रविवार, १० जानेवारी, २०१६

'शाळा' (लेखक : मिलिंद बोकील)



'शाळा' वाचताना अस वाटत होत की कादंबरीचा नायक लेखक नाही तर आपण स्वतःच आहोत. या कादंबरीतील बर्‍याच गोष्टी आपण आपल्या शाळेय जीवनात अनुभवलेल्या आहेत. कादंबरीची सुरुवात नववीच्या वर्षापासून होते. शाळा दुपारी बारा चाळीसला भरायची. पण लेखक (मुकुंद जोशी कादंबरीतील नाव) आकरा वाजताच घरातून निघायचा. लेखकाची बहिण काॅलेजला सकाळीच जायची त्यामुळे त्याला शाळेत लवकर का जातो म्हणून विचारणारे कोणी नव्हते. आईला स्काउट बॅण्डच्या प्रॅक्टीसला जातो म्हणून तो सांगायचा. पण आईला फारस कळायच नाही म्हणून ती जास्त विचारीत नसे. सुऱ्या, चित्र्या आणि फावड्या व लेखक ही चौघेजण शाळेच्या रस्त्यावर बांधकाम चालू असलेल्या सुऱ्याच्या बिल्डिंगवर जमायचे. सर्व मित्रांना काहीतरी टोपणनाव होते. अगदी आपण वापरायचो तशी.
ते रोज त्या बिल्डिंग मधून येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलींना व शिक्षकांना चिडवायचे.
     सुऱ्या आठवीच्या गुप्ते वर लाईन मारायचा. ती केवड्याच्या फुलांची वेणी घालून यायची म्हणून तिचे टोपणनाव केवडा पडले. सुऱ्या तिच्यावर फारच फिदा झाला होता. तो सारखा केवड्याचाच विचार करायचा. शाळेत कोण कोणावर लाईन मारतो याची सर्व माहिती मुलांना असायची. लेखकही वर्गात नवीन आलेल्या शिरोडकर  नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो ही मग शिरोडकर वर लाईन गुपचूप लाईन मारू लागतो. यावर कोणी डाऊट खाऊ नये म्हणून तो बर्‍याच गोष्टींची काळजी घेतो. सुऱ्या सारखा तो उघड उघड बोलत नाही.
      लेखक आपल्या बहिणीला आंबाबाई म्हणायचा. ती सारखी प्रत्येक कामात लुडबुड करायची. वडील शांत होते. ते सचिवालयात नोकरीला होते. आई जरी शांत असली तरी ती चिडल्यावर लेखक तिला घाबरत असे. तो आईला आईसाहेब म्हणायचा. या कादंबरीत नरू मामा नावाचे एक महत्त्वाचे पात्र आहे. तो लेखकाचा सख्ख्या मामा असतो. आई पासुन तो वयाने लहान होता. तो शाळेत इंग्रजी शिकवायचा. तो जेव्हा जेव्हा मुंबईत यायचा तेव्हा तो लेखकाला इंग्रजी चित्रपट पहायला घेऊन जायचा. दोघांचे संबंध फार मैत्रीचे होते. लेखक आणि नरू मामा मुलींच्या विषयी गप्पा मारत. लेखक बर्‍याचदा मित्रांचे नाव सांगून त्याच्या कडून टिप्स मिळवायचा. ही कहाणी साधारणपणे 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळात घडलेली आहे. आणीबाणीचा बराच उल्लेख यामध्ये येतो. शाळेतही इंदिरा गांधींच्या सर्मथनात गाणी गायला लावायचे. या वेळची दडपशाही याची माहिती लेखक देतो.
     शिरोडकर एक ठिकाणी क्लास लावते हे लेखकाला समजते. मग तोही तिथेच क्लास लावतो. तो सारखा शिरोडकरला भेटायचा प्रयत्न करतो. तिच्यावर पाळत ठेवून ती कुठल्या रस्त्याने येते जाते याची माहिती मिळवतो. शेवटी त्यांची भेट होते. शिरोडकरला कळते कि जोशी आपल्यावर लाईन मारत आहे. शाळेतल्या इंग्रजीच्या बेंद्रे बाई फारच कडक होत्या. त्यांच्या इंग्रजीच्या तासाच्या आधी तो फळ्यावर अनुशासनपर्व असे लिहीतो. तेव्हातर त्याला बेंद्रे बाई फार मारतात.
     कहाणीचा शेवट हा मोठा नाट्यमय होतो. सुऱ्या एकदा बिल्डिंगवरून केवड्याला एकटीच येताना पाहतो. सुऱ्या तिला लेखकाच्या मदतीने थेट जाऊन विचारतो. ये आपल्याला लाईन देते का? केवडा घरी आपल्या वडिलांना ही हकिकत सांगते. दुसर्‍या दिवशी त्याचे वडील शाळेत तक्रार घेऊन येतात. तेव्हा ते त्या दोघांना फार मारतात. त्याना पालकांना बोलवून घ्यायला सांगितले जाते. सुऱ्याच्या घरी जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याचे वडील त्याला फार मारतात. लेखकालाही घरी बोलणे बसतात. दुसर्‍या दिवशी पालक येतात. पण तोपर्यंत याचा बोभाटा शाळाभर होतो. शिरोडकर लेखकाकडे पहायचे सोडून देते. शाळेची परीक्षा संपून सुट्टी लागते. सुट्टीत लेखक आजोळी नरू मामाच्या लग्नाला जातो. शाळेचा निकाल लागतो. लेखक पाचवा नंबर मिळवतो. सुऱ्या आणि फावड्या नापास होतात. शिरोडकर निकाल घ्यायला आलेली नसते. नंतर लेखकाला तिच्या वडिलांची बदली झाल्याचे कळते. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो.
     शाळा कादंबरीत अनेक ठीकाणी गमतीदार विनोद आढळतात. कादंबरी वाचताना आपण भूतकाळात जातो. आपल्या शाळेय जीवनाची आठवण येते.

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

दुबईतील गुलाबी थंडी

ऑक्टोबर सरता सरता दुबईतील तापमानाचा पारा खाली उतरू लागतो. जीव नकोसा करणारा, अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपतो आणि चाहूल लागते ती हिवाळ्याची. नोव्हेंबर महिन्यात तापमान सामान्य होत जाते. बहुतेक घरातील ए सी बंद राहतात. भर दुपारी बाहेर फिरताना उन्हाची रखरख जाणवत नाही.

डिसेंबर महिन्यात बहुतेक वेळा आकाश काळ्या ढगांनी व्यापून जाते. या महिन्यात बरेचदा पाऊल अनुभवायला मिळतो. पाऊस आणि उत्तर पश्चिम दिशेकडून वाहणारा वारा यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. सलग आठ नऊ महिने अडगळीत पडलेली स्वेटर, मफलर बाहेर पडू लागतात. पावसाचे ठराविक प्रसंग सोडल्यास आकाश मोकळे असते. उबदार कोवळे उन अंगाखांद्यावर घ्यावेसे वाटते. दुबईतील बाग बगीचे, रस्ते मनमोहक सुगंधी फुलांनी सजवले जातात. स्वतःला वातानुकूलित घरात, गाडीत बंद करून ठेवणारे दुबईकर मुक्तपणे उघड्या गाडीतून फिरू लागतात.

दुबईतील रस्ते पर्यटकांनी भरून जातात. दुबईतील गुलाबी थंडी अनुभवायला देशविदेशातील पाहुणे डेरेदाखल होतात. परदेशी पाहुण्यात पक्षांचाही समावेश असतो. दुबई क्रिकवर परदेशी पक्षी मनमोकळेपणे वातावरणाचा आनंद लुटतात. आपल्या देशात अंग गोठणाऱ्या कडाक्याच्या थंडीपेक्षा इथले वातावरण त्यांना स्वर्गा सारखे भासू लागते.

नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबई आता जागतिक केंद्र बनले आहे. येथली आतिषबाजी पाहण्यास लाखो पर्यटक येतात. बुर्ज खलिफा, बुर्ज अल अरब, पाम आयलंड वरील नयनरम्य आतिषबाजी अनुभवायला प्रचंड गर्दी होते. नाताळ व नवीन वर्षाची येथे सरकारी सुट्टी असल्याने डिसेंबरचा शेवटचा आठवडा उत्साहात सरून जातो.

जानेवारी महिन्यात दुबई शॉपिंग फेस्टिवलची सुरूवात होते. दुबईतील हाॅटेल व पर्यटन व्यावसायिकांसाठी हा सुवर्ण काळ असतो. विविध ऑफर्स आणि योजना घेऊन दुबईतील दुकाने व माॅल्स तयार होतात. सोने खरेदीला उधाण येते. सोन्याची या दिवसात एवढी मोठी खरेदी होते की दर दिवशी एका भाग्यवान विजेत्याला चक्क एक किलो सोने बक्षिस म्हणून दिले जाते.

ग्लोबल व्हिलेज, समुद्र किनारे, माॅल्स अक्षरश: भरून जातात. या दिवसात लोक डेझर्ट सफारीचा आनंद घेतात. थंड वातावरणात वाळवंट अनुभवायला मिळतो. बरेच लोक वाळवंटात कॅम्प करून राहतात. फेब्रुवारी सरता सरता दुबईतील पर्यटक मायदेशी निघतात.

मार्च सुरू झाल्यावर तापमानाचा पारा परत चढू लागतो. हवा हवासा वाटणारा हिवाळा संपलेला असतो. पूढील आठ महिने हिवाळ्याची वाट पाहण्यात कंठावे लागतात.

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

इमानदारी की भिती??

वेळ मध्यान्हाची, स्थळ एक दक्षिण भारतीय नामांकित सोन्याचे दालन, मीना बाजार, बर दुबई.

दुबईतील सोने हा आता भारतीयांच्या जीवनातील एक मायावी घटक बनला आहे. दुबईत कुठल्याही कामासाठी आलेला भारतीय सोने खरेदी केल्या खेरीज आभावानेच जात असावा. माझे काही ओळखीचे लोक पर्यटनाला म्हणून दुबईत आले होते. त्यांना सोने खरेदी करण्याची फार इच्छा. म्हणून मी त्यांना घेऊन मीना बाजार आलो होतो.

"या" दालनात आल्यावर साखळी घेण्याचे ठरले. ही डिझाईन, ती डिझाईन, दुबई मेक, सिंगापूर मेक. मेकिंग चार्जेस मध्ये किती कमी करतो? हे ते अशी बरीच घासाघीस. मग ही साखळी घालून पाहा, ती घालून पाहा वगैरे अक्षरशः दोन तास चालू होते. तो सेल्समन पूरा वैतागला होता. साखळी घेणार्‍या पाहुण्यांचे प्रश्न संपत नव्हते. तेच तेच प्रश्न 10 वेळेस विचारले जात होते. शेवटी एक सिंगापूर डिझाईन पसंत पडली. 11 दिरहम प्रति ग्रॅम मेकिंग चार्जेस सह. बील झाले. मी मनात 'सुटलो बुवा एकदाचे' म्हणत बाहेर पडलो.

आता एकाची खरेदी झाली. दुसर्‍याची बाकी होती म्हणून परत एका वेगळ्या दालनात गेलोत. मीना बाजार मध्ये सोन्याची दालने उदंड. या दालनातही परत तिच घासाघीस. एकाने साखळी घालण्यासाठी गळ्या भोवती नेली. तर काय एक साखळी गळ्यात अगोदरच होती. म्हणजे आधीच्या दुकानात साखळी घालून पाहतांना ती तशीच राहिली होती. आमच्या दोघांची नजरा नजर झाली. ते म्हणाले आता काय करायचे? माझ्या पाया खालचा वाळवंटच सरकला होता. हा प्रकार तोही हायटेक दुबईत? बापरे. माझ्या काळजाचे ठोके आता वाढत होते. जरी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नसली तरी आम्हाला पकडने म्हणजे चूटकीचा खेळ.

क्षणार्धात आम्ही ते दालन गाठले. त्या सेल्समनला बाजूला घेऊन घडला प्रकार सांगितला. दोन तोळे वजनाची साखळी आम्ही परत केली. तो सेल्समन आमच्या कडे अवाक होऊन पाहात राहिला. त्यालाही त्याची चूक समजली होती.

आम्ही मोकळ्या मनाने दालना बाहेर पडलो. ही आमची इमानदारी होती का भिती देव जाणे (?)

-गणेश

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

जयंती की ऊरूस???

"दिवाणजी!"....
"कहा मर गये सबके सब"

दिवाणजी आपल दाटूनच पळत आल्यासारखा बोलला

"गुस्ताखी ला क्षमा असावी पातशाहा"
"मी आलंमपन्हा साठी वीडा बनवत होतो"

"हमे अभी इन काफिरोंकी धरती का पाणी पण नाही प्यायचय"
"आम्ही बहोत उदास झालो अहोत" पृथ्वीपती खिन्न होऊन म्हणाला.

आता दिवाणजीच्या कपाळात गेल्या होत्या. हा थेरडा आपल्याला उकळत्या कढाईत टाकेल नाही तर करवातीने डोक्यापासून ढुंगनापर्यंत दोन फांगळ्या करवेल.

"चुकीला माफी, आम्हाला अभय द्या"
दिवाणजी घाबरत म्हणाला.

"हम आपल्यावर नाही ये दख्खनके वजीर-ए-आला वर नाराज आहोत"
"ये मै काय सून रहा हूं?"

आलंमपन्हाची दख्खनी मराठी ऐकून दिवाणजी फार खूष झाला
"आलमगीर पातशाहा दख्खन ची जूबान छान बोलतायत आता" 
दिवाणाने हळूच टोला हनला.

"का नाही बोलणार?"
"अब हमे यहा मराठोंकी सरजमीन पर गढे हुये पूरे तीन अलफ साल झालेत"
"तो हमे बेशक यायला पाहिजे ही जूबान"
"आमच्यानंतर ही जुबान अटकेपार जावून आलिये. हे विसरलात काय दिवाणजी?"
"खू खू !!!"
पातशहाचा रागाच्या भरात बोलता बोलता उबाळी येवून थांबला

"पण आलंमपन्हा आपणास काय झालय आज?"
दंतहीन बोळक्याचा आवंढा गिळत दिवाण म्हणाला.

"हे पेपरात काय छापलय आज?"
आपल्या मोगली रुबाबदार भाषेत पातशाहा गरजला.

"कोणसी आखबार की बात कर रहे है आप? अभी हिंदुस्थान मे बहोत जुबान के अखबार निकते है हुजूर"
"बस निकलता नही तो सिर्फ फारसी का....
साहेबेआलम"

"खामोश....."
"तुमची ती मोगले आझमची नौटंकी बंद करा"
"कुठल्याही भाषेचा पेपर घ्या"
"आमच्या मोबाईलमध्ये हर जुबान के अखबार के अॅप है"
आपल्या कडचा iPhone 6s दाखवत बादशहा खूशीने म्हणाला.

"क्षमा असावी आलंमपन्हा मी अजून Nokia 1100 वापरतोय. माझ्याकडे नाहीत ते अॅप की काय"

"दिवाणजी तो नमक हराम सीधा राम्मेया त्या दो टकेच्या टिपूची जयंती साजरी करणार म्हणे"
"आमचा ऊरूस साजरा करायचे सोडून हे काय चाळे चाललेत या वजिरांचे"

"हमने भी सुना है ये...आलंमपन्हा...."

"तो फिर फरमान निकालके रोका क्यू नही आपने उनको"
"यहा सिर्फ हमारा ऊर्स होणा चाहिये"
पातशहाने आज्ञा सोडली

"अब हिंदुस्थान मे जम्हुरैत है आलमगीर साहेबेआलम"
"या अब सब अपणी मर्जीके मालिक है"
"हमारा फतवा अब लागू नही होता यहा" दिवाणजी म्हणाला

"तो ठीक है वजीरे आलम म्होतरमा को हमारा पैगाम दो. की हमने उन्हे तलब किया है. नही तो ओ.... बुखारी को म्होतरमा के पास भेजो.... साला दिल्ली मे हमारी दैलत का मालिक हो बैठा है वह नाचीज"
"और हा! हमरी किलत भी लेके जाव साथमे मॅडमको...
100 सोने कि अशरफिया, दो उंट, दो हाथी, चार गाय"

म्हातार्‍याच्या भ्रष्ट बुद्धीला भानावर आणण्याचा दिवाणजी प्रयत्न करू लागला.

"साहेबेआलम मॅडम म्होतरमा का तख्ता पलट हो गया है. अब यहा मोदी की हूकूमत चलती है. और दस जणपथ पर उंट, हाथी रखने की जगह नही है. वहा गाय पालन नही होता...."

"क्या??"
"फिर ये मराठे कुच करते क्यू नही?"
"अभी पेशवा रावसाहेब को sms करके बूला लो"

"आलंमपन्हा पेशवाई पण बुडालीय आता..
आता सिर्फ मोदी की सरकार...."

"तो मोदी को संदेशा दो और कहो ये जयंती होणी नही चाहिये" धाप्या टाकत आलमगीर पातशाहा बोलला.

"जी .."
"सरकार बरतानियाला गेलेत आता.... "
"आल्यावर कळवतो"
अस म्हणत दिवाणजीने खाली मान घालून तीनदा मुजरा केरून आपली पाठ न दाखवता खुलताबादच्या दर्ग्यातून बाहेर पडला.

नाराज बादशहा आपला किमाॅश डोक्यात घालून तुळशीच्या सावलीत परत झोपी गेला.