले होते. मला वाटायला लागले की, आपणही आखातात घाऊन नशीब का आजमावू नये? त्यावेळी मी मनाशी पक्के केले की आपणही आखातात जायचेच. त्यानंतर मला आखातात नोकरी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आखातात नोकरी मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. पासपोर्ट कसा असतो? तो कसा मिळवायचा? कुठे अर्ज करायचा? हे देखील मला माहीत नव्हते. माझ्या बरोबर काम करणा-या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. त्यानंतर जवळपास एक वर्ष मला पुणे मुंबई इंटरव्ह्यूसाठी फे-या मारव्या लागल्या. मुंबईतील काही एजंट नोकरी मिळवून देतो म्हणून फसवणूक देखील करतात. ब-याच ठिकाणी मला याचे खूप वाईट अनुभव आले. आखातात आधी जाऊन आलेल्या माझ्या मित्रांनी मला एजंटच्या हातात पासपोर्ट कधीच द्यायचा नाही असा सल्ला दिला होता आणि तो मी पाळला. कामगारांना घेऊन जाण्याचा सगळा खर्च ही तेथील कंपनी करत असते तरीही हे एजंट आपल्याकडून खर्चाच्या नावाखाली खूप पैसे मागायचे म्हणून पैसे मागणा-या कंपनी वा एजंटकडे मी जाणे टाळले.

एजंटला एक पैसाही न देता २००६ साली मला पहील्यांदा सौदी अरेबिया येथे नोकरी मिळाली. नोकरी मिळाली पण पगार होता जेमतेम १७०० रियाल (त्यावेळचे २०,००० रूपये). भारतात मिळत होता त्यापेक्षा काही हजार जास्त. तरीही एक नवीन संधी आणि अनूभवासाठी मी ही नोकरी पत्करली आणि आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली.

नवीन देशात चाललो होतो त्यामुळे मनात एक भिती होती. मी या अधी कधीच विमानात प्रवास केला नव्हता. पहिला विमान प्रवास हा माझ्या अविस्मरणीय अनुभव होता. सौदीमध्ये पहिल्यांदाच पाउल ठेवल्यानंतर माझ्या मनात शंका होती की मला कोणी मराठी बोलणारा मित्र भेटेल की नाही. आमच्या कंपनीतील नवीन १४ लोकांच्या ग्रुप मध्ये मी एकटाच मराठी भाषक होतो तर इतर बहुतेक दक्षिणात्य होते. येथे आल्यावर जवळपास दोन आठवडे मला मराठी बोलायला मिळालेच नाही. काही दिवसांनी येथे दोन-तीन मराठी माणसं आहेत असं समजल्यावर मला फार आनंद झाला.

सौदी मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे केरळी लोकांची संख्या आणि त्यांनी येथे प्रत्येक व्यवसायात घेतलेली गरुड झेप. येथे केरळी लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांचा प्रत्येक व्यवसायात बोलबाला आहे. मुंबईमध्ये जसे भैय्या लोक कुठलाही व्यवसाय करतात त्याप्रमाणे येथेही केरळी लोक सर्व प्रकारच्या व्यवसायात दिसतात. किराणा दुकान, खानावळी, चहाची दुकानं, शॉपिंग सेन्टर्स, नाव्ही, टेलर, गाडी चालक, लाँड्री वाले, भाजीपाला विक्रेते असे जवळपास सर्व व्यवसाय केरळी लोकांचेच आहेत. येथे असलेले बहुतेक डॉक्टर आणि नर्स हे देखील केरळीच आहेत.

सौदी अरेबियातील नियम हे भारतापेक्षा खूपच वेगळे होते. तिथे राजेशाही राज्यपद्धती चालते. इस्लाम धर्म आणि इस्लामीक कायदे तिथे काटेकोरपणे पाळले जातात. याचा अनूभव तिथं गेल्यागेल्या आला. रमजानच्या महीन्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा उघडपणे काही खाता-पिता मनायी असते. गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शिक्षा दिली जाते मग ते चाबकाने फटके मारणे असो नाहीतर फाशी किंवा शिरच्छेद असो.

माझी कंपनी ही सौदी अरेबियाच्या दम्माम या शहरात होती. आमची राहण्याची व्यवस्था कंपनीने जरी केली असली तरी खाण्यापिण्याचा खर्च ज्याला त्यालाच करावा लागणार होता. म्हणजे १७०० रियाल पगारामधून जवळपास २०० रियाल खर्च व्हायचा आणि उरलेले पैसे घरी पाठवावे लागचे. सुरुवातीचे दोन महिने खूप वाईट गेले. मी जन्मापासून शुद्ध शाकाहारी माणूस असल्यामुळे माझे खाण्यापिण्याचे थोडे हालच झाले. सौदी मध्ये शुद्ध शाकाहारी अश्या खानावळीच नाहीत. रेस्टॉरंटमध्ये फक्त मौंसाहारी पदार्थ मिळायचे. क्वचितच एखाद्या ठिकाणी शाकाहारी जेवण मिळायचे. दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये इडली, डोसा आणि परोठा खाऊन थोडे दिवस काढले. स्वयंपाकाचे माझे ज्ञान शुन्य होते तरीही काही दिवसांनी कसेतरी जेवण बनवायला लागलो.

कुठल्याही नवीन प्रदेशात जाण्या अगोदर आपल्या मनात अनेक शंका येतात जसे की, त्या देशाची भाषा आपल्याला येत नाही मग कसे होणार? वगैरे, पण माझ्या बाबतीत हा अनुभव थोडा भिन्न होता. मी सौदी मध्ये येण्या अगोदर अरबी भाषेचे थोडे ज्ञान संपादन केले होते. माझ्या गावातील एक टेलर काम करणारा मित्र पाच वर्ष सौदीत काम करून परतला होता त्यामुळे तो खूपच छान अरबी बोलत असे. मी त्याच्याकडून अरबी भाषेचे थोडे शब्द आणि वाक्य शिकून घेतले त्यामुळे येथे आल्यावर मी नवीन असून सुध्दा भाषेचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या एका मुस्लिम मित्राकडून उर्दू अक्षरे शिकलो होतो. अरबी आणि उर्दू लिपीत बरेच साधर्म्य असल्यामुळे मला अरबी लिहिण्यास व वाचण्यास काहीच अडचण आली नाही. अरबी भाषा चांगली शिकण्यासाठी मी जोमाने प्रयत्न केले. कंपनी मध्ये जुन्या सहकाऱ्याकडून मी वेगवेगळे नवीन शब्द आणि वाक्य शिकून ते एका वहीत व्यवस्थित लिहून घेतले. अरबी भाषेचा अभ्यास करताना मला आढळून आले की अरबी मधील कित्येक शब्द आपण मराठी मध्ये जाशेच्या तशे वापरतो. नंतर मी माझ्या वहीत अरबी आणि मराठीत वापरत येणाऱ्या सारख्या शब्दांची यादीहीच करून ठेवली. सौदी मध्ये दाखल झाल्यानंतर काही महिन्यातच मी अरबी छान बोलू लागलो होतो.

मिळणारा पगार खरोखरच तुटपुंजा होता. गावाकडच्या लोकांना आणि मित्रांना असे वाटायचे की मी लाखात कमावतो आहे. अजूनही गावाकडच्या लोकांची हीच धारणा असते की दुबईत काम करणा-या व्यक्तीस लोखो रूपये पगार असतो आणि तो सहजासहजी मिळतो. एक प्रकारे गावी गेल्यावर त्यांची नेहमी याबाबत कुचेष्टा केली जाते. पण आखाती देशात ज्या परिस्थितीत कामगारांना काम करावे लागते त्याची विचारपूस किंवा चर्चा कोणी करत नाही. मी आरेखक असल्यामुळे मला बाहेर (आऊट डोअर) काम नसायचे. पण बाहेर काम करणा-या लोकांचे काम खरोखरच फार कठीण होते हे मी पाहिले आहे. सौदी अरेबिया म्हणजे वाळवंटी देश. इथला उन्हाळा खूपच कडक असतो. उन्हाळ्यात तापमान जवळपास ५५° सेल्सिअस पर्यंत जाते. त्यात भयंकर आर्द्रता, वाळूचे वादळ असल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. कंस्ट्रक्शन साईटवर काम करणा-या लोकांचे खूप हाल होतात. तरीही आपली स्वप्न आणि घरच्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी हा कामगार एवढ्या उष्ण परिस्थितीतही काम करत रहातो. आखातात काम करणा-या कामगारांचे जीवन मी जवळून अनूभवले आहे. काही ठिकाणी लेबर कॅम्पमध्ये कामगारांना खूप वाईट परिस्थितीत रहावे लागते. आखातात बराच काळ राहिल्या नंतर त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. एवढं सगळं होऊनही भारतात त्यांची नातेवाईक आणि सरकारकडून उपेक्षाच होते. सरकार अनिवासी भारतीयांना केवळ विदेशी मुद्रा कमावून देणारी मशीनच समजते. या अनिवासी भारतीय कामगारांसाठी सरकारकडे काही ठोस उपाययोजनाच नाही. त्यांना साधे आधार कार्ड देखील काढता येत नाही. मतदानासारखा घटनेने दिलेला अधिकार निभावता येत नाही.

२००६-२००९ या तीन वर्षाच्या कालखंडात मी सौदी अरेबियामध्ये नोकरी केली. सौदी अरेबियात अनेक निर्बंधामुळे विदेशी नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर खूप मर्यादा होत्या. त्यामुळे सौदी अरेबियात विदेशी लोक आपले उत्सव, सण मोकळेपणाने साजरे करू शकत नाहीत. अनेक निर्बंध असूनही मी या देशात मनाने काम केले. पुढे माझी कामगिरी पाहून कंपनीने पगार एका चांगल्या पातळीवर नेला. सौदीत खूप वेगवेगळे अनूभव मिळाले त्यात विविध देशातील लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीशी ओळख झाली.

२००९ साली मी नोकरीचा राजीनामा देऊन भारतात परतलो.

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

कविता संग्रह : मनाच्या झरोक्यातून



पुस्तकाचे नाव : मनाच्या झरोक्यातून
प्रकार : काव्यसंग्रह
कवी/लेखक : गणेश भाऊसाहेब पोटफोडे
प्रकाशक : मीरा बुक्स, औरंगाबाद
किमंत : १00 रुपये (पोस्टाचे चार्ज धारून)
संपर्क : gbp125@gmail.com 

बुधवार, १२ जुलै, २०१७

कथासंग्रह : आभाळ (शंकर पाटील)


कथासंग्रह : आभाळ
लेखक : शंकर पाटील
प्रकाशन : मेहता पब्लिकेशन हाऊस
किंमत : १०० रू

शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे. त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे. ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण तसेच त्यांचे चटपटीत संवाद आपल्याला त्यांच्या कथांतून अनूभवायला मिळतात. नैसर्गिकपणे आलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. खेड्यातील माणसं, त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय.

कथा, कादंबरी, वगनाट्य, स्फुटलेखन, चित्रपट कथा सारख्या साहित्यिक प्रकारात त्यांचे योगदान मोठे आहे. ऊन, खुशखरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, टारफुला, धिंड, पाऊलवाटा यासारखे अनेक कथासंग्रहाने त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. 

समाज हा नेहमीच परिवर्तनशील राहीला आहे. समाजातील घटकांचा त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गाचा, मानसांचा आणि आपल्या वयाचा परिणाम झालेला आपल्याला नेहमी दिसतो. नैसर्गिक कारणांमुळे ग्रामीण भागात होणारे परिवर्तन आपल्यातील अनेकांनी अनुभवले आहे. अशाच ग्रामीण जीवनावर भाष्य करणारा "आभाळ" हा कथासंग्रह आहे. यात लेखकाने ग्रामीण जीवनातील विविध विषय टिपलेले आहेत. या कथासंग्रहात एकून १३ कथा आहेत. या कथांच्या माध्यमातून लेखक समकालीन परिस्थितीचे चित्र हुबेहुब आपल्या डोळ्यासमोर साकारण्यात यशस्वी होतात.

म्हातारपणात आपल्या आगोदर सोडून गेलेली बायको, स्वतःच्या संसारात व्यस्त झालेला मुलगा आणि रामजी काकांना आलेले मानसिक एकटेपण, मुलाचे बापाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे रागावून रानातल्या खोपीत आलेले रामजी काका. भर पावसात खोपीच्या तोंडाशी अंधारात बसून आपल्या भूतकाळातील आठवणीत हरवून गेलेले आणि खोपीबाहेर डोळे किलकिले करून अनंतात पहात बसलेले असतात. भाकरीचं गटळं घेऊन आलेला चंद्रप्पा आणि रामजी काका यांच्यातील संवाद मनाची घालमेल करतात. आपल्या हृदयाला स्पर्श करणारी "निचरा" ही पहिली कथा आहे. या कथेतून आईबापानी बालपणात आणि आपल्या सुखासाठी, आपल्याला वाढवण्यात घेतलेले कष्ट मुलं लग्न झाल्यावर कसे विसरतात; या सामाजिक समस्येवर या कथेतून भाष्य केले आहे.

कधीकाळी आपल्या पळवून नेलेल्या बायकोला परत घेऊन जाण्यासाठी गाढवावर बसून व एका प्रतिष्ठित पाटलाकडे फिर्याद घेऊन आलेला बेलदार. हातावर असलेले पोट. आपण चार आणे कमवले तर बायको किमान तीन आणे तरी कमवील हा त्याच्या जगण्याचा हिशोब आपल्याला "हिशोब" या कथेतून पाहण्यास मिळतो. 

रादूबाई ही आपली बायको याच गावात असून तिला आपल्याला परत करावी याची विनंती तो पाटलाला करतो. पाटील तपास घेतात तेंव्हा त्यांना समजते की बेलदाराची बायको गावातील राऊ जांबळ्याकडे आहे. त्याला चावडीत बोलावण्यात येते. नागू पैलवानानं पळवलेली बेलदाराची बायको आपण दोनशे रूपयात घेतली. जर बेलदाराला ती परत पाहीजे असेल तर त्याने ती दोनशे रूपये देऊन घेऊन जावी. बेलदाराची गरीब परिस्थिती कळल्यावर राऊ जांबळ्यात शंभर रूपयावर ती देण्यास तयार होतो. पण रादूबाईला दोन मुलं आहेत हे कळल्यावर बेलदाराच्या जगण्याचा हिशोबच चुकतो. ही मुलं जर बायकोबरोबर आली तर ती आपल्याला परवडणारी नाहीत. म्हणून तो बायको न घेताच परत जातो.

म्हातारपणीही बाई माणसाचं संसारात किती मन गुंतलेले असते याचे सुरेख वर्णन आपल्याला "कावळा" आणि "वावटळ" या दोन कथांमधून अनुभवायला मिळते. म्हातारपणी उसणवारी, व्याजावर दिलेले पैसे तसेच राहतात. मेल्यावर मात्र त्या पैशांसाठी आत्मा घटमळत असतो.

म्हातारपणी वावराशिवारातही बाई माणसांचा जीव अडकलेला असतो. भर पावसात, वा-या वादळात आंब्याच्या कै-या गोळा करण्यासाठी आर्ध्या रस्त्यातून परत फिरणारी व त्या पडलेल्या कै-या कुणी चोरून नेवू नये म्हणून रात्री भर पावसात त्याला राखन बसणारी म्हतारी. या दोन्ही कथा फारच सुंदर असून ग्रामीण स्त्री मनाचा त्या वेध घेतात.


"सोबत" कथेत तालुक्याच्या ठिकाणीहून गावाकडे निघालेला गोपाळ. एका तरूण व देखण्या आणि आड वाटेने एकट्याच निघालेल्या बाईवर भुलतो. या नादात स्वतःची वाट सोडून त्या बाईबरोबर निघतो. इचलकरंजीहून बदलून आलेली शिक्षिका उद्या शनिवारची सकाळच्या शाळेत वेळेवर पोहण्यासाठी आधल्या दिवशीच त्या गावी निघालेली असते. पण गाडीच्या बिघाडीमुळे तिला उशीर झालेला असतो. गोपाळ त्या तरूण बाईला तिच्या ठिकाणापर्यंत सोबत करतो. पण शेवटी त्याला निराशाच मिळते.

ग्रामीण जीवनात आपल्याला पदोपदी उपेक्षित जीवन कंठत असलेले म्हातारे आईबाप नेहमीच दिसतात. भीमा व शिवा या दोन भावांच्या वाटणीत भलडलेले गेलेले म्हतारे आईबाप आणि त्यांचे शेवटी होणारे हाल हे "वाटणी" या कथेतून लेखक मांडतात.

"आभाळ" ही शिर्षक कथा शेतक-यावर निसर्गामुळे येणा-या मानसिक दडपणाचे वर्णन करते. कधी पाऊस वेळेवर येत नाही, आला तर पिक जेंव्हा काढणीला आलेले असते नेमका त्याचवेळी पाऊस येतो. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला जातो आणि या परिस्थितीत जेंव्हा शेतकरी सापडतो तेव्हा तो फार मानसिक दडपणाखाली असतो. अशाच एका प्रसंगाचे वर्णन आपल्याला या कथेतून प्रतिबिंबित झालेले दिसते.

आकाश ढगांनी भरून येते, शेतात कापून वाळत घातलेल्या तंबाखूच्या चापाचे काय होणार याची चिंता हरीबाला सतावत असते. तर पाऊस आला तर सगळ्यांचेच नुकसान होईल या विचारात त्याची बायको बिनघोर झोपलेली असते. आपले कष्ट काया जातात की काय याची चिंता मात्र हरीबाला असते. तो मनाचे समाधान होण्यासाठी गावभर फेरी मारतो व पावसाचा अंदाज घेतो.

"कोंडी", "अर्धली", "जीत" आणि "वंगण" या कथादेखील ग्रामीण जीवनाचे व ग्रामीण कौटुंबिक समस्यांचे यथार्थ वर्णन करतात. तर शेवटच्या दोन कथा "पानगळ" आणि "वाटचाल" या कौटुंबिक वातावरणात उद्भवणा-या समस्यांमुळे माणसाच्या मनावर होणार आघात आणि त्यामुळे होणारे मानसिक विकार अत्यंत चपखलपणे मांडतात.

_ गणेश भाऊसाहेब पोटफोडे

बुधवार, १४ जून, २०१७

सम्राट अशोक चरित्र (लेखक: वासुदेव गोविंद आपटे)


सम्राट अशोक चरित्र
लेखक: वासुदेव गोविंद आपटे
विस्तार : प्र. रा. अहिरराव
सुधारीत आवृत्ती : डिसेंबर २००२
प्रकाशक : वरदा बुक्स
किंमत : २५० रु

भारताच्या राजमुद्रेवर, नाण्यांवर किंवा चलणी नोटांवर आपण अशोकस्तंभ रोज पाहतो. भारताच्या राष्ट्रध्वजावरही अशोक चक्र उमटलेले आपण पाहतो. पण ही जी प्रतिकं ज्या राजाची आहेत तो सम्राट अशोक राजा नक्की कोण होता?

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा "सम्राट अशोक" नावाचा राजा होऊन गेला. त्याने न केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले, तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया यांची शिवकण दिली. प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला. अशा या महान सम्राट अशोकाची माहिती आपल्याला वासुदेव गोविंद आपटे लिखीत "सम्राट अशोक चरित्र" हा ग्रंथातून सविस्तरपणे मिळते. लेखकाने पुराणे किंवा दंतकथा यावर विसंबून न राहता आत्तापर्यंत मिळालेल्या अशोकाच्या शिलालेखांचा योग्यप्रकारे अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने हे चरित्र लिहिले आहे.

पार्श्वभूमी :

वासुदेव गोविंद आपटे यांनी इ स १८९८ मध्ये सम्राट अशोक याच्या चरित्राची रूपरेखा लिहून 'ग्रंथमाला' मासिकाद्वारे प्रकाशित केली होती. त्याकाळी सम्राट अशोकाच्या चरित्राबाबत फार कमी साधने उपलब्ध होती. इंग्रजी भाषेतही तेंव्हा अशोकाचे एकही चरित्र लिहीले गेले नव्हते. आपटे यांनी सुरूवातीला लिहीलेल्या या चरित्रात अशोकाच्या काही दंतकथा, अशोकाच्या काही लेखांचा सारांश, व त्यावरून अशोकाचा स्वभाव, वर्तन, राज्यव्यवस्था, धर्मपरायणता, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींच्या संबंधाने काढलेली अनुमाने याचाच समावेश होता. परंतु अशा तर्हेचा मराठीत केलेला सामान्य प्रयत्न सुद्धा अपूर्व वाटावा असा तो काळ होता. त्यावेळच्या ग्रेटप्रायमर टाइपाचें ८८ पृष्ठांचा हा चरित्र ग्रंथ तयार झाला. तत्कालीन अनेक प्रख्यात मराठी वृत्तपत्रांतून व मासिकांतून या चरित्र ग्रंथाविषयी प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाचा तेंव्हा हिंदी, उर्दू आणि गुजराती भाषांत अनुवादही करण्यात आला होता.

कालांतराने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अशोकासंबंधाचे कितीतरी नवीन शोध लागले. अशोकाच्या स्तंभ व गिरीलेखांची पाश्चात्य व भारतीय पंडितांनी केलेली चिकित्सा ग्रंथाच्या रूपाने वाचकांना उपलब्ध झाली. विन्सेंट स्मित या जगप्रसिध्द इतिहासकाराचे इंग्रजी भाषेत अशोकाचे चरित्र लिहील्याने अनेकांना याचा फायदा झाला. वासुदेव गोविंद आपटे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहीलेल्या मराठीतील पहिल्या सम्राट अशोक चरित्राला श्री प्र. रा. अहिरराव यांनी आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून परिपूर्ण विकसित केले. त्याची सुधारीत आवृत्ती डिसेंबर २००२ ला वरदा बुक्सच्या माध्यमातून प्रसारित केली.

अशोक पुर्वीचा काळ :
अशोककालीन काही स्थळांचा उल्लेख वायुपुराण, विष्णूपुराण आणि भिष्मपुराण यामध्ये आढळतो. पुराणकारांनी अशोकाच्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे पण त्यात एकवाक्यता नाही. मौर्य घराण्याचा उदय होण्यापूर्वी मगधावर अनेक घराण्यांनी राज्य केले. मौर्यांची मगधवर सत्ता स्थापन होण्याच्या आधी महापद्मनंद हा नंद वंशाचा राजा राज्य करत होता. याच्याच कारकिर्दीत इतिहास प्रसिध्द जगज्जेता अलेक्झांडर ऊर्फ सिंकदर याची भारतावर स्वारी आली होती. पण अलेक्झांडर पंजाबची हद्द ओलांडून खाली न आल्याने त्याचा व महापद्मनंद याचा मुकाबला झालाच नाही. महापद्मनंद हा मोठा शूर व पराक्रमी, पण तितकाच लोभी व निर्दय राजा होता. नंदवंशाचा उच्छेद चंद्रगुप्त मौर्य याने ब्राह्मण मुत्सद्दी कौटिल्य अथवा चाणक्य याच्या साह्याने करून मगधावर इ.स. पुर्व ३३२ साली आपली सत्ता स्थापण केली. पुराण कथेप्रमाने चंद्रगुप्त हा मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता म्हणून त्याच्या वंशास मौर्य हे नाव पडले. मौर्य सत्तेचा संस्थापक चंद्रगुप्त हा अशोकाचा अजोबा होता.

चंद्रगुप्त मौर्य चा काळ :
ग्रीक राजा अलेक्झांडर याच्या मृत्यूनंतर त्याच्या सम्राज्याचे विभाजन होऊन मध्य अशिया, अफगाणिस्तान येथे ग्रीकांची सत्ता कायम राहीली. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा सेनापती सेल्सूकस निकेटर हा मध्य अशियातील बॅक्ट्रियाचा सम्राट बनला. त्याने आपला राज्यविस्तार करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. त्याचा चंद्रगुप्त मौर्य ने दारून पराभव केला. त्याला चंद्रगुप्तशी तह करावा लागला. या तहानुसार त्याला पाचशे हत्ती, काबूल, हिराम व कंदाहर हे तीन प्रांत आणि आपली कन्या चंद्रगुप्तला द्यावे असे ठरले. या तहानंतर सेल्युकस ने मेगॅस्थनीजला पाटलीपुत्र येथे वकील म्हणून पाठवले. मेगॅस्थनीजने आपल्या सहा वर्षांच्या काळात भारताची भौगोलिक, सामाजिक व धार्मिक स्थिती यावर बरीच माहिती आपल्या "इंडिका" या ग्रंथात लिहून ठेवल्याने त्याचा उपयोग इतिहासकारांना झाला आहे.
  चंद्रगुप्तने आपल्या २४ वर्षांच्या शासन काळात मगध राज्याला फार वैभवशाली बनवले. अनेक परदेशी राज्यांपर्यंत मगधाच्या ऐश्वर्याची चर्चा होत असे. विविध देशातील राजांनी आपले वकिल मधग राज्यात ठेवले होते. मगधची राजधानी पाटलिपुत्र ही एक संपन्न आणि वैभवशाली अशी नगरी होती. हिची लांबी ५ कोस व रूंदी सुमारे २ कोस होती. तिच्या भोवती मजबूत तट व तटाभोवती खंदक होते. तटाची भिंत ४०० हात रूंद व ३०० हात उंच होती. तटात ५७० बुरूंज व ६४ दरवाजे होते. पाटलिपुत्र शहराची लोकसंख्या ४ लाख होती. राज्याच्या रक्षणासाठी ६० हजार पायदळ, ३० हजार घोडेस्वार व ८ हजार हत्ती होते. याशिवाय युद्धाच्या कामी उपयुक्त अशी ६ लाख खडी फौज होती.

चंद्रगुप्ताने मोठ्या हुशारीने सर्वांवर दबदबा ठेऊन राज्य केले. जैन ग्रंथातील उल्लेखानुसार चंद्रगुप्तने शेवटी जैन धर्माचा स्वीकार केला. आपला पुत्र बिंदुसार याच्याकडे सत्ता सोपवून तो जैन साधु होऊन दक्षीणेकडे निघून गेला.

सम्राट बिंदुसारचा कालखंड :
सम्राट बिंदुसारचे इतिहासात फारसे उल्लेख सापडत नाहीत. ग्रीक इतिहास ग्रंथात बिंदुसारचा उल्लेख अमित्रघात असा आढळतो. परंतु हिंदुचे विष्णूपुराण, बोद्धांचा महावंश ग्रंथ आणि जैनांचा परिशिष्टपर्व ग्रंथ यातून चंद्रगुप्तच्या मुलाचे नाव बिंदुसार हेच आढळते.

बिंदुसारने चंद्रगुप्तच्या वेळेचे राज्यकारभाराचे धोरण चालू ठेऊन देशात शांतता राहील असे प्रयत्न केले. चंद्रगुप्ताने जो ग्रीक राजांशी स्नेहसंबंध जोडला तो बिंदुसारनेही चालू ठेवला.  बिंदुसारच्या पदरी खल्लटक आणि राधागुप्त नावाचे दोन हुशार मंत्री होते. २५ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. पुर्व २७३ साली त्याचा मृत्यु झाला.

अशोकाचे राज्यारोहन :
बौद्ध धर्म ग्रंथातून अशोकाच्या संबंधी अनेक दंतकथा रूढ आहेत. त्यानुसार तो स्वभावाने अत्यंत क्रूर व दुष्ट होता. राज्य मिळवण्यासाठी त्याने आपल्या ९९ भावंडांना ठार मारले व क्षुल्लक कारणांवरून आपल्या राण्यांचा शिरच्छेद केला असा उल्लेख आढळतो. परंतु विन्सेंट स्मित व इतर मान्यवर इतिहासकारांनी हे विधान चुकीचे ठरवले आहे. अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याचे जे साधुत्वाचे वर्तन त्याच्या चरित्रातून दिसून येते ते बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे घडलेले परिवर्तन होय आणि असे परिवर्तन घडवून आणण्याची अलौकिक शक्ती त्या धर्माच्या ठायी आहे हे लोकांच्या डोळ्यात भरावे म्हणून अशोकाच्या पुर्वायुष्यावर बौद्ध ग्रंथकारांनी काजळ फासले असावे.

अशोकने संम्राट होण्यापूर्वी तक्षशिला व उज्जेन येथे राजप्रतिनिधी म्हणून खूप चांगले काम केले होते. तेथिल बंड त्याने कुठलाच रक्तपात न करता मोडून काढले होते. त्या मानाने त्याचा मोठा भाऊ सुशीम हा फार क्रुर व दुष्ट होता. या दोघांत सम्राट बिंदुसारच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी युद्ध झाले असणार आणि त्यात सुशीमचा मृत्यू होऊन अशोक मगधचा सम्राट झाला ही शक्यता अनेक इतिहासकारांनी मान्य केली आहे.

कलिंग विजय :
कलिंग विजय ही प्राचीन भारताच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. या युद्धामुळे प्राचीन भारतीय इतिहासात फार दूरगामी परीणाम झाल्याचे दिसतात. कलिंग राज्य भारताच्या पूर्वेला ओरीसा राज्याच्या जवळपास होते. या युद्धामुळे अशोकाच्या चरित्राचा प्रवाह बदलून तो एक विस्तारवादी राजा ते धर्मिक व मानवतावादी राजा बनला. कलिंग सारखे प्रचंड राज्य काबीज केले म्हणजे आपल्या पुर्वजांनी आरंभिलेला भारतदिग्विजय पुर्ण होईल या लालसेने त्याने या देशावर आक्रमण केले असावे. कलिंग युद्ध अशोकाच्या राज्यारोहणापासून १३ व्या वर्षी म्हणजे इ. स. पुर्व २६१ ला घडले.

अशोकाने स्वतःच या प्रसंगाचा उल्लेख आपल्या १३ व्या गिरीलेखात विस्ताराने केला आहे. त्यात म्हटले आहे की देवांचा प्रिय राजा याने राज्याभिषेकाला आठ वर्षे होऊन गेल्यावर कलिंग देश जिंकला. तेंव्हा दीड लक्ष लोक कैद करण्यात आले, एक लक्ष लोकांना मारण्यात आले, आणि या संख्येच्या अनेक पट लोक युद्धामुळे धान्यचंटाई, महामारी किंवा साथीच्या रोगांनी बळी पडले. इतकी प्राणहानी आपली विजयप्राप्तीची आकांक्षा व साम्राज्यविस्ताराची हाव यांच्यामुळे घडून आली. हे पाहुन अशोकाच्या मनाला घोर पश्चात्ताप झाला आणि तेंव्हापासून त्याने निश्चय केला की हिंसाचाराचा मार्ग यानंतर कधीच अवलंबायचा नाही.

बौद्ध धर्माचा स्वीकार :
कलिंगविजयाच्या वेळी झालेल्या भयंकर प्राणहानीमुळे झालेल्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी व अंतःकरणाला शांती देण्यासाठी भूतदयाप्रधान बौद्ध धर्म योग्य असल्याने तो अशोकाने स्वीकारला असावा. अशोकाच्या वेळी बौद्धधर्म त्याच्या शुद्ध स्वरूपात होता. आणि निरनिराळ्या धर्मप्रचारकांकडून तो उपदेशिला जात होता. मगध राज्यात असा कुठलाच प्रदेश नव्हता तिथे बौद्धभिक्षूंचा व धर्मप्रचारकांचा प्रवेश झाला नव्हता. बौद्धधर्म स्विकारल्यानंतर अशोकाने अनेक ठिकाणी तर्थयात्रा केली.
अशोकाचे शिलालेख :

सम्राट अशोकाच्या संबंधीत जी विश्वसनीय इतिहास सामग्री उपलब्ध झाली आहे ती मुख्यत्वे त्याचे विशाल गिरीलेख, लघु गिरीलेख, विशाल स्तंभलेख, लघु स्तंभलेख आणि गुंफा लेख  अशा पाच प्रकारच्या शिलालेखतून मिळते.

शिलालेखांची भाषा आणि लिपी :
सम्राट अशोकाने सगळे लेख रस्त्याने जाणा-या येणा-या लोकांना कळावेत म्हणून मुद्दामहून महत्वाच्या मार्गांवर कोरले आहे. सर्व लेखांची भाषा सुटसुटीत व सोपी असून ते प्रादेशिक लिपीत लिहीले गेले आहेत. अशोकाचे लेख हे सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेत व खरोष्ठी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी ही देवनागरी लिपीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. तर खरोष्ठी लिपी पारशी-अरबी लिपीप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.

या लेखांवरून असा अंदाज लावता येतो की त्या काळी प्राकृत भाषा ही भारतात मोठ्या प्रमाणावर बोलली जात होती व भारत खंडातील सर्व भाषा या ब्राह्मी लिपीतून लिहीण्याचा प्रघात होता. 

अशोकाचे चौदा गिरीलेख ऊर्फ आदेश :

अशोकाच्या सर्व लेखात त्याच्या चौदा गिरीलेख किंवा आदेशांचे विशेष महत्त्व आहे. हे चौदा आदेश आठ वेगवेगळ्या ठिकाणी विखूरलेले आहेत. त्यात धौली, शाहबाजगढी, मानसेहरा, कालसी, जौगढ, सोपरा, एरागुडी आणि गिरनार या ठिकाणांचा समावेश होतो. प्रत्येक लेखात काही ना काही महत्वाचा विषय आला आहे व त्यावरून अशोकाचा स्वभाव, त्याची धर्ममते, राज्यव्यवस्था, तत्कालीन समाजस्थिती इत्यादी गोष्टींवर महत्वाचा प्रकाश पडला आहे.

अशोकाच्या सर्व शिलालेखांचे मराठीत भाषांतर लेखकाने या ग्रंथात दिल्याने हा ग्रंथ इतिहास अभ्यासकांसाठी फार मोल्यवान ठरला आहे.

अशोकाचे चौदा आदेश व त्यांचे विषय

आदेश १ : प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेला विरोध
आदेश २ : मनुष्य व प्राणी यांच्या चिकीत्सालयाची निर्मिती
आदेश ३ : राज्यातील सर्व वरिष्ठ राजुक अधिका-यांना प्रत्येक पाच पाच वर्षांनी धर्म प्रचारासाठी दौरे काढण्याचा आदेश.
आदेश ४ : लोकांत धर्माचरण वाढल्याचे समाधान व ते आणखी वाढण्यासाठी राजाची वचनबद्धता व्यक्त
आदेश ५ : राज्यात धर्ममहामात्रांची नियुक्ती. या पाचव्या आदेशात राष्ट्रीक व प्रतिष्ठानिक असे शब्द आले असून ते अनुक्रमे महाराष्ट्र व प्रतिष्ठान किंवा पैठण यांचा उल्लेख आहे.
आदेश ६ : राजा म्हणून प्रजेची कामे सर्व ठिकाणी करत राहीन. या आदेशात अशोकाची प्रजेच्या हिताची तळमळ व स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याची तयारी यागोष्टी दर्शविल्या आहेत.
आदेश ७ : सर्व संप्रदायांनी एकत्र राहावे
आदेश ८ : तिर्थ यात्रेचे वर्णन
आदेश ९ : धर्मकृत्ये आणि मंगलकृत्ये याचे वर्णन
आदेश १० : राजा व उच्च अधिकारी नेहमी प्रजेच्या हितासाठी दक्ष राहतील
आदेश ११: धम्म आणि धर्म याची व्याख्या
आदेश १२ : स्रीधर्ममहामात्रांची नियुक्ती. सर्व संप्रदायांनी परस्परांशी मित्रत्वाने वागावे
आदेश १३ : कलिंग युद्धाचे व झालेल्या हाणीचे वर्णन. अशोकाचे मन परिवर्तन घडवून आल्याचे या आदेशावरून स्पष्ट होते.
आदेश १४ : धार्मिक जीवन जगण्याची प्रेरणा. हा शेवटचा आदेश उपसंहाराच्या स्वरूपाचा आहे.

अशोकाचे स्तंभलेख :
अशोकाचे स्तंभलेख दिल्ली - तोपरा, मीरत, अलाहाबाद, सारनाथ, सांंची, कंधार अफगाणिस्तान, अमरावती या ठिकाणी मिळून एकंदर सात आहेत. हे लेख नुसत्या अधिका-यांनाच उद्देशून लिहिलेले नसून एकंदरीत प्रजेला उद्देशून आहेत, व त्यात राज्यशासनाची तत्वे, धर्माचरण, आत्मपरीक्षण, हितसंबंधाचे नियम, धर्मानुराग, धर्मप्रचार्थ योजना इत्यादी भिन्न भिन्न विषय आलेले आहेत.

शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व :
अशोकाचे शिलालेख हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या कलिंगच्या युद्धाची माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.

अशोक कालीन राज्यव्यवस्था व समाजस्थिती :
मगध हे भव्य राज्य होते. त्यावेळच्या मगध राज्यात आत्ताचा बहुतांश भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या यांचा समावेश होता. २५०० वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या साम्राजाची व्यवस्था ठेवणे किती कठीण काम असेल याची कल्पनाच न केलेली बरी. मगध राज्याचे पाच वेगवेगळ्या प्रांतात विभाजन करण्यात आले होते. हे प्रांत म्हणजे मगध, तक्षशिला, सुवर्णगिरी, उज्जेन आणि तोसली. मगध प्रांताचा कारभार राजा स्वतः पाही तर इतर प्रांतावर राजकुमारांची प्रांतपाल किंवा सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात येई. चंद्रगुप्त मौर्यचा पंतप्रधान चाणक्याने घालून दिलेल्या नियमानुसारच अशोकाची राज्य पद्धती होती. राज्यकारभार पाहण्यासाठी वेगवेगळे विभाग व आधिकारी होते. अशोकाने नवीन आधिका-यांच्या नियुक्त्या केल्याचा उल्लेख त्याच्या लेखात आला आहे. अशोकाच्या कारकिर्दीत कुठे त्याच्या राज्यात उठाव व बंड झाल्याने आढळून येत नाही. यावरून त्याची संपूर्ण मगध राज्यावर मजबूत पकड होती असे दिसते. एकुणच अशोकाच्या काळी समाजात सुबत्ता होती. उत्कृष्ट न्यायदान अधिकारी तत्पर आधिकारीवर्ग यामुळे राज्यकारभारही चांगल्याप्रकारे होत होता.

त्याकाळी मगध राज्य हे शिक्षण व्यवस्थेसाठी फार प्रसिद्ध होते. तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठातून उत्कृष्ट शिक्षण दिले जात होते. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विदेशातून विद्यार्थी येत होते, असे उल्लेख सापडतात. संस्कृत भाषा, पाली भाषा, तत्वज्ञान, अर्थशास्त्र आणि धर्मशास्र यासारख्या विविध विषयात शिक्षण दिले जात होते.

या ग्रंथात तिस-या धर्मपरीषदेची ही सविस्तर माहीती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अशोक कालिक स्थापत्यकला यांचीही माहिती विस्ताराने दिली आहे. सम्राट अशोकासंबंधी प्रचलित असलेल्या विविध धर्म ग्रंथातील दंतकथाही देण्यात आल्या आहेत. अशोकाचा मृत्यू व त्यानंतरच्या कालखंडावर लेखकाने बरीच माहीती दिली आहे.

एकूणच हा ग्रंथ प्राचीन इतिहास अभ्यासक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य असा बहुमोल ग्रंथ आहे.

~ © गणेश भाऊसाहेब पोटफोडे