गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

आपुलकी (पु. ल. देशपांडे)



शाळेत असतांना (बहुतेक इयत्ता नववीत) अभ्यासक्रमात संत नामदेवांचा फार सुंदर अभंग होता.

परिसाचेनी संगे लोह होय सुवर्ण|
तैसा भेटे नारायण संतसंगे ||

अर्थात परीसासोबत राहिल्याने लोखंडाचे पण सोने होते. तसेच संतांबरोबर राहिल्याने देवाची प्राप्ती होते. असा या अभंगाचा मतितार्थ आहे. मी या अभंगाचा उल्लेख यासाठी करत आहे कारण असेच अनेक परीस पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यात येऊन गेले आणि त्याच्या आयुष्याचे खरोखरच सोनं झाले. हा ग्रंथ वाचल्यावर पु. ल. देशपांडे किती समृद्ध आयुष्य जगले असतील याची कल्पना येते. पु. ल. देशपांडे यांनी लिहलेला प्रत्येक ग्रंथ आणि त्या ग्रंथाची प्रत्येक ओळ म्हणजे वाचकांसाठी अद्वितीय अनुभव आहे. त्यासाठी कुठल्याच समीक्षेची गरजच नाही. मला त्यांच्या साहित्याची समीक्षा करण्याचा अजिबात अधिकार नाही पण ही माझी समीक्षा नसून असला विलक्षण ग्रंथ हातात पडल्यावर निघालेले आनंदाचे उद्गार आहेत.

पु. ल. देशपांडे यांना आपल्या जीवनात भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आठवणीचा शब्दबद्ध केलेला ठेवा म्हणजेच 'आपुलकी' होय. या ग्रंथात भाईंनी पंधरा व्यक्तिमत्त्वाचा उलगडा केला आहे. यात इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, कवी गिरीश ऊर्फ प्रा. शंकर केशव कानिटकर, श्री. रा. टिकेकर, माधव आचवल, शरद तळवलकर, आवाबेन देशपांडे, वसंतराव देशपांडे, अनंत काणेकर, शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक, शंकर घाणेकर, कवी सदाशिव अनंत शुक्ल, माधवराव वालावलकर, मटा संपादक गोविंदराव तळवलकर, नाटक प्रेमी मदनमोहन लोहिया आदींचा समावेश यात आहे.

प्रत्येक व्यक्ती बरोबर आपली ओळख कशी झाली यापासून ते थेट त्या व्यक्तीचा त्या त्या क्षेत्रातील कार्याचा आवाका, सहवासातील गमती जमती ह्या पुलंनी आपल्या अद्वितीय शब्दात वर्णन केल्या आहेत. आयुष्यात एकदातरी नक्की वाचावे असला हा ग्रंथ आहे. यातील बहुतेक व्यक्ती आता कोणाच्याही स्मरणात नसतील. हेच त्या व्यक्तींचे मोठेपण आहे. कारण यातील एकही जण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काम करत नव्हता. ध्येय वेडाने झपाटलेली ही माणसे शेवटपर्यंत साहित्य, कला, संगीत, नाटक, शिक्षण, समाजकार्य असल्या क्षेत्राच्या उन्नतीसाठी झगडत राहिली. काळाच्या ओघात आपणही त्याचे कार्य विसरत चाललो आहेत ही नक्कीच शोकांतिका आहे.

ग्रंथात मला आवडलेली काही वाक्ये :
१. प्रतिभासंपन्न कलावंताला सर्वसामान्यांपेक्षा अधिक दिसत असते, अधिक ऐकू येत असते, किंबहुना त्याच्या साऱ्या इंद्रियांना सारेच काही अधिक जाणवत असते. (पान ४३)

२. आणि पायांनी कुणीतरी रांगोळी विस्कटावी तसे ते गाणे कानांवर येता येता विस्कटले जाते. त्याच्या नसण्याच्या वेदनेवर ते सूर मात करू शकत तर नाहीच, पण तिची तीव्रता वाढवतात. (पान ७२)

प्रकाशक :मौज प्रकाशन गृह
प्रथमावृत्ती : ८ नोव्हेंबर १९९८
पाने : १४०
किंमत : १२५

~ गणेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा