स्वामी वैशिष्ट्य म्हणजे यात केलेले स्थलवर्णन, व्यक्तीवर्णन. ही वर्णने वाचताना हुबेहुब व्यक्ती आणि प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. असली वर्णने साकारणे हे कादंबरीकारासाठी मोठे दिव्य असते. यासाठी त्यांना इतर किती गोष्टींचा अभ्यास करावा लागत असेल हे त्यानाच ठाऊक, असो. ह्या कादंबरीत माधवरावाच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटना, त्या भोवती फिरणारे राजकारण, सरदार आणि कारभारी लोकात बसलेली तरूण पेशव्याची वचक, राघोबादादांची कारस्थाने आणि महत्वाचे म्हणजे रमाबाई आणि माधवराव याचे प्रेम संबंध यावर सविस्तर विश्लेषण केले आहे. स्वामी तीन प्रकरणात विभागली गेली आहे. ही तीन प्रकरणे विभागतांना लेखकाने फार काळजी घेतली आहे.
14 जानेवारी 1761 ला पानपतावर सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेचा पराजय होतो. या युद्धात भाऊंसह विश्वासराव हा भावी पेशवा धारातिर्थी पडतो. गिलच्यांचा हातुन मराठी फौजेची व बाजार बुणग्यांची बेसुमार कत्तल होते. नानासाहेब पेशवे हा धक्का सहन न करू शकल्याने पानपतानंतर काही महिन्यातच (23 जुन 1761) त्यांचा मृत्यु होतो. पेशवाईचे मुख्य वारस विश्वासराव आधीच लढाईत मारले गेल्याने पेशवाईची वस्त्र नानासाहेबांचे द्वितीय पुत्र माधवराव यांना मिळतात. अवघ्या सोळाव्या वर्षी 20 जुलै 1761 रोजी माधवराव पेशव्यांच्या मसनदीवर आरूढ होतात. पेशवे पदासाठी गुडघ्यावर बाशिंग बांधुन बसलेल्या नानासाहेब पेशव्यांचे धाकले भाऊ राघोबादादांना हे सहन होत नाही आणि येथूनच सुरूवात होते ती गृह युद्धाला.
पानपतावर जबरदस्त हानी नंतर दख्खन मधील निजाम व कर्नाटकातील हैदर अली यांना जोर चढतो. त्यात अजून कमी की काय नागपूरकर भोसल्यांना देखील सातारा गादीचे स्वप्न पडू लागतात. माधवरावाची जेमतेम 11 वर्षांची कारकीर्द याच घटनांनी व्यापून जाते. हैदरचा बिमोड करण्यासाठी कर्नाटकच्या चार, निजाम विरूद्ध दोन आणि भोसल्या विरूद्ध दोन अश्या एकूण आठ स्वाऱ्या हा तरूण पेशवा जबाबदारीने पार पाडतो. राघोबादादांना अनेक वेळा समजावून सांगितो, त्याच्या कडे आळेगावत स्वतःला ओलिस ठेवतो परंतु राघोबादादांच्या कारवायांना पुर्णपणे पायबंद बसत नसल्याने शेवटी माधवराव त्यांना नजर कैदेत ठेवण्याचा हुकूम देतात.
माधवरावाच्या जीवनातील महत्वाची भावनिक बाजू म्हणजे त्यांची आई गोपिकाबाई. निजामाच्या स्वारीत असतांना निजाम पुण्यात येऊन सर्व शहर लुटतो. पर्वतीवर श्री भंग करतो. यावेळी पेशव्यांचे सख्खे मामा रास्ते हे निजामाला मदत करतात म्हणून माधवराव त्यांना 5000 रूपये दंड ठोठावतात. दंड मागे घे नाहीतर मी शनिवारवाड्यात पाणी पिण्यासही थांबणार नाही असे गोपिकाबाई माधवरावास ठणकावून सांगतात. परंतू कर्तव्यदक्ष माधवराव दंड मागे घेत नाहीत. याचा राग येऊन गोपिकाबाई कायमच्या गंगापूरला निघून जातात. परत माधवरावांची व गोपिकाबाई यांची भेट होत नाही. माधवराव एकाकी पडतात. रमाबाई सोडल्यास त्यांना जवळचे असे कोणीच रहात नाही. सारख्या धकाधकीच्या जीवनात त्याना रमाबाईना वेळ देता येत नाही. यातच माधवरावना क्षयाचा गंभीर आजार होतो. या आजारात माधवराव थेऊर येथे दि. 18 नोव्हेंबर 1772 रोजी मरण पावतात. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. माधवरावाच्या आदेशानुसार नुसार रमाबाई सहगमन करतात. तिचे वृंदावन थेऊरयेथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.
स्वामीची शेवटची 20 पाने फार भावनिक आहेत. रमाबाई सती जातानांचा प्रसंग वाचतांना काळजात फार कालवा कालव होते. डोळ्यात अश्रु तरळतात.
मी ही कादंबरी आत्तापर्यंत दोनदा वाचली आहे. अजून किती वेळेस वाचेल हे सांगता येत नाही.